शास्त्रोक्त, प्रभावी आणि ईश्वरी अधिष्ठान ठेवून औषधांची निर्मिती करणारे पू. वैद्य विनय भावेकाका !

पू. वैद्य विनय नीळकंठ भावे

 

१. आयुर्वेदाची परंपरा लाभलेले वरसईकर भावे घराणे

‘महाराष्ट्र आणि गोवा येथील वैद्यवर्गामध्ये पू. वैद्य विनय भावे हे नाव सर्वांनाच सुपरिचित होते. आयुर्वेद औषधनिर्मितीच्या क्षेत्रातील ‘वरसईकर भावे वैद्य’ हे एक मोठे नाव ! त्यांचा जन्म १९५३ या वर्षी झाला. घरात आयुर्वेदाची आणि त्यातही औषधनिर्मितीची अनेक पिढ्यांची परंपरा ! त्यांचे वडील वैद्य नीळकंठ भावे यांनी ‘सुदर्शन आयुर्वेद भवन’ या औषधनिर्मिती आस्थापनाची स्थापना केली होती. पू. भावेकाका यांचे ज्येष्ठ बंधू कै. विजय भावे यांनीसुद्धा ‘सुदर्शन आयुर्वेद भवन’च्या माध्यमातून उत्तम प्रतीच्या आयुर्वेदाच्या औषधांची निर्मिती करून आयुर्वेदाची सेवा केली.

 

२. आयुर्वेदातील शिक्षण आणि औषधनिर्मितीला आरंभ

पू. वैद्य विनय भावे १९७४ मध्ये पुण्याच्या अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयातून ‘आयुर्वेद प्रवीण’ झाले. वैद्यराज फणसळकरशास्त्री, विद्यार्थीमित्र वैद्यराज मा. वा. कोल्हटकर हे त्यांचे आयुर्वेदातील गुरु. आयुर्वेदाचे शिक्षण घेतल्यावर काही काळ पू. वैद्य विनय भावे यांनी सुदर्शन आयुर्वेद भवनच्या कार्यात सहभाग घेतला. नंतर त्यांनी वरसई येथे ‘श्री अनंतानंद औषधालय’ या नावाने स्वतःचा वेगळा कारखाना काढला.

 

३. शास्त्रोक्त आणि प्रभावी औषधांच्या निर्मितीसाठी केलेले प्रयत्न

वैद्य मेघराज पराडकर

३ अ. ‘औषधनिर्मितीमध्ये कधीही ‘शॉर्टकट’ नसतात’, हे स्वतः कृतीतून दाखवून देणे

पू. भावेकाका यांचा शास्त्रोक्त औषधे बनवण्यामध्ये कटाक्ष असायचा. आयुर्वेदात लोखंड, तांबे यांसारख्या धातूंची ‘भस्मे’ औषध म्हणून वापरली जातात. धातू तप्त करून वेगवेगळ्या औषधी द्रवांमध्ये बुडवून त्याची शुद्धी केली जाते आणि अत्यंत तीव्र तापमानावर त्या धातूला वनस्पतींसोबत भाजले जाते. असे अनेक वेळा केले की, धातू आणि वनस्पती यांचे एक संयुग बनते. याला ‘भस्म’ असे म्हणतात. या भस्मांमध्ये धातू त्याच्या मूळरूपात शेष रहात नाही. तो धातू शरिरात आरोग्यनिर्मितीचे कार्य करणारे एक औषध बनून जातो. धातूंची भस्मे बनवणे फार वेळखाऊ काम असते. ती भस्मे चांगल्या प्रतीचीच बनावी लागतात. महाराष्ट्रात अनेक आस्थापनांची भस्मे मिळत असतांनासुद्धा ‘भावेंची भस्मे म्हणजे उत्तम प्रतीची भस्मे’ असे वैद्यांमध्ये समीकरणच झाले होते. पू. भावेकाका एकेका भस्मासाठी ६ – ६ मास वेळ द्यायचे. कधीही ऑर्डर आहे, म्हणून अर्धवट बनलेली भस्मे वापरली, असे त्यांनी केले नाही. ‘औषधनिर्मितीमध्ये ‘शॉर्टकट’ उपयोगी नाहीत’, हे त्यांचे नेहमी म्हणणे असायचे. त्यांच्या या व्रतामुळे अनेक वैद्य त्यांच्याकडे एकेक वर्ष आधी औषधाची मागणी देऊन ठेवत असत.

‘गंधक रसायन’ नावाच्या औषधामध्ये शुद्ध केलेला गंधक ८ वेगवेगळ्या औषधांमध्ये प्रत्येकी ८ वेळा घोटला जातो. ‘औषध घोटणे’ याला आयुर्वेदात ‘खल करणे’ असे म्हणतात. आजकाल काही आस्थापने आठही औषधे एकत्र करून ८ वेळाच खल करतात; परंतु पू. काका गंधक रसायनाचा खल न्यूनातिन्यून ६४ दिवस चालवत. त्यापेक्षा अल्प कालावधीत गंधक रसायन करणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने ‘पाप’ होते.

३ आ. उत्तम प्रतीचा कच्चा माल वापरणे

अल्प प्रतीचा स्वस्तातला कच्चा माल वापरून औषधे बनवणे त्यांना कधीच पटायचे नाही. त्या काळात (वर्ष २००८ मध्ये) ते ज्या चित्रकादी वटी नावाच्या गोळ्या बनवत, त्यांमध्ये जो हिंग वापरत त्याचे मूल्य ८ सहस्र रुपये प्रतिकिलो असे.

३ इ. आयुर्वेदातील कठीण अशी शास्त्रीय औषधे बनवणे

आयुर्वेदाच्या मूळ ग्रंथांमधील वेगवेगळी औषधे बनवून ती रुग्णांमध्ये वापरणे हा त्यांचा छंद होता. चरक संहितेच्या ‘रसायन’ अध्यायातील ‘अमृत रसायन’ या औषधाच्या कृतीमध्ये पळसाच्या ओंडक्याचा गाभा काढून त्यामध्ये आवळे भरून ते गोवर्‍यांच्या साहाय्याने शिजवण्यास सांगितले आहे. हे अमृत रसायन अगदी याच पद्धतीने त्यांनी अनेक वेळा केले होते. साधारण ५ किलो आवळे शिजवण्यासाठी ट्रकभर गोवर्‍या लागतात, असे ते सांगायचे.

चरक संहितेत ‘महानील तेल’ नावाचे बेहड्याच्या तेलामध्ये बनवलेले केस काळे करणारे आणि चेहर्‍यावरील सुरकुत्या घालवणारे असे एक तेल आहे. पू. काका यांचे दादर येथील मित्र श्री. पटवर्धन यांनी पू. काकांकडून हे तेल बनवून घेतले होते. हे तेल बनवण्यासाठी अत्यंत दुर्मिळ असणारे बेहड्याचे तेल खास इंदूरहून मागवले होते. हे तेल ज्या लोखंडी कढईत बनवले होते, ती कढई उचलण्यासाठी ८ ते १० हट्टीकट्टी माणसे लागत. एवढी ती कढई मोठी होती. या औषधामध्ये जवळजवळ ४० लिटर आवळ्याचा रस लागला होता. हा रस पाणी न घालता काढला होता.

याचप्रमाणे नाथ परंपरेतील ‘अतुल शक्तीदाता’ यांसारखी औषधेही त्यांनी बनवून रुग्णांवर वापरली.

३ ई. पार्‍यावर अष्टसंस्कार करणे

आयुर्वेदात पार्‍याच्या औषधांचे फार महत्त्व आहे. पारायुक्त औषधे प्रभावी होण्यासाठी पार्‍यावर ८ वेगवेगळे संस्कार करावेत, असे आयुर्वेदात सांगितले आहे. याला ‘अष्टसंस्कार’ असे म्हणतात. हे संस्कार करणे पुष्कळ वेळखाऊ आणि खर्चिक असल्याने हे करण्याकडे सहसा कुणाचा कल नसतो. पू. भावेकाका यांच्या वडिलांच्या मनात पार्‍यावर अष्टसंस्कार करण्याचा विचार होता; परंतु पैशांअभावी त्या काळात केवळ पाचच संस्कार त्यांना करता आले. पू. भावेकाका यांनी त्यांच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. ते पार्‍याच्या सुवर्णयुक्त औषधांमध्ये अष्टसंस्कारित पारा वापरत असत.

३ उ. पार्‍याच्या साहाय्याने धातूंची भस्मे करण्यासाठी प्रयत्न करणे

सध्या ते भस्मनिर्मितीच्या क्षेत्रात एका महत्त्वाच्या प्रकल्पावर कार्य करत होते. पार्‍याच्या उपयोगाने अनेक धातूंची भस्मे बनवणे आणि या प्रक्रियेत वापरला जाणारा पारा पुन्हा मिळवणे, यासाठी ते प्रयत्नरत होते.

३ ऊ. औषधनिर्मितीला ईश्वरी अधिष्ठान असणे

पू. भावेकाका औषधांची निर्मिती करतांना नामजप करत. ‘श्री दुर्गासप्तशती’चा पाठ वाचत. एकनाथी भागवतासारख्या ग्रंथांचे वाचन करत. त्यांची प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉक्टर यांच्यावर अपार श्रद्धा होती. यांमुळे त्यांच्या औषधनिर्मितीच्या कार्याला ईश्वरी अधिष्ठान लाभले होते.

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

वैद्या (कु.) अपर्णा महांगडे

ए. एखादे औषध बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल मिळत नसला, तर पू. भावेकाका कधीही पर्यायी कच्चा माल अथवा भेसळ करायचे नाहीत. ‘औषध बाजारात विलंबाने गेले, तरी चालेल’, असे ते म्हणायचे.

ऐ. ते औषधीकरण करतांना सुवेर-सूतक-शौचादी सर्व नियमांचे पालन करत असत. त्यांचे वय आणि शारीरिक स्थिती नसतांनाही ते ग्रहण किंवा यज्ञ यांतील सर्व नियमांचे पालन करत असत.

ओ. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही औषधीकरण करायचो, तेव्हा त्यांनी धन्वन्तरि देवतेचा मंत्र ऐकायला सांगितला.

औ. त्यांचा ग्रंथामध्ये दिल्याप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीनेच औषधे करण्याविषयी आग्रह असायचा. ग्रंथात औषध घोटण्याचा कालावधी अधिक असतो. काही वैद्य औषधे अल्प वेळा घोटतात; पण पू. भावेकाका कधीही तसे करायचे नाहीत.

अं. पू. भावेकाका अनेक महाग औषधे, जसे सुवर्णकल्प किंवा अनेक दुर्मिळ वनस्पती असलेले तेल सिद्ध करायचे.

 

४. पू. भावेकाकांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध केलेल्या
औषधांचे ‘यू.ए.एस. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’द्वारे
निरीक्षण करणे, त्या नोंदी सकारात्मकता दर्शवत असणे

वरील कारणांमुळे त्यांच्या औषधांचा परिणामही लगेच जाणवायचा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सनातन संस्थेच्या अंतर्गत औषधांची निर्मिती केल्यावर त्याचे तुलनात्मक ‘यू.ए.एस.’ (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) द्वारे परीक्षण केले. तेव्हा गंधर्व हरितकी आणि लघूसुतशेखर या औषधांचे निरीक्षण सकारात्मक आले, तर अन्य उद्योगालयांनी केलेल्या त्याच औषधांचे निरीक्षण नकारात्मक आले.

– वैद्या (कु.) अपर्णा महांगडे

 

५. उत्तम चिकित्सक (वैद्य) असलेले पू. भावेकाका

पू. भावेकाका एक उत्तम चिकित्सक होते. ते दादरला आयुर्वेदाचे उपचार करण्यासाठी जात असत. वरसई येथे त्यांच्या घरी पुष्कळ दूरवरून अनेक लोक उपचार घेण्यासाठी येत असत.

 

६. विद्यार्थ्यांना घरच्यांप्रमाणे वागवणारे पू. भावेकाका

त्यांच्याकडे अनेक जुन्या वैद्यांच्या आठवणी होत्या. त्यांच्याकडे वरसईला आयुर्वेद महाविद्यालयांतील विद्यार्थी औषधीकरण शिकायला येत असत. सर्वांना ते घरच्यांप्रमाणे वागवत. निवासाची आणि जेवणा-खाण्याची सारी सोय करत असत.

 

७. केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर आपल्या
प्रतिस्पर्ध्यांनाही निःसंकोचपणे ज्ञान देणारे पू. भावेकाका

एकदा पुणे येथील वैद्य महेंद्र शर्मा पू. काकांकडे वरसई येथे आले होते. त्यांना एक आयुर्वेदाचा औषधांचा कारखाना काढायचा होता. त्या वेळी पू. भावेकाका यांनी वैद्य शर्मा यांना या क्षेत्रातील आपले अनुभव अत्यंत सहजपणे सांगितले. त्यांनी वैद्य शर्मा यांना अनेक बारकावेही सांगितले. समोरील व्यक्ती पुढे जाऊन आपल्याच क्षेत्रातील कारखाना काढणार आहेत, हे ठाऊक असूनसुद्धा पू. काकांनी एवढ्या मोकळेपणाने माहिती दिली, याचे वैद्य शर्मा यांना फार आश्चर्य वाटले. पुढे वैद्य शर्मा यांनी ‘चरक संहिता’ या ग्रंथाचा पुण्यामध्ये एक मोठा प्रकाशन सोहळा आयोजित केला. त्या कार्यक्रमात त्यांनी पू. भावेकाकांना बोलावले आणि तेथे त्यांचा सत्कार करून ही आठवण सर्वांना सांगितली. वैद्य महेंद्र शर्मा यांची पू. भावेकाकांशी पुष्कळ चांगली मैत्री होती. यामुळेच सनातनच्या आयुर्वेदाच्या औषधांचे उत्पादन वैद्य महेंद्र शर्मा यांच्या कारखान्यात होत आहे. वैद्य महेंद्र शर्मा यांचे मे २०२१ मध्ये दुःखद निधन झाले.

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

८. इतरांना साहाय्य करून समाजऋण फेडणार्‍या
पू. भावेकाकांना त्यांच्या निःस्वार्थ सेवेसाठी ‘रायगड भूषण’ हा पुरस्कार मिळणे

अ. सरकारी तलाठी गावामधील गरीब कामगारांना फसवून त्यांची भूमी कह्यात घेत असत. तेव्हा पू. भावेकाका त्यांच्याविरुद्ध दावा करून गरिबांना साहाय्य करायचे. त्यांच्यामध्ये इतरांना साहाय्य करण्याची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची सहजप्रवृत्ती होती.

आ. ते उच्च वर्गीय, उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित असूनही गावातील आदिवासी लोकांना आपल्या घरातील सदस्याप्रमाणे प्रेम देत होते. ते त्यांच्याकडून औषधनिर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आनंदाने घ्यायचे आणि त्यांना साहाय्यही करायचे.

इ. ‘कोकण प्रांतातील वैद्यांना औषधनिर्मितीत एकमेकांना साहाय्य व्हावे’, यांसाठी पू. भावेकाकांनी कोकण प्रांतातील वैद्यांच्या समवेत एक समिती नेमली होती.

पू. भावेकाकांना त्यांच्या या निःस्वार्थ सेवेसाठी ‘रायगड भूषण’ हा पुरस्कार प्राप्त झाला होता.

 

९. पू. भावेकाकांनी केलेली साधना

९ अ १. सप्तशती पाठ अन् भागवत सप्ताह करणे आणि
त्यातील अनेक गोष्टी साधकांना सांगून त्यांच्या अडचणी सोडवणे

पू. भावेकाका नियमित भागवत सप्ताह आणि सप्तशती पाठ यांचे वाचन करत असत. ते नियमित धन्वन्तरि यागही करत होते. ते जे वाचन करत, त्यातील साधनेसाठी उपयुक्त भागाचे ते सतत चिंतन करायचे आणि ते चिंतन इतरांनाही सांगायचे, उदा. ‘देवीमहात्म्य किंवा भागवतातील अनेक गोष्टी सांगून साधनेच्या दृष्टीने त्यातून काय बोध घ्यायला पाहिजे ?’, हे ते आम्हाला सांगायचे. अनेक साधक त्यांना स्वतःच्या अडचणी सांगायचे. तेव्हाही ते यातील उदाहरणे देऊन त्यांच्या अडचणी सोडवायचे. त्यामुळे साधकांना त्यांचा आधार वाटायचा.

९ अ २. आरत्या म्हणतांना किंवा हरिपाठ करतांना ते केवळ कर्मकांड
म्हणून न करता त्यातून ‘पू. भावेकाका भगवंताला अनुभवत होते’, असे जाणवणे

मला दोन वेळा त्यांच्या घरी जाण्याची संधी मिळाली. सकाळी पूजा झाल्यावर पू. भावेकाका देवघर पहायचे आणि पूजेतील त्रुटी सांगायचे. सायंकाळी ते अनेक आरत्या आणि हरिपाठ म्हणत असत. तेव्हा पू. भावेकाका ते कर्मकांड रूपाने न करता ‘प्रत्यक्ष देवाला अनुभवत त्याचा आनंद घेत आहेत’, असे जाणवायचे.

९ अ ३. संसारात राहून सर्व कर्तव्ये पूर्ण करणे, वैद्यकीय ज्ञान आणि
औषधीकरण यांत तज्ञ असूनही त्यात न अडकता साधनेचे महत्त्व जाणून साधना करणे

शुद्ध औषधे निर्माण करणे, उत्तम चिकित्सा आणि परंपरागत वैद्य असल्यामुळे पू. भावेकाकांची अनेक वैद्यांशी ओळख अन् जवळीक होती. आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये पू. भावेकाकांची मोठी ख्याती होती. ते औषधनिर्मितीच्या क्षेत्रात तज्ञ होते. त्यांना हवे, तर ते अनेकांना शिकवू शकले असते आणि आयुर्वेदात आणखी पुढे गेले असते; पण असे असतांनाही ते आयुर्वेदाच्या क्षेत्रात अडकून राहिले नाहीत. त्यांनी स्वतःला आयुर्वेद, संसार किंवा औषधनिर्मिती यांत मर्यादित ठेवले नाही. हे सर्व करतांना त्यांनी याच जन्मामध्ये स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी साधनाही केली. ते वर्षातून केवळ काही मास घरी जायचे. घरातील सर्व कर्तव्ये पूर्ण करत त्यांनी आध्यात्मिक प्रगती केली आणि ते संतपदावर विराजमानही झाले. संत तुकाराम महाराज यांच्याप्रमाणे संसारात राहून साधना करत ते देवाशी एकरूप झाले होते.

९ अ ४. देवाच्या सतत अनुसंधानात असणे

ते एकटे असतांना भजने म्हणत असत. त्यांचा नामजपही नेहमी चालू असे. त्यावरून ‘ते सतत देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे लक्षात यायचे. ते नेहमी सहजावस्थेत असायचे.

 

१०. कृतज्ञता

गुरुवर्य पू. वैद्य विनय भावे यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच राहील. देवाने गुरुदेवांचे धन्वन्तरितत्त्व आम्हाला पू. भावेकाकांच्या माध्यमातून मार्गदर्शनासाठी दिले होते. यासाठी मी ईश्वराच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– वैद्या (कु.) अपर्णा महांगडे, सनातन आश्रम, गोवा (२६.६.२०२१)

Leave a Comment