‘सर्व काही देवच करवून घेतो’, या भावात असणारे आणि कुटुंबियांना साधना करण्यास प्रोत्साहन देणारे सनातनचे संत पू. बलभीम येळेगावकरआजोबा !

आज आपण सनातनचे ८२ वे संत पू. बलभीम येळेगावकरआजोबा यांची त्यांच्या सुनेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहूया.

पू. बलभीम येळेगावकर
जन्मदिनांक : १४.२.१९३५

वाढदिवस : माघ शुक्ल पक्ष एकादशी (२३ फेब्रुवारी २०२१) या दिवशी झाला

संतपदी विराजमान : ५.११.२०१८

 

१. मुलगा पूर्णवेळ सेवा करू लागल्यावर
घरी पैशांची अडचण असतांना परिस्थिती सहजतेने स्वीकारणारे पू. आबा !

सौ. केतकी येळेगावकर

‘श्री. कौस्तुभ (पती) पूर्णवेळ साधना करू लागल्यावर कधी कधी घरी खर्चाला पैसे न्यून पडायचे. घरात पैशांची अडचण होती, तरी पू. आबांनी मला ती कधी जाणवू दिली नाही. तेव्हा कधी कधी पू. आबांनी नुसत्या वरणासमवेत भाकरी खाल्ली; पण कधीही चिडचिड किंवा तक्रार केली नाही. आमच्या जीवनातील प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात त्यांनी आम्हाला साथ दिली आहे आणि अजूनही तेच आमचे आधार आहेत.

 

२. पू. आबांची अनुभवलेली प्रीती !

२ अ. नातीचे अंथरूण घालून देणे

माझी मोठी मुलगी ऋतुजा (आताची सौ. स्वराली पाध्ये) लहानपणी माझ्या मांडीवर झोपायची. ‘ती झोपली आहे’, हे लक्षात आले की, पू. आबा लगेच तिच्यासाठी अंथरूण घालून द्यायचे.

२ आ. ‘मुलगा आणि सून यांना कामावर वेळेत जाता यावे’,
यासाठी स्वयंपाकात साहाय्य करून त्यांना जेवू घालणारे पू. आबा !

सौ. स्वराली ३ मासांची असतांना सकाळी ८ ते १० या वेळेत माझा बालवाडीचा वर्ग आणि शिकवणी वर्गही असायचा. त्या वेळी पू. आबा आणि सासूबाई मला अन् श्री. कौस्तुभ यांना गरम गरम भाजी-भाकरी करून जेवायला द्यायचे. तेव्हा मी त्यांना सांगायचे, ‘‘तुम्ही करू नका. मी करते.’’ तेव्हा ते म्हणायचे, ‘‘आता तुला आमच्या साहाय्याची अधिक आवश्यकता आहे. त्यामुळे ‘मीच सर्व केले पाहिजे’, असा विचार तू करू नकोस.’’ सासूबाई कर्करोगाने आजारी होत्या, तरी त्या भाकरी करायच्या आणि पू. आबा भाकरी भाजायचे. हे सर्व आठवल्यावर आजही माझी भावजागृती होते.

 

३. नातींवर चांगले संस्कार करणे

पू. आबा कर्मकांडही पुष्कळ भावपूर्ण आणि मनापासून करायचे. त्यामुळे माझ्या मुलींवर कर्मकांड मनापासून करण्याचे आणि इतरही अनेक चांगले संस्कार झाले आहेत.’

– सौ. केतकी कौस्तुभ येळेगावकर (पू. आबांची थोरली सून), देहली सेवाकेंद्र (१४.१२.२०१८)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment