हिंदु राष्ट्र स्थापनेच्या धर्मकार्यात सहभागी होऊन स्वतःचा उद्धार करून घ्या ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पू. रमानंद गौडा

बेंगळुरू – आज कोरोना महामारीमुळे लक्षावधी लोकांनी प्राण गमावले आहेत, तसेच तेवढेच लोक अजूनही या आजाराशी झुंजत आहेत. त्यामुळे सर्व समाजजीवन अस्थिर आणि भयग्रस्त झाले आहे. आज समाजात वाढत असलेला अन्याय, अहंकार, स्वार्थ आणि अधर्माचरण यांमुळे वातावरणात रज-तम वाढून मनुष्यातील नैतिकतेचे अधःपतन होत आहे. अशा वेळी मनुष्याच्या अयोग्य कर्मामुळे समष्टी पाप निर्माण होऊन त्याचा परिणाम सध्या संपूर्ण समाजाला भोगावा लागत आहे. अनेक द्रष्टे संत आणि भविष्यवेत्ते यांनी सांगितल्याप्रमाणे पुढील काळ याहून भयानक असणार आहे. त्याचा सामना करण्यासाठी भगवंताचे भक्त होणे, हा एकच पर्याय आहे. ‘न मे भक्त: प्रणश्यति ।’ (माझ्या भक्ताचा नाश होत नाही) या भगवंताच्या वचनाप्रमाणे भक्ताचे रक्षण भगवंतच करतो. त्यासाठी आपण साधना करणे आवश्यक आहे. भगवंताच्या कृपेने वर्ष २०२३ ला हिंदु राष्ट्र येणार आहे. या धर्मकार्यात आपण सर्वजण सहभागी होऊया. त्यामुळे आपला उद्धार होणार आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने पू. रमानंद गौडा यांचे नुकतेच ‘ऑनलाईन कोरोना महामारीच्या विरुद्ध मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर कसे लढायचे ?’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या मार्गदर्शनाचा थेट प्रसारणाच्या वेळी ४ सहस्र ३०० जणांनी पाहिला, तर मार्गदर्शनानंतर संपूर्ण दिवसभरात एकूण २० सहस्र जिज्ञासूंनी कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहून लाभ घेतला.

 

पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनातील काही सूत्रे

१. मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी मनाला स्वयंसूचना कशा द्याव्यात, याविषयी माहिती देण्यात आली.

२. कोरोना महामारीच्या काळात आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी ‘श्री दुर्गादेवी (३ वेळा), श्री गुरुदेव दत्त (१ वेळा), श्री दुर्गादेवी (३ वेळा), ॐ नम: शिवाय (१ वेळा)’ हा नामजप करण्याचे महत्त्व सांगितले.

३. पूर्वजांचे त्रास दूर करण्यासाठी करावयाचा ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप आणि त्याचे महत्त्व सांगितले.

 

क्षणचित्रे

१. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या जिज्ञासूंपैकी ५४१ जणांनी साधना करण्याची इच्छा व्यक्त केली.

२. अनेकांनी हा कार्यक्रम सहकुटुंब पाहिल्याचे सांगितले.

३. ‘आम्हाला यापूर्वी कोरोनाकाळात करावयाचा नामजप कळाला. तो केल्यामुळे आमचे रक्षण होत आहे’, असा अभिप्राय अनेकांनी व्यक्त केला.

४. मार्गदर्शनानंतर २ घंट्यात १८ जणांनी भ्रमणभाष करून ‘आम्ही पुढे कसे करायचे’, हे जाणून घेतले. यात उच्चशिक्षित जिज्ञासू होते.

५. ‘आम्हाला पुष्कळ भीती वाटत होती आणि यातून बाहेर कसे पडायचे, हे समजत नव्हते. आम्हाला मार्गदर्शन ऐकून पुष्कळ आधार मिळाला. आजच्या मार्गदर्शनामुळे आमची भीती गेली’, असे बहुतांश जिज्ञासूंनी सांगितले.

. हिंदु जनजागृती समितीच्या ‘यू ट्यूब चॅनेल’चे ३७९ धर्माभिमानी वर्गणीदार झाले.

७. कन्नड भाषेतील साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे काही जण ‘ऑनलाईन’ वर्गणीदार झाले.

 

पू. रमानंद गौडा यांच्या सत्संगाचा लाभ सर्व
जिज्ञासूंना मिळावा, यासाठी करण्यात आलेले प्रयत्न

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून जोडले गेलेले हिंदुत्वनिष्ठ, ‘सनातन प्रभात’चे वाचक, जाहिरातदार, अर्पणदाते, संकेतस्थळाला भेट देणारे, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते, व्यावसायिक, सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेले जिज्ञासू, हितचिंतक, धर्मशिक्षणवर्गाला येणार्‍या धर्मप्रेमींचे कुटुंबीय, तसेच साधकांचे नातेवाइक आणि नव्याने जोडले गेलेले जिज्ञासू अशा सर्वांना म्हणजेच एकूण २१ सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत या कार्यक्रमाचे निमंत्रण पोचवण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमाला पुष्कळ प्रतिसाद मिळाला.

– सर्वश्री गुरुप्रसाद गौडा आणि मोहन गौडा, हिंदु जनजागृती समिती

 

पू. रमानंद गौडा यांचे मार्गदर्शन ऐकून जिज्ञासूंनी कळवलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

१. श्रीशैल संगापूर – संतांच्या मार्गदर्शनाने मी प्रभावित झालो आहे. सध्या मी कोरोनाकाळात करावयाचा नामजप करत आहे. मला स्वरक्षण आणि प्रथमोपचार यांचे प्रशिक्षण घेऊन राष्ट्र आणि धर्म यांसाठी समष्टी सेवा करायची इच्छा आहे. सनातन संस्थेसारखी श्रेष्ठ संस्था मिळाल्याने मला पुष्कळ समाधान वाटते.

२. प्राध्यापक डॉ. आनंद, कृषी विश्वविद्यालय, रायचूर – संतांचा सत्संग पुष्कळ चांगला होता. कोरोनाविषयी भीती वाटल्यास स्थिर कसे रहायचे, हे समजले. मी घर आणि कार्यालय यासंदर्भातील घटनांच्या विचारांमध्ये अडकून पडलो होतो. त्यातून बाहेर पडता न आल्याने मला तणाव येत होता. आज परिस्थिती कशीही असली, तरी स्थिर रहाण्याचा मार्ग मिळाला. त्यामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

३. श्री. मंजुनाथ जुम्मण्णवरु, कोप्पळ – संतांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर धर्म आणि राष्ट्र यांची सेवा करण्याची इच्छा निर्माण झाली आहे. सनातन संस्था सांगत असलेले आज खरे होत आहे. मला निःस्वार्थ भावाने सेवा करायची आहे.

४. श्री. रवींद्र महाबलशेट्टी, बेळगाव – संतांचे मार्गदर्शन पुष्कळ चांगले होते. मी आजपर्यंत अनेक संतांना भेटलो आहे; परंतु सनातनच्या संतांचे वैशिष्ट्य वेगळे वाटले. त्यांचे बोलणे ऐकतांना पुष्कळ चैतन्य जाणवत होत आणि ते पुनःपुन्हा ऐकावे, असे वाटत होते. ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’मध्ये असलेल्या सर्व मंत्रांमध्ये पुष्कळ शक्ती आहे. मी ते ऐकत असतो. कुटुंबातील आम्ही सर्वजण सकाळी कोरोनाकाळात करावयाचा नामजप करतो. अशा संस्थेशी आम्हाला जोडल्याविषयी पुष्कळ धन्यवाद !

५. सौ. मंजुळा, शिक्षिका, राणेबेन्नुरू – संतांच्या मार्गदर्शनाने चांगले वाटले. कोरोनाची पुष्कळ भीती वाटत होती. संतांच्या मार्गदर्शनाने आमची भीती गेली. आजच्या मार्गदर्शनानंतर आपण आध्यात्मिक साधना केली पाहिजे, असे वाटते.

६. श्री. रंजित कुमार, दक्षिण कन्नड – आजच्या सत्संगाने मला पुढील जीवनात साधना करण्याची आवश्यकता लक्षात आली. आपल्याला त्रास किंवा अडचणी असल्यास त्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपायांनी मात कशी करावी, हे समजले. कोरोना महामारीविषयी माझ्यात असलेली भीती नष्ट झाली. मला पुष्कळ आनंद झाला. परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो.

७. श्री. विजित पुजारी, दक्षिण कन्नड – सत्संग ऐकून मला पुष्कळ आनंद झाला, तसेच मनाला शांतता आणि समाधान मिळाले. कोरोना महामारीची भीती नामजपाने नष्ट करू शकतो, हे समजले. माझे मन मार्गदर्शनामुळे हलके झाले.

८. श्री. मधुसूदन आयर, दक्षिण कन्नड – सध्याच्या आपत्काळातील पुष्कळ अर्थपूर्ण कार्यक्रम ! अंध असलेल्या आम्हाला हात धरून आत्मोन्नतीकडे घेऊन जाणार्‍या गुरूंना कोटी कोटी वंदन !

९. श्री. व्यंकटेश, दक्षिण कन्नड – आजचा सत्संग आमच्यामध्ये आध्यात्मिक पालट करण्यास प्रेरणादायक ठरला. त्याविषयी गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

१०. श्री. श्रीपाद राव, दक्षिण कन्नड – अधर्मामुळे समाजाची हानी होत आहे. चुकीच्या कर्माचे फळ सर्वांना भोगायचे आहे, हे समजल्यावर मनात पुष्कळ तळमळ निर्माण झाली. त्यासाठी नामजप आणि अधिकाधिक साधना करणे, हे समजले. कोरोनाकाळात करावयाचा नामजप स्वतःही करीन आणि इतरांनाही सांगेन. संतांनी मार्गदर्शनात सत्संगाचे महत्त्व पुष्कळ चांगल्या रितीने सांगितले. मी सत्संगाला नियमितपणे येण्याचा प्रयत्न करीन.

११. श्री. शंभुलिंगय्या, तुमकुरू – पू. रमानंद अण्णांचे प्रत्येक वाक्य चैतन्यदायी होते. मनाला पुष्कळ आनंद झाला. पू. अण्णांचे मार्गदर्शन पूर्ण ऐकल्यामुळे मन चैतन्यमय झाले. आम्हाला मार्गदर्शनाचे नियोजन करून साधनेत साहाय्य केल्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम !

१२. श्री. श्याम नायक, बेंगळुरू – माझी पूर्ण वेळ सेवा करण्याची इच्छा वाढली आहे. समाजाला चांगला दृष्टीकोन देणारी संस्था म्हणजे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती होय ! मला पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे.

१३. श्री. नागराज नायक, उत्तर कन्नड – पू. रमानंद अण्णांचा सत्संग ऐकून पुष्कळ चांगले वाटले. आजच्या आपत्काळात आम्ही काय प्रयत्न करायचे, ते समजले. वर्ष २००५ ते २००६ या काळात मी संस्थेच्या संपर्कात होतो. त्यानंतर संस्थेचा संपर्क तुटला. हा सत्संग मिळाल्याने पुष्कळ आनंद झाला. यापुढे मी समितीच्या धर्मशिक्षणवर्गाला जोडून साधना करण्याचा प्रयत्न करीन.

१४. श्री. गणेश शेट्टी, उत्तर कन्नड – आजचा सत्संग ऐकून मला पुष्कळ आनंद झाला. असा सत्संग प्रथमच मिळाला. सत्संगातील सर्व विषय पुष्कळ महत्त्वाचे होते. ‘आजच्या परिस्थितीत आपले रक्षण केवळ भगवंतच करू शकतो’, हे वाक्य माझ्या मनाला भावले. मी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून धर्मप्रसाराची सेवा करण्याचा प्रयत्न करीन. मी अजून काय प्रयत्न करू, तेही सांगावे.

१५. श्री. मोहित रामदास, उत्तर कन्नड – मी लहान असतांना संस्थेविषयी ऐकले होते आणि परिचयही होता. आज पुष्कळ वर्षांनंतर मला हा सत्संग मिळाल्यामुळे पुष्कळ बरे वाटले. मी आता नामजप नियमितपणे करीन. तुम्ही सत्संग ठेवल्यास नियमितपणे येईन. या सत्संगाने आपत्काळाची तीव्रता समजली.

१६. रेखा भट, उत्तर कन्नड – संतांच्या मार्गदर्शनातून मला आपत्काळ म्हणजे काय ? आपत्काळात आपले रक्षण होण्यासाठी साधना कशी करायची, हे समजले. सध्याच्या भीतीच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक प्रयत्न करावेच लागतील, असे वाटले. मला स्वतःला संस्थेशी जोडून सेवा आणि साधना करायची आहे.

१७. उषा एम्., शिवमोग्गा – पू. रमानंद अण्णांचे मार्गदर्शन ऐकून पुष्कळ आनंद झाला आणि मन शांत झाले. तसेच मला पुष्कळ सेवा करण्याची इच्छा आहे. या मार्गदर्शनामध्ये सांगितलेले सर्व विषय आचरणात आणण्याचा प्रयत्न करीन.

१८. लक्ष्मी राधाकृष्ण, शिवमोग्गा – पू. रमानंद अण्णांनी आमच्या मनाला स्पर्श करेल, असे मार्गदर्शन केले. आमच्या मनातील नकारात्मकता नष्ट होण्यासाठी, वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी आणि आत्मबळ वाढवण्यासाठी मी नामजप वाढवण्याचा प्रयत्न करीन. तसेच प्रत्येक आठवड्याला सत्संगात सांगितलेला प्रत्येक विषय शिकून कृतीत आणण्याचा प्रयत्न करीन.

१९. श्री. सुभाष चंद्र, धारवाड – या कोरोनाच्या काळात अनेक भयग्रस्त कुटुंबांना धैर्य मिळणे आवश्यक होते. ते आजच्या सत्संगामुळे मिळाले.

२०. श्री. रघुनाथ भंडारी, बागलकोटे – या आपत्काळामध्ये कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी नामजप, प्रार्थना, स्वयंसूचना देणे इत्यादींचे महत्त्व सत्संगात सांगितल्यामुळे आमचे धैर्य वाढले.

२१. सौ. वसुंधरा ऐनापूर, विजयपूर – माझ्या यजमानांचे वय ७६ वर्षे आहे. त्यांना कोरोना झाला होता. त्यांचा ‘पल्स रेट’ अत्यंत न्यून झाला होता. यावर मी सनातन संस्थेला आध्यात्मिक स्तरावरील उपाय विचारला. त्यांनी मला कोरोनाकाळात करावयाचा नामजप दिला. आम्ही औषधोपचारासह नामजप आणि प्रार्थना केल्यावर माझ्या यजमानांना बरे वाटले. देवाच्या कृपेनेच त्यांना आता बरे वाटत आहे. सनातन संस्थेविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment