हिंदु राष्ट्राचा अखंड ध्यास असलेले डिगस (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सनातनचे ९३ वे संत पू. बन्सीधर तावडे आजोबा (वय ८१ वर्षे) यांचा देहत्याग !

पू. बन्सीधर तावडे

कुडाळ – तालुक्यातील डिगस येथील सनातनचे ९३ वे व्यष्टी संत पू. बन्सीधर उपाख्य पप्पा तावडेआजोबा यांनी ९ जून २०२१ या दिवशी रात्री ११.०५ वाजता देहत्याग केला. त्यांच्या पार्थिवावर १० जून या दिवशी कुडाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पू. तावडेआजोबा यांच्या पश्‍चात १ मुलगा, सून, २ विवाहित मुली, जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे. सनातन परिवार पू. तावडेआजोबा यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

पू. तावडेआजोबा हे वर्ष १९९७ पासून सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करत होते. डिसेंबर २०११ मध्ये त्यांनी ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती, तर १८ मे २०१९ या दिवशी त्यांनी संतपद गाठले. त्यांनी तन, मन आणि धन अर्पून गुरुसेवा केली. त्यांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा अखंड ध्यास असायचा. यासाठी ते सतत प्रार्थना करत. पक्षाघात (पॅरॅलिसिस), वृद्धापकाळ आणि गुडघेदुखी यांमुळे पू. तावडेआजोबा सतत एका जागी बसून असत. घरातल्या घरात फिरण्यासाठी ते चाकांच्या आसंदीचा (व्हील चेअरचा) वापर करत. अशी परावलंबी स्थिती असूनही ते सतत आनंदी असत. ‘अशा स्थितीत मी आनंदी रहाणे, ही केवळ देवाचीच कृपा आहे’, असा कृतज्ञताभाव सतत त्यांच्या मनात होता.

प्रारब्धामुळे पुष्कळ अडचणी येऊनही भगवंताशी असलेल्या अखंड अनुसंधानामुळे ते कधीच विचलित झाले नाहीत. पूर्वी त्यांच्या घरी अनेक सत्संग सोहळे झाले आणि संतही येऊन गेले होते. वैयक्तिक अडचणी आणि शारीरिक त्रास असूनही ते गुरुपौर्णिमेची सेवा आनंदाने करत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment