अखंड भावावस्थेत असणारे ठाणे येथील सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांचा देहत्याग !

४ वर्षे सनातनच्या देवद आश्रमात होते वास्तव्य !

 

पू. सदाशिव सामंत

ठाणे – देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्य केलेले आणि आता ठाणे येथे वास्तव्यास असलेले अन् अखंड भावावस्थेत असणारे सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांनी १० जून या दिवशी सकाळी ७.३० वाजता त्यांच्या रहात्या घरी देहत्याग केला. त्यांच्या पश्‍चात पत्नी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या दिनप्रभा सामंत, २ मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. पू. सामंतआजोबा यांच्या पार्थिवावर ११ जून या दिवशी ठाणे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वर्ष २०१७ ते वर्ष २०२१ या काळात पू. सदाशिव सामंतआजोबा हे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास होते. ९ ऑगस्ट २०१९ या दिवशी पू. सामंतआजोबा संतपदी विराजमान झाले होते. आश्रमात ते सनातनच्या सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करत. वय किंवा प्रकृती यांचा विचार न करता ते आश्रमात तळमळीने सेवा करायचे. आश्रमातील साधकांसमवेत प्रतिदिन सकाळी ७ वाजता ते व्यायामवर्गातही सहभागी होत असत. ते नामजप तळमळीने करायचे, तसेच प्रार्थना आणि कृतज्ञताही अतिशय भावपूर्णपणे व्यक्त करायचे. दिवसभरात अनेकदा ईश्‍वराप्रती कृतज्ञता वाटून त्यांचे हात नकळत जोडले जायचे. साधकांना होणार्‍या त्रासांच्या निवारणार्थ पू. सामंतआजोबा नामजप करत असत.

 

पू. सदाशिव सामंतआजोबा यांचा अल्प परिचय !

पू. सदाशिव सामंतआजोबा यांनी वर्ष १९९६ मध्ये सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यास आरंभ केला. वर्ष २००० मध्ये त्यांनी सनातनच्या ठाणे येथील सेवाकेंद्रात देवपूजा करणे, प्रसंगी स्वयंपाकघरात साहाय्य करणे, सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने यांचे वितरण करणे, अर्पण गोळा करणे, त्याविषयीचा लेखा-जोखा पहाणे इत्यादी सेवा भावपूर्ण केल्या. त्यानंतर वर्ष २०१७ पासून ते देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात पत्नी दिनप्रभा सामंत यांच्यासह पूर्णवेळ साधना करत होते. पू. सामंतआजोबा यांचे बी.एस्.सी. (स्टॅटीस्टीक्स) पर्यंत शिक्षण झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment