अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीयांच्या वतीने व्यापक प्रमाणात करण्यात आला ‘ऑनलाईन’ अध्यात्मप्रसार !

सोलापूर – साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीया या सणाचे विशेष महत्त्व आहे. यंदा सर्वत्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक निर्बंध असल्यामुळे हा सण नेहमीप्रमाणे साजरा करण्यास पुष्कळ मर्यादा होत्या. अशा परिस्थितीतही अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने धर्माचरण कसे करावे ? आणि या सणाचे आध्यात्मिक महत्त्व याविषयी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली अन् सातारा या जिल्ह्यांमध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ पद्धतीने प्रवचन, नामजप सत्संग, फलक प्रसिद्धी, तसेच सामाजिक माध्यमे यांद्वारे व्यापक प्रमाणात अध्यात्मप्रसार करण्यात आला.

 

पुणे जिल्ह्यात करण्यात आलेला व्यापक प्रसार

१. चिंचवड आणि नाशिक रस्ता येथे ४८ ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. या प्रवचनांचा ७२७ जिज्ञासूंनी लाभ घेतला, तर ४६ ठिकाणी ‘ऑनलाईन’ पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या नामसत्संगांचा लाभ ६२५ जिज्ञासूंनी घेतला. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ५ ठिकाणी ‘विष्णुसहस्त्रनाम’ स्तोत्राचे पठण करण्यात आले. येथील विविध ठिकाणी फलकांद्वारेही अध्यात्मप्रसार करण्यात आला. ज्या ठिकाणी फलक उपलब्ध झाले नाहीत, तेथे मोठ्या कागदावर हाताने माहिती लिहून इमारतीच्या वा अन्य ठिकाणी दर्शनी भागांमध्ये लावण्यात आले.

२. पुणे शहर आणि भोर येथे २८ ठिकाणी ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. त्याचा लाभ ५८३ जिज्ञासूंनी घेतला. ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप सत्संगाचे आयोजन ७७ ठिकाणी करण्यात आले. त्याचा लाभ १३ सहस्र ६९५ जिज्ञासूंनी घेतला. तसेच ३८ ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ‘विष्णुसहस्त्रनाम’ स्तोत्र पठणाचा लाभ १४ सहस्र ९१६ जिज्ञासूंनी घेतला. विशेष म्हणजे येथे बालसाधक आणि युवा साधक यांच्यासाठी एके ठिकाणी आयोजित केलेल्या ‘विष्णुसहस्त्रनाम’ स्तोत्र पठणाला ९३ बालसाधक उपस्थित होते.

 

सांगली जिल्हा

सांगली येथे ४५ ठिकाणी ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. या प्रवचनांचा ५९७ जिज्ञासूंनी लाभ घेतला, तर ७६ ठिकाणी नामसत्संगांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ ८१२ जिज्ञासूंनी घेतला. येथील लहान मुलांसाठी ६ ठिकाणी ‘विष्णुसहस्त्रनाम’ आणि ‘रामरक्षा’ स्तोत्र पठण घेण्यात आले. याचा लाभ अनेक मुलांनी घेतला.

 

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यात १०९ ठिकाणी ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. याचा लाभ १ सहस्र ५१९ जिज्ञासूंनी घेतला, तसेच १२४ ठिकाणी फलक प्रसिद्धीच्या माध्यमातून धर्मप्रसार करण्यात आला. याचसमवेत १०२ ठिकाणी घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचा लाभ १ सहस्र ९० जिज्ञासूंनी घेतला.

 

विविध ठिकाणी करण्यात आलेला वैशिष्ट्यपूर्ण अध्यात्मप्रसार

१. पुणे येथील ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. खिरीड यांनी प्रवचनामध्ये जिज्ञासूंना समाजासाठी घेण्यात येणारा ‘ऑनलाईन’ भावसत्संग ऐकण्याचे आवाहन केले.

२. सातारा येथील श्री मेडिकल आणि समर्थ मेडिकल, शिवाजीनगर शाहूपुरी या ठिकाणी, तसेच डॉ. रजपूत क्लिनिक येथे प्रतिदिन नामजप लावण्यात येत आहे.

३. कोल्हापूर येथील सनातन संस्थेचे साधक त्वचारोगतज्ञ डॉ. मानसिंग शिंदे यांनी त्यांच्या रुग्णालयात अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने असलेली विशेष माहिती त्यांच्या रुग्णालयातील दूरचित्रसंचावर लावून ठेवली होती.

 

मंदिरांमध्ये नामजप लावण्याच्या संदर्भात
हिंदुत्वनिष्ठांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद

विविध मंदिरांमध्ये नामजप लावण्याच्या संदर्भात हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हेर्ले, शिरोली, उंचगाव, इचलकरंजी अशा सर्व ठिकाणच्या हिंदुत्वनिष्ठांना संपर्क केल्यावर सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. उंचगाव येथे शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांना विषय सांगितल्यावर त्यांनी श्री. दीपक पाटील यांना भेटून दत्त मंदिरात नामजप लावण्याची सिद्धता दाखवली. याच दिवशी सायंकाळी एका ‘ऑनलाईन’ सत्संगात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केलेल्या मार्गदर्शनाने श्री. राजू यादव प्रभावित झाले. यानंतर श्री. यादव यांनी त्वरित श्री. शिवानंद स्वामी यांना दूरभाष करून सांगितले, ‘‘आपण उंचगाव येथील मंदिरात ध्वनीक्षेपकावर नामजप लावू.’’ नंतर त्यांनी तत्परतेने ४ नवीन ‘पेनड्राईव्ह’ खरेदी करून उंचगाव ग्रामदैवत मंगेश्‍वर मंदिरात नामजप लावण्यास पुढाकार घेतला. या पुढील काळात दत्त मंदिर, तसेच हनुमान मंदिरात रामरक्षा आणि हनुमान स्तोत्र लावण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment