लोकहो, अशा संकटांपासून कोणतीही सरकारी यंत्रणा नाही,
|
अनेक ठिकाणी झाडे कोसळली
समुद्राचे पाणी गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात शिरले !

मुंबई – तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसल्याने मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली होती. सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर या परिसरांत मुसळधार पाऊस पडला. ठिकठिकाणी झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडल्याने लोकांनी चक्रीवादळाची भीषणता अनुभवली. मुसळधार पावसामुळे मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात समुद्राचे पाणी शिरले. हे पाणी गुडघाभर होते. मुंबईमध्ये ताशी १०२ कि.मी. वेगाने वारे वहात होते. चक्रीवादळामुळे मुंबई विमानतळ सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद होते. त्यामुळे विमानतळावर उतरणार्या ३ विमानांचा मार्ग पालटण्यात आला. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या वेळी त्यांनी महाराष्ट्रातील परिस्थिती जाणून घेतली.
ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या वेळी पावसामुळे ओव्हरहेड वायरचा स्फोट झाला. त्यामुळे तेथील वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती.
तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईसह रायगड येथेही पुष्कळ हानी !
१. चक्रीवादळामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली होती, तर मोनो रेल्वेची सेवा स्थगित करण्यात आली. वांद्रे-वरळी सी लिंकवरून होणारी वाहतूकही रोखण्यात आली होती,
२. नवी मुंबईत दुचाकीवर झाड कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर उल्हासनगरमध्ये एका रिक्शावर झाड कोसळल्याने दोन प्रवासी गंभीर घायाळ झाले आहेत.
३. वादळामुळे मुंबईच्या समुद्रामध्ये दोन मोठी जहाजे भरकटली आहेत. नौदलाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. एका जहाजावर २७३, तर दुसर्या जहाजावर १३७ जण आहेत. या जहाजांच्या साहाय्यासाठी आय.एन्.एस्. कोच्ची, आय.एन्.एस्. कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आल्या आहेत.
४. रायगड जिल्ह्यात १ सहस्र २०० घरांची हानी झाली आहे. सहस्रावधी लोकांचे स्थलांतर करण्यात आले. पनवेल परिसरातही अनेक इमारतींच्या वरील पत्रे उडाले.
५. पालघर परिसरात काही घरांची पडझड झाली.
६. श्रीवर्धन, मुरूड, रोहा, अलिबाग, महाड येथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पोलादपूर, महाड, रोहा या ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत.
‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे गोव्यात वीज खात्याची मोठ्या प्रमाणावर हानी
मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठकीत घेतला चक्रीवादळामुळे झालेल्या हानीचा आढावा७०० हून अधिक वीज खांब कोलमडून पडले, तर २०० ते ३०० ट्रान्सफॉर्मर्सची हानी |

पणजी – गोवा राज्यात १६ मे या दिवशी धडकलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे वीज खाते आणि कृषी उत्पादने यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे, तसेच शेकडो घरांची पडझड झाली आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे गोव्यात झालेल्या हानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १७ मे या दिवशी संबंधित शासकीय अधिकारी, संबंधित मंत्री आणि खात्याचे प्रमुख यांच्यासमवेत एक ‘व्हर्च्युअल’ बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जीवनावश्यक सेवा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आदेश संबंधित खात्यांना दिले आहेत.

उच्चस्तरीय बैठकीनंतर पत्रकारांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘चक्रीवादळामुळे सुमारे ७०० वीजखांब मोडून पडले आहेत, तर विजेचे सुमारे २०० ते ३०० ट्रान्स्फॉर्मरांना हानी पोचली आहे. उच्चस्तरीय बैठकीत चक्रीवादळामुळे झालेल्या हानीचा सविस्तर आढावा घेणे, तसेच जीवनावश्यक सेवा तत्परतेने सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे, यांसाठी सर्व खात्यांच्या प्रमुखांना आदेश देण्यात आले आहेत. सर्व हमरस्ते १७ मेपर्यंत वाहतुकीसाठी मोकळे होतील, तर ग्रामीण भागात वीजपुरवठा १८ मेपर्यंत सुरळीत होणार आहे. पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा १८ मेपर्यंत सुरळीत होणार आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या हानीचा अहवाल केंद्राला पाठवून यासाठी केंद्राकडून साहाय्य घेतले जाणार आहे.’’
आपत्कालीन व्यवस्थापन निधीतून हानीभरपाई देणार

चक्रीवादळामुळे कृषी उत्पादन नष्ट झालेल्यांना, तसेच घर आणि वाहन यांची हानी झालेल्यांना आपत्कालीन व्यवस्थापन निधी अन् मुख्यमंत्री साहाय्य निधी यांमधून हानीभरपाई देण्यात येणार आहे. संबंधितांनी यासाठी धीर धरला पाहिजे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
चक्रीवादळाचा गोमेकॉवर विशेष परिणाम झाला नाही
चक्रीवादळामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) आणि इतर रुग्णालये यांना मोठी हानी पोचलेली नसल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. चक्रीवादळामुळे गोमेकॉ रुग्णालय आणि गोमेकॉचा सूपर स्पेशालिटी विभाग यांमध्ये पाणी शिरल्याच्या वृत्ताविषयी विचारले असता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘चक्रीवादळाची भीषणता पहाता अशा लहानसहान घटना घडणारच. सूपर स्पेशालिटी विभागाच्या खिडक्या उघड्या ठेवल्यामुळे आत पाणी साचले.’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा यांच्याकडून केंद्राचे सर्वतोपरी साहाय्य देण्याचे आश्वासन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला संपर्क साधून तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या हानीविषयी माहिती जाणून घेतली. याप्रसंगी केंद्रशासनाचे सर्वतोपरी साहाय्य देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तत्पूर्वी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी हानीविषयी चर्चा केली. गोमंतकियांना आवश्यक सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहे.’’
भ्रमणभाषची नेटवर्क समस्या सोडवण्यासाठी ‘इंट्रा-सर्कल रोमिंग’ सुविधा कार्यान्वित
चक्रीवादळामुळे झालेल्या हानीमुळे अनेकांना भ्रमणभाषच्या नेटवर्कची अडचण निर्माण झाली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी ‘इंट्रा-सर्कल रोमिंग’ सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘आता प्रत्येक जण त्याच्या भ्रमणभाषमध्ये असलेल्या ‘मॅन्युअल सेटींग्स’च्या आधारे तो वास्तव्यास असलेल्या विभागात कार्यान्वित असलेले कोणतेही नेटवर्क निवडू शकणार आहे.’’
तौक्ते चक्रीवादळामुळे गोवा राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हानी
गोव्यात २ मृत्यू, सहस्रो झाडे उन्मळून पडली, बहुतांश भागांत वीजपुरवठा खंडित, वाहतुकीचा खोळंबा

पणजी/सिंधुदुर्ग – हवामान खात्याने दिलेल्या चेतावणीनुसार १६ मे या दिवशी आलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा यांना बसला. सोसाट्याचा वारा अन् मुसळधार पाऊस यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले.
गोवा – राज्यात १६ मे या दिवशी ताशी १०० कि.मी. वेगाने वहाणारे वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेली भरती यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. राज्यात सहस्रो झाडे उन्मळून पडली, शेकडो वीजखांब मोडल्याने राज्यातील बहुतांश भागांत वीजपुरवठा खंडित झाला आणि पाणी साठल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. राज्यातील १५० घरांना हानी पोचली. पणजी शहरातही पाणी तुंबले होते. हणजूण येथे अंगावर झाड पडल्याने १ महिला जागीच ठार झाली. समुद्राला आलेल्या उधाणामुळे समुद्रकिनारपट्टीवर हानी झाली. चक्रीवादळामुळे रस्ता, रेल्वे आणि विमान वाहतूक यांवरही परिणाम झाला. गोव्यात येणारी आणि जाणारी सर्व विमाने रहित करण्यात आली.
चक्रीवादळ गोव्यापासून १०० कि.मी. अंतरावरून पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ दमण आणि दीव, तसेच दादरा नगरहवेली येथून पुढे १८ मे या दिवशी सकाळी गुजरात राज्याला धडक देणार आहे.
‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ सहस्र ३७५ हेक्टर क्षेत्रावरील बागायतीची हानी
‘तौक्ते’ चक्रीवादळाचा बागायतीला मोठा फटका

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा जिल्ह्यातील बागायतीला मोठा फटका बसला आहे. १७२ गावांमधील १ सहस्र ५९ शेतकर्यांच्या एकूण ३ सहस्र ३७५.१६ हेक्टर क्षेत्रावरील बागेची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हानी झालेल्या पिकांमध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम आणि केळी यांचा समावेश आहे. सर्वाधिक हानी काजू बागायतींची झाली असल्याची माहिती अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक हानी देवगड तालुक्यातील बागांची झाली आहे, तर सर्वांत अल्प हानी वैभववाडी तालुक्यातील बागांची झाली आहे. मालवण तालुक्यात काजू, नारळ, सुपारी, कोकम यांच्या बागा, देवगड तालुक्यात आंब्याच्या बागा, तर दोडामार्ग तालुक्यात केळीच्या बागा यांची सर्वाधिक हानी झाली आहे.
उपरोक्त आकडेवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडून प्राथमिक स्वरूपात देण्यात आली असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरे, गोठे, आंबा, काजू यांसह विविध प्रकारची झाडे यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. यामुळे वीजपुरवठ्यासह वाहतुकीवरही परिणाम झाला. या वादळामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या वादळामुळे लाखो रुपयांची हानी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सावधानतेचा उपाय म्हणून किनारपट्टीवरील एकूण १४४ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले. तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात दिवसभरात ४४७ घरे, ३७ गोठे, ३ शाळा, १० शेड, १४ शासकीय इमारती, २३ विद्युत् खांब आणि २ विद्युत वाहिन्या यांची हानी झाली आहे. १४३ ठिकाणी झाडे पडली आहेत, अशी प्राथमिक माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळामुळे वीज वितरण कंपनीची पुष्कळ हानी
- १ लाख ७५ सहस्र वीजग्राहकांना फटका
- २४ वीज उपकेंद्रे बंद पडली

सिंधुदुर्ग – ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे आणि फांद्या पडल्यामुळे वीजवाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक गावे गेले २ दिवस अंधारात आहेत. वीज वितरण आस्थापनाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात असून अतिरिक्त मनुष्यबळ मागवण्यात आले आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात ३३ लहान आणि ४ मोठ्या नौकांची हानी

अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !