कर्करोगासारख्या दुर्धर आजारातही गुरूंवरील दृढ श्रद्धेमुळे आनंदी राहून त्याला सामोरे जाणारे पू. डॉ. नंदकिशोर वेद !

पू. डॉ. नंदकिशोर वेद यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावरही गुरूंवरील दृढ श्रद्धेमुळे त्यांना स्थिर रहाता आले. या दुर्धर व्याधीत त्यांनी भावजागृतीचे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना आनंदी आणि भावस्थितीत रहाता आले. ‘गुरुकृपेने असह्य वेदनांवर मात करून आनंदी कसे रहायचे ?’, हे वाचकांना या लेखातून शिकता येईल. (भाग १)

 

१. अकस्मात् कमरेत असह्य वेदना होणे, आधुनिक वैद्यांना
दाखवल्यावर दुखण्याचे कारण त्यांच्या लक्षात न येणे आणि
अधिक वेदनाशामक औषधे घेतल्यामुळे पोटाचाही पुष्कळ त्रास होऊ लागणे

‘१०.११.२०१९ या दिवशी अधिक प्रमाणात सेवा आणि शारीरिक श्रम झाल्यामुळे माझ्या कमरेत दुखू लागले. १४.११.२०१९ या दिवशी मी वाराणसीला काही अडचण न येता पोचलो. १५, १६ आणि १७.११.२०१९ या कालावधीत असलेल्या शिबिरात मी दिवसभर उपस्थित राहिलो. त्या वेळी संपूर्ण दिवस बसून होतो, तरीसुद्धा मला काही त्रास झाला नाही; परंतु १८.११.२०१९ या दिवशी अयोध्येला परत येतांना आगगाडीतच माझ्या कमरेत असह्य वेदना होऊ लागल्या. मी कसाबसा घरी पोचलो. त्यानंतर आधुनिक वैद्यांना दाखवण्याची शृंखला चालू झाली. एक-एक करून तीन आधुनिक वैद्यांना दाखवले; परंतु त्यांच्या फारसे लक्षात येत नव्हते किंवा ते माझ्या आजाराचे निदान करण्यात रस घेत नव्हते. ते प्रत्येक वेळी औषधे देत होते. अधिक वेदनाशामक औषधे घेतल्यामुळे मला पोटाचाही त्रास पुष्कळ होऊ लागला.

 

२. अनाहतचक्राच्या अगदी मागच्या बिंदूवर अतिशय तीव्र
आणि असह्य वेदना होणे, आध्यात्मिक उपाय केल्यावर त्या न्यून
होणे अन् यावरून वैद्यकशास्त्राची मर्यादा आणि ‘अध्यात्मशास्त्र अन्
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी सांगितलेल्या उपायांचे महत्त्व’ लक्षात येणे

‘अनाहतचक्राच्या अगदी मागच्या बिंदूवर एखाद्या बोथट वस्तूने पुष्कळ दाबले जात आहे’, असे मला वाटत होते. मधे मधे ही वेदना अतिशय तीव्र आणि असह्य होत असे. बहुतांश वेळा रात्री झोपल्यानंतर ४५ मिनिटे ते १ घंट्यानंतर ही वेदना चालू होत असे. तेव्हा मी उठून देवघरात उदबत्ती लावून प.पू. गुरुदेवांना प्रार्थना करायचो, तसेच अत्तर आणि कापूर यांचे उपाय करायचो. उदबत्ती ने माझ्या भोवतालचे आवरण काढायचो. श्री बगलामुखी स्तोत्र, देवीकवच आणि श्रीरामकवच ऐकायचो. नामजप, प्रार्थना आणि आत्मनिवेदन करायचो आणि त्याचसह ‘इलेक्ट्रिक हीटिंग पॅड’ने शेकायचो. प्रारंभी काळे तीळ आणि लिंबू यांनी दृष्ट काढायचो. ‘हं’ या बीजाक्षराचा जप करायचो. धनुर्धरीदेवीला प्रार्थना आणि सकाळी, दुपारी अन् सायंकाळी ‘श्री धनुर्धरीदेव्यै नमः।’ हा नामजप करायचो. तेव्हा रात्री ३ वाजता वेदना न्यून होत असे आणि मी झोपू शकत असे. यावरून वैद्यकशास्त्राची मर्यादा आणि ‘अध्यात्मशास्त्र अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी सांगितलेल्या उपायांचे महत्त्व’ माझ्या लक्षात आले.

 

३. समाजातील आधुनिक वैद्यांचा व्यावसायिक
आणि माणुसकीशून्य दृष्टीकोन अनुभवायला मिळणे

मी एका आधुनिक वैद्यांना या अतीतीव्र वेदनेविषयी सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘ज्या वेदनेचे कारण समजत नाही, त्याविषयी चिंता करता कामा नये. मी जी औषधे देतो, ती तुम्ही घेत रहा, बस.’’ यावरून माझ्या लक्षात आले, ‘समाजातील आधुनिक वैद्य आपली व्यावसायिक कुशलता वाढवण्याऐवजी ‘आणखी अधिक धन कसे कमवू ? आपले चिकित्सालय कसे मोठे करू ?’, यावरच लक्ष देतात. ‘रुग्ण हातातून निघून जाऊ नये’, यासाठी ते त्याला पुढे विशेष तज्ञाकडेही पाठवत नाहीत.’

३ अ. समाजातील साधना न करणारे आधुनिक वैद्य आणि साधना
म्हणून चिकित्सा करणारे साधक आधुनिक वैद्य यांच्यातील लक्षात आलेला भेद !

रामनाथी आश्रमातील आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांच्या सल्ल्यानुसार मी ‘एम्.आर्.आय’., पोटाचे ‘अल्ट्रासाउंड’ आणि हृदयाची ‘इको टेस्ट’ लखनौला जाऊन करवून घेतली. दुसर्‍या दिवशी तेथे एक ‘न्यूरो सर्जन’ आणि एक अस्थिरोग तज्ञ शल्यचिकित्सक (आर्थोपेडिक सर्जन) यांना दाखवले. त्यांनी माझ्या आजाराचे निदान ‘एँकीलोजिंग स्पाँडिलाइटिस (Ankylosing Spondylitis)’ असे केले आणि ‘या आजारावर काही उपाय नाही’, असे सांगितले. ही गोष्ट जेव्हा मी आधुनिक वैद्य मराठे यांना सांगितली, तेव्हा ते म्हणाले, ‘‘यावर काहीच उपाय नाहीत, असे नाही. तुम्ही गोव्याला या.’’ पू. नीलेश सिंगबाळदादांनीसुद्धा मला त्वरित गोव्याला जाण्यास सांगितले. उत्तरप्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमधील विशेष तज्ञ आधुनिक वैद्यांना ठाऊक नव्हते की, ‘एँकीलोजिंग स्पाँडिलाइटिस’वरील औषध दोन वर्षांपूर्वीच बाजारात आलेले आहे. यावरून समाजातील साधना न करणारे आधुनिक वैद्य आणि साधना म्हणून चिकित्सा करणारे साधक आधुनिक वैद्य यांच्यातील भेद माझ्या लक्षात आला.

३ आ. साधक आधुनिक वैद्य मराठे यांच्या सांगण्यानुसार
अनावश्यक औषधे बंद केल्यावर पोटदुखी आणि अन्य वेदनाही न्यून होणे

आधुनिक वैद्य मराठे हे व्यावसायिक आधुनिक वैद्य नाहीत. ते आश्रमात साधना म्हणूनच रुग्ण साधकांची तपासणी करण्याची सेवा करतात. ते काही विशेष तज्ञ आधुनिक वैद्यसुद्धा नाहीत, तरीसुद्धा त्यांच्याकडून मला योग्य निर्णय मिळाला. वेदनाशामक औषधे अधिक झाल्यामुळे माझ्या पोटात पुष्कळ दुखत होते. आधुनिक वैद्य मराठे यांनी अयोध्या आणि लखनौ येथील आधुनिक वैद्यांनी दिलेल्या औषधांमधील अनावश्यक औषधे बंद करून त्याचे प्रमाण योग्य केल्यामुळे माझी पोटदुखीच नव्हे, तर अन्य वेदनासुद्धा न्यून झाल्या.

 

४. रामनाथी आश्रमातील चैतन्यामुळे रात्री वेदना न होणे आणि शांत झोप लागणे

मी १०.१२.२०१९ या रात्री ११.३० वाजता रामनाथी आश्रमात पोचलो. रात्री झोपल्यानंतर मला सकाळीच जाग आली. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘रात्री नियमितपणे मला होणारी वेदना झालीच नाही.’ रात्री निद्रेत येणारी अडचण आणि तीव्र वेदनेचा जो सामना मला करावा लागत होता, तो येथे आल्यापासून आजतागायत करावा लागत नाही. यावरून आश्रमाच्या चैतन्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले.

 

५. तीव्र वेदना झाल्यावर मन व्याकुळ होणे आणि
परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण अन् आत्मनिवेदन केल्यावर मन शांत आणि स्थिर होणे

अयोध्येमध्ये अत्यंत वेदनेमुळे माझे मन अधूनमधून पुष्कळ निराश व्हायचे. मनाला हे तर स्पष्ट होते की, परात्पर गुरु डॉक्टर माझ्याकडून प्रारब्धभोग भोगून घेत आहेत; परंतु वेदनेचे प्रमाण अधिक झाल्यावर आणि बराच वेळ वेदना होत असल्यामुळे अधूनमधून मन व्याकुळ होत असे. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण आणि त्यांना आत्मनिवेदन केल्यावर मन शांत अन् स्थिर होत होते.

 

६. रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावर ‘ईश्‍वरच हे
आजारपण भोगण्याची शक्ती देणार आहे’, या दृढ श्रद्धेने स्थिर रहाता येणे

पुढे गोव्यामध्ये आधुनिक वैद्यांनी रक्ताची चाचणी केल्यावर मला रक्ताचा कर्करोग (blood cancer) झाल्याचे निदान झाले. तेव्हा मला पुष्कळ दुःख अथवा चिंता वाटली नाही. मी स्थिर राहिलो. मला परात्पर गुरु डॉक्टरांचे शब्द आठवले, ‘प्रारब्धभोग भोगूनच जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त व्हायचे आहे.’ ‘ईश्‍वरच हे आजारपण भोगण्याची शक्ती देणार आहे. जसे त्याने आजपर्यंत सांभाळले आहे, तसेच तो पुढेही सांभाळणार आहे’, अशी श्रद्धा दृढ होऊन मी स्थिर राहू शकलो.

 

७. रुग्णालयात भरती केल्यावर ‘बायॉप्सी’ करण्यात येणे

२६.१२.२०१९ या दिवशी मी एका रुग्णालयात भरती झालो. तेथे माझी ‘बोन मॅरो’ (bone marrow) ची ‘बायॉप्सी’ (‘रुग्णामध्ये कर्करोगाचे विषाणू आहेत किंवा नाहीत ?’, हे पहाण्यासाठी केली जाणारी चाचणी) झाली.

 

८. हाताला सुई लावतांना भावार्चना केल्यामुळे अत्यल्प
वेदना होणे आणि भावविश्‍वात राहिल्यामुळे भावावस्था अन् आनंद अनुभवणे

माझी चिकित्सा करणार्‍या आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘४.१.२०२० या दिवशी पहिली किमोथेरपी (Chemo Therapy) (कर्करोगावरील विशिष्ट उपचार, ज्याचे अनेक दुष्परिणाम होतात आणि वेदनासुद्धा होतात.) होईल. त्यापूर्वी २२.१२.२०१९ या दिवशी हाताला सुई लावतांना मला पुष्कळ वेदना झाल्या होत्या; म्हणून २६.१२.२०१९ या दिवशी पुन्हा सुई लावतांना परात्पर गुरुदेवांना प्रार्थना करून वेदना सहन करण्यासाठी शक्ती मिळण्यासाठी मी भावार्चना केली की, मी धावत जाऊन परात्पर गुरुदेवांचे चरण धरले आहेत. त्याच वेळी परिचारिकेने सुई लावून ती हलवून शिरेमध्ये व्यवस्थित केली. मला ही संपूर्ण प्रक्रिया जाणवत होती; परंतु त्यासह असणारी वेदना झाली नाही. त्यानंतर ते आतापर्यंत माझे दोन्ही हात, मनगट, तळहात यांच्या मागे, हाताच्या मध्यभागी, हाताचा वरचा भाग आणि पोटात असंख्य सुया टोचल्या गेल्या; परंतु याच भावार्चनेमुळे मला वेदना झाल्या नाहीत किंवा झाल्या, तरी त्या अत्यल्प झाल्या आणि मी भावविश्‍वात राहिल्यामुळे भावावस्था अन् आनंद अनुभवत होतो.

 

९. आधुनिक वैद्यांनी किमोथेरपीच्या संदर्भातील शास्त्र
आध्यात्मिक भाषेत समजावून सांगणे आणि त्यामुळे वेदनेविषयीची भीती दूर होणे

माझ्यावर उपचार करणारे आधुनिक वैद्यकशास्त्रात उच्चशिक्षित आणि प्रशिक्षित आहेत, तसेच ते तरुण, शक्तीशाली अन् मृदूभाषी आहेत. त्यांना एकदा प्रशांतने (माझ्या जावयांनी) विचारले, ‘‘तुम्ही रुग्णांना उपचारांसाठी किमो देता; परंतु रुग्णाला वेदना आणि इतर त्रास कशामुळे होतात ?’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘आम्ही जो किमो देतो, त्याला पांडव समजा आणि रुग्णाच्या देहात जे कर्करोगाचे विषाणू उत्पन्न झाले आहेत, त्यांना कौरव समजा. जेव्हा किमो देहात पोचते, तर त्या दोघांमध्ये युद्ध होते आणि ते युद्ध कुरुक्षेत्रामध्ये होते; म्हणून युद्धाचे त्रास कुरुक्षेत्रालाच सहन करावे लागतात. किमो आणि कर्करोगाचे विषाणू यांच्या युद्धात रुग्णाचा देहच कुरुक्षेत्र होतो.’’ त्यांचे हे उत्तर ऐकून प्रथम तर ‘मला वेदना अधिक होत आहेत’, असा विचार करून भीती वाटली; परंतु माझ्या त्वरित लक्षात आले, ‘कुरुक्षेत्रात तर श्रीकृष्ण सतत रहात होता. तेथेच त्याने अर्जुनाला आपले विराट रूपसुद्धा दाखवले होते. ‘जेथे श्रीकृष्ण आहे, तेथे भ्यायचे कशाला ?’ केवळ याच विचाराने माझी वेदनेविषयीची भीती दूर झाली.’

 

१०. ‘किमोथेरपी’च्या वेळी आलेल्या अनुभूती

१० अ. आधुनिक वैद्यांनी पहिली किमो देणार असल्याचे सांगून प्रार्थना करण्यास सांगितल्यावर भावजागृती होणे

‘किमोथेरपी’च्या आदल्या दिवशी त्याची सिद्धता पूर्ण झाल्यानंतर आधुनिक वैद्यांनी माझ्या उशाशी ठेवलेल्या ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाकडे (या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र आहे.) पहात म्हटले, ‘‘आज आपण पहिली किमो देणार आहोत. आपण सर्वांनी प्रार्थना करावी.’’ त्यांचे हे शब्द ऐकताच माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि मला कृतज्ञता वाटली.

१० आ. ‘किमोथेरपी’च्या वेळी भावविश्‍वात राहिल्याने वेदनारहित
अन् आनंदाच्या स्थितीत रहाता येणे आणि ‘वेळ कसा गेला ?’, हे न समजणे

‘किमोथेरपी’ आरंभ झाली होती; परंतु मला मात्र केवळ मुंगी चावल्यासारखे जाणवत होते. भावविश्‍वात असल्यामुळे त्याचासुद्धा परिणाम माझ्यावर होत नव्हता. मी जणू आनंदसागरात डुंबत होतो. माझ्या नेत्रांतून भावाश्रू वहात होते. परात्पर गुरुदेव सतत माझ्या डोक्यावरून हात फिरवत होते. मधे एक-दोनदा परिचारिकेने काही विचारल्यावर माझी तंद्री भंग पावली. परिचारिकेचे बोलणे संपताच मी अधिक प्रयत्न न करता पुन्हा भावविश्‍वात गेलो. त्यात मी परात्पर गुरुदेवांचे चरण धरून ठेवले होते आणि ते माझ्या डोक्यावरून हात फिरवत होते. जवळजवळ दीड घंट्यापर्यंत किमो चालू होती आणि मी भावविश्‍वात वेदनाविरहित आणि आनंदाच्या स्थितीत राहिलो. मला कृतज्ञतागीतातील शब्द आठवत होते. ‘वेळ कसा गेला ?’, हे मला समजलेसुद्धा नाही.

१० इ. ‘किमोथेरपी’ चालू असतांना प.पू. दास महाराज भेटायला येणे
आणि ‘किमोचे दुष्परिणाम सहन करण्याची शक्ती मिळण्यासाठी प.पू. दास महाराज
यांच्यासारख्या उच्च पातळीच्या संतांचे दर्शन परात्पर गुरुदेवांच्या कृपेने घडले’, या विचाराने भावजागृती होणे

नंतर मी अर्धवट झोपेत असतांना मला क्षिप्राचा (मुलगी सौ. क्षिप्रा जुवेकर यांचा) आवाज ऐकू आला, ‘‘बाबा, बघा कोण भेटायला आले आहेत ?’’ मी डाव्या बाजूला वळलो आणि झोपाळलेल्या डोळ्यांनी ‘कोण आले आहे ?’, हे बघण्याचा प्रयत्न करू लागलो. येणार्‍या व्यक्तीची झलक बघताच मी विस्मयचकित झालो. ते प.पू. दास महाराज होते ! तात्काळ माझ्या मनात कृतज्ञताभावाचा झरा पाझरू लागला आणि भावावस्थेत मी रडू लागलो अन् वाणीहीन झालो. माझ्यासारख्या एका तुच्छ साधकाची परात्पर गुरुदेव किती काळजी घेतात ! मला ‘किमो’चे दुष्परिणाम सहन करण्याची शक्ती मिळण्यासाठी त्यांनी प.पू. दास महाराज यांच्यासारख्या उच्च पातळीच्या संतांचे दर्शन रुग्णालयात पडल्या पडल्याच करवून दिले. वाह रे माझे भक्तवत्सल दयाळू परात्पर गुरुदेव ! प.पू. दास महाराज यांनी प्रसाद दिला.

१० ई. भ्रमणभाषवर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी बोलतांना
भावविभोर होणे आणि त्यांच्या वात्सल्यपूर्ण अन् चैतन्यमय वाणीने मन निर्भय, निश्‍चिंत आणि स्थिर होणे

जेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा भ्रमणभाष आला, तेव्हा मी भावविभोर झालो. त्यांनी सांगितले, ‘‘परात्पर गुरुदेवांचे सतत तुमच्यावर लक्ष आहे आणि त्यांनी असेच आनंदात रहायला सांगितले आहे.’’ त्यांच्या वात्सल्यपूर्ण आणि चैतन्यमय वाणीने माझे मन एकदम निर्भय, निश्‍चिंत अन् स्थिर झाले.

१० उ. गुरुकृपेने किमोचे दुष्परिणाम अत्यल्प प्रमाणात होणे आणि आनंदात रहाता येणे

७.१.२०२० या दिवशी मला रुग्णालयातून सोडण्यात आले आणि मी आश्रमात परत आलो. गुरुकृपेमुळे मी आनंदात राहू शकत होतो आणि माझ्यावर किमोथेरपीचे आधुनिक वैद्यांना अपेक्षित दुष्परिणाम अत्यल्प प्रमाणात झाले. मला पाहून सद्गुरु, संत आणि साधक म्हणतात, ‘‘तुमच्याकडे पाहून ‘तुम्ही आजारी आहात’, असे वाटतच नाही.’

१० ऊ. ‘बोन मॅरो’चा तपासणी अहवाल चांगला येणे आणि यासाठी
आधुनिक वैद्यांनी ईश्‍वराप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अन् आश्रमातील सर्व साधकांना धन्यवाद देणे

दोन मासांनंतर ‘बोन मॅरो’ची दुसरी ‘बायॉप्सी’ (‘रुग्णामध्ये कर्करोगाचे विषाणू आहेत कि नाहीत ?’, हे पहाण्यासाठी केली जाणारी चाचणी) झाली. जेव्हा त्याचा अहवाल आला, तेव्हा आधुनिक वैद्यांनी मला पुढील संदेश ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून पाठवला, ‘आपल्याला सांगण्यास पुष्कळ आनंद होत आहे की, तुमचा ‘बोन मॅरो’चा तपासणी अहवाल चांगला आला आहे. हे सफल होण्यासाठी सर्वशक्तीमान ईश्‍वराप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. हे सफल होण्यासाठी आश्रमातील सर्व साधकांना धन्यवाद !’

१० ए. उपचार घेणार्‍या अल्प वयाच्या व्यक्तीच्या ‘बायॉप्सी’चा अहवालापेक्षा साधकाचा अहवाला
चांगला येणे आणि ‘यात आश्रमाचे (परात्पर गुरु डॉक्टरांचे) योगदान आहे’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे

नंतर आम्ही आधुनिक वैद्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितले, ‘‘तुमच्या समवेत रक्ताचा कर्करोग झालेले एक रुग्ण आले आहेत; परंतु त्यांचे वय ४५ वर्षे असल्यामुळे त्यांना औषधाचे प्रमाण थोडे अधिक दिले होते आणि तुमचे वय अधिक (६६ वर्षे) असल्यामुळे तुम्हाला औषध अल्प प्रमाणात दिले होते. दोघांची ‘बोन मॅरो’ची दुसरी ‘बायॉप्सी’ साधारणतः एकाच वेळी केली होती. मला आशा होती की, त्या व्यक्तीचा अहवाल तुमच्यापेक्षा अधिक चांगला असेल; परंतु याच्या विपरीत घडले. तुमचा अहवाल त्याच्यापेक्षा पुष्कळच चांगला आला. यामध्ये आश्रमाचे (परात्पर गुरु डॉक्टरांचे) योगदान आहे.’’

१० ऐ. ‘तुमच्यावर ईश्‍वराची पुष्कळ कृपा असल्यामुळे किमोचे
दुष्परिणाम अल्प झाले आहेत’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे

पुढे एक किमो घेण्यासाठी एक दिवस आणि त्याचा दुष्परिणाम न्यून करण्यासाठी ३ दिवस लागत होते. या कालावधीत आधुनिक वैद्यांनी एकदा सांगितले, ‘‘तुमच्यावर ईश्‍वराची पुष्कळ कृपा असल्यामुळे याचे दुष्परिणाम अल्प झाले आहेत. अन्य रुग्णांना सामान्यतः यामुळे पुष्कळ त्रास होतो. त्यामुळे कधी कधी ही औषधे थांबवावी लागतात.’’ मला वाटते, ‘आधुनिक वैद्य आणि काही अन्य कर्मचारी यांना माझ्या संदर्भात गुरुकृपेची काहीतरी जाणीव होत असावी.’

११. ईश्‍वराच्या कृपेने धनाची व्यवस्था होणे

या रोगाचा उपचार पुष्कळ खर्चिक आहे. तेवढे धन माझ्याजवळ नव्हते; परंतु ईश्‍वराच्या कृपेने त्याचीसुद्धा व्यवस्था झाली.

१२. आजारातील असह्य वेदना, रक्ताचा कर्करोग आणि त्यांच्या उपचारांचे
दुष्परिणाम परात्पर गुरुदेवांच्या कृपेने सुसह्य होणे अन् त्याचसह सतत आनंदातही रहाता येणे

मागील ११ मासांपासून अत्यंत वेदनादायक एँकीलोजिंग स्पाँडिलाइटिस’च्या (Ankylosing Spondylitis च्या) तीव्र आणि असह्य वेदना, रक्ताचा कर्करोग अन् त्याच्या उपचारांचा त्रास आणि दुष्परिणाम परात्पर गुरुदेवांनी माझ्यासाठी नुसते सुसह्य केले असे नाही, तर त्याचसह मला सतत आनंदातही ठेवले आहे. त्यासाठी ‘कृतज्ञता’ शब्द अपुरा वाटतो.’

– डॉ. नंदकिशोर वेद, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.११.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment