सर्वांवर प्रेम करणारे आणि सर्वार्थांनी आदर्श असणारे पू. डॉ. नंदकिशोर वेद !

१. श्रीमती मिथिलेश कुमारी (पत्नी)

श्रीमती मिथिलेश कुमारी

अ. आध्यात्मिक कुटुंबात जन्म होणे आणि लहानपणापासून साधना करणे

‘डॉ. नंदकिशोर यांच्या पित्याचे नाव श्री. राम आसरे आणि मातेचे नाव सौ. द्रौपदी होते. श्री. राम आसरे हे व्यावसायिक होते आणि त्यांना अध्यात्माची आवड होती. ते साधना करत होते. पहाटे ४ वाजल्यापासून ते श्रीरामाचा नामजप करत असत. ते संपूर्ण घराची शुद्धी करत असत. आईसुद्धा कुलदेवीचा पुष्कळ नामजप करत होत्या. अशा आध्यात्मिक घरात डॉ. नंदकिशोर यांचा जन्म झाला होता. त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची विशेष आवड होती. डॉ. नंदकिशोर हे हनुमानाचे भक्त होते. ते घराजवळ असलेल्या हनुमानाच्या मंदिरात नियमित दर्शनाला जात असत आणि नियमितपणे मंगळवारचे व्रतही करत असत.

१ आ. आई-वडिलांच्या कामात त्यांना साहाय्य करणे 

ते आपल्या आई-वडिलांचा पुष्कळ आदर करत असत. त्यांची आई शिकलेली नव्हती, तरीही ती शिवणवर्गाला शिकायला जात होती. तेव्हा डॉ. नंदकिशोर स्वतः त्यांच्यासह जाऊन त्यांच्यासाठी टिपणे लिहून घेत असत. त्यांना साहाय्य करत असत. ते त्यांच्या वडिलांनाही त्यांच्या व्यवसायात साहाय्य करत असत. आई-वडिलांविषयी त्यांच्या मनात पुष्कळ आदरभाव होता.

डॉ. नंदकिशोर यांना ५ भाऊ आणि २ बहिणी, अशी एकूण ७ जण भावंडे होती. भावंडांत ते चौथ्या क्रमांकाचे होते. कुटुंबात शिकण्यात ते सर्वांत पुढे होते आणि बुद्धीमान असल्यामुळे सर्व जण त्यांचा सल्ला घेत असत. सर्व जण त्यांना विचारून करत असत आणि त्यांना मानत असत.

१ इ. घर एकत्र कुटुंबपद्धतीचे असल्यामुळे पुष्कळ मोठा परिवार असणे
आणि विवाहानंतर पत्नीला घरातील सर्व गोष्टी पुष्कळ चांगल्या प्रकारे समजावून सांगून प्रोत्साहन देणे 

डिसेंबर १९८० मध्ये माझा डॉ. नंदकिशोर यांच्याशी विवाह झाला. आमचे घर एकत्र कुटुंबपद्धतीचे असल्यामुळे पुष्कळ मोठा परिवार होता; परंतु विवाहानंतर त्यांनी मला पुष्कळ चांगल्या प्रकारे सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. माझ्या मनातील सर्व भीती दूर केली, तसेच मला प्रोत्साहन दिले. घरातील सर्व कामे उत्तम प्रकारे होण्यासाठी त्यांनी मला नियोजन करून दिले. मनातल्या गोष्टी, अडचणी सांगण्यासाठीही त्यांनी मला प्रोत्साहन देऊन पुष्कळच आधार दिला.

१ ई. सर्व भावांसाठी आधारस्तंभ असणे, भावांविषयी मनात
अतिशय आदर आणि प्रेम असणे अन् त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करणे

डॉ. नंदकिशोर त्यांच्या सर्व भावांसाठी आधारस्तंभ होते. त्यांना आपल्या भावांविषयी अतिशय आदर आणि प्रेम होते. भावांना कसल्याही प्रकारच्या साहाय्याची आवश्यकता असेल, तर ते प्रथम पुढाकार होऊन साहाय्य करत असत. भावांना शिक्षणासाठी साहाय्य लागू दे किंवा अन्य, डॉ. नंदकिशोर अगदी मनापासून सर्वांना साहाय्य करत होते. त्यामुळे त्यांचे भाऊसुद्धा साहाय्य लागल्यास डॉ. नंदकिशोर यांचे स्मरण करत असत. इतरांना साहाय्य करण्यात ते कधीही मागे हटले नाहीत. साहाय्य करतांना त्यांच्या मनात कसलाही स्वार्थ नसायचा. ते सर्वार्थांनी आदर्श बंधू होते.

१ उ. सर्व वहिनींशी अतिशय मिळूनमिसळून वागणे आणि त्यांना साहाय्य करणे 

त्यांच्या सर्व भावजयाही (वहिनीही) त्यांना पुष्कळ मानत होत्या. डॉक्टरही कोणत्याही भावजयीला कसले साहाय्य लागले, तर तत्परतेने साहाय्य करत होते. सर्व भावजयांना त्यांचा आधार वाटत होता. ते सर्वांशी अतिशय मिळूनमिसळून वागत असत. इतरांना साहाय्य करणे जणू त्यांचा स्वभावच होता. त्या दृष्टीने ते एक आदर्श दीरसुद्धा होते.

१ ऊ. पत्नीला जीवनाच्या प्रत्येक वळणावर सांभाळून तिला प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन देणे 

जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्यांनी मला सांभाळले आणि प्रोत्साहनही दिले. मला ज्या गोष्टीची आवड आहे, ती प्रत्येक गोष्ट करण्यात त्यांनी मला साहाय्य केले. आमच्या विवाहानंतर त्यांनी मला पुढचे शिक्षण घेण्यासाठी, तसेच चारचाकी शिकण्यासाठीही प्रोत्साहन दिले होते; परंतु मी ते शिकू शकले नाही. जेव्हा मुले मोठी झाली, तेव्हा मला शाळेत शिकवण्याची नोकरी करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. साधनेत आल्यानंतर साधनेत पुढे जाण्यासाठी मला साहाय्य केले. पूर्वी मला कोणासमोर बोलायची भीती वाटत असे; परंतु त्यांनी त्यावर मात करण्यासाठी मला साहाय्य केले. आज मी जी काही आहे, ती केवळ त्यांचे वेळोवेळी साहाय्य लाभल्यामुळेच आहे.

१ ए. सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर घरातील सर्व गोष्टी
दायित्व घेऊन पहाणे आणि पत्नीला सेवेला पाठवणे अन् ‘साधनेच्या दृष्टीने
कसा विचार करायला पाहिजे ?’, याचे योग्य मार्गदर्शन अत्यंत शांतपणे करणे 

जेव्हा मी सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर सत्संगात आणि सेवेला जाऊ लागले, तेव्हा त्यांनी कधीही मला अडवले नाही. मी सेवेसाठी घरातून बाहेर गेले, तर ते घरी मुलांना सांभाळत होते. ते मला सेवेला जाऊ देत असत आणि स्वतः घराचे सर्व बघत असत. त्यामुळे मला पुष्कळ साहाय्य होत असे. जेव्हा कधी मला प्रतिक्रिया यायच्या, मनात नकारात्मकता येत होती, तेव्हा ते मला योग्य दृष्टीकोन देत असत. मला ‘साधनेच्या दृष्टीने कसा विचार करायला पाहिजे ?’, याचे मार्गदर्शन ते अत्यंत शांतपणे करत होते. त्यामुळे मला त्या स्थितीतून बाहेर पडण्यास आणि पुन्हा साधनेचे प्रयत्न वाढवण्यास साहाय्य होत असे. बिहारमध्ये धर्मजागृती सभा असो किंवा प्रयागचा कुंभमेळा असो, अशा सेवांसाठी काही दिवसांसाठी जाण्यास ते मला प्रोत्साहित करत होते. त्यांना जेवढे शक्य असेल, तेवढे साहाय्य ते मला करत होते. त्यामुळे मी या सर्व सेवा मनापासून करू शकत असे. घराचे संपूर्ण दायित्व ते स्वतःकडे घेत असत आणि मला सेवेला जाण्यास साहाय्य करत असत.

१ ऐ. पत्नीला मुलींवर चांगले संस्कार करण्यासाठी
वेळ देण्यास सांगणे आणि दोघींनाही साधनेत अन् इतर प्रत्येक गोष्टीत साहाय्य करणे 

आम्हाला दोन मुली आहेत. दोघींवर चांगले संस्कार होण्यासाठी ते बारकाईने लक्ष देत होते. ते मला म्हणायचे, ‘‘तू दिवसभर घरातील कामे, भोजन इत्यादी सर्व गोष्टी कर; परंतु सायंकाळचा वेळ दोन्ही मुलींना देत जा. त्यांचे शिक्षण, त्यांच्यावर चांगले संस्कार होतील, याकडे लक्ष देत जा.’’ त्यांनी पुढे साधनेतसुद्धा मुलींना पुष्कळ साथ दिली. शिक्षण घेतल्यानंतर आमची धाकटी मुलगी क्षिप्रा हिला पूर्णवेळ साधना करण्यासाठी त्यांनीच साहाय्य केले. तिला जे चांगले वाटते, ते करण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी तिला साहाय्य केले. ‘मुलीने साधनेत पुढे जावे, गुर्वाज्ञेनुसार तिने करावे’, असे त्यांना वाटत होते. ते सर्वार्थांनी एक आदर्श पिता होते. त्यांनी मोठ्या मुलीला शिक्षणासाठी दुसर्‍या राज्यात पाठवले. तिला जे लागेल ते साहाय्य केले. तिच्या नोकरीसाठीही त्यांनी पुष्कळ कष्ट घेतले.

 

२. सौ. कनुप्रिया श्रीवास्तव (मोठी मुलगी)

सौ. कनुप्रिया श्रीवास्तव

२ अ. ‘माझ्या वडिलांबद्दल मी काय सांगू ?

त्यांना ओळखणारी प्रत्येक व्यक्ती त्यांना मान आणि आदरच देत असे.

२ आ. मुलीचा स्वभाव अत्यंत लाजरा आणि साधा असल्याने
तो पालटण्यासाठी वडिलांनी अत्यंत जड मनाने तिला वसतीगृहात ठेवणे 

मी त्यांची मोठी मुलगी असल्यामुळे त्यांचे माझ्यावर विशेष प्रेम होते. माझा वर्ण सावळा असल्यामुळे मला स्वतःविषयी न्यूनगंड होता; परंतु माझ्या वडिलांनी मला या न्यूनगंडातून बाहेर काढले. माझा स्वभाव अत्यंत संकोच करणारा, लाजरा आणि साधा होता. तो पालटण्यासाठी त्यांनी अत्यंत जड मनाने मला वसतीगृहात ठेवून माझे शिक्षण पूर्ण करवून घेतले, ज्यामुळे मी समाजाला चांगले ओळखू शकीन. जेव्हा मी वसतीगृहात गेले, तेव्हा माझे वडील माझी आठवण काढून रडायचे; परंतु त्यांनी कधीही मला शिक्षण सोडून घरी यायला सांगितले नाही. त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन आणि धैर्यच दिले.

२ इ. माझे वडील आमचा शब्दकोष (dictionary) होते

कोणताही प्रश्‍न त्यांना विचारला की, त्यांच्याकडे त्याचे उत्तर असायचे. त्यांचे ज्ञान (knowledge) सदैव अद्ययावत् (updated) असायचे.

२ ई. माझे वडील अनेक कष्ट सहन करत होते

परंतु ते कधीही आम्हाला सांगायचे नाहीत; कारण ‘आम्हाला त्याचा त्रास होऊ नये’, असे त्यांना वाटत होते.

२ उ. माझ्या वडिलांचा सर्वांत मोठा गुण होता की

त्यांना कितीही बरे नसले, तरी ते स्वतःची कामे स्वतःच करायचे. ते स्वतःचे कपडेसुद्धा स्वतःच धुवायचे.

२ ऊ. वडील प्रत्येकाला आनंदानेच भेटायचे

त्यांच्या मनात कोणाविषयी द्वेष नसायचा. ते आपल्या जावयांना आपल्या मुलांप्रमाणेच मानत होते.

२ ए. मुलीला योग्य दृष्टीकोन देणे 

मी नोकरी मिळण्यासाठी फार काळजीत होते. माझे वडील मला नेहमी सकारात्मक रहायला शिकवायचे. ते म्हणायचे, ‘‘योग्य वेळेपूर्वी आणि आपल्या भाग्यात जेवढे आहे, त्यापेक्षा अधिक कधीही मिळत नसते.’

२ ऐ. प्रेमभाव 

माझी मोठी मुलगी मीठी (आनंदिता) हिच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. ते तिच्याशी लहान होऊन खेळायचे. माझ्या प्रथम प्रसुतीच्या वेळी माझी प्रकृती बरी नव्हती आणि माझ्या यजमानांचीही प्रकृतीही बरी नसायची. अशा परिस्थितीत स्वतःची प्रकृती बरी नसतांनाही त्यांनी मला पुष्कळ सांभाळले.

२ ओ. दुसर्‍या प्रसुतीच्या वेळी प्रकृती बरी नसल्याने विश्रांती घ्यावी लागणे,
त्याच कालावधीत वडिलांची प्रकृती बिघडण्यास प्रारंभ होणे आणि त्याविषयी त्यांनी काहीही न सांगणे 

दुसर्‍या प्रसुतीच्या वेळी ६ – ७ मास माझी प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे मी विश्रांती घेत असे. त्याच कालावधीत वडिलांची प्रकृती बिघडणे चालू झाले होते; परंतु त्यांनी मला याविषयी काही सांगितले नाही. जेव्हा त्यांची प्रकृती अधिकच बिघडू लागली, तेव्हा अयोध्येत औषधोपचार योग्य प्रकारे होत नसल्यामुळे ते गोव्याला आले. या काळातसुद्धा त्यांना माझीच चिंता असायची.

२ औ. प्रत्येक कृती आदर्श असणे 

माझे वडील प्रत्येक कृती अतिशय नियोजितबद्धरित्या करायचे. ते आपले अंथरूणसुद्धा एवढ्या चांगल्या प्रकारे अंथरायचे की, सर्वांना त्यावर झोपण्याची इच्छा होत असे. जेव्हा आम्ही लहान होतो, तेव्हा ते आमचे अंथरूणसुद्धा अत्यंत व्यवस्थितपणे घालायचे. त्यांची प्रत्येक कृती आदर्श होती.’

 

परात्पर गुरुदेवांवर दृढ श्रद्धा असणार्‍या वडिलांनी
(पू. डॉ. नंदकिशोर वेद यांनी) मुलीला पाठवलेले काही भावपूर्ण लघुसंदेश !

सौ क्षिप्रा जुवेकर

१. हे मोक्षगुरु, अब एक ही कामना है ।
बनकर धूलकण इसी चरणपादुका में समा जाएं, चरणपादुका हो जाएं ।

हे परम पूज्य, आपने हम पर अत्यंत कृपा कर हमें अपनी चरणपादुकाएं प्रदान की हैं ।
उसके लिए हम आपके श्री चरणों में कोटि-कोटि कृतज्ञ हैं ॥ १ ॥

हे गुरुश्रेष्ठ, हमारे हृदय का राग-द्वेष, दोष-अहं, सब आप ही नष्ट कीजिए ।
आप ही हमारे हृदय को निर्मल और पवित्र कीजिए ॥ २ ॥

हे कृपालु हरि, आप ही हमारे हृदय को मंदिर बना दीजिए ।
उस मंदिर में अपनी चरणपादुकाओं को सजा दीजिए ॥ ३ ॥

हे विष्णु स्वरूप, हम सब अपने हृदय मंदिर में इन पादुकाओं का हर क्षण, हर पल दर्शन कर पाएं ।
हमारे सब पाप मिटें और हम तर जाएं ॥ ४ ॥

हे दयानिधान, इन पादुकाओं का दर्शन पाकर, हमारा कष्ट मिटे ।
आनंद बढे और साधना का बल मिले ॥ ५ ॥

हे मोक्षगुरु, अब एक ही कामना है ।
बनकर धूलकण इसी चरणपादुका में समा जाएं, चरणपादुका हो जाएं ॥ ६ ॥

– डॉ. नंदकिशोर वेद, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१२.२०२०)

 

२. पत्नीला गंभीर आजार झाल्याचे
कळल्यावरही गुरूंवर दृढ श्रद्धा असणारे डॉ. नंदकिशोर वेद !

‘आईला गंभीर आजार झाल्यावरसुद्धा वडिलांची श्री गुरूंवर किती श्रद्धा होती ?’, हे त्यांच्या भ्रमणभाषवरील संदेशावरून लक्षात होते. आईला अकस्मात् हातापायांत कंप होऊ लागल्यामुळे गोव्यातील रुग्णालयामध्ये भरती केले होते. २८.११.२०१९ या दिवशी मी वडिलांना पाठवलेला लघुसंदेश आणि त्यावर त्यांनी दिलेले उत्तर पुढे दिले आहे.

अ. वडिलांना पाठवलेला संदेश 

आईला ‘chronic inflammatory demyelinating polyneuropathy (CIDP)’ हा आजार झाला आहे.’

२ आ. वडिलांनी पाठवलेले उत्तर 

मला तर ते काही ठाऊक नाही. ‘हा आजार किती मोठा आहे ?’, हेही मला ठाऊक नाही; परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे, ‘कोणताही आजार, कोणताही त्रास कितीही मोठा असू दे, तो माझ्या गुरुदेवांपेक्षा मोठा कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे काळजी करू नये. कृष्ण रात्री !

श्री गुरुचरणी दृढ श्रद्धा ठेवणारे असे आध्यात्मिक पिता आम्हाला दिल्याविषयी श्री गुरुचरणी अनंत कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. क्षिप्रा जुवेकर (कै. डॉ. नंदकिशोर वेद यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment