सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आरंभलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संग मालिकांच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ‘कृतज्ञता सप्ताहा’चे आयोजन !

कोरोना महामारीच्या संक्रमणामुळे वर्षभरापूर्वी देशभरात प्रथम ‘जनता कर्फ्यू’ आणि नंतर ‘दळणवळण बंदी’ लागू करण्यात आली, परिणामी लोकांना बाहेर पडता येत नव्हते. या काळात सर्वच व्यवहार ठप्प झाल्यामुळे अनेकांना तणाव, निराशा आदी मानसिक विकारांचा सामना करावा लागत होता. अशा आपत्कालीन स्थितीला तोंड देत आनंदी कसे रहायचे, तसेच या काळात मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढावे, यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाईन’ सत्संग मालिका चालू करण्यात आल्या.

प्रौढांसाठी ‘धर्मसंवाद’, बालकांसाठी ‘बालसंस्कार’, तर साधनेत रुची असणार्‍यांसाठी ‘भावसत्संग’ आणि ‘नामजप सत्संग’ या हिंदी भाषेतील ४ सत्संग मालिका आरंभण्यात आल्या. या मालिकांची आता वर्षपूर्ती होत आहे. वर्षभरात या मालिकांना दर्शकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आपत्तीच्या काळातही भगवान श्रीकृष्ण आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची अपार कृपा, तसेच दर्शकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यांमुळे या मालिका वर्षभर नियमितपणे चालू आहेत. त्यामुळे या वर्षपूर्तीच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ३ एप्रिल ते १० एप्रिल या काळात ‘धर्मशिक्षा की वर्षगांठ – कृतज्ञता समारोह’ हा कृतज्ञता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीकडून देण्यात आली आहे.

१. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी अध्यात्म, धर्म, संस्कार, संस्कृती, ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना आदी विविध विषयांवर अनेक वर्षे प्रत्यक्ष साधना, संशोधन आणि अभ्यास करून अखिल मानवजातीला उपयुक्त असे लिखाण केले आहे. या सत्संग मालिकांतील ज्ञानाचा स्रोत हे मूळ लिखाणच आहे.

२. ‘बालसंस्कार’ मालिकेतील ईश्‍वरसमान माता-पित्याच्या सेवेचे महत्त्व, चांगले संस्कार होण्यासाठी प्रतिदिन करावयाच्या कृती आदी विषयांमुळे भावीपिढी आदर्श आणि सदाचारी बनेल.

३. ‘धर्मसंवाद’ मालिकेद्वारे हिंदु धर्माविषयीचे समाजात पसरलेले अपसमज दूर करून धर्माची महती सांगितली जाते, हे घरबसल्या धर्मशिक्षण आहे. ‘नामजप सत्संग’ मालिकेत नामजपाचे महत्त्व, करण्याच्या पद्धती, प्रत्यक्ष जप करणे आदी साधनेच्या संदर्भातील; तर ‘भावसत्संग’ मालिकेत ईश्‍वराप्रतीचा भाव कसा वाढवावा, याविषयी मार्गदर्शन करण्यात येते.

 

सर्व सत्संग मालिका एकूण २ कोटी वेळा पाहिल्या गेल्या !

/SanatanSanstha1 आणि /HinduJagruti या यू-ट्यूब चॅनलद्वारे, तसेच ‘Hindu Adhiveshan’ या फेसबूक पेजद्वारे या सत्संग मालिकांचे थेट प्रक्षेपण केले जाते. ‘नामजप सत्संग’ प्रतिदिन स. १०.३० वा., ‘भावसत्संग’ प्रतिदिन दु. २.३० वा., ‘बालसंस्कार’ शनिवारी आणि रविवारी सायं. ५ वा., तर ‘धर्मसंवाद’ प्रतिदिन सायं. ७ वा. प्रसारित करण्यात येतात. गेल्या वर्षभरात ‘नामजप सत्संग’ ७९ लाख ८९ सहस्र ६२२ इतक्या वेळा; ‘भावसत्संग’ ५१ लाख ३६ सहस्र ६६५ इतक्या वेळा; ‘बालसंस्कार’ २५ लाख ७८ सहस्र ७४३ इतक्या वेळा; तर ‘धर्मसंवाद’ ४६ लाख ८६ सहस्र १७३ इतक्या वेळा पाहिला गेला आहे. सर्व सत्संग मालिका एकूण २ कोटी ३ लाख ३१ सहस्र २०३ इतक्या वेळा पाहिल्या गेल्या आहेत. ही आमच्यासाठी मोठी अनुभूती असल्याचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी म्हटले आहे. सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी अशा मालिका काळाची गरज असून हे सत्संग नियमितपणे पहावेत, असे आवाहन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी केले आहे.

Leave a Comment