देवाप्रती पूर्ण शरणागत आणि भोळा भाव असलेले रामनगर (बेळगाव) येथील सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. प्रियांका लोटलीकर यांनी रामनगर (बेळगाव) येथील सनातनचे संत पू. शंकर गुंजेकर यांच्याशी साधनेचा प्रवास याविषयी साधलेला संवाद येथे दिला आहे. माघ शुक्ल पक्ष अष्टमी या दिवशी पू. गुंजेकरमामा यांचा तिथीनुसार वाढदिवस आहे.

पू. शंकर गुंजेकर

 

१. परिस्थिती कशीही असली, तरी देवावरची श्रद्धा
कधीच न्यून न होणे, उलट देवाची पुष्कळ ओढ असणे

कु. प्रियांका लोटलीकर : नमस्कार मामा, आज सकाळी मी देवाला विचारत होते, मी पू. शंकरमामांशी (पू. शंकर गुंजेकर यांच्याशी) प्रथमच बोलणार आहे. त्याचा आरंभ कसा करायचा ? तेव्हा मला प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) एक भजन आठवले. सावत्या माळ्याने हो, माळ्याने हो, माळ्याने लावला मळा ।, तेव्हा मला सावत्या माळ्याच्या ठिकाणी तुम्हीच दिसला.

पू. शंकरमामा (हसून) : मला देवाची पुष्कळ आवड आणि ओढ होती. मार्गावर कुठलीही श्री गणेशमूर्ती दिसली किंवा उदबत्तीच्या पाकिटावर, पत्रिकेवर, कुठेही देवाचे चित्र दिसले, तर मी ते घ्यायचो. लोक म्हणायचे, हा असा काय वेड्यासारखा देवाची चित्रे गोळा करतो ? त्यामुळे ते दुसरीकडे बघत असतांना मी हळूच देवाची चित्रे उचलायचो. शेतावरच्या गवताच्या झोपडीतील भिंतीला ती बारीक बारीक चित्रे पिठाने चिकटवत होतो. त्या भिंतीला नंतर सारवायची आवश्यकताच नव्हती; कारण भिंतीवर खालपासून वरपर्यंत देवाची चित्रे चिकटवली होती. माझी देवाप्रतीची ओढ पाहून माझ्या बाबांनी मला आमच्या ग्रामदेवतेची पूजा करण्यास सांगितले होते; पण काही वेळा परिस्थितीमुळे बाबा वैतागून मला म्हणायचे, तू देवाची एवढी भक्ती करतोस; पण देवाने तुला असे का केले ? आता तू पूजाही करू नकोस. सोडून दे. तेव्हा मी त्यांना म्हणायचो, बाबा, असे म्हणायचे नाही. पूर्वीच्या जन्माचे काहीतरी असेल.

पू. शंकर गुंजेकर यांच्याशी संवाद साधतांना कु. प्रियांका लोटलीकर (वर्ष २०१६)

 

२. सनातन संस्थेशी परिचय

असे करतांना १५ वर्षे गेली. या १५ वर्षांत कर्जही फेडले गेले. सतत काम करून डोळ्यांखाली काळे आले. माझ्या ओळखीच्या व्यक्तीला सनातनचे साधक भेटत होते. तिला मी देवाविषयी माहिती विचारत होतो. तीही कंटाळली, हा प्रतिदिन येतो आणि देवाविषयी विचारतो. ती मला म्हणाली, सनातनचे साधक टोपी घालून येतात आणि देवाविषयी सांगतात. मी त्यांच्याशी तुमची भेट घालूून देतो. मग मी म्हणालो, कोण ते दाखव. ते लोक पैसे घेतात का ? तेव्हा तिने सांगितले, ते मला काही ठाऊक नाही. मग मी म्हणालो, घेतले, तर घेऊ दे. मी कुणाकडून तरी पैसे घेऊन २०० रु. पर्यंत देतो. मग घरी येऊन आईला विचारले, सनातनचे साधक देवाविषयी सांगतात. त्यांना घरी बोलावू का ? आई म्हणाली, सोमवारी बोलव. मग मी सनातनच्या साधकांना सोमवारी घरी बोलावले.

 

३. आई-वडिलांनी पुष्कळ चांगले संस्कार केल्यामुळे वाईट मार्गाचा विचारही मनात न येणे

कु. प्रियांका लोटलीकर : एवढी तुमची घरची परिस्थिती बिकट होती, तरी अशा बिकट परिस्थितीत वाईट मार्गाने पैसे मिळवूया, असे विचार तुमच्या मनात कधी आले का ?

पू. शंकरमामा : एक दिवसही असा विचार मनात आला नाही. कुणाला फसवायचे नाही, चोरी करायची नाही किंवा असले काहीच करायचे नाही, असे मला वाटायचे.

कु. प्रियांका लोटलीकर : जे काही होईल, ते माझ्या नशिबानेच होणार, असे वाटत असल्यामुळे देवच सगळे करत आहे, याची जाणीव होती.

पू. शंकरमामा : बाबांनीही मला सांगितले होते, मी असेपर्यंत कुणाचे वाईट चिंतायचे नाही आणि वाईट करायचे नाही. वाईट मार्गाने जायचे नाही. मी कसे केले, तसे तुम्हीही करा. परिस्थिती कशीही राहू दे. त्यांचे हे शब्द मी लक्षात ठेवले.

कु. प्रियांका लोटलीकर : आई-वडिलांनी पुष्कळ चांगले संस्कार केले.

पू. शंकरमामा : ते देवाचे भक्तच होते.

 

४. देवाशी बोलणे आणि देवाचे दर्शन होणे

पू. शंकरमामा : उद्या आमच्यावर काही संकट येणार असेल, तर शंकर (देव) मला आधीच सांगायचा.

कु. प्रियांका लोटलीकर : म्हणजे तुमचे भगवान शंकरांशी प्रत्यक्ष बोलणे व्हायचे.

पू. शंकरमामा : हो.

कु. प्रियांका लोटलीकर : तुम्हाला देव कसा दिसायचा ?

पू. शंकरमामा : स्वप्नात दिसायचा. मी पलंगावर डोळे मिटून झोपलो, तर शंकर माझ्याशी बोलत आहे, असे मला वाटायचे. तो म्हणायचा, बघ रे, तिथे जाऊन कुणी काही ठेवले आहे का, ते बघ ? तिथे जाऊन बघितल्यानंतर मला ते मिळायचे. रामनगरहून ८ कि.मी. अंतरावर वैजगाव आहे. त्या गावी मी शेती करत होतो. तेथील लोक चांगले नाहीत. शेतावर मारायलाही यायचे. एकदा माझा बैल शेतातून पळून गेला. तो दुसर्‍या कुणाच्या शेतात गेला, तर लोक मला शिव्या देतील; म्हणून मला भीती वाटली. मी त्याची पावले शोधत त्या मागे मागे जंगलात गेलो. अर्ध्या जंगलात गेल्यावर मला मोठी शंकराची पिंडी दिसली. पूर्वी कुणी तरी पांडवांनी केली असणार, असे समजून मी तिला हात लावून नमस्कार केला. एक प्रदक्षिणा घातली आणि आमचा बैल कुठे गेला ? ते मला ठाऊक नाही. मला तो मिळू दे, अशी प्रार्थना केली. थोडेसे पुढे गेल्यावर त्या बाजूने आमचा बैल येत होता. मी बैलाला घेऊन गावात आलो आणि गावच्या लोकांना विचारले, या जंगलात शिवाची पिंड आहे का ? ते नाही म्हणाले.

कु. प्रियांका लोटलीकर : पिंड केवढी होती ?

पू. शंकरमामा : बरीच मोठी होती. अंदाजे १० फूट उंचीची होती. तिची गोलाईही मोठी होती. मला तिच्याकडे डोके वर करून बघावे लागत होते; पण गावचे लोक नाही म्हणाले; म्हणून दुसर्‍या दिवशी पुन्हा जंगलात जाऊन पाहिले, तर तिथे पिंड नव्हती.

कु. प्रियांका लोटलीकर : अरे बापरे ! म्हणजे प्रत्यक्ष शिवानेच दर्शन दिले.

 

५. भांडणे केल्याने देव घरातून निघून जाईल, या विचाराने
भांडण न करण्याचे ठरवणे, तरीही भांडणे होणे, तेव्हा शंकरदेवाचे प्रत्यक्ष दर्शन होणे

पू. शंकरमामा : आमच्या बहिणी काहीतरी निमित्त करून भांडायच्या. मग शंकर मला म्हणाला, तुमच्या घरात प्रतिदिन भांडणे होतात. मी तेथे रहाणार नाही. मला बाजूला एक देऊळ बांधून दे, मी तिथे रहातो.

कु. प्रियांका लोटलीकर : म्हणजे घरात शंकराची पिंड होती का ?

पू. शंकरमामा : नाही. देव घरातून बाहेर जाईल, या विचाराने मला वाईट वाटायचे. मी शंकराला म्हणालो, मी एवढी भक्ती करून तुला प्रसन्न करून घेतले. आता तू घरीच रहायचे. बाहेर जायचे नाही. मी सगळ्यांना सांगतो, आता काही भांडण करणार नाही; पण तू घरीच रहा. नंतर बहिणींना सांगितले, आता भांडायचे नाही. नाहीतर शंकरदेव मी घरी रहात नाही, असे म्हणतो. भांडणे केलेली त्याला चालत नाहीत. तेव्हा त्याही म्हणाल्या, हो. आम्ही आता काही भांडण करणार नाही. तेव्हा असे काही मला ठाऊक नव्हते. आता सनातनमध्ये सगळे शिकवतात. तेव्हा मला स्वभावदोष इत्यादी काही कळत नव्हते. मी हे सर्व मनानेच करायचो. दुसर्‍या दिवशी पुन्हा दोघींची भांडणे चालू झाली. त्यांची भांडणे चालू झाली, तेव्हा मी दुसर्‍या खोलीत होतो. त्यांच्यामधून शंकरदेव आला आणि माझ्यासमोर येऊन उभा राहिला. त्या दिवशी मी प्रत्यक्ष शंकरदेव बघितला. बहिणींना काही तो दिसला नाही; पण तो मला भांडणार नव्हता ना ? आता भांडायला कशा लागल्या ?, असे विचारील; म्हणून मी त्याच्याकडे वर मान करून बघितलेच नाही. बाजूने हळूच पाहिले.

कु. प्रियांका लोटलीकर : कसे बघितले ?

पू. शंकरमामा : मी मान खाली घालून थांबलो. मला शंकराचे केवळ पाय तेवढे दिसले. त्याच्या गळ्यात घातलेला हार पायापर्यंत आला होता. शंकर चांगला गोरापान आणि सुंदर दिसत होता ! त्यानंतर तो अर्धा घंटा थांबला. नंतर पाय दिसत नव्हते; म्हणून मी वर बघितले.

कु. प्रियांका लोटलीकर : तुम्ही वळून बघितले नाही का त्याच्याकडे ?

पू. शंकरमामा : मी घाबरून बघितले नाही. तो गेल्यानंतर मला वाटले, अरे, मी किती पापी ! देव समोर येऊनही मी तोंडवळाही पाहिला नाही.

कु. प्रियांका लोटलीकर : शंकराची वल्कलेही दिसली का तुम्हाला ?

पू. शंकरमामा : हो. डोगलापासून (गुडघ्यापासून) खाली चांगलेच बघितले. पांढरा हार होता.

कु. प्रियांका लोटलीकर : आणि पाय केवढे होते ?

पू. शंकरमामा : पाय मोठे होते आणि गोरेपान अन् गुबगुबीत होते !

 

६. अनेक वेळा देवाचे दर्शन होणारे पू. शंकरमामा गुंजेकर !

कु. प्रियांका लोटलीकर : तुम्हाला अनेक वेळा देवाने दर्शन दिले ना ?

पू. शंकरमामा : हो. देवाने बर्‍याच वेळा दर्शन दिले.

कु. प्रियांका लोटलीकर : देवतांचे दर्शन होते, असे आपण केवळ गोष्टींमध्ये ऐकले आहे; पण तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन झाले आहे.

पू. शंकरमामा : हो. आता घरात समोरच शंकराचे छायाचित्र लावले आहे. मी त्याच्यासमोर खाटेवर बसतो आणि त्याच्याकडे बघत बसतो. तेव्हा मला वेगवेगळे रंग दिसतात. कधी गुलाबी रंग दिसायचा. मग मी सांगायचो, बघा, आज देवाचा रंग गुलाबी आहे. तोंडवळा कसा दिसतोय बघा.

कु. प्रियांका लोटलीकर : मग इतरांनाही दिसायचे का तसे ?

पू. शंकरमामा : कधी कधी दिसायचे. मंगल (धाकटी बहीण) म्हणायची, हो. मलाही दिसत आहे. आईलाही तसे दिसत होते. मला ते अधिक दिसायचे.

 

७. देवाची पापी घेतल्यावर देवाने गळ्यात साप टाकणे, तेव्हा चूक लक्षात येऊन पापी घेणे बंद करणे

पू. शंकरमामा : आई आणि मंगल उपवास करायच्या. घरात सगळ्यांनाच देवाविषयी आवड निर्माण झाली. शेतावर देवाचे छायाचित्र लावत होतो. मळणी झाल्यावर घरी यायचो. तेव्हा मला त्याला सोडून येतांना पुष्कळ वाईट वाटून रडायला यायचे. मग मी घरातून पुन्हा तिकडे जायचो आणि देवाला सांगायचो, ‘उद्या येतो हां !’ मग असे किती वेळा जायचो आणि किती वेळा परत यायचो. त्यात माझा वेळ जायचा. मला तेव्हा काही कळत नव्हते; पण देवाने ओळखले, ‘हा जाणारच नाही.’ म्हणजे मी तिथेच रहायचो. ‘उद्या येतो, उद्या येतो’, असे करतांना दिवस मावळायला लागायचा. मी पुढे जायचो आणि पुन्हा परत यायचो. माझे समाधानच होत नव्हते. मग मी देवाचा मुका घ्यायचो. माझी चूक लक्षात आणून देण्यासाठी देवाने काय केले ? एका सापाने माझ्या गळ्यात उडी मारली.

कु. प्रियांका लोटलीकर : बापरे !

पू. शंकरमामा : मी सापाला उडवून टाकले; पण मी घाबरलो. लांब राहिलो आणि देवाला म्हणालो, ‘आजपासून मी तुझी पापी घेणार नाही. माझी चूक झाली. मला क्षमा कर.’ तेव्हापासून देवाची पापी घेतली नाही. तेव्हा मला वाटले, ‘मी देवाची पापी घेतली; म्हणूनच देवाने असे केले, म्हणजे ती चूक असणार.’ मग मी घरी आलो.

 

८. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना आरंभ करणे आणि अनुभूती येणे

कु. प्रियांका लोटलीकर : बापरे ! किती अनुभूती आहेत तुमच्या ! त्यानंतर तुम्ही सनातनमध्ये कधी आलात ?

पू. शंकरमामा : १५ किंवा १६ वर्षे झाली.

कु. प्रियांका लोटलीकर : मग तुम्ही सत्संगाला जायला लागलात.

पू. शंकरमामा : हो. त्यांना बोलावून घेतले.

 

९. कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करायला लागल्यानंतर
‘कंपाऊंड’चे काम मागील ६ वर्षे होत नव्हते, ते केवळ १५ दिवसांत
विनासायास होणे, तेव्हा ‘सनातन संस्थेत शक्ती आहे’, अशी निश्‍चिती होणे

कु. प्रियांका लोटलीकर : तुम्ही तेव्हा कशा प्रकारची साधना करत होतात ? सनातन संस्थेमध्ये आल्यानंतर प्रसाराला जाणे इत्यादी कशा प्रकारे केलेत ?

पू. शंकरमामा : साधकांनी सत्संग घेतला. सत्संगामध्ये ‘कुलदेवतेचा नामजप आणि पूर्वजांच्या त्रास न्यून होण्यासाठी दत्ताचा नामजप करायचा’, असे सांगितले. मी दोन सत्संगामध्ये त्यांचे बोलणे ऐकून घेतले. ‘मला हे कळते आणि हेच सांगतात’, असे वाटले; पण देवाविषयी बोलतात, तर ऐकत बसायचो. तिसर्‍या सोमवारी मनात ठरवले, ‘एवढे सांगतात ना, मग बघूया.’ आमच्या बाजूचे लोक आम्हाला ‘कंपाऊंड’ करू देत नव्हते. शेजारी थोडा श्रीमंत आणि नोकरी करणारा होता. आम्ही गरीब असल्यामुळे तो आमचे ऐकत नव्हता. सारखी तक्रार करायचा. मी देवाला सांगितले, ‘आजपासून मी सनातनने सांगितल्याप्रमाणे नामजपाला आरंभ करत आहे. हे ‘कंपाऊंड’ या वर्षी तंट्याविना, काही मारामारी न होता झाले, तर या सनातनमध्ये काहीतरी शक्ती आहे’, असे मी समजेन.

मग मी कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप चालू केला. १५ दिवस झाले आणि शेजारच्याचा भाऊ माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘शंकर, इकडे कूप (कंपाऊंड) करूया. सामान आणून टाक.’’ मी म्हणालो, ‘‘तुझा भाऊ करू देत नाही.’’ तो म्हणाला, ‘‘कसा करू देत नाही, ते बघूया. मी करून देतो.’’ त्याने ते ‘कंपाऊंड’ करू दिले. त्याने त्याच्या भावाला सांगितले, ‘‘आता हे ‘कंपाऊंड’ मोडशील, तर वाईट होईल.’’ मग माझी निश्‍चिती झाली, ‘मागील ६ वर्षे पोलीस ठाण्यात सांगूनही ‘कंपाऊंड’ झाले नाही, ते केवळ १५ दिवस नामजप केल्यानंतर झाले. म्हणजे या सनातनमध्ये काहीतरी शक्ती आहे.’

 

१०. रात्री नदीत उतरल्यावर अंगावर भला मोठा
साप चढणे आणि तो एकदम चमकत असल्याचे दिसणे

पू. शंकरमामा : मला पूर्वी एक अनुभूती आली होती. आमचे काका आणि मी नदीत पाण्यात मासे पकडण्यासाठी जाळी घालत होतो. तेव्हा मागून मोठा साप आला. तो एवढा होता की, ‘मोठ्या प्राण्यालाही त्याने अख्खा गिळला असता !

कु. प्रियांका लोटलीकर : म्हणजे त्याचे तोंड मोठे होते ?

पू. शंकरमामा : तोंडच नव्हे, तर अंगही मोठे होते.

कु. प्रियांका लोटलीकर : साधारण केवढा होता ?

पू. शंकरमामा : साधारण त्याची लांबी २० फूट असेल. तो माझ्या पाठीवर चढला. मला वाटले, ‘पूर्वीच्या काळी भूते-बिते असायची. ‘ती भीती दाखवायची’, असे बाबांनी मला सांगितले होते. तसेच कुणीतरी असेल.’ ‘ती कशी असतात बघूया’; म्हणून मी फिरलो. तेव्हा तो खाली उतरला आणि मला भीती दाखवायला समोरून आला. तेव्हा मी त्याला बघून घाबरलो. एका हातात जाळी धरून एका हाताने पाणी मारत होतो. मी मोठ्याने आरडाओरड चालू केला. काका म्हणाले, ‘‘भिऊ नकोस, पाणी मार’’; पण माझ्या अंगात कापरे भरले होते.

कु. प्रियांका लोटलीकर : बापरे !

पू. शंकरमामा : नंतर काकांनी देवाला सांगितले कि काय ? मला ठाऊक नाही. तेव्हा मी काही देवाला सांगितले नाही; पण तो साप नदीतून परत जातांना पाहिला. तो फार मोठा आणि चकचकीत दिसत होता. ती रात्रीची वेळ होती. पौर्णिमेच्या चांदण्यात तो एकदम चमकत होता.

कु. प्रियांका लोटलीकर : साधारण कुठल्या रंगाचा होता ?

पू. शंकरमामा : तसे काही समजले नाही. केवळ तो चमकत होता.

कु. प्रियांका लोटलीकर : म्हणजे तुमची शिवाची भक्ती असल्यामुळे तो कदाचित् शिवाचाच नाग असेल.

पू. शंकरमामा : नदीच्या वरच्याच बाजूला शिवाची पिंडी होती आणि आरंभी मी तिथे पूजा करायचो.

 

११. प्रसार करतांना लोकांच्या प्रश्‍नांना उत्तरे देता
आल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतःच्या माध्यमातून
बोलतात’, असे वाटून धर्मप्रसार आणि सेवा करण्यातून आनंद मिळू लागणे

कु. प्रियांका लोटलीकर : देवाने तुम्हाला दर्शन दिले, तरी तुम्हाला सनातन संस्थेमध्ये येण्याची ओढ कशी लागली ? सनातनमध्ये आल्यानंतर ‘साधना करूया, धर्मप्रसार करूया’, असे कधीपासून वाटायला लागले ?

पू. शंकरमामा : सत्संगामध्ये सांगितल्याप्रमाणे १५ दिवस नामजप केल्यावर मला अनुभूती आली. तेव्हापासून मला आवड निर्माण झाली. साधक सेवा करायला सांगायचे. ती मी थोडी थोडी करायला लागलो. साधक मला देवळांमध्ये साफसफाई, दैनिक वितरण अशा सेवा द्यायचे. मी ती करायचो. प्रसारासाठी बाहेर पडल्यावर कुणीतरी विरोध करण्यासाठी म्हणायचे, ‘असेच म्हणजे काय ? तसेच म्हणजे काय ?’ मी शिकलेलो नव्हतो, तरी तिथे मला बोलायला थोडे जमत होते. ‘घरी जमत नाही आणि बाहेर गेल्यावर कसे जमते ?’, तेव्हा माझ्या मनात आले, ‘परम पूज्यच माझ्या माध्यमातून बोलतात ना !’ मला असा विश्‍वासही वाटला; कारण कुणीही कसलाही प्रश्‍न विचारला, तरी मला त्याचे उत्तर द्यायला जमत होते. मग माझ्या लक्षात आले, ‘हे देवच करवून घेत आहे. मला त्यातून आनंद मिळायला लागला आणि ‘मला बोलायला जमत आहे’, याचाही एक प्रकारचा आनंद झाला. आता दोन वर्षे झाली, मी बाहेरचे काम केले नाही. केवळ शेतीची कामे करतो. ‘मी दिवसा प्रसार करतो, कुठेही असले, तरी कुणालाही वैयक्तिक जाऊन भेटून बोलतो. कुणाच्या घरी गेलो, तरी केवळ साधनेविषयी बोलतो. सनातन पंचांग मागवतो आणि त्याचे गावात वितरण करतो’, अशी सेवाच करतो.

 

१२. शेतकर्‍यांनी राजकारणी किंवा सरकारवर अवलंबून न रहाता देवावर अवलंबून रहायला हवे !

कु. प्रियांका लोटलीकर : बरेच शेतकरी सरकार आणि राजकारणी यांवर अवलंबून असतात. कुणी देवावर अवलंबून असतेच, असे नाही. त्यामुळे त्यांची परिस्थिती आणखीनच बिकट व्हायला लागते. प्रत्येक शेतकर्‍याने सरकारवर अवलंबून न रहाता देवावर अवलंबून राहिले पाहिजे. ‘जो भक्ती करतो, त्याचे सगळे देवच करत असतो’, हे यातून लक्षात येते. देव त्याला कुठल्याच गोष्टीची न्यूनता भासू देत नाही.

पू. शंकरमामा : ‘देवाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही’, असा माझा १०० टक्के विश्‍वास आहे. मी आता सगळ्यांना सांगतो, ‘मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी पैसे मिळवले, घरदार सगळे केले ना ? मग पुढची सिद्धता काय केली ? चौर्‍याऐंशी लक्ष योनी फिरून एकदा मनुष्यजन्म मिळतो. परम पूज्यांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सांगितले आहे, ‘दोनच कारणांसाठी मनुष्यजन्म मिळतो. प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि आध्यात्मिक उन्नती करून घेणे.’ मुलांसाठी सिद्धता करणारे आम्ही कोण ? त्यांची सिद्धता देवानेच केली आणि नंतर त्यांना जन्माला घातले. ‘माझी मुले, माझे हे, ते’, असे म्हणणे चूक आहे. मला असे वाटते, ‘ही मुले म्हणजे देवाचे दागिने आहेत. देवाचे देवच घेणार ना ! आम्ही म्हातारे होईपर्यंत ‘माझा मुलगा, माझे हे, माझे ते’, असे कशाला म्हणतो ?’

 

१३. व्यष्टी लिखाण करत नसल्याने संतांच्या मार्गदर्शनाला बसता न येणे

पू. शंकरमामा : परम पूज्यांनी सांगितले, तसे मलाही जमले नाही. मी मनाने थोडे केले; पण स्वभावदोष सारणी लिहिली नाही. प.पू. देशपांडेकाका एकदा रामनगरमध्ये आले होते. तेव्हा साधक झालेल्या चुका स्वभावदोष सारणीत लिहायचे. मला लिहायला येत नाही. ‘जे सारणी लिखाण करत नाहीत, त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाला बसायचे नाही’, असे आम्हाला सांगितले होते. तेव्हा मला वाटायचे, ‘मला नको म्हटले, तर चांगले. त्याविषयी काही विचारले, तर मी काय सांगणार ? मी बाहेरची काही सेवा असेल, तर ती करीन.’ मग बाहेरची सेवा घेतली आणि सारणी लिखाण करणारे साधक आत बसले.

१३ अ. समष्टी प्रार्थना केल्यावर ताप गेल्याची आलेली अनुभूती

१३ अ १. पू. निकमतात्या बेळगावमध्ये आले असतांना केवळ सारणी लिखाण करणार्‍या साधकांना त्यांच्या मार्गदर्शनाला नेले जाणे आणि अंगात ताप असतांनाही दैनिक वितरण करायला सांगितले जाणे : बेळगावमध्ये पू. निकमतात्या आले होते. तेव्हा एक साधक मला म्हणाले, ‘‘जे साधक सारणी लिखाण करतात, त्यांनाच पू. तात्यांकडे घेऊन जायचे आहे. तू काही सारणी लिखाण करत नाहीस. तू दैनिक वितरण कर.’’ मला ताप होता. मी त्याला म्हणालो, ‘‘अरे, मी कसे करू ?’’ तो म्हणाला, ‘‘काहीही करून तू दैनिक वितरण कर.’’ मला खरे तर पुष्कळ ताप होता, तरी ते माझ्यावर दैनिक वितरण सोडून गेले. मी त्याला ‘‘हो’’, म्हणालो.

१३ अ २. पू. निकमतात्यांना ‘साधकांवरील आवरण जाऊदे आणि त्यांना तुमचे चैतन्य मिळूदे’, अशी प्रार्थना करणे, त्यानंतर ताप जाणे : ते साधक बेळगावला गेल्यावर नीताने (आताच्या सौ. केतकी पेडणेकर) मला ‘पू. निकमतात्या कधी येणार ? किती वेळ बसणार ? अमुक वेळेला मार्गदर्शन असणार, अमुक वेळेला संपणार’, असे सगळे सांगितले. मग मी दैनिक वितरण करून आलो आणि त्या वेळेला आमच्या घरी बसून देव, कृष्ण आणि पू. निकमतात्या यांना प्रार्थना केली, ‘आपले साधक पुष्कळ तळमळीने सेवा करतात. त्यांच्यावर आवरण आले असेल, तर तुम्ही ते नष्ट करा. तुमच्या चैतन्याचा त्यांना लाभ होऊ दे. साधकांना चांगले कार्य करण्यासाठी तुम्ही शक्ती द्या.’

१३ अ ३. ‘समष्टीसाठी प्रार्थना केल्यावर देव व्यष्टीतही साहाय्य करतो’, असे शिकायला मिळणे : मी माझ्यासाठी काही मागितले नाही आणि माझ्यासाठी मी मागत नाही अन् प्रार्थनाही करत नाही.’ मी असे म्हणाल्यावर ‘सर्र’ करून माझ्या अंगावर काटा उभा राहिला आणि माझा ताप संपूर्णपणे गेला. नंतर मला गारवा जाणवला. त्यानंतर मला पुन्हा ताप आलाच नाही. मी मनात पू. निकतात्यांना म्हणालो, ‘मी साधकांसाठी प्रार्थना केली, तर तुम्ही मलाच चांगले केले.’ मला त्यातून शिकायला मिळाले, ‘भाव आणि श्रद्धा असेल, तर कुठूनही आणि कसाही देव अन् परम पूज्य आपल्याला साहाय्य करतात. रामनगरमध्ये राहूनही चैतन्य न्यून पडत नाही.’

कु. प्रियांका लोटलीकर : ‘तुम्ही समष्टीसाठी प्रार्थना केली आणि देवाने तुम्हाला व्यष्टी स्तरावरही त्याचा लाभ करून दिला’, असे मला त्यातून शिकायला मिळाले. देवाने दोन्ही साध्य करून घेतले.

 

१४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर सुचलेले भजन !

पू. शंकरमामा : आता परवा दिवशी मी गावी गेलो होतो. जातांना मला परम पूज्यांवर एक भजन सुचले. ‘गप्प न बसता मनातल्या मनात म्हणूया’, या विचाराने मी ते म्हटले. भजन संपल्यानंतर परम पूज्यांनी सूक्ष्मातून मला सांगितले, ‘तुमच्या भावाला बोलवा आणि मला भेटून जा.’ तेव्हा ‘मी इथे बोलतो, ते परम पूज्यांना सगळेच कळते’, असे मला वाटले आणि आनंदही झाला.

सांग कधी येऊ आता रामनाथीला । धाव परम पूज्य, पाव परम पूज्य ।
सांग कधी येऊ आता रामनाथीला । सांग कधी येऊ आता रामनाथीला ॥ धृ.॥

परम पूज्यांच्या कृपेने पावन झालो । परम पूज्यांच्या कृपेने पावन झालो ।
साधकांच्या बोधाने परिवर्तन झाले । साधकांच्या बोधाने परिवर्तन झाले ।
धाव परम पूज्य … ॥ १ ॥

रामनाथींचे परम पूज्य साधकांच्या घरी । धाव परम पूज्य, पाव परम पूज्य ।
सांग कधी येऊ आता रामनाथीला धाव परम पूज्य …॥ २ ॥

धन्य परम पूज्य तुझी रे करणी । धन्य परम पूज्य तुझी रे करणी ।
साधकांची उन्नती, साधकांची उन्नती धाव परम पूज्य …॥ ३ ॥

एकदा तरी येऊन बघ रे रामनाथीला । एकदा तरी येऊन बघ रे रामनाथीला ।
रामनाथीला, रामनाथीला । धाव परम पूज्य …॥ ४ ॥

धाव परम पूज्य, पाव परम पूज्य । सांग कधी येऊ आता रामनाथीला ।
सांग कधी येऊ आता रामनाथीला ॥ धृ. ॥

कु. प्रियांका लोटलीकर : किती छान ! भाव जागृत होतो.

 

१५. पू. शंकरमामा करत असलेल्या काही प्रार्थना !

पू. शंकरमामा : पूर्वी साधक सांगायचे, ‘अशी प्रार्थना करा, तशी प्रार्थना करा.’ खरेतर मी माझ्या मनाला सुचलेली प्रार्थनाच करत होतो आणि आताही तशीच करतो. ती समष्टी प्रार्थना आहे.

कु. प्रियांका लोटलीकर : प्रार्थनेमधूनही तुमची समष्टी प्रार्थना चालू असते.

पू. शंकरमामा : ‘हे श्रीकृष्णा, ‘प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज), राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य करण्यासाठी मला शक्ती मिळू दे. माझी आध्यात्मिक उन्नती होऊ दे. माझ्यावर गुरुकृपा होऊ दे. गुरुकृपा जगभर होऊ दे. सनातनचे कार्य पुष्कळ जोमाने आणि वायूवेगाने वाढू दे. सनातन संस्थेला कुठल्याही प्रकारचे अडथळे आणि अडचणी येऊ देऊ नये. आतंकवाद संपूर्णपणे नष्ट होऊ दे’, अशी तुमच्या चरणी कोटीशः प्रार्थना, कोटीशः प्रार्थना.’ हीच प्रार्थना आतापर्यंत मी करत आलो आहे.

१५ अ. प्रसार करतांना स्वतःच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले बोलत असल्याची आलेली अनुभूती

कु. प्रियांका लोटलीकर : म्हणजे तुम्ही प्रसार करतांना समष्टीसाठी प्रार्थनाही करायचात ?

पू. शंकरमामा : हो. प्रसारात गेल्यावर कुठलीही व्यक्ती भेटली की, ती मला आडवे – तिडवे प्रश्‍न विचारायची. मग मी आधी प्रार्थना करायचो, ‘प. पूज्य बाबा, या व्यक्तीला काय सांगायचे ?’, ते तुम्हीच माझ्या माध्यमातून बोला.’ मग मी बोलायचो. नंतर घरी आल्यानंतर मला आनंद मिळायचा. ‘बघ, परम पूज्य कसे बोलले आणि शेवटी त्यांनी मान्य केले. ‘आजपर्यंत मान्य केले नाही’, असे एकदाही झाले नाही. सगळ्यांना हे सांगितल्यानंतर त्यांनी हात जोडले आणि दंडवतही घातले.

कु. प्रियांका लोटलीकर : देवानेच तुमच्या माध्यमातून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले.

पू. शंकरमामा : ‘मी करतो, मी केले’, असे म्हणायचे नाही. ‘मला काहीच कळत नाही. सर्व देवच करतो’, असे म्हणायचे आणि सगळे देवावरच सोपवायचे. शरणागतभावाने रहायचे. ‘देव आपणहूनच सुचवतो आणि देवच करवून घेतो’, असे मला ठामपणे समजले आहे.

 

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

 

Leave a Comment