सनातनचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा साधनाप्रवास ! (भाग १)

‘खडतर कष्ट केल्यावरच संत होता येते’, असे आपण बर्‍याच ठिकाणी वाचलेले असते. ‘खडतर कष्ट म्हणजे काय?’, हे पू. सदाशिव (भाऊ) परब यांच्या पुढील लेखातून लक्षात येते. असे संत सनातनला लाभले, हे सनातनच्या साधकांचे आणि माझेही भाग्यच आहे. ‘त्यांच्या सत्संगाचा लाभ घेऊन साधकांनी साधनेत लवकर प्रगती करावी’, अशी माझी भगवंताच्या चरणी प्रार्थना !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पू. सदाशिव परब

‘पूर्वीपासून मला ‘आपला जीवनपट लिहावा’, असे वाटायचे; कारण ‘ज्याच्या अंगी मोठेपण, त्यास यातना कठीण । ’ ही म्हण माझ्या जीवनप्रवासास जुळणारी आहे. या माध्यमातून कठीण परिस्थितीतही ‘गुरूंच्या कृपेने एखाद्या जिवाचा उत्कर्ष कसा साधला जातो’, हे समाजाला सांगता यावे’, असे मला वाटायचे. माझी गुरुमाऊली परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आज माझी ही इच्छासुद्धा या लिखाणाच्या रूपाने पूर्ण होत आहे.

 

१. वैयक्तिक जीवन

१ अ. जन्म

माझा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमा (दत्तजयंती) (८.१२.१९४०) या दिवशी ‘मुळगाव’ (तालुका डिचोली, गोवा) येथे झाला.

१ आ. बालपण

१ आ १. कौटुंबिक स्थिती ठीक नसल्याने कष्टाची कामे करावी लागणे

आमच्या कुटुंबात आम्ही एकूण ११ जण होतो. आम्ही ८ भावंडे होतो. मी एकटा मुलगा असून मला ७ बहिणी होत्या. आई-वडील आणि आजोबा, असे एकूण ११ जणांचे कुटुंब होते. वडील शेती करायचे. आमची शेती थोडीच होती. त्या शेतीतून आम्हाला ६ मास (महिने) पुरेल, एवढेच धान्य उपलब्ध व्हायचे. उरलेल्या ६ मासांसाठी वडिलांना मोलमजुरी करावी लागायची. अशा प्रकारे त्या वेळी आमची हलाखीची स्थिती होती. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी आई आणि मोठी बहीण यांच्या समवेत मी ‘मँगनीज’ खाणीवर मजुरीने माती काढण्याचे काम करायचो, तसेच पावसाळ्यामध्ये काजूच्या कारखान्यात काजू फोडणे आणि सोलून निवडणे, या कामासाठी जायचो. त्याचप्रमाणे मी वडिलांसमवेत शेतात कामालाही जायचो.

वडिलांसमवेत मी जून ते जुलैपर्यंत १ मास (महिना) हळदोणा (बार्देश, गोवा) येथे ख्रिश्‍चन लोकांकडे मजुरीने शेतीची कामे करायला जायचो. अशा प्रकारे मला बालपणी पुष्कळ त्रास सहन करावा लागला.

१ आ २. बालपणापासून अंगी असलेले गुण

बालपणापासूनच माझ्यात खरे बोलणे (सत्यवचनी), प्रामाणिकपणा, निःस्वार्थी, मनमिळाऊपणा, इतरांशी जुळवून घेणे, प्रेमाने बोलणे, इतरांचा विचार करणे, सेवाभावी वृत्ती, आज्ञाधारकपणा, चिकाटी, कामाची तळमळ, मृदुभाषी, मितभाषी आणि सकारात्मकता इत्यादी गुण होते.

१ आ ३. हलाखीची परिस्थिती असल्याने काजूच्या कारखान्यात काजू फोडायला जाणे आणि मोलमजुरी करून कुटुंबाचा भार सांभाळणे

वर्ष १९५३ मध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या मासांत (महिन्यांत) गावामध्ये तापाची साथ आली होती. प्रत्येक कुटुंबातील अधिकाधिक माणसे तापाने रुग्णाईत होती. आमच्या घरात माझे वडील आणि सातही बहिणी या कालावधीत २ मास (महिने) तापाने रुग्णाईत होत्या. मी आणि आई तापातून बरे झालो. त्या वेळी आमच्या घरात खायला काहीच नव्हते. मी आणि आई ५ किलोमीटर चालत डिचोली बोर्डे येथे काजूच्या कारखान्यात काजू फोडायला जाऊ लागलो. आई फोडलेल्या काजूंचा ६ शेर आणि मी ४ शेर (१ शेर म्हणजे ८५० ग्रॅम) गर काढत होतो. आम्हाला त्याची सव्वा रुपया मजुरी मिळत होती. आम्हाला ही मजुरी संध्याकाळी काजूगर मोजून झाल्यावरच मिळायची. त्या मिळालेल्या पैशातून आम्ही दीड शेर तांदूळ आणि इतर जीवनावश्यक वस्तू घ्यायचो. असे आम्ही २ मास (महिने) काढले.

कधीकधी आई अति परिश्रमाने रुग्णाईत असल्यावर मी एकटाच मजुरीसाठी जात असे. जे काही पैसे मिळतील, त्यातून आम्हा १० माणसांच्या जेवणाचा व्यय भागवत होतो.

१ इ. शिक्षण

१ इ १. नोकरी करून वयाच्या ३४ व्या वर्षी पुणे बोर्डाची अकरावीची परीक्षा उत्तीर्ण होणे

आमचे शिकवणीचे शिक्षक केवळ गणित, मराठी आणि हिंदी हे तीनच विषय शिकवणार होते. ‘अन्य विषयांचा अभ्यास मी घरीच करीन’, असा विचार करून मी प्रतिदिन संध्याकाळी माझ्या नोकरीचा वेळ संपल्यानंतर २ घंटे (तास) शिकवणीला जायचो. मी मन लावून अभ्यास करू लागलो. मी अकरावीला (Extrenal Candidate) ४ वेळा बाहेरून परीक्षेला बसलो. ४ थ्या वेळी मी शिकवणी लावली आणि ऑक्टोबर १९७४ मध्ये वयाच्या ३४ व्या वर्षी पुणे बोर्डाची अकरावीची परीक्षा उत्तीर्ण झालो. या वेळी माझी मानलेली बहीण मला ‘गणित विषय घेऊ नकोस’, असे सुचवत होती. तेव्हा मी तिला म्हणालोे, ‘‘जीवनाचे सूत्रच ‘गणित’ या विषयावर आधारित आहे. गणिताविना जीवनाला ‘अर्थ’ नाही.’’

१ इ २. मानलेल्या बहिणीने ११ वीची परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन देऊन पुस्तकेही आणून देणे

मी नोकरी करत असतांना देवाने मनात विचार घातला, ‘माणूस म्हणून जगायचे असेल, तर निदान मराठीचे ११ वी पर्यंत शिक्षण हवेच.’ देवाने मला ११ वी पर्यंतचे (मॅट्रीकपर्यंतचे) शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक योगायोग घडवून आणला. कुडके (गोवा) येथील कु. प्रमिला माधव कुडके या माझ्या जीवनात आल्या. या माझ्या मानलेल्या बहिणीने मला ११ वीची परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिले. तिने मला पुस्तकेही आणून दिली. ‘तिच्या माध्यमातून मला श्री सरस्वतीदेवीचा आशीर्वादच मिळाला’, असे मला वाटले.

१ ई. नोकरी

१ ई १. नोकरी करत महाराष्ट्र बोर्डातील ११ वी पर्यंत शिक्षण घेणे

माझे शिक्षण पोर्तुगीज ४ थी, म्हणजेच ‘सेगुंदग्राव’ पास इतकेच झाले होते. त्यानंतर मला ११.११.१९६३ ला आरोग्य खात्यात ‘मलेरियाचे सर्व्हेलन्स वर्कर’ म्हणून नोकरी मिळाली. मी नोकरी करत असतांना ‘आपण मराठी अकरावीपर्यंत (महाराष्ट्र बोर्डाप्रमाणे ११ वी पर्यंत) शिक्षण घ्यायला पाहिजे’, असे वाटले. देवानेच हा सकारात्मक विचार माझ्या मनात घातला.

‘सेगुंदग्राव’ झाल्यावर मला पोलीसदलातून बोलावणे आले होते. तेव्हा ५०० मुलांमध्ये माझा ३० वा क्रमांक आल्याने मला नोकरीसाठी बोलावणे आले. त्या वेळी मला काही जण म्हणाले, ‘‘कुणाचा वशिला लावलास ?’’ तेव्हा मी म्हणालोे, ‘‘भगवंताचा वशिला लागला असेल !’’

१ ई २. नोकरीतील तत्त्वनिष्ठता

अ. मी नोकरी करत असतांना कुणाकडून कशासाठी कधीच लाच घेतली नाही. मला जे काम सांगितले जायचे, ते मी परिपूर्ण केले. त्यात मी कधीच चालढकलपणा केला नाही. मी दिलेले काम वेळच्या वेळी आणि परिपूर्ण केले.

आ. मी आरोग्य खात्यात ‘डिचोली प्रायमरी हेल्थ सेंटर’मध्ये नोकरी करत असतांना वरिष्ठांनी (हेल्थ ऑफिसर) सांगितलेली कामे प्रामाणिकपणे आणि वेळच्या वेळी परिपूर्ण करत होतो.

इ. ‘मी चूक करणार नाही आणि दुसर्‍यालाही चूक करू देणार नाही’, असे माझे तत्त्व होते.

ई. मी ३५ वर्षे एकाच तालुक्यात नोकरी केली. त्या वेळी वरिष्ठांनी दिलेले एखादे सूत्र पूर्ण झाले नाही किंवा मी कामात टाळटाळ केली, असे कधीच झाले नाही. त्यासाठी वरिष्ठ अधिकारी माझ्यावर प्रसन्न (खुश) असायचे. ‘कुठल्याही प्रकारची किंवा दर्जाची (पदाची) नोकरी असो, ती प्रामाणिकपणे आणि परिपूर्णच करायला पाहिजे. पूर्ण करायला जमत नसेल, तर ती सोडायची’, असे माझे तत्त्व आहे.

१ उ. नोकरी समवेतच केलेले व्यवसाय

१ उ १. नोकरी समवेत जोडधंदा म्हणून म्हशी घेऊन दुधाचा धंदा करणे

वडिलांचे वय झाल्यामुळे वर्ष १९६४ पासून कुटुंबाचे दायित्व माझ्याकडे आले. तेव्हा मी २४ वर्षांचा होतो. आम्ही एकूण ८ भावंडे होतो. त्या पैकी वडिलांच्या कारकीर्दीत २ बहिणींची लग्ने झाली होती. माझ्या तुटपुंज्या पगारातून ‘बहिणींची लग्ने आणि संसार कसा होणार ?’, असा विचार माझ्या मनात येऊ लागला. तेव्हा मी देवाला अंतर्मनातून शरणागतभावाने प्रार्थना केली, ‘देवा, तूच मला यातून मार्ग दाखव आणि तुला अपेक्षित असे घडू दे.’ तेव्हा ‘तू नोकरी समवेत जोडधंदा म्हणून म्हशी घेऊन दुधाचा धंदा करू शकतोस. त्याने तुला साहाय्य होईल’, असा विचार देवाने माझ्या मनात घातला. माझे आई-वडील आणि बहिणी यांनाही हे मान्य झाले आणि मी लगेचच दुग्धव्यवसाय चालू केला. मी जुलै १९६४ मध्ये एक गावठी म्हैस घेतली. ती दिवसाला ४ लिटर दूध देत होती. हे दूध मी किरकोळ विकायचो आणि राहिलेले दूध ‘सोसायटीत’ (दुधाच्या डेरीत) घालत असे. अशा प्रकारे एक-एक करत मी एकूण ८ म्हशी घेतल्या होत्या. यामुळे ४ – ५ वर्षांतच माझ्या ५ बहिणी आणि मी अशी एकूण ६ जणांची लग्ने देवाच्या कृपेने अन् आई-वडिलांच्या आशीर्वादाने व्यवस्थित पार पडली.

१ उ २. कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणे

बहिणींची लग्ने झाल्यानंतर मी हळूहळू दुधाचा व्यवसाय (धंदा) बंद केला आणि कुक्कुटपालनाचा व्यवसाय चालू केला. शासनाने शेतकर्‍याला जोडधंदा म्हणून अंडी देणार्‍या कोंबड्या पाळण्याची योजना (स्कीम) काढली होती. शासनाने त्या योजनेसाठी ५० टक्के अनुदान (‘सब्सिडी’) देण्याचे योजले होते. त्या योजनेमध्ये मी भाग घेतला. कोंबड्यासाठी खुराडे बांधले. ‘अंडी देणार्‍या कोंबड्यांच्या पिल्लांची देखभाल कशी करायची ?’, याचे प्रशिक्षण घेतले आणि हा व्यवसाय चालू केला. अशा प्रकारे मी नोकरी करत असतांना ५ वर्षे हा जोडधंदा केला. नंतर तोही बंद केला. देवाच्या कृपेने याही व्यवसायात मला चांगले यश मिळाले.

१ उ ३. नोकरी आणि व्यवसाय करतांना देवाने वेळोवेळी केलेले साहाय्य

वर्ष १९८२ मध्ये मी नोकरी करत असतांनाच सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत म्हावळिंगे (डिचोली, गोवा) या गावी वैद्यकीय व्यवसाय चालू केला. नोव्हेंबर १९९९ मध्ये मी पूर्णवेळ साधना करू लाल्यावर वैद्यकीय व्यवसाय बंद केला.

१ ऊ. रहाणीमान

आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मी एकदा शिवलेले कपडे ४ – ५ वर्षे वापरत होतो. नंतर आर्थिक परिस्थिती पालटल्यामुळे शर्ट आणि पँट वापरू लागलो. साधनेत आल्यावर आरंभी सदरा आणि पायजमा वापरत असे.

१ ए. साधनेत नसतांनाही देवाने मोठ्या संकटातून म्हणजे विषमज्वराच्या तापातून वाचवणे

मे १९६२ मध्ये मला ‘विषमज्वर’ (टायफाईड) झाला होता. हा ताप १५ – १५ दिवसांनी असा २ वेळा आला. त्यामुळे मी ४ मास (महिने) अंथरुणावर खिळून होतो. त्या वेळी गावातील प्रत्येक जण मला पाहून म्हणत असे, ‘हा आता जगणार नाही.’ त्या वेळी ‘हा एकुलता एक मुलगा आहे. देवाने त्याला जीवदान द्यावे’, अशी लोक प्रार्थना करत.’ ताप पुष्कळ वाढल्यामुळे मी तापात काहीतरी बडबडत असे. मी साधनेत नसतांना देवाने मला पुनर्जन्म दिला. लोकांनी केलेल्या प्रार्थना आणि आई-वडिलांचे प्रयत्न यांमुळे देवाने मला पुर्नजन्म दिला. यासाठी मी त्या सर्वांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.

१ ऐ. शिकायला मिळालेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१ ऐ १. कर्ता-करविता भगवंतच आहे !

घरच्या गरीब परिस्थितीला तोंड देण्यासाठी देवाने मला शक्ती आणि स्फूर्ती दिली. त्या वेळी ‘आपले काहीच कर्तृत्व नसतांना भगवंतच कर्ता-करविता आहे’, हे मला शिकायला मिळाले.

१ ऐ २. भगवंताचे नियोजन शिकता येणे

नोकरी करत असतांना जोडधंदा म्हणून मी दुग्ध व्यवसाय, कुक्कटपालन, होमिओपॅथीचे औषधोपचार (व्यवसाय) करणे आणि बेकरी व्यवसाय इत्यादी केले. त्यामुळे ५ बहिणींचे विवाह होऊ शकले. त्या वेळी मला भगवंताचे नियोजन शिकता आले. या कालावधीत भगवंताने मला अनेक प्रसंगांतून अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी शिकवल्या. त्या आता स्मरणात नाहीत.

आतापर्यंत भगवंताने माझ्या जीवनात जे काही घडवले, ते म्हणजे माझ्यासाठी देवाने दिलेल्या अनुभूतीच आहेत.

 

२. सनातन संस्थेमध्ये येण्यापूर्वी केलेली साधना किंवा उपासना

सनातन संस्थेमध्ये येण्यापूर्वी मी गणपतीची भक्ती करत असे. मी सकाळी थंड पाण्याने अंघोळ करून आणि देवपूजा करून बाहेर पडत असे. माझ्या आजोबांना अध्यात्माची आवड असल्यामुळे ते एका मठात जायचे. त्या मठात मी श्रावणात, नवरात्रीमध्ये आणि भंडारा इत्यादींच्या वेळी त्यांच्यासमवेत जात असे. गावात प्रत्येक गुरुवारी श्री सातेरीदेवीच्या देवळात भजन आणि कीर्तन यांसाठी जात असे.

 

३. संतपद घोषित केल्याने परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा बसणे

वर्ष २०१० मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के घोषित केल्यानंतर मला कुटुंबियांसह गोवा येथील रामनाथी आश्रमात बोलावून माझा सन्मान करण्यात आला. त्या प्रसंगी परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘भाऊ तुम्ही लवकरच संत व्हाल.’’ त्यांची ही अमृतवाणी ऐकून मला पुष्कळ आनंद झाला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे ९.१०.२०१२ या दिवशी मला ‘संत’ म्हणून घोषित केले. तेव्हा माझी गुरुमाऊलींवर पूर्ण श्रद्धा बसली आणि तशी अनुभूतीही मला आली; म्हणून गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

 

४. समष्टी साधना आणि सेवा

४ अ. अध्यात्मप्रसार करणे

मी श्री गणेशचतुर्थी आणि अन्य सणांच्या वेळी घरोघरी जाऊन गणपतीची, तसेच संबंधित सणांच्या देवतांची शास्त्रीय माहिती द्यायचो.

४ आ. विविध ठिकाणी जाऊन ग्रंथप्रदर्शने लावणे

माझ्याकडे गोव्यातील डिचोली भागातील प्रसाराचेे दायित्व असल्याने मी साधकांसमवेत डिचोलीमध्ये अंतर्भूत असलेल्या विविध गावांतील जत्रांच्या आणि प्रमुख उत्सवांच्या वेळी ग्रंथप्रदर्शनाचे नियोजन करत असे. आम्ही वर्षभरामध्ये अंदाजे ५५ ठिकाणी ग्रंथप्रदर्शने लावत होतो. त्यात मला साधकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत असे. अशा प्रकारे गुरुमाऊली आम्हा साधकांकडून सेवा करवून घेत होती.

 

५. अन्य सेवा

अ. गोव्यातील विविध उत्सव आणि सण यांच्या वेळी प्रत्येक गावामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर मासांमध्ये घरोघरी जाऊन आणि व्यापार्‍यांना भेटून पुढील वर्षीचे पंचांग वितरण करत असे. मी गुरुपौर्णिमेच्या वेळी विज्ञापने आणण्याचीही सेवा करत असे.

आ. वर्ष १९९९ पासून मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ‘गुरुकृपायोगा’नुसार साधनेला आरंभ केला. त्या वेळी मी सकाळी ६ वाजता आमच्या गावी, म्हणजे ‘मुळगाव’ (डिचोली, गोवा) येथे दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंक आणि रविवारच्या ‘सनातन प्रभात’च्या अधिकच्या अंकांचे वितरण करत असे. त्याचप्रमाणे मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या २१ अंकांचे वितरण करायचो. तेव्हा मला त्यातून पुष्कळ आनंद मिळत असे.

इ. त्या वेळी मी ४०० ते ५०० विशेषांक मागवून आम्ही त्यांचे डिचोली बाजारपेठेत आणि बसस्थानकावर जाऊन वितरण करत असू, तसेच बसमध्ये चढून बसलेल्या लोकांना दैनिक ‘सनातन प्रभात’चेे महत्त्व सांगून तेथेे वितरण करत असू. तेव्हा आम्हा सर्व साधकांना सेवेतून उत्साह आणि आनंद मिळत असे.

 

६. साधना चांगली होण्यासाठी केलेले प्रयत्न

मी साधना चांगली होण्यासाठी उत्तरदायी साधकांनी सांगितलेली अष्टांग साधनेची सूत्रे मन लावून आणि बुद्धीचा अडथळा न आणता करत होतो. माझ्यातील काही गुणांचा वापर होऊन गुरुमाऊलींनी सांगितलेली साधनेतील अनमोल सूत्रे त्यांनीच माझ्याकडून करवून घेतली, उदा. उत्तरदायी साधकाने दिलेली सेवा तत्त्वनिष्ठपणे, परिपूर्णतेने आणि बिनचूक करत राहिलोे. त्यामुळे साधनेचा प्रवास येथपर्यंत झाला; म्हणून मी गुरुमाऊलींच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.

 

७. साधनेतील सातत्य

‘साधनेत सातत्य नाही’, असे माझ्या संदर्भात कधी घडले नाही.

 

८. आध्यात्मिक त्रास

मला आध्यात्मिक त्रास झाल्याचे माझ्या कधी लक्षात आले नाही.

 

९. प्रतिकूल परिस्थितीत रहाणे कठीण वाटत असतांना केलेले प्रयत्न

बालपणापासूनच मला प्रतिकूल परिस्थितीतून जावे लागले आहे. प्रत्येक परिस्थितीत भगवंताने मला सुखरूपपणे बाहेर काढलेे आहे. त्यामुळे मला अशी परिस्थिती कधीच कठीण वाटली नाही. जणू देवाने मला कठीण परिस्थितीतून जाण्याचा सरावच करून घेतला आहे.

 

१०. स्थिर असणे

आरंभीपासून माझ्या जीवनात सर्व परिस्थितीत मी स्थिर राहूनच मार्गक्रमण करत आलो आहे.

 

११. स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी आलेले विचार किंवा अनुभूती

‘स्वतःची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, असे मला कधी वाटले नाही; कारण ‘देव ती करणारच आहे’, यावर माझा दृढ विश्‍वास होता आणि अजूनही आहे. त्यामुळे वेगळे असे काही मला करावे लागले नाही, सर्व भगवंतच करून घेत आहे.

– (पू.) श्री. सदाशिव परब, कोल्हापूर (१५.१२.२०१८)

Leave a Comment