‘१६.११.२०२० या दिवसापासून कार्तिक मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर, शालिवाहन
शक – १९४२, दक्षिणायन, शरदऋतू, कार्तिक मास चालू आहे.

(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. वैकुंठचतुर्दशी
कार्तिक शुक्ल चतुर्दशी तिथीला वैकुंठचतुर्दशीनिमित्त शिव आणि श्रीविष्णुदेवता यांचे पूजन करण्यास सांगितले आहे. या दिवशी आवळी पूजन आणि भोजन करावे. निशीथकाळात (मध्यरात्री) असलेल्या चतुर्दशीला श्रीविष्णुपूजन करून नंतर अरुणोदयकाळी शिवपूजन करावे.
२ आ. त्रिपुरारि पौर्णिमा
या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केल्याने या पौर्णिमेला ‘त्रिपुरारि पौर्णिमा’ असे म्हणतात. ही तिथी प्रदोषव्यापिनी पाहिजे. या दिवशी सायंकाळी त्रिपुरवाती लावून दीपोत्सव साजरा केला जातो.
२ इ. कार्तिकस्वामी दर्शन
कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र असा एकत्र योग असतांना श्री कार्तिकस्वामींचे दर्शन घेण्यास सांगितले आहे. २९.११.२०२० या दिवशी दुपारी १२.४८ पासून ३०.११.२०२० या दिवशी सकाळी ६.०३ वाजेपर्यंत कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र असा एकत्र योग असल्याने या वेळेत श्री कार्तिकस्वामींचे दर्शन घ्यावे.
२ ई. भद्रा (विष्टी करण)
ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. २९.११.२०२० या दिवशी दुपारी १२.४८ पासून उत्तररात्री १.५६ पर्यंत विष्टी करण आहे, तसेच ३.१२.२०२० या दिवशी सकाळी ६.५८ पासून सायंकाळी ७.२७ पर्यंत विष्टी करण आहे.
२ उ. कार्तिकस्नान समाप्ती
सूर्योदयकाली असलेल्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिकस्नान समाप्ती होते.
२ ऊ. गुरुनानक जयंती
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गुरुनानक जयंती साजरी केली जाते. शीख धर्माची स्थापना गुरुनानक यांनी केली. हा दिवस शीख धर्मियांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
२ ए. तुळशीविवाह समाप्ती
कार्तिक शुक्ल एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी भगवान विष्णूचा तुळशीशी विवाह साजरा करून मंगलकार्ये चालू होतात.
२ ऐ. मन्वादी
कल्पादी, युगादी आणि मन्वादी या दिवशी केलेल्या श्राद्धाचे विशेष फल सांगितले आहे. धर्म सावर्णिनुसार कार्तिक पौर्णिमेला मन्वादी योग आहे.
२ ओ. दग्ध योग
दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. २.१२.२०२० या दिवशी बुधवार असून सायंकाळी ६.२२ पासून तृतीया तिथीला आरंभ होत असल्याने तेव्हापासून ३.१२.२०२० या दिवशी सकाळी ६.५८ सूर्योदयापर्यंत दग्ध योग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयापासून वाराला आरंभ होतो.
२ औ. घबाड मुहूर्त
हा शुभ मुहूर्त आहे. ४.१२.२०२० या दिवशी दुपारी १.३९ पासून रात्री ८.०४ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
३. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर,
शालिवाहन शक –१९४२, दक्षिणायन, शरदऋतू आणि कार्तिक
मास चालू आहे १५.१२.२०२० पासून मार्गशीर्ष मास आणि हेमंतऋतू चालू होणार आहे
(संदर्भ : दाते पंचांग)
४. शास्त्रार्थ
४ अ. भद्रा (विष्टी करण)
ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यांत विलंब होण्याचा संभव असतो. १३.१२.२०२० या दिवशी दुपारी २.१८ पर्यंत आणि १७.१२.२०२० या दिवशी उत्तररात्री २.४५ पासून १८.१२.२०२० या दिवशी दुपारी २.२३ पर्यंत विष्टी करण आहे.
४ आ. दर्श अमावास्या
अमावास्या तिथीचे मधले पाच प्रहर (दुसर्या प्रहरापासून सहाव्या प्रहरापर्यंत) हे ‘दर्श’ संज्ञक मानतात. रविवार, १३.१२.२०२० या दिवशी उत्तररात्री १२.४५ पासून १४.१२.२०२० या दिवशी रात्री ९.४७ वाजेपर्यंत अमावास्या तिथी आहे.
४ इ. सोमवती अमावास्या
सोमवारी अमावास्या तिथी आल्यास ‘सोमवती योग’ होतो. या योगावर तीर्थस्नान, अश्वत्थ पूजन, विष्णुपूजन करावे. सोमवारी १४.१२.२०२० या दिवशी ‘सोमवती अमावास्या’ आहे.
४ ई. देवदीपावली
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदेला देवदीपावलीचा कुलधर्म करतात. आपल्या कुलदेवतेला अभिषेक करून नैवेद्य दाखवला जातो. देवदिवाळीचा कुलधर्म मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदेला करणे शक्य न झाल्यास मार्गशीर्ष मासात कोणत्याही दिवशी करता येतो.
४ उ. मार्तंड भैरव (मल्हारी खंडोबा) उत्सव, षड्रात्रोत्सवारंभ
मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते षष्ठी तिथीपर्यंत मार्तंड भैरवाचा (मल्हारी खंडोबाचा) उत्सव असतो. या सहा दिवसांच्या उत्सवाला ‘षड्रात्रोत्सव’, ‘खंडोबाचे नवरात्र’ किंवा ‘सटीचे नवरात्र’ असेही म्हणतात. पहिल्या दिवशी देव खंडोबाची स्थापना करून त्याची पूजा करतात. सहा दिवस अखंड नंदादीप लावतात. पहिल्या दिवशी फुलांची एक माळ, दुसर्या दिवशी दोन, असे क्रमाने वाढवत जाऊन सहाव्या दिवशी सहा माळा घालतात. प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी पूजा करून आरती करतात. तबकातील नारळ खंडोबावरून ओवाळून फोडल्यावर त्याचा प्रसाद आणि भंडारा सर्वांना देतात. सहाव्या दिवशी भरीत-रोडग्याचा आणि कांद्याच्या पातीचा नैवेद्य असतो. त्या दिवशी खंडोबापुढे गोंधळ घालतात.
४ ऊ. धनुर्मासारंभ
सूर्य ग्रहाचा धनु राशीत प्रवेश झाल्यावर दुसर्या दिवशी धनुर्मासाचा प्रारंभ होतो. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी धनुर्मास समाप्ती असते. यालाच ‘धुंधूरमास’ असेही नाव आहे.
४ ए. चंद्रदर्शन
अमावास्येनंतर चंद्राचे प्रथम दर्शन ‘चंद्रकोर’ रूपात होते. हिंदु धर्मात चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी चंद्रदर्शन होणे भाग्यकारक आहे; कारण चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. सूर्यास्तानंतर लगेचच केवळ थोड्या वेळासाठी चंद्रकोर दिसते. या तिथीची देवता ब्रह्मा आहे. १६.१२.२०२० या दिवशी सायंकाळी ७.५४ पर्यंत चंद्रदर्शन आहे.
४ ऐ. दग्ध योग
दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. १६.१२.२०२० या दिवशी बुधवार असून सायंकाळी ४.५५ पासून तृतीया तिथीला आरंभ होत असल्याने ‘दग्ध योग’ आहे.
४ ओ. नागपूजन-नागदिवे
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष पंचमीला नागपूजन करून दिवे लावतात. या दिवशी स्नानदानादी पुण्यकृत्ये करून नागदेवतेची कृपा संपादन करावयाची असते. ‘नागपूजनासाठी पंचमी तिथी सूर्योदयानंतर न्यूनतम ६ घटी (२ घंटे २४ मिनिटे) असावी’, असा सर्वसाधारण नियम असतो.
४ औ. घबाड मुहूर्त
हा शुभ मुहूर्त आहे. १९.१२.२०२० सायंकाळी ७.४० पासून धनिष्ठा नक्षत्र आरंभ आणि २०.१२.२०२० दुपारी २.५३ पर्यंत शुक्ल पक्ष षष्ठी तिथी संपेपर्यंत घबाड मुहूर्त आहे.
५. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर,
शालिवाहन शक – १९४२, दक्षिणायन आणि २१.१२.२०२०
पासून उत्तरायण, हेमंतऋतू, मार्गशीर्ष मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे
(संदर्भ : दाते पंचांग)
६. शास्त्रार्थ
६ अ. चंपाषष्ठी, स्कंद षष्ठी, मार्तंड भैरवोत्थापन
मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला ‘चंपाषष्ठी’, ‘स्कंद षष्ठी’ अशी नावे आहेत. सूर्योदयानंतर ६ घटींपेक्षा जास्त (२ घंटे २४ मिनिटे) आणि अन्य काही योगांनी युक्त षष्ठी तिथी असते. मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून चालू झालेल्या मार्तंड भैरव उत्सवाची समाप्ती या षष्ठी तिथीच्या दिवशी होते. भगवान शंकराने मार्तंड भैरव अवतार घेऊन मणि आणि मल्ल या राक्षसांना मारले अन् जनतेला संकटातून मुक्त केले. या आनंदप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा केला जातो.
६ आ. घबाड मुहूर्त
हा शुभ मुहूर्त आहे. १९.१२.२०२० या दिवशी सायंकाळी ७.४० पासून २०.१२.२०२० दुपारी २.५३ पर्यंत आणि २५.१२.२०२० या दिवशी उत्तररात्री १.५५ पासून २६.१२.२०२० सकाळी १०.३५ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
६ इ. उत्तरायणारंभ
ज्योतिषशास्त्रानुसार एका वर्षात दक्षिणायन आणि उत्तरायण अशी दोन आयन असतात. २१ डिसेंबरपासून २१ जूनपर्यंत उत्तरायण काल असतो. या काळात सूर्य उत्तरेकडे झुकण्याचा काळ चालू होतो. उत्तरायणाला देवांचा दिवस म्हणतात. उत्तरायण जप, तप आणि साधना यांसाठी अनुकूल असते. उत्तरायण काळात शुभ कार्ये करतात.
६ ई. भद्रा (विष्टी करण)
ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते. त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. २१.१२.२०२० या दिवशी सायंकाळी ४.१६ पासून २२.१२.२०२० या दिवशी पहाटे ५.११ पर्यंत आणि २५.१२.२०२० या दिवशी दुपारी १२.३७ पासून उत्तररात्री १.५५ पर्यंत विष्टी करण आहे.
६ उ. कल्पादि
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष नवमी या तिथीला कल्पादि योग होतो. या दिवशी केलेल्या श्राद्धाचे विशेष फल सांगितले आहे.
६ ऊ. मोक्षदा एकादशी
मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील एकादशीला ‘मोक्षदा एकादशी’ म्हणतात. या दिवशी विष्णूच्या दामोदर रूपाची पूजा करतात. या एकादशी व्रताने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि मोक्ष मिळतो.
६ ए. गीताजयंती
‘मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील एकादशीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेशामृतरूपी गीता सांगितली’, असे मानले जाते; म्हणून या दिवशी गीताजयंती साजरी केली जाते. या निमित्ताने गीतेवर आधारित प्रवचने, गीतापठण असे कार्यक्रम केले जातात.
टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयानंतर वार पालटतो.
टीप २ – संकष्ट चतुर्थी, घबाड मुहूर्त, भद्रा (विष्टी करण) आणि दग्ध योग यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.
टीप : वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत.
१. हरिचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥ – संत एकनाथ
अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो.
२. तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ दाही दिशा ॥ – संत तुकाराम
अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’
ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’



अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !