छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री विष्णूदेव साय

सोमनाथ शिवलिंगाच्या दिव्यांशांच्या दर्शनासाठीही मुख्यमंत्र्यांचे सहकार्याचे आश्‍वासन!

सनातन संस्थेच्या वतीने श्रीकृष्णार्जुनाची प्रतिमा भेट देतांना डावीकडून श्री. चेतन राजहंस, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, तर प्रतिमा स्वीकारतांना मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय आणि भाजपचे छत्तीसगड उपाध्यक्ष श्री. प्रबल प्रताप जुदेव

रायपूर (छत्तीसगड) : छत्तीसगडमधील विविध तीर्थक्षेत्रे, पवित्र नद्या आणि पौराणिक स्थळे येथील आध्यात्मिक मूल्य असलेल्या वस्तूंचे अन् वास्तूंचे भावी पिढ्यांसाठी जतन होण्याच्या दृष्टीने राज्य सरकार ‘सनातन संस्थे’ला सर्वतोपरी साहाय्य करेल, असे महत्त्वपूर्ण आश्वासन छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. विष्णूदेव साय यांनी दिले.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारीणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी नुकतीच छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. विष्णूदेव साय यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सांस्कृतिक वारशांच्या जतनाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय यांच्या हस्ते भेटवस्तू स्वीकारतांना डावीकडून सनातन संस्थेच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

सोमनाथ शिवलिंगाच्या दिव्यांशांचे भाविकांना दर्शन घडवणार

सोमनाथ शिवलिंगाचे सुरक्षित असलेले काही ‘दिव्यांश’ !

एक सहस्र वर्षांपूर्वी गझनीच्या महमूदाने ऐतिहासिक सोरटी सोमनाथ शिवलिंगाचा विध्वंस केला होता; मात्र सुदैवाने या शिवलिंगाचे दिव्यांश आजही सुरक्षित आहेत. विशिष्ट चुंबकीय तत्त्व असलेल्या या सोमनाथ शिवलिंगाच्या दिव्यांशांचे छत्तीसगडमधील भाविकांनाही दर्शन घेता यावे, यासाठी केंद्र सरकारच्या ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ या अभियानांतर्गत राज्यात विशेष आयोजन करण्याच्या संदर्भातही मुख्यमंत्री श्री. विष्णूदेव साय यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासनाकडून सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात सहभागी असलेले संत आणि अन्य मान्यवर व्यक्ती तथा हिंदुत्वनिष्ठ !

सनातन संस्थेच्या कार्याचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

या विशेष भेटीदरम्यान माननीय मुख्यमंत्र्यांनी सनातन संस्थेचे देशभरात चालू असलेले राष्ट्र आणि धर्म हिताचे कार्य, तसेच गोवा येथील सनातनच्या आश्रमात चालू असलेल्या आध्यात्मिक संशोधनाच्या विविध उपक्रमांची अत्यंत आस्थेने माहिती जाणून घेतली.

या महत्त्वपूर्ण प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष श्री. प्रबल प्रताप जूदेव, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे अधिवक्ता आशिष शर्मा, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि समितीचे छत्तीसगड येथील सर्वश्री कमल विश्वास, आशिष परेडा, रोहितसिंग तिरंगा, हेमंत कानसकर आणि नीरज क्षीरसागर उपस्थित होते.

१. श्री. कमल बिश्वास यांना संतांच्या दौर्‍याची स्वप्नात मिळालेली पूर्वसूचना

छत्तीसगड येथील सनातन संस्थेच्या कार्याशी नव्याने जोडले गेलेले एक धर्मप्रेमी श्री. कमल बिश्वास यांना या दैवी दौर्‍याच्या ८ दिवस आधीच स्वप्नात एक दृश्य दिसले. त्यांना स्वप्नामध्ये श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई सर्व साधक अन् धर्मप्रेमी यांना ‘छत्तीसगडमध्ये धर्मकार्य कसे वाढवायचे आणि साधना कशी करायची’, याविषयी मार्गदर्शन करत असल्याचे दिसले. त्यांनी हे स्वप्न कळवले, तेव्हा हा दौरा प्रत्यक्ष ठरलेला नव्हता; परंतु त्यानंतर २ दिवसांतच प.पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराजांच्या आमंत्रणावरून हा दौरा ठरला. यावरून ईश्वराचे सूक्ष्म नियोजन कसे असते आणि साधक अन् धर्मप्रेमी यांना आधीच कशी पूर्वसूचना मिळते, हे सर्वांच्या लक्षात आले.

शेकडो किलोमीटर दूर असणार्‍या संतांना सूक्ष्मातून ज्ञान मिळून त्यांनी त्यांचे शिष्य अधिवक्ता आशिष शर्मा यांना सद्गुरुद्वयींच्या सान्निध्यात रहाण्यास सांगणे

भिलाई येथील अधिवक्ता आशिष शर्मा हे या दौर्‍यात सद्गुरुद्वयींच्या समवेत होते. त्यांचे गुरु हिंगणघाट (जिल्हा वर्धा) येथील असून त्यांनी अधिवक्ता आशिष शर्मा यांना दूरभाष करून कळवले, ‘‘आता तुमच्यासह ज्या दोन महान विभूती आहेत, त्या म्हणजे साक्षात् श्री सरस्वतीमाता आणि श्री महालक्ष्मीमाता आहेत. त्यांचा कृपाशीर्वाद तुम्हाला लाभू द्या, तुम्ही अधिकाधिक त्यांच्या सान्निध्यात रहा.’’ ‘शेकडो किलोमीटर दूर असणार्‍या संतांना सूक्ष्मातून हे ज्ञान मिळणे आणि त्यांनी शिष्याला (अधिवक्ता आशिष शर्मा यांना) हे सांगणे’, हा दैवी योजनेचाच भाग असल्याचे लक्षात आले. दुसर्‍या दिवशी अधिवक्ता आशिष शर्मा यांना त्यांच्या गुरूंनी दूरभाषवरून  पुन्हा सांगितले, ‘‘हिमालयातील एक महान सद्गुरु असून या दोन्ही माताजी त्यांच्या शिष्या आहेत, असे मला दिसत आहे. या दोन्ही माताजी, म्हणजे देवींचेच रूप असून त्यांची आध्यात्मिक ऊर्जा पुष्कळ मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे.’’

२. संतांच्या चैतन्याने प्रभावित झालेले प्रतिष्ठित उद्योजक

अधिवक्ता आशिष शर्मा यांनी सकारात्मक राहून अनेक उद्योजकांना सद्गुरुद्वयींच्या दर्शनासाठी निमंत्रित केले. सद्गुरुद्वयींच्या सान्निध्यात आल्यावर सर्व उद्योजकांनी कृतज्ञता व्यक्त करत म्हटले, ‘‘येथे येऊन आमचे भाग्य उजळले. यापुढे आम्ही या ईश्वरी कार्याशी निरंतर जोडलेले राहू.’’

‘बिजनेस नेटवर्क इंटरनॅशनल’ या उद्योजक संघटनेचे उपाध्यक्ष आणि त्यांचे सहकारी प्रथमच सद्गुरुद्वयींच्या दर्शनासाठी आले होते. सद्गुरुद्वयींचे अस्तित्व आणि सहज बोलणे यांनी ते एवढे प्रभावित झाले की, त्यांनी अत्यंत नम्रतेने चरणांवर मस्तक टेकवून दर्शन घेतले. ‘अशा संतांचा आशीर्वाद मिळणे हे आमचे भाग्य आहे. यापुढे संस्थेच्या धर्मकार्यासाठी आमचे नेहमीच सहकार्य राहील’, असे त्यांनी सांगितले. तसेच गोव्यातील आगामी उद्योजक परिषदेच्या शिबिराच्या वेळी आश्रमाला भेट देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

३. साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी आलेले छत्तीसगडचे उच्च पदस्थ अधिकारी !

छत्तीसगड राज्याचे एक उच्च पदस्थ अधिकारी हे स्वतः अत्यंत साधे आणि आध्यात्मिक वृत्तीचे आहेत. ते सकाळीच सद्गुरुद्वयींना भेटण्यासाठी आले होती. त्यांनी ‘साधना कशी करावी आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया कशी राबवावी’, हे आत्मीयतेने समजून घेतले. सद्गुरुद्वयींच्या मार्गदर्शनानुसार नियमित साधना करण्याचा निश्चय केला.

४. कुठलीही योजना नसतांना छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची अत्यंत भावपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात झालेली भेट !

छत्तीसगड येथील ‘अखिल भारतीय घरवापसी अभियाना’चे प्रमुख तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव यांच्या पुढाकारातून राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय यांची सद्गुरुद्वयींची भेट झाली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी जवळजवळ १ घंटा वेळ देऊन सद्गुरुद्वयींशी विविध विषयांवर चर्चा केली. छत्तीसगडचा सांस्कृतिक वारसा, तेथील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरा यांवर चर्चा झाली. ‘सनातन संस्था ज्या प्रकारे आध्यात्मिक संशोधन करत आहे आणि दौरे करून आध्यात्मिक महत्त्व येणार्‍या पिढीला कळावे, यासाठी वस्तूंचे जतन आणि संवर्धन करत आहे, त्याविषयी शासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल’, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. भेटीनंतर श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव यांच्याशी बोलताना मुख्यमंत्री स्वतः म्हणाले, ‘‘या भेटीमुळे मला पुष्कळ मोठ्या प्रमाणावर सकारात्मक ऊर्जा मिळाली आणि ही भेट अत्यंत उत्तम झाली.’’

मा. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही सद्गुरुद्वयींचे संतत्व ओळखून उत्स्फूर्तपणे त्यांचा छत्तीसगडमधील पारंपरिक शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला.

५. श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव यांना सद्गुरुद्वयींविषयी आलेली अनुभूती

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव यांनी दूरभाषवर सांगितले, ‘‘मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी मी अतिशय थकलेलो होतो; परंतु या भेटीनंतर मला सद्गुरुद्वयींच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात आध्यात्मिक ऊर्जा आम्हाला लाभली. धर्मकार्य करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या वेळी पुष्कळ मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा अन् एक वेगळीच अनुभूती मिळाली. त्यांच्या या दौर्‍याच्या कालावधीत अशा संतांचा सहवास लाभणे, हे आमचे परम भाग्य आहे.’’

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना घरवापसीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देतांना श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव

६. घरवापसीच्या महाअनुष्ठानासाठी सद्गुरुद्वयींना भावपूर्ण निमंत्रण

श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव यांनी छत्तीसगडमध्ये सहस्रो हिंदूंची ‘घरवापसी’ (अन्य धर्मातून हिंदु धर्मात परत घेणे) केली आहे. बस्तर आणि दंतेवाडा या ठिकाणी २ मासांनंतर घरवापसीचा एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमासाठी त्यांनी सद्गुरुद्वयींना अत्यंत आदरपूर्वक निमंत्रित केले. ‘सद्गुरुद्वयींच्या पावन उपस्थितीत हे धर्मकार्य व्हावे’, असा त्यांचा भाव होता.

 

 

 

Leave a Comment