निज आश्‍विन मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२,
दक्षिणायन, शरदऋतू, निज आश्‍विन मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे.

(संदर्भ : दाते पंचांग)

टीप : ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयानंतर वार पालटतो.

२. शास्त्रार्थ

२ अ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. घबाड मुहूर्तावर कार्य करण्यास आरंभ केला, तर ते कार्य सफल होऊन मोठ्या प्रमाणात लाभ होतो. अकस्मात् एखादा मोठा लाभ झाल्यास ‘हाती घबाड लागले’, असा वाक्प्रचार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजल्यावर जी संख्या येते, त्या संख्येला तिप्पट करून येणार्‍या अंकात शुक्ल प्रतिपदेपासूनची तिथी मिळवावी. येणार्‍या बेरजेला ७ या संख्येने भागल्यावर बाकी ३ आली, तर ‘त्या दिवशी घबाड मुहूर्त आहे’, असे समजतात. बाकी जर शून्य आली, तर ‘अर्धघबाड मुहूर्त आहे’, असे समजतात. ३.११.२०२० या दिवशी रात्री (४.११.२०२०) ३.२५ पासून ५.११.२०२० या दिवशी पहाटे ४.५१ पर्यंत मृग नक्षत्र आणि कृष्ण पक्ष चतुर्थी तिथी असल्याने घबाड मुहूर्त आहे.

उदा. सूर्य नक्षत्र : स्वाती

चंद्र नक्षत्र : मृग

तिथी : कृष्ण पक्ष चतुर्थी

स्वाती या सूर्य नक्षत्रापासून मृग हे चंद्र नक्षत्र १८ वे आहे.

१८ × ३ = ५४. यामध्ये कृष्ण चतुर्थी तिथी, म्हणजे १९ वी तिथी मिळवल्यावर ५४ + १९ = ७३

७३ या संख्येला ७ ने भागल्यावर बाकी ३ येते.

२ आ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. पंचांगाच्या तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या पाच अंगांपैकी पाचवे अंग (भाग) म्हणजे करण. सोप्या भाषेत सांगायचे, तर तिथीच्या अर्ध्या भागाला ‘करण’ असे म्हणतात. भद्रा ही भगवान सूर्यदेवाची कन्या आणि श्री शनिदेवाची बहीण आहे. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यांत विलंब होण्याचा संभव असतो. ३.११.२०२० या दिवशी दुपारी २.२२ पासून रात्री ३.२५ पर्यंत विष्टी करण आहे, तसेच ७.११.२०२० या दिवशी सकाळी ७.२४ पासून सायंकाळी ७.३२ पर्यंत विष्टी करण आहे.

२ इ. संकष्ट चतुर्थी : प्रत्येक मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला ‘संकष्ट चतुर्थी’ असे म्हणतात. आश्‍विन मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला ‘करक चतुर्थी’ असे म्हणतात. या दिवशी सुवासिनी स्त्रिया सौभाग्यवृद्धीसाठी ‘करवा चौथ’ हे व्रत करतात. ज्या दिवशी चंद्रोदय समयी चतुर्थी तिथी असते, त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा उपवास करतात; कारण या व्रतामध्ये चंद्रदर्शन होणे विशेष महत्त्वाचे आहे. पूर्ण दिवस उपवास करून चंद्रदर्शन झाल्यावर नैवेद्य ग्रहण करतात. या दिवशी विघ्नहर्त्या श्री गणपतीची उपासना करतात. संकष्ट चतुर्थी व्रत केल्याने सर्व विघ्ने दूर होतात. ‘घरात मंगलकार्य व्हावे’, यासाठी मंगलमूर्ती श्री गणेशाचे हे व्रत घरोघरी केले जाते. या दिवशी श्री गणपतिस्तोत्र, श्री गणपति अथर्वशीर्ष पारायण, गणेश स्तुती, गणेश चालीसा, श्री गणेश अष्टक आदी स्तोत्रे वाचतात. गणपतीला दूर्वा वहातात, तसेच मोदकांचा नैवेद्य दाखवतात.

२ ई. दग्ध योग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्ध योग होतो. दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. ५.११.२०२० या दिवशी गुरुवार असून रात्री (६.११.२०२०) ६.३७ पासून षष्ठी तिथीला आरंभ होत आहे आणि सकाळी ६.४२ ला सूर्योदय समयापर्यंत गुरुवार असल्याने दग्ध योग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयापासून वाराला आरंभ होतो. ६.११.२०२० या दिवशी सकाळी ६.४२ ला सूर्योदय असल्याने सूर्योदयानंतर शुक्रवार चालू होतो.

टीप : या लेखात दिलेल्या सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत.

१. हरिचिया दासा हरि दाही दिशा ।
भावें जैसा तैसा हरि एक ॥ – संत एकनाथ

अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो.

२. तुका म्हणे हरिच्या दासा ।
शुभ काळ दाही दिशा ॥ – संत तुकाराम

अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’

ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्‍वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्‍वर घेतो.’

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्‍लेषणशास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, फोंडा, गोवा. (२०.१०.२०२०)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment