(म्हणे) ‘सनातन संस्थेवर बंदी घाला !’ – वैफल्यग्रस्ततेतून डाव्या आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे प्रकरणात पसार असलेले सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना अटक करा. या प्रकरणात सनातन संस्थेशी संबंधित साधकांची नावे निष्पन्न झाल्याने सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी, असे निवेदन डाव्या आघाडीच्या वतीने नूतन पोलीस अधीक्षक शैलेंद्र बलकवडे यांना देण्यात आले. (गेली ७ वर्षे दाभोलकर-पानसरे हत्येच्या संदर्भात सीबीआय आणि विशेष तपास पथके तपास करत आहेत; मात्र एकाही यंत्रणेला सनातन संस्थेच्या सहभागाचा काहीही पुरावा मिळालेला नाही. कॉ. पानसरे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले समीर गायकवाड यांना १९ मासांनी जामिनावर मुक्त करण्याची वेळ आली. असे असतांना डाव्या आघाडीचे कार्यकर्ते कशाच्या आधारावर सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी करत आहेत ? नेहमीप्रमाणे ‘आम्ही म्हणू तेच खरे !’ आणि ‘आम्ही सांगू तेच गुन्हेगार !’ अशा अविवेकी वृत्तीतून अशा प्रकारे वैफल्यग्रस्त आरोप केले जात आहेत ! – संपादक)

पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना पकडण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात विशेष दर्जाच्या अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात यावी. कॉ. पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणातील संशयितांना आतंकवादी घोषित करण्यात यावे. (कॉ. पानसरे प्रकरणाचे अन्वेषण या अगोदरच विशेष पोलीस पथक करत आहे. असे असतांना आणखी कोणत्या विशेष दर्जाच्या अधिकार्‍याची नियुक्ती करण्याची मागणी डावी आघाडी करत आहे ? डॉ. दाभोलकर-कॉ. पानसरे यांच्या कुटुंबियांच्या दबावामुळे दोन्ही खटले चालत नसून अनेक निष्पाप हिंदुत्वनिष्ठांना कारागृहात खितपत पडावे लागत आहे ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात