जळूच्या समोर अ‍ॅलोपॅथिक, होमिओपॅथिक आणि आयुर्वेदीय औषधांच्या गोळ्या ठेवल्यावर तिने दिलेला प्रतिसाद आणि तिच्यावर झालेला परिणाम

प्राण्यांसंबंधी नावीन्यपूर्ण आध्यात्मिक संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया‘ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

आश्रमातील जळूला सात्त्विकतेची जाण असल्याचे प्रयोगातून सिद्ध होणे
आणि ती मृत झाल्यावर सप्तर्षींनी तिला आश्रमाच्या परिसरातील एखाद्या चांगल्या
वृक्षाच्या खाली पुरण्यास सांगणे, तसेच ‘ती आश्रमात होती, हा शुभशकुन आहे’, असेही सांगणे

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

‘आश्रमात आयुर्वेदीय उपचारांसाठी एक जळू होती. जळू त्वचेला चिकटून बसते आणि शरिरातील अशुद्ध रक्त शोषून घेते. त्यामुळे मनुष्यावर उपचार होतात. आरोग्य प्रदान करणार्‍या धन्वन्तरीदेवाच्या हातात जळू असते. त्यामुळे ‘जळू हा दैवी जीव आहे’, असे लक्षात येते.

आश्रमात असलेल्या जळूची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी केली असता तिच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा नसून सकारात्मक ऊर्जा असल्याचे आढळून आले. ‘तिच्यामध्ये सात्त्विकतेची जाण कशी आहे ?’, याचे प्रयोग घेण्यात आले. त्यांत ती सात्त्विक आयुर्वेदीय औषधाकडेच गेली. तिच्यासमोर धन्वन्तरीदेवाचे चित्र ठेवले असता तिने त्या चित्राकडे जाऊन धन्वन्तरीदेवाच्या चरणांना स्पर्श केला. अशा या दैवी जिवाने २ दिवस प्रयोगांत सहभागी होऊन आज (२.८.२०२० या दिवशी) प्राण सोडला.

या जळूविषयी तमिळनाडूतील चेन्नई येथील सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना सांगितले असता त्यांच्या माध्यमातून सप्तर्षींनी सांगितले, ‘आश्रमात या जळूचे वास्तव्य होते’, हा शुभशकुन आहे. मृत झालेल्या त्या जळूला आश्रमाच्या परिसरातील एखाद्या चांगल्या वृक्षाच्या खाली पुरा. तिला तेथे ठेवतांना धन्वन्तरीदेवाचा श्‍लोक म्हणा.’ सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे २.८.२०२० या दिवशी मृत जळूला आश्रमाच्या लागवडीतील अश्‍वत्थ (पिंपळ) वृक्षाच्या खाली मातीत पुरण्यात आले.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२.८.२०२०)

‘आयुर्वेदाची देवता श्री धन्वन्तरीदेवाच्या चित्रात तिच्या उजव्या हातात जळू पहायला मिळते. जळवांचा उपयोग आयुर्वेदामध्ये साधारणपणे शरिरातील रक्ताच्या संदर्भातील व्याधी निवारणासाठी केला जातो. ३०.७.२०२० या दिवशी गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक जळू सापडली. ती सात्त्विक वस्तूंकडे आकृष्ट होत असल्याचे लक्षात आले. जळूच्या समोर अ‍ॅलोपॅथिक, होमियोपॅथिक आणि आयुर्वेदीय औषधांच्या गोळ्या ठेवल्यावर तिने दिलेला प्रतिसाद आणि तिच्यावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी १.८.२०२० या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

 

आयुर्वेदीय औषधाच्या गोळीला स्पर्श करतांना जळू आणि बाजूला होमियोपॅथी अन् अ‍ॅलोपॅथी गोळ्या

 

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

१ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

अ‍ॅलोपॅथिक गोळीमध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा होत्या. होमियोपॅथिक अन् आयुर्वेदीय गोळ्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

१ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

अ‍ॅलोपॅथिक गोळीमध्ये सकारामक ऊर्जा आढळली नाही. होमिओपॅथिक गोळीमध्ये अल्प प्रमाणात, तर आयुर्वेदीय गोळीमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती.

वरील विवेचन पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

चाचणीतील औषधांच्या गोळ्या गोळ्यांच्या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ (मीटर) गोळ्यांच्या सकारामक ऊर्जेची प्रभावळ (मीटर)
इन्फ्रारेड ऊर्जा अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा
१. अ‍ॅलोपॅथिक गोळी २.६४ १.५६ नाही
२. होमिओपॅथिक गोळी नाही नाही ०.९४
३. आयुर्वेदीय गोळी नाही नाही २.७६

१ इ. जळूने औषधांच्या गोळ्यांना दिलेला प्रतिसाद आणि तिच्यावर झालेला परिणाम

प्रयोगात एका काचेच्या पेटीत सर्दी बरी होण्यासाठी दिल्या जाणार्‍या अ‍ॅलोपॅथिक, होमिओपॅथिक आणि आयुर्वेदीय औषधांच्या गोळ्या एकमेकांपासून काही अंतरावर मांडून ठेवण्यात आल्या. जळूला पेटीत सोडल्यावर ती प्रथम आयुर्वेदीय औषधाच्या गोळीजवळ गेली आणि तिला स्पर्श केला. त्यानंतर ती आयुर्वेदीय अन् होमिओपॅथिक गोळ्यांच्या मधून गेली. त्यानंतर ती अ‍ॅलोपॅथिक औषधाच्या गोळीजवळ गेली आणि तिला स्पर्श केला. एकूण २० मिनिटांच्या प्रयोगात जळू अधिकांश वेळ आयुर्वेदीय गोळीपाशी थांबत असल्याचे निदर्शनास आले.

जळूमध्ये नकारात्मक ऊर्जा नसून सकारात्मक ऊर्जा होती. तिची प्रभावळ २.८० मीटर होती. प्रयोगानंतर तिच्या सकारात्मक ऊर्जेत ०.३० मीटरने वाढ होऊन ती ३.१० मीटर झाली.

 

२. चाचणीचा निष्कर्ष

आयुर्वेदीय औषधाच्या गोळीतून प्रक्षेपित होणार्‍या सत्त्वप्रधान स्पंदनांमुळे जळू आयुर्वेदीय औषधाच्या गोळीजवळ अधिकांश वेळ थांबली. प्रयोगानंतर तिच्या सकारात्मक ऊर्जेत थोडी वाढ झाली.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

 

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. चाचणीतील अ‍ॅलोपॅथिक गोळीमध्ये नकारात्मक स्पंदने असण्याचे कारण

अ‍ॅलोपॅथिक उपचार पद्धतीमध्ये रोगाचे मूळ कारण शोधून त्यावर उपचार न करता केवळ रुग्णाला झालेला आजार दूर करण्यासाठी त्याला औषधे दिली जातात. अनेक संशोधनांवरून हे सिद्ध झाले आहे की, अ‍ॅलोपॅथिक औषधांमध्ये असणार्‍या रासायनिक घटकांमुळे ती आरोग्यासाठी घातक असू शकतात. काही वेळा त्यांतील रासायनिक घटकांमुळे देहातील विषाणू लगेच मरतात; परंतु त्यांचे देहावर दूरगामी नकारात्मक परिणामदेखील होऊ शकतात, तसेच त्यांतून तमोगुणी स्पंदनांचे प्रक्षेपण होते. चाचणीतील अ‍ॅलोपॅथिक गोळीमध्ये तमोगुणी (त्रासदायक) स्पंदने असल्याने त्यातून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली.

३ आ. चाचणीतील होमिओपॅथिक गोळीमध्ये अल्प प्रमाणात, तर
आयुर्वेदीय गोळीमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने असण्याचे कारण

‘होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये रुग्णाचा आजार बरा करण्यासाठी त्याची संपूर्ण माहिती घेण्यात येते आणि त्यानुरूप त्याला औषधे देण्यात येतात. ही औषधे पशू, वनस्पती, खनिज आणि सिंथेटिक पदार्थांपासून बनवलेली असतात.’ (संदर्भ : संकेतस्थळ)

आयुर्वेदीय उपचार पद्धतीमध्ये रुग्णाला झालेल्या रोगाचे मूळ कारण शोधून त्यावर रुग्णाच्या प्रकृतीनुसार (वात, पित्त, कफ) उपचार करण्यात येतात. रुग्णाला आयुर्वेदीय औषधे देण्यासह योग्य आहार-विहार, तसेच पथ्य-अपथ्य इत्यादी संदर्भातही मार्गदर्शन करण्यात येते. आयुर्वेदीय औषधांचे देहावर कोणतेही नकारात्मक परिणाम होत नाहीत, तसेच आजार मूळापासून नष्ट होतात. आयुर्वेदीय औषधांतून प्रक्षेपित होणार्‍या सत्त्वप्रधान स्पंदनांमुळे आणि आयुर्वेदीय औषधांमध्ये असणार्‍या नैसर्गिक घटकांमुळे ती आरोग्यासाठी हितावह असतात. चाचणीतील होमिओपॅथिक गोळीमध्ये अल्प प्रमाणात, तर आयुर्वेदीय गोळीमध्ये पुष्कळ प्रमाणात सात्त्विक स्पंदने असल्याने त्यातून त्या त्या प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली.

३ इ. जळूला तिन्ही प्रकारच्या औषधांच्या गोळ्यांमधून प्रक्षेपित होणारी
नकारात्मक किंवा सकारात्मक स्पंदने ओळखता आल्याने तिने त्यानुरूप प्रतिसाद देणे

चाचणीतील होमियोपॅथिक गोळीतून अल्प प्रमाणात, तर आयुर्वेदीय गोळीतून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत, हे जळूला बरोबर ओळखता आले. त्यामुळे ती प्रथम आयुर्वेदीय औषधाच्या गोळीकडे गेली. त्यानंतर ती आयुर्वेदीय अन् होमियोपॅथिक गोळांच्या मधून गेली. जळूने अ‍ॅलोपॅथिक गोळीला स्पर्श केला. तिला त्यातून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे लक्षात आल्याने ती त्या गोळीजवळ थांबली नाही. एकूण २० मिनिटांच्या प्रयोगात जळू अधिकांश वेळ आयुर्वेदीय गोळीपाशी थांबत होती. प्रयोगानंतर जळूच्या सकारात्मक ऊर्जेत थोडी वाढ झाली. सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. जळूमध्ये ३.१० मीटर म्हणजे पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे आणि तिने तिन्ही गोळ्यांना दिलेला प्रतिसाद पाहून ती साधारण प्राणी नसून सात्त्विक जीव असल्याचे लक्षात येते. या जळूमध्ये सूक्ष्मातील कळण्याची क्षमता असल्याने तिला तिन्ही प्रकारच्या औषधांच्या गोळ्यांमधून प्रक्षेपित होणारी नकारात्मक किंवा सकारात्मक स्पंदने ओळखता आली.

३ ई. मानवेतर योनीतील सात्त्विक जिवांना सात्त्विकतेची ओढ असल्याने
ते सनातनच्या आश्रमातील सात्त्विक वातावरणाकडे आकृष्ट होणे आणि देह सोडणे

काही साधकजीव मानवेतर योनींमध्ये (पशू-पक्षी आणि वनस्पती) जन्म घेऊन त्यांचे प्रारब्धातील भोग भोगून संपवतात. ते सात्त्विक ठिकाण अन् सात्त्विक व्यक्ती यांच्याकडे सहजतेने आकृष्ट होतात आणि त्यांच्या सहवासात रहातात. सनातनच्या आश्रमातील सात्त्विकतेमुळे काही प्राणी अन् पक्षी, उदा. फुलपाखरू, जळू इत्यादी आश्रमात स्वतःहून येतात. ते आश्रमातील साधक अन् संत यांच्या सहवासात रहातात आणि काही दिवसांनी काही जण तेथेच प्राण सोडतात, असे लक्षात आले आहे. सात्त्विक ठिकाणी प्राणत्याग केल्यास त्यांना चांगली गती प्राप्त होते. सनातनच्या आश्रमाच्या प्रवेशद्वारापाशी सापडलेली जळू याचेच उदाहरण आहे. तिने सनातनच्या आश्रमात येऊन प्रयोगात सहभागी होऊन देवाचरणी तिची सेवा अर्पण केली. २.८.२०२० या दिवशी तिने आश्रमातच प्राण सोडले. त्यामुळे तिला चांगली गती मिळाली.’

– डॉ. अमित भोसले, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, मिरज. (१४.९.२०२०)

ई-मेल : [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment