श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या समवेत यज्ञाच्या संदर्भातील सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळायला सूत्रे

सनातन धर्माचे अविभाज्य अंग असलेल्या ‘यज्ञसंस्कृती’चे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन आश्रमात पुनरुज्जीवन केले जात आहे. या प्रक्रियेचा आत्मा आहेत श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ! ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग या तिन्ही योगांचा अपूर्व संगम असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामुळे हे यज्ञयाग दैवी वातावरणात पार पडतात. त्या वेळी साधकांना अनेक अनुभूती येतात, तसेच दैवी संकेतही लाभतात.श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

 

१. प्रत्येक कृती चांगली आणि परिपूर्ण करण्याची तळमळ

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे रहाणीमान पुष्कळ साधे आहे; परंतु यज्ञाच्या आणि अन्य सोहळ्यांच्या वेळी त्या अनेक अलंकार घालतात अन् जरीची साडी परिधान करतात. त्या ‘हे सर्व साधना म्हणून करायचे आहे आणि जे करायचे, ते चांगलेच करायचे’, या भावाने करतात. यातून प्रत्येक कृती चांगली आणि परिपूर्ण करण्याची त्यांची तळमळ जाणवते.

 

२. उत्तम स्मरणशक्ती आणि सतर्कता

अ. यज्ञ चालू असतांना यज्ञातील बारकावे त्यांच्या लक्षात असतात. काही वेळा काही सूत्रे राहिल्यास त्याच इतरांना त्यांची आठवण करून देतात, मग ते चित्रीकरणाविषयी असो किंवा पुरोहितांकडून राहिलेली एखादी गोष्ट असो, फुलांचे रंग अन् रचना यांतील त्रुटी असो किंवा तेथील अन्य सेवेतील साधकांकडून राहिलेली एखादी गोष्ट असो. न्यून असलेली एखादी गोष्ट सद्गुरु ताई वेळीच लक्षात आणून देतात.

आ. एखाद्या साधकाने एखादी चांगली कृती झाली असेल, तर त्याच वेळी त्या साधकाचे कौतुक करतात.

इ. एका देवतेचा किंवा देवीचा यज्ञ थोड्या थोड्या दिवसांच्या अंतराने पुनःपुन्हा होतो. अशा वेळी ‘मागील वेळी यज्ञात कुठल्या गोष्टीचा अंतर्भाव होता ?’, हे त्यांच्या लक्षात असते. पूर्वी महाकालीदेवीचा यज्ञ झाला होता. त्या वेळी त्यांना कवड्यांची माळ घालण्यास सांगितले होते. तोच यज्ञ काही कालावधीनंतर झाला. तेव्हा पुरोहितांकडून त्यांना निरोप येण्याआधीच त्यांच्या लक्षात आले, ‘मागील वेळी या यज्ञामध्ये त्यांना कवड्यांची माळ घालायला सांगितली होती.’ त्यामुळे ‘या वेळीही कवड्यांची माळ घालायची का ?’, हे त्यांनी लगेच पुरोहितांना विचारून येण्यास मला सांगितले. पुरोहितांनीही ‘हो. या वेळीही कवड्यांची माळ घालायची आहे’, असा निरोप दिला.

 

३. साहाय्यक साधकांची सेवा भावपूर्ण होण्यासाठी त्यांना यज्ञाविषयीची सूत्रे सांगणे

उग्र प्रत्यंगिरा यागाच्या पूर्णाहुतीच्या वेळी भावपूर्ण नमस्कार करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, पूर्णाहुती देतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि अमर जोशी

‘यज्ञ कुठल्या वेळेत असणार ? कुठल्या देवतेचे तत्त्व कार्यरत असणार ? यज्ञ कशासाठी असणार ?’, ही सर्व सूत्रे त्या आम्हा साहाय्यक साधकांना सांगतात. त्या योगे सेवा करतांना आम्हाला तसा भाव ठेवून सेवा करण्यास साहाय्य होते. ‘सेवेपूर्वी प्रार्थना केली ना ? सेवा करतांना नामजप चालू आहे ना ?’, असे विचारून त्या आम्हाला त्याची आठवण करून देतात.

 

४. यज्ञाची सेवा पूर्ण झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी सेवा आणखी अचूक होण्यासाठी
‘आणखी चांगले काय करता आले असते ?’, हेही त्या तेवढ्याच सहजतेने सांगतात.

 

५. साधकांवरील प्रीती

एकदा यज्ञातील चैतन्य आणि शक्ती यांचा लाभ होण्यासाठी त्यांनी काही साधक आणि पाहुणे यांचे यज्ञस्थळी बसण्याचे नियोजन केले होते. त्यांतील काही पाहुणे त्यांना यज्ञस्थळी आलेले दिसले नाहीत. तेव्हा त्यांनी पुन्हा त्यांना निरोप पाठवला. नंतर ते साधक आलेले पाहून निरोप देणार्‍या साधिकेकडे पाहून हसून मान हलवून त्यांनी आनंद व्यक्त केला. त्या वेळी त्यांची साधकांवर असलेली प्रीती पाहून मला कृतज्ञता वाटली.

 

६. दृढ श्रद्धा आणि शरणागतभाव

गजस्थापना करतांना पुरोहितांना विचारून ‘आपण करत असलेल्या सेवा आणि त्यांचे नियोजन संतांना नीट सांगितले आहे ना ?’, याची त्यांनी निश्‍चिती केली आणि त्या वेळी ‘आपण काय करतो ?’, हे संतांना सांगितले, तर ती सेवा लवकर पूर्ण होऊन तिच्यात अडथळे येत नाहीत’, असे सांगितले. यातून त्यांची संतांप्रती असलेली श्रद्धा तर जाणवलीच; पण ‘त्या शरणागतभाव ठेवून सेवा करतात’, हे लक्षात आले.

 

७. ‘यज्ञ ऐतिहासिक असल्याने त्यांचे चित्रीकरण चांगले व्हायला हवे’, अशी तळमळ असणे

यज्ञाचे चित्रीकरण होत असल्याने त्या मधे-मधे चित्रीकरण करणार्‍या साधकांना ‘आपल्याला अपेक्षित असे सर्व चित्रीकरण मिळत आहे ना ? अजून काही राहिले का ? काही अडचण नाही ना ?’, असे विचारतात. ‘हे सर्व यज्ञ ऐतिहासिक आहेत आणि त्यांचे चित्रीकरण चांगले व्हायला हवे’, अशी त्यांची तळमळ असते.

 

८. जिज्ञासा आणि शिकण्याची वृत्ती

यज्ञ चालू असतांना त्या वेगळी अवस्था अनुभवतात. कधी त्यांना त्यांच्या डोळ्यांतून शक्ती प्रक्षेपित होतांना जाणवते, तर कधी त्यांना ‘स्वतः पुष्कळ व्यापक झालो आहोत’, असे जाणवते. अनेक वेळा त्या स्वतःच्या ठिकाणी देवीचे अस्तित्व अनुभवतात. अशा वेळी त्या ‘सूक्ष्मातील जाणणार्‍या साधकांना काय जाणवले ?’, हे शिकण्याच्या दृष्टीने विचारतात आणि स्वतःची स्थिती सांगतात. ‘त्यामागे काय शास्त्र असेल ?’, हे समजून घेतात. हे विचारतांना त्यांचा जिज्ञासू तोंडवळा पाहून पुष्कळ आनंद जाणवतो.

 

९. साधकांना यज्ञाचा प्रसाद देतांना परिपूर्ण विचार करणे

एका आजारी साधकाला यज्ञाचा प्रसाद द्यायचा होता. तो निरोप देतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘ते साधक आजारी आहेत, तर त्यांना काही पथ्य आहे का ? हा प्रसाद ते खाऊ शकतील का ? त्यांना ते फळ आवडते का ? प्रसाद किती द्यायचा ?’, हे सर्व संबंधित साधिकेला समजेल, असे सांगितले. यातून ‘आजारी साधकांना केवळ यज्ञाचा प्रसाद दिला’, असे न होता ‘तो प्रसाद त्या साधकांनी भावपूर्ण आणि कृतज्ञतेने ग्रहण करावा’, असा त्यांचा विचार आहे’, असे वाटले. ‘हा त्यांच्यातील त्या साधकांप्रतीचा अव्यक्त प्रेमभावच होता’, असे जाणवले.

 

१०. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या समवेत
सेवा करतांना मनाला एक प्रकारची स्थिरता आणि शांतता जाणवणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या समवेत यज्ञाची सेवा करतांना माझ्यामध्ये एक प्रकारची स्थिरता आली असून मन शांत झाल्याप्रमाणे वाटते. घडत असलेल्या गोष्टींकडे पहातांना सकारात्मकता आल्याने अडचणी आल्या तरी, त्यावर सहज उपाय सापडतो. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या समवेत सेवा देऊन भगवंताने माझ्यावर केलेली ही एक प्रकारची कृपा आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment