आपत्काळापूर्वी महानगरे आणि शहरी भाग येथूून गावांत स्थलांतरित होतांना एकएकटे न रहाता अन्य साधकांसमवेत आपली निवासव्यवस्था करा !

आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधकांना जी पूर्वसिद्धता करावी लागेल, त्यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे महानगरे, तसेच मोठी शहरे या ठिकाणी न रहाता गावी अथवा तालुक्याच्या ठिकाणी रहायला जाण्याची पर्यायी व्यवस्था करणे ! समवेतच्या चौकटीत दिलेल्या निकषांनुसार साधक भारतभरात कुठल्याही गावी अथवा तालुक्याच्या ठिकाणी घर घेऊ शकतात; पण आपल्या कुटुंबियांसह शहरांतून स्थलांतरित होतांना त्यांनी वेगवेगळ्या गावांत एकएकटे रहाण्याचा विचार करू नये. त्याऐवजी सर्वांना सोयीस्कर अशा एखाद्या गावात साधक जवळपास घरे घेऊन राहू शकतात. अशा प्रकारे गावी अथवा तालुक्याच्या ठिकाणी साधकांनी एकत्र रहाणे, हे त्यांच्या साधनेच्या दृष्टीने पूरक असून काळानुसार आवश्यकही आहे. याविषयी, तसेच घराच्या संदर्भातील काही मार्गदर्शक सूत्रे पुढे दिली आहेत.

 

१. साधकांनी गावी एकएकटे न रहाता अन्य साधकांसह राहिल्याने होणारे लाभ !

१ अ. साधनेच्या दृष्टीने

१. येणार्‍या आपत्काळात प्रत्येकाला प्रतिकूल प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते. कठीण प्रसंगांत साधक एकमेकांच्या जवळ असल्यास ते इतरांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर साहाय्य करू शकतील. यामुळे साधकांमध्ये संघटितपणा आणि कुटुंबभावना निर्माण होईल.

२. आपत्काळात बाह्य परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी साधक एकत्र असल्यास त्यांना साधनेत एकमेकांचे साहाय्य घेता येईल. यामुळे त्यांच्या साधनेला गती येईल आणि त्यांच्या साधनावृद्धीसाठी तो काळ अनुकूल ठरेेल.

३. चांगली आध्यात्मिक पातळी असणारे साधक, तसेच साधनेचे प्रयत्न तळमळीने करणारे साधक इतरांना साधनेच्या संदर्भात दिशा देऊ शकतील. यामुळे सर्वांची आध्यात्मिक उन्नती जलद होईल.

आपत्काळातही गावोगावी साधनेसाठी पूरक, तसेच आश्रमासारखे सात्त्विक वातावरण निर्माण होईल.

१ आ. धर्मप्रसाराच्या संदर्भात

१. साधकांना शक्य होईल तेथे संघटितपणे धर्मप्रसाराचे कार्य करता येईल.

२. सध्या राबवत असलेल्या धर्मप्रसाराच्या उपक्रमांतील शक्य तितके आणि कालसुसंगत उपक्रम (उदा. नामसत्संग, भावसत्संग, धर्मशिक्षणवर्ग, बालसंस्कार वर्ग) त्या त्या गावांत राबवता येतील.

१ इ. अन्य लाभ

१. आपत्काळात घराच्या आवारातील विहिरीचे पाणी उपयोगी पडेल. आसपासचे काही साधक एकत्रित मिळून एक विहीर खणून घेऊ शकतील.

२. गोपालन करणे, शेती करणे, वनौषधींची लागवड करणे आदी एकत्रितपणे करता येईल.

३. साधकांनी एकमेकांच्या जवळपास रहाणे, हे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हिताचे आहे.

४. एखादा साधक रुग्णाईत असल्यास अन्य साधक त्याच्यावर विविध उपचार पद्धतींनुसार (बिंदुदाबन, प्राणशक्तीवहन उपाय, नामजप-उपाय आदींनुसार) उपाय करू शकतील.

५. एखाद्या साधकाकडे विशिष्ट (उदा. गवंडीकाम, सुतारकाम, लागवड, शिवणकाम) कौशल्य असल्यास त्या कौशल्याचा इतरांनाही लाभ होईल.

 

२. गावी घरे घेण्याच्या संदर्भातील सूत्रे

वरील सर्व लाभ लक्षात घेऊन साधकांनी सर्व दृष्टींनी सोयीस्कर अशा एखाद्या गावात जवळपास घरे घेऊन किंवा बांधून तेथे रहाण्याचा निर्णय घ्यावा. यातील २ – ३ साधक पुढाकार घेऊन योग्य गाव किंवा तालुका निवडणे, तेथे घरे शोधणे किंवा बांधणे आदी करू शकतात.

अ. आपत्काळात आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी बराच व्यय करावा लागेल. त्यामुळे साधकांनी आपल्याकडे असलेली बचत पुढील आपत्काळासाठी राखून ठेवावी. गावात घर बांधण्याचा किंवा ते खरेदी करण्याचा विचार करतांना ‘न्यूनतम व्ययात घराची व्यवस्था कशी करता येईल ?’, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.

आ. आता वेळ अगदी अल्प असल्याने घर बांधण्याऐवजी तयार घर विकत घेण्यास प्राधान्य द्यावे. अपेक्षित असे तयार घर मिळत नसल्यासच घर बांधण्याचा निर्णय घेता येईल. गावात घर बांधण्याची प्रक्रिया पुढील ५ मासांत पूर्ण करावी; परंतु सध्या तेथे स्थलांतरित होऊ नये.

इ. सर्वसाधारणपणे नवीन घर घेतांना ‘आपले घर प्रशस्त असावे, तेथे सर्व सोयी-सुविधा असाव्यात’, असे प्रत्येकाला वाटते. आपत्काळाच्या दृष्टीने गावात घराची व्यवस्था करतांना मात्र सर्व सोयी-सुविधांऐवजी आवश्यक तेवढ्याच जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करण्याविषयी विचार करावा. ‘आपण केवळ आपत्काळाच्या दृष्टीने या घराची व्यवस्था करत आहोत’, हे लक्षात घ्यावे.

ई. गावी घ्यावयाच्या घराच्या परिसरात थोडी मोकळी जागा असावी. या मोकळ्या जागेत औषधी वनस्पती, फळे, फुले, पालेभाज्या आदी जीवनावश्यक गोष्टींची लागवड करता येईल.

मोठ्या शहरांमधील असुरक्षित वातावरण, तसेच तेथे वाढत चाललेले रज-तमाचे प्राबल्य यांमुळे कुटुंबियांसह गावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचा विचार करा आणि तेथे रहाण्याची व्यवस्था करून ठेवा !

हा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – https://www.sanatan.org/mr/a/73920.html

आपत्काळ दिवसेंदिवस समीप येत आहे. काळाची भीषणता लक्षात घेता भगवान श्रीकृष्णावर अनन्य निष्ठा ठेवून वरील सर्व प्रक्रिया (नवीन ठिकाण शोधणे, तेथे घर घेणे किंवा बांधणे आदी) पुढील ५ मासांत शीघ्रातिशीघ्र पूर्ण करा ! गावात निवासाची व्यवस्था केली, तरी सध्या तेथे स्थलांतरित होऊ नये.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment