सहस्रो दर्शकांना अनमोल ज्ञानामृत देऊन त्यांच्या वैयक्तिक जीवनात परिवर्तन घडवणार्‍या ‘ऑनलाईन’ सत्संगांना लाभणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, हे राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यासाठी सध्या ‘समृद्ध काळ’ असल्याचेच दर्शक !

‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फेसबूक’ अन् ‘यू ट्यूब’ या सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे ‘नामजप सत्संग’, ‘बालसंस्कारवर्ग’, ‘भावसत्संग’, तसेच ‘धर्मसंवाद’ या ‘ऑनलाईन सत्संग शृंखले’चे आयोजन केले जात आहे. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या कृपेमुळे मागील ४ मासांपासून हे सत्संग चालू असून त्यात एकही दिवस खंड पडलेला नाही.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

 

१. जिज्ञासूंसाठी बोधामृत ठरलेली सत्संगशृंखला !

सध्या समाजाला सहजसोप्या भाषेत योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. सत्संगांच्या माध्यमातून जिज्ञासूंना घरबसल्या हे मार्गदर्शन मिळत असून ते जिज्ञासूंसाठी बोधामृत ठरले आहेत. अनेक जण या सत्संगांची चातकाप्रमाणे वाट पहात असतात. ते आप्त, परिचित आदींना ‘सत्संगातील मार्गदर्शन अत्यंत मोलाचे असल्याने तुम्हीही त्याला उपस्थित रहा’, असे सांगून सत्संगांचा प्रसार करत आहेत.

 

२. दर्शकांनी साधनेला आरंभ करणे, तसेच
धर्मकार्यात सहभागी होण्याची इच्छा दर्शवणे, ही या सत्संगांची फलश्रुती !

अ. नामजप सत्संगाला येणारे बरेच दर्शक तर आता केवळ दर्शक राहिलेले नसून त्यांनी नामजपादी साधनेला आरंभ केला आहे. ‘साधना करण्याचे महत्त्व या सत्संगांमुळे आमच्या लक्षात आले. नामजप करू लागल्यावर आम्हाला मनःशांती अनुभवता येऊ लागली’, असे काही जण उत्स्फूर्तपणे सांगतात.

आ. भावसत्संगांमुळे भगवद्भक्तीची ओढ निर्माण झाल्याने जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटल्याचे काही दर्शकांनी सांगितले. वैयक्तिक जीवनातील अयोग्य कृतींमध्ये पालट (उदा. व्यसन सुटणे, राग न्यून होणे) झाल्याचेही अनेकांच्या लक्षात आले.

इ. ‘लहान मुलांवर योग्य संस्कार होण्यासाठी, त्यांना साधनेची गोडी लावण्यासाठी बालसंस्कारवर्ग अत्यंत महत्त्वाचे आहेत’, असा अभिप्राय काही पालकांनी दिला आहे. सुसंस्कारांची शिदोरी देणार्‍या या वर्गांची मुलांनाही गोडी लागली आहे.

ई. ‘धर्मसंवादा’मुळे दर्शकांना हिंदु धर्मातील सिद्धांत, तसेच आचारधर्म या संदर्भात अमूल्य माहिती मिळत आहे. ‘हिंदु धर्माने सांगितलेले धर्माचरण ही केवळ परंपरा नसून त्यामागे विज्ञानही आहे’, याची निश्चिती पटत आहे. काही धर्मप्रेमी ‘हे मार्गदर्शन म्हणजे धर्मज्ञानच आहे’, असे सांगून धर्मकार्यात सहभागी होण्याची इच्छा दर्शवत आहेत.

 

३. देश-विदेशांतील दर्शकांचा सत्संगांना लाभत असलेला अभूतपूर्व प्रतिसाद !

या सत्संगांना प्रतिदिन देश-विदेशांतील ८० ते ९० सहस्र दर्शकांची उपस्थिती असते. ४.७.२०२० या दिवशी तर या संख्येने उच्चांक गाठला. या एकाच दिवशी १ लक्ष १४ सहस्र ५४७ दर्शक सत्संगांना उपस्थित होते. सत्संगांना एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणे, यावरून समाजाला सत्संगांचा लाभ होत असल्याचे दर्शक आहे.

‘सध्या ‘कोरोना’मुळे घरोघरी जाऊन अध्यात्मप्रसार करायला मर्यादा येत आहेत. सत्संगांच्या माध्यमातून त्यापेक्षा अधिक व्यापक प्रसार होत आहे. सत्संगांना लाभणारा अभूतपूर्व प्रतिसाद म्हणजे आपत्काळातही संस्था आणि समिती यांचे कार्य विहंगम मार्गाने वाढत असल्याचे निदर्शक आहे.

‘सध्याचा काळ समाजासाठी आपत्काळ असला, तरी राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी ‘समृद्ध काळ’च आहे ! अखिल मानवजातीला साधना, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन लाभावे’, यासाठी ग्रंथ, सत्संग आदींच्या रूपाने अनमोल ज्ञानभांडार उपलब्ध करून देणार्‍या परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.८.२०२०)

Leave a Comment