(म्हणे) ‘अंनिसचा कायदा संमत होण्यापूर्वीच सनातन्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून केला !’ – पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते

  • अंनिसच्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचा फज्जा : केवळ २४६ जणांचीच उपस्थिती  
  • हिंदु जनजागृती समितीचा ‘अर्बन नक्षलवाद आणि अपरिचित डॉ. दाभोलकर’ हा विशेष संवाद संकेतस्थळावर ४१ सहस्र ६३८ जणांनी पाहिला

खटला अद्याप न्यायालयात प्रलंबित असतांना त्यावर न्यायाधिशाच्या भूमिकेत जाऊन बिनबुडाचे वक्तव्य करणारे पृथ्वीराज चव्हाण अन्वेषणाची दिशा पुन्हा एकदा भरकटवण्याचाच प्रयत्न करत असल्यावरून पोलिसांनी त्यांच्यावरच कारवाई केल्यास चूक ते काय ?

मुंबई – समाजाने बुद्धीप्रामाण्यवाद्यांप्रमाणे वागू नये. स्वतःची दुकानदारी बंद होऊ नये, यासाठी सनातन्यांनी अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना विरोध केला. या सनातन्यांनी अनेक राज्यांत आतंकवादी कारवाया केल्या आहेत. (पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे जर पुरावे आहेत, तर त्यांनी अद्यापपर्यंत न्यायालयात सादर का केले नाहीत ? तथाकथित पुरोगाम्यांना खूश करण्यासाठी चव्हाण अशी हिंदुद्वेषी वक्तव्ये करत आहेत, हे हिंदू जाणून आहेत. वर्ष १९८४ मध्ये सहस्रावधी शिखांचे सामूहिक हत्याकांड, गांधी हत्येनंतर देशभरात ब्राह्मणांचे हत्यांकाड, भोपाळ वायू दुर्घटनेतील सहस्रोंच्या मृत्यूला उत्तरदायी असलेल्या अँडरसनला पळून जाण्यास साहाय्य करणे आदी अनेक अक्षम्य अपराध करणार्‍या काँग्रेस पक्षातील नेत्यांवर काय कारवाई केली, ते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रथम सांगावे ? – संपादक) अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा संमत होण्यापूर्वीच सनातन्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून केला आहे, अशी मुक्ताफळे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अंनिसच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात उधळली. (डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर १ घंट्यातच ‘डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागे नथुराम गोडसेच्या विचारसरणीचे लोक आहेत’, असे विधान करून पृथ्वीराज चव्हाण यांनी अन्वेषणाची दिशा भरकटवली. आता तेच नवीन विधान करून स्वतःची संभ्रमावस्था लोकांसमोर उघड करत आहेत. अशांवर कोण विश्‍वास ठेवणार ? सनातन्यांनी हत्या केली असेल, तर शस्त्रतस्कर मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांच्याकडून दाभोलकर हत्येतील पिस्तुलाचा जो न्यायवैद्यक अहवाल न्यायालयात आपल्या काँग्रेस सरकारने सादर केला तो खोटा होता का ?, याचे उत्तर द्यावे ! – संपादक)

२० ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ७ व्या स्मृतीदिनानिमित्त ‘ऑनलाईन’ अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, पुणे येथील अधिवक्त्या मनीषा महाजन, संजय नहार, अंनिसचे राज्याचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी प्रत्यक्षात पृथ्वीराज चव्हाण अनुपस्थित राहिल्याने कार्यक्रमात त्यांनी पाठवून दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले.

पृथ्वीराज चव्हाण संदेशात पुढे म्हणतात की,

१. वर्ष २०११ मध्ये सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज पाठवला होता. त्या अर्जाचा पाठपुरावा घेतला; मात्र त्या वेळी केंद्र सरकारने त्यावर अंतिम निर्णय दिला नाही. (वर्ष २०११ मध्ये सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या संदर्भात कोणताही ठोस पुरावा नसल्याने केंद्र सरकारने तत्कालीन काँग्रेस सरकारचा सनातन संस्थेवरील बंदीचा विद्वेषी प्रस्ताव फेटाळून लावला होता. ही गोष्ट मुख्यमंत्री राहिलेले चव्हाण यांनी जनतेपासून का लपवली ? याचे उत्तर त्यांनी समाजाला प्रथम द्यायला हवे ! अशी दायित्वशून्य आणि असत्य वक्तव्ये करणार्‍या लोकांचा भरणा असलेल्या काँग्रेसला जनतेने का नाकारले हे यातून स्पष्ट होते ! – संपादक)

२. अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक सिद्ध करतांना त्यामध्ये २७ कलमांचा मसुदा घातला. त्यामध्ये थोडे पालट करून हा कायदा संमत केला. डॉ. दाभोलकरांची भूमिका समाजमनाची होती. वर्ष १९९५ सिद्ध करण्यात आलेल्या मसुद्यातील १५ कलमे काढून १२ कलमे ठेवली. (सरकारने मूळ विधेयकातील डॉ. दाभोलकर यांनी घातलेल्या २७ कलमांपैकी १६ कलमे वगळली आणि केवळ ११ कलमांचा कायदा बनवला. काँग्रेसचे सरकार सत्तेत असतांना त्यांना ती १६ कलमे काढावी लागली; कारण ती अयोग्य आणि हिंदु धर्माला लक्ष्य करणारी होती, हे सिद्ध झाले ! – संपादक)

अंनिसचे संजय नहार म्हणाले की, ‘डॉ. दाभोलकर यांची वैचारिक संघर्षातून हत्या झाली आहे. ही लढाई वाटते तितकी सोपी नाही. कायद्यांचा अभ्यास असलेले लोक वेगळे विचार मांडणार्‍यांना जिवंत सोडत नाहीत. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येची घटना घडण्यापूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पथकाने डॉ. दाभोलकर यांना त्यांच्या चळवळीत भाग घेण्यास सांगितले होते. याला सनातन संस्थेने विरोध दर्शवला होता.’ (याचा अर्थ श्री. अण्णा हजारे कोणाच्या ऐकीव माहितीवरून काम करतात, असे म्हणण्यासारखे आहे. ठोस पुराव्यांच्या आधारावरच लढा देणार्‍या श्री. हजारे यांना अल्प लेखून त्यांच्या चळवळीचा अवमान करणे कितपत योग्य आहे ? – संपादक)

 

(म्हणे) ‘गोमूत्र, गोमय यांचा वापर करून कोरोनाच्या
विरोधात आपण लढा देऊ शकत नाही !’ – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर

चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्र हा नेहमीच पुरोगामी राहिला आहे. आताच्या काळात गोमूत्र, गोमय यांचा वापर करून कोरोनाच्या विरोधात आपण लढा देऊ शकत नाही.’’ (कोरोनाच्या निमित्ताने आज जगभरातील लोक हस्तांदोलन करण्याऐवजी हात जोडून नमस्कार करणे, शाकाहार घेणेे, योग-प्राणायाम करणे, तसेच मृत व्यक्तीचे दफन न करता अग्नीसंस्कार करणे अशा हिंदु पद्धतींचा अवलंब करत आहेत. रोगराईपासून वाचण्यासाठी आणि वातावरणाच्या शुद्धीसाठी प्रतिदिन ‘अग्निहोत्र’ करण्याची संकल्पनाही हिंदु संस्कृतीमध्ये आहे. गोमूत्राच्या सेवनाने अनेकांना शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरावर लाभ होत आहे, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. महामारीला आळा बसण्यासाठी गोमूत्रापासून बनवलेली औषधे लाभदायक ठरत आहेत. त्यामुळे एकीकडे सगळे जग हिंदु संस्कृतीचा अंगीकार करत असतांना ‘महाराष्ट्र पुरोगामी आहे’, अशी आरोळी ठोकून ‘गोमूत्र-गोमय यांचा उपयोग नाही’, असे म्हणणे हा केवळ हिंदुद्वेष आणि हिंदु संस्कृतीविषयीचे अज्ञान आहे ! – संपादक)

 

(म्हणे) ‘हिंदु जनजागृती समिती ‘अर्बन नक्षलवाद आणि
अपरिचित डॉ. दाभोलकर’ अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे
धाडस कसे करू शकते ?’ – अधिवक्त्या मनीषा महाजन यांचा कांगावा !

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती ‘एकीकडे समाजासाठी आम्ही चांगले काम करतो’, असे दाखवतात आणि दुसरीकडे अंनिसचे काम जगजाहीर असतांना ‘अर्बन नक्षलवाद आणि अपरिचित डॉ. दाभोलकर’ अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे धाडस कसे करू शकतात ? अंनिसचे काम जगासमोर उघड आहे. डॉ. दाभोलकर यांचे काम जगजाहीर आहे, असे असतांना ‘अपरिचित डॉ. दाभोलकर’ असे सांगून समाजात दिशाभूल करण्याचे काम केले जात आहे. (महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा इतिहास पहाता, त्यांचे कार्यकर्ते हे नक्षलवादी कारवायांत सहभागी असल्याच्या आरोपावरून त्यांना अटक झालेली आहे. ‘परकीय चलन विनियमन कायद्या’चे (एफ्.सी.आर्.ए.चे) उल्लंघन केल्यामुळे त्यांची ‘एफ्.सी.आर्.ए.’ मान्यता केंद्रशासनाने रहित केली, ‘नक्षलवाद्यांना साहाय्य करणार्‍या संस्थां’च्या गृहमंत्रालयाच्या सूचीत महाराष्ट्र अंनिसचे नाव होते. अंनिसचा खरा तोंडवळा जगासमोर येण्यासाठी ‘अर्बन नक्षलवाद आणि अपरिचित डॉ. दाभोलकर’ या कार्यक्रमाचे आयोजन हिंदु जनजागृती समितीने केले, यासाठी अधिवक्त्या मनीषा महाजन यांना पोटशूळ का उठतो ? या कार्यक्रमामुळे डॉ. दाभोलकर यांचे भ्रष्ट आणि दांभिक स्वरूप उघड झाले, हे अधिवक्त्या महाजन यांनी जाणावे ! – संपादक)

अधिवक्त्या मनीषा महाजन पुढे म्हणाल्या की,

१. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण योग्य प्रकारे झाले असते, तर पुढील हत्या टळल्या असत्या. (या प्रकरणात निरपराध हिंदूंना गोवून अन्वेषणच भरकटवण्यात आले, त्यामुळेच हत्येचे अन्वेषण योग्य प्रकारे झाले नाही, हे अधिवक्त्या महाजन का सांगत नाहीत ? – संपादक)

२. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमध्ये डॉ. तावडे, सचिन अंधुरे, विक्रम भावे, तसेच हिंदु जनजागरचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना अटक झाली. (ज्यांना उच्च न्यायालयात वकिली करणार्‍या राष्ट्रप्रेमी संजीव पुनाळेकर यांच्या संघटनेचे नावही नीट उच्चारता येत नाही, त्यांनी अधिवक्ता पुनाळेकर यांच्यावर डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा आरोप करणे हास्यास्पद आहे ! – संपादक) या प्रकरणातील काही आरोपींना जामीन मिळाला, तर काहींना जामीन मिळायचा आहे.

३. डॉ. दाभोलकर यांचा खून ज्या संघटनांनी केला, त्या संघटनांना ‘आपण खून पचवू शकतो’, असे त्यांना वाटते. त्यामुळे डॉ. दाभोलकर, गौरी लंकेश, कलबुर्गी आणि कॉ. पानसरे यांच्या सर्व खुनांसाठी सामूहिक पथक नेमले पाहिजे. या संघटना समाजात तेढ आणतात. त्यामुळे त्यांवर बंदी आणली पाहिजे. (महाराष्ट्र पोलीस, कर्नाटक पोलीस, विशेष अन्वेषण पथक, आतंकवादविरोधी पथक, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) यांनी गेली अनेक वर्षे अन्वेषण करूनही अटकेतील संशयित आरोपींच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. त्यासाठी ‘नवीन तपास पथक नेमा’, असे म्हणणे, हे अन्वेषण यंत्रणांवर अविश्‍वास दाखवण्यासारखे आहे. कॉ. पानसरे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले सनातन संस्थेचे साधक समीर गायकवाड यांना १९ मासांनी जामिनावर मुक्त करण्याची वेळ आली, तसेच डॉ. वीरेंद्र तावडे यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी एकही पुरावा यंत्रणांकडे नाही. असे असतांना अधिवक्त्या मनीषा महाजन स्वत: न्यायाधीश असल्याच्या भूमिकेत जाऊन एखाद्या संघटनेवर बंदीची मागणी करतात, हे हास्यास्पद ! ‘आम्ही म्हणू तेच खरे !’ आणि ‘आम्ही सांगू तेच गुन्हेगार !’ अशा अविवेकी वृत्तीतून अशा प्रकारे वैफल्यग्रस्त आरोप केले जात आहेत, हेच यातून लक्षात येते ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment