गणेशोत्सवामध्ये श्री गणेशाचा अधिकाधिक नामजप करा ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

रामनाथी (गोवा) – गणेशोत्सवाचे पूजन ही अर्चनभक्ती आहे. कर्मकांडापेक्षा उपासनाकांड श्रेष्ठ आहे. उपासनाकांडामध्ये स्मरणभक्तीच्या अंतर्गत नामस्मरण करणे महत्त्वपूर्ण आहे. गणेशोत्सवाचा आध्यात्मिक लाभ करून घेण्यासाठी श्री गणेशपूजनाच्या जोडीला साधनेच्या प्राथमिक अवस्थेतील व्यक्तीने ‘श्री गणेशाय नमः’, तर काही वर्षे साधना किंवा श्री गणेशाची उपासना करणार्‍या व्यक्तीने ‘ॐ गं गणपतये नमः’ हा नामजप अधिकाधिक वेळ करावा, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘आपत्काळात गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’, या विषयावर १७ ऑगस्ट या दिवशी ‘ऑनलाईन’ विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर हेही संवादामध्ये सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले.

श्री. चेतन राजहंस

श्री. चेतन राजहंस पुढे म्हणाले, ‘‘पाने, फळे, फुले यांनी बनवलेली, प्लास्टर ऑफ पॅरिसची, तसेच मातीची श्री गणेशमूर्ती यांच्या संदर्भात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने ‘पिप’ (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाद्वारे संशोधन केले होते. संशोधनाअंती ‘पाने, फळे, फुले यांनी बनवलेली किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची श्री गणेशमूर्ती नकारात्मक ऊर्जा, तर मातीची मूर्ती सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित करते’, असे आढळून आले होते. कोणत्याही उत्सवाचा उद्देश हा सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, हा असतो. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसची श्री गणेशमूर्ती शास्त्रसंमत नाही. चॉकलेट, पाने-फुले यांच्या आधारावर श्री गणेशमूर्ती बनवणे, हे मानसिक स्तरावरचे अध्यात्म झाले.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment