अखिल मानवजातीच्या हितासाठी हिंदु धर्माधिष्ठित राज्यप्रणालीच हवी !

प.पू. काणे महाराज

 

१. जगासाठी आदर्श राज्यपद्धत

सनातन हिंदु धर्म हा नीतीचे मूळ आहे. धर्मनिरपेक्ष राज्यप्रणालींमध्ये धर्माचे (पंथाचे नव्हे) अधिष्ठान नसल्याने राष्ट्रातील नागरिकांचे नैतिक अधःपतन होत आहे. त्यामुळे कालबाह्य साम्यवाद, अत्याचारी हुकूमशाही आणि स्वार्थी लोकशाही या फसलेल्या राज्यपद्धतींना ‘हिंदु धर्माधिष्ठित राज्यप्रणाली’ हा आदर्श पर्याय आहे. राष्ट्रजीवनात नैतिकतेचे संवर्धन करण्यासाठी जगातील सर्वच राष्ट्रांना हिंदु धर्माधिष्ठित राज्यप्रणाली अंगीकारणे आवश्यक ठरते.

 

२. विश्वशांतीसाठी उपयुक्त

सनातन हिंदु धर्म सहिष्णुतेसारख्या मूल्यांची जोपासना करण्याची शिकवण देतो. त्यामुळे तो जगासाठी कल्याणकारी आहे. हिंदु धर्माधारित राज्यप्रणाली जगभरातील राष्ट्रांनी आचरणात आणल्यास हिंसाचारी प्रवृत्तींचा लोप होईल; परिणामी जगभर युद्धबंदी होऊन अवघे जग शांती अनुभवील आणि विश्वशांतीचे महान ध्येय साध्य होईल !

 

३. सृष्टीचा विनाश टाळण्याचा एकमात्र उपाय !

‘ज्या वेळेस धर्मग्लानी येते, म्हणजे मानव तमोगुणाच्या शिखरावर जातो, त्या वेळेस सर्वत्र अनैतिकताच पसरते. अशा वेळी निसर्ग पूर्णपणे प्रतिकूल होऊन प्रदूषणासारखी अनेक समस्यारूपी संकटे कोसळतात  असे झाले, तर सृष्टीचा विनाश जवळ आला, असे समजले जाते. अशा वेळी मानवामध्ये सत्त्वगुणाची वृद्धी झाली, तरच सृष्टीचा विनाश टळतो. त्यासाठी रामराज्य, म्हणजे हिंदु धर्माने नियंत्रित केलेल्या राज्यघटनेवर आधारित राज्य, हा एकच उपाय संभवतो. आज ती वेळ जवळ येऊन ठेपली आहे !’

 

४. हिंदु धर्मावर आधारित ‘रामराज्या’चे आदर्शत्व !

सर्व राज्यप्रणालींचा अभ्यास केला, तर रामराज्याचे आदर्शत्व ठळकपणे दिसून येते. आज लाखो वर्षे उलटली, तरी ‘रामराज्य’ लोकांच्या लक्षात आहे; कारण त्याला धार्मिक अधिष्ठान होते. त्यामुळे रामराज्यातील नागरिक सुसंस्कृत, सुखी आणि समाधानी होते. तेथे भ्रष्टाचार, रोगराई, नैसर्गिक आपत्ती आदींना स्थान नव्हते. ‘श्रीरामाच्या शासनकाळात कधीही विलाप ऐकू आला नाही’, असे ‘रामराज्या’चे वर्णन महर्षि वाल्मीकि यांनी रामायणातील ‘युद्धकांडा’त लिहून ठेवले आहे. राजा श्रीराम म्हणतो,

स्नेहं दयां च सौख्यं च यदि वा जानकीमपि ।
आराधनाय लोकस्य मुञ्चतो नास्ति मे व्यथा ॥

– उत्तररामचरित, अंक १, श्लोक १२

अर्थ : प्रजारंजनासाठी मी माझ्या वैयक्तिक सौख्याचा काय; परंतु प्रत्यक्ष धर्मपत्नी जानकी हिचासुद्धा त्याग करावा लागला, तरी करीन. त्यात मला यत्कींचितही दुःख होणार नाही.

रजारंजनासाठी असे असामान्य धैर्य दाखवणारा एकही राजा जगाच्या इतिहासात झाला नाही ! रामराज्यात धार्मिक, राजनैतिक आणि आर्थिक अशा सर्व गोष्टींचा प्रामाणिकपणे विचार केलेला आहे. या प्रणालीला ‘ईश्वरी राज्य’, ‘धर्मराज्य’, ‘पक्षपातविहीन राज्य’, ‘धर्मसापेक्ष राज्य’ किंवा ‘धर्मनियंत्रित शासनतंत्र’ असे नाव देता येईल.

 

५. धर्म हाच राष्ट्राचा प्राण असल्याने राष्ट्र ‘धर्मनिरपेक्ष’ नको, तर‘धर्मसापेक्ष’च हवे !

‘राष्ट्र म्हणजे त्रिकालबाधित सत्यरचना आहे. ‘धर्म’ हा अशा राष्ट्राचा ‘प्राण’ आहे. प्राण गेल्यानंतर देहाला महत्त्व उरत नाही, ते कुजू लागते. आज तीच अवस्था धर्मनिरपेक्ष राष्ट्रांची होत आहे. जी राष्ट्र्रे धर्मसापेक्ष दिसत आहेत, ती दिवसेंदिवस दुःखी होत चालली आहेत; कारण ‘धर्मनिष्ठे’पेक्षा ती ‘अर्थनिष्ठ’ होत आहेत. अशा राष्ट्रांचा प्राण धर्म असला, तरी तेथे अर्थाला महत्त्व आहे. अर्थाला महत्त्व प्राप्त झालेली अशी राष्ट्रे कालौघात नष्ट पावतात. याउलट धर्मनिष्ठ राष्ट्र काही वर्षे नाही, तर अनंतकाळ टिकू शकते. इतर विचारप्रणालींवर स्थापन झालेली राष्ट्रे नष्ट झाल्याचे जगाने अनुभवले आहे, तसेच जी राष्ट्रे नष्ट झाली नाहीत, तीसुद्धा अनैतिकतेच्या शिखरावर पोचलेली दिसतात. त्यांचे अंधानुकरण केल्यामुळे धर्मसापेक्ष भारताची अवस्था काय झाली आहे, हे आपण पहातच आहोत. एकंदरीत राष्ट्र ‘धर्मनिरपेक्ष’ नको, तर ‘धर्मसापेक्ष’च हवे !’

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जि. पुणे. (१९९१)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment