अयोध्येत श्रीराममंदिर भूमीपूजनाच्या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते कृतज्ञतापूर्वक प्रभु श्रीरामाचे पूजन !

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – ‘श्रीरामजन्मभूमी ही रामललाचीच !’, असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर अयोध्येमध्ये श्रीराममंदिर उभारणीसाठीचे भूमीपूजन ५ ऑगस्ट या दिवशी मोठ्या उत्साहात करण्यात आले. याचेच औचित्य साधून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्रीराममंदिर उभारणीचा क्षण कृतज्ञता उत्सव म्हणून साजरा करण्यासाठी घरोघरी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून त्यापुढे तेलाचा दिवा, तसेच सायंकाळी घरापुढे तेलाचे २ दिवे लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानुसार येथील सनातनच्या आश्रमात प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन सनातन संस्थेच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते भावपूर्णरित्या करण्यात आले. या वेळी त्यांनी प्रभु श्रीरामाला अपेक्षित असे रामराज्य, अर्थात् हिंदु राष्ट्र अवतरण्यासाठी भावपूर्ण प्रार्थना केली. पूजनाची सांगता प्रभु श्रीरामाच्या आरतीने करण्यात आली. पूजनाचे पौरोहित्य सनातन पुरोहित पाठशाळेचे श्री. अमर जोशी यांनी केले.

या पूजनासह सायंकाळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते तेलाचे २ दिवे लावण्यात आले होते. आश्रमात दिवसभरामध्ये मधे मधे प्रभु श्रीरामाचा नामजप ध्वनीक्षेपकावर लावण्यात येत होता.’

प्रभु श्रीरामाला आरती ओवाळतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
दीप प्रज्वलित करतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

 

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना
श्रीरामाच्या पूजनाच्या वेळी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. ‘पूजनात ठेवलेल्या प्रभु श्रीरामाच्या चित्रामध्ये मागील बाजूस असलेले निळ्या रंगाचे पडदे सजीव वाटत होते, तसेच चित्रामधील प्रभु श्रीरामाच्या गळ्यातील हार सजीव वाटत होता.

२. प्रभु श्रीरामाच्या जागी श्रीरामस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले बसल्याचे दिसत होते.

३. प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेच्या बाजूला लावलेल्या दोन्ही समयांमधील ज्योती शांत स्वरूपात दिसत होत्या.

४. श्रीरामाचे पूजन करतांना ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ सूक्ष्मातून माझ्या समवेत आहेत’, असे जाणवले.’ (याविषयी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या की, ‘ज्या ज्या वेळी आश्रमात एखादे पूजन किंवा विधी असतो, त्या त्या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ माझ्यासमवेत सूक्ष्मातून असतात.’ – संकलक)

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.८.२०२०)

 

नवी देहली येथे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन !

देहली येथे प्रभु श्रीरामाला आरती ओवाळतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

‘नवी देहली – श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाच्या निमित्ताने ५ ऑगस्टला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी देहली येथे प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती केली. या वेळी त्यांनी प्रभु श्रीरामाच्या चरणी ‘संपूर्ण भूतलावर लवकरात लवकर रामराज्य स्थापन होऊ दे’, अशी प्रार्थना केली. तसेच त्यांनी ‘श्रीराममंदिराचे भूमीपूजन हे रामराज्य स्थापनेमधील पहिले पाऊल आहे’, असे सांगितले.

या पूजनासह सायंकाळी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते तेलाचे २ दिवे लावण्यात आले. या वेळी तेथे श्रीरामतत्त्व आकृष्ट करून आनंदाची अनुभूती देणारी सनातन संस्थेची सात्त्विक रांगोळी काढण्यात आली होती.’

 

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे आणि मंगळुरू (कर्नाटक) येथेही श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन करतांना पू. नीलेश सिंगबाळ

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथे आणि सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन केले. मंगळुरू येथील सनातनच्या सेवाकेंद्रात हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन केले.

 

सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात आणि कोल्हापूर
(महाराष्ट्र) येथील सेवाकेंद्रात श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमामध्ये दीपप्रज्वलन करतांना श्री. निनाद गाडगीळ आणि त्यांच्या समवेत श्री. सुनील कदम

देवद (पनवेल) – येथील सनातनच्या आश्रमात श्री. निनाद गाडगीळ आणि समितीचे श्री. सुनील कदम यांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन अन् दीपप्रज्वलन केले. कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील सेवाकेंद्रात समितीचे श्री. किरण दुसे यांनी दीपप्रज्वलन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment