पावसाळ्यात उगवणार्‍या रानभाज्या प्रतिकारशक्ती वाढवणार्‍या आहेत ! – वैद्य मुक्तेश्‍वरी पाखरे

कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी निसर्गाची देणगी

रत्नागिरी – कोकणातील रानमाळावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवतात. अत्यंत चविष्ट आणि निसर्गाची देणगी असलेल्या या औषधी रानभाज्या कोरोना प्रादुर्भावाच्या विरोधात लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यास अत्यंत उपयुक्त आहेत, अशी माहिती येथील वैद्य मुक्तेश्‍वरी पाखरे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देतांना वैद्य मुक्तेश्‍वरी पाखरे यांनी सांगितले की,

१. पावसाळ्यात उगवणार्‍या रानभाज्यांमध्ये मानवाला आवश्यक असणारी सर्व प्रकारची जीवनसत्त्वे दडलेली आहेत.

२. या रानभाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम, बीटा कॅरोटीन, जीवनसत्त्व ‘अ’, जीवनसत्त्व ‘ड’, मॅग्नेशिअम रेबोप्लेविन, फॉलिक ऍसिड असते. या जीवनसत्त्वांमुळे शरिरातील रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास साहाय्य होते.

३. टाकळा, सुरण, करटोली, केणा, कुडा, करंदा, हादगा, बांबूचा कोंब यांची कुणीही शेती करत नाही. निसर्गच या औषधी भाज्या आपल्याला भरभरून देतो.

४. आपल्या पूर्वजांनी या रानभाज्यांतील औषधी महत्त्व ओळखले आहे.

५. या रानभाज्यांमध्ये ‘करटोली’ची भाजी रक्तातील साखर नियंत्रित करते. ‘आघाडा’ ही भाजी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास उपयुक्त असून पोटदुखीवर गुणकारी आहे. ‘मोरशेंड’च्या कोवळ्या पानांची भाजी करतात. ही भाजी रक्तातील ‘युरिक अ‍ॅसिड’चे प्रमाण न्यून करते. श्‍वसननलिका दाह टाळण्यासाठी ‘नळी’ची भाजी उपयुक्त आहे. ‘टाकळ्या’ची भाजी खाल्ल्याने कफ न्यून होतोे. सुरणच्या भाजीतून ‘कॅल्शियम’ मिळते. त्यामुळे हाडे बळकट होतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment