मंदिरांच्या रक्षणासाठी राष्ट्रव्यापी आंदोलन उभारण्याची आवश्यकता ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

  • ‘राष्ट्रीय मंदिर-संस्कृती रक्षा अभियाना’च्या ‘ऑनलाईन’ चर्चाचत्राला मंदिर विश्‍वस्तांसह १७५ जणांची उपस्थिती !
  • मंदिरांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात संघटितपणे कृती करण्याचा निर्धार ! 

कोल्हापूर – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून सर्व मंदिरे खुली करण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा, यासाठी विश्‍वस्तांनी शासनाला पत्र पाठवणे, मंदिरांमध्ये भाविकांना धर्मशिक्षण मिळावे, यासाठी व्यवस्था करणे यांसह देशपातळीवरील कोणत्याही मंदिरावर आघात झाल्यास त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वत्रच्या मंदिर विश्‍वस्तांनी एकत्रित आवाज उठवून कृती करण्याचा निर्धार समस्त मंदिरांच्या विश्‍वस्तांनी केला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रातील मंदिर विश्‍वस्तांचे कृतीशील संघटन निर्माण व्हावे; म्हणून ३ जुलै या दिवशी ‘ऑनलाईन चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राला सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा येथून १७५ हून अधिक मंदिरांचे विश्‍वस्त, पुजारी, मठाधिपती, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते तथा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त ठरल्यानुसार देशपातळीवर मंदिरांवरील अशा सर्व आघातांविरोधात ‘राष्ट्रीय मंदिर-संस्कृती रक्षा अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या अंतर्गत मंदिर विश्‍वस्तांचे ‘ऑनलाईन’ चर्चासत्र पार पडले.

 

मंदिरांच्या रक्षणासाठी राष्ट्रव्यापी आंदोलन उभारण्याची
आवश्यकता ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

सध्या सर्वच राज्यांतील मोठ्या आणि श्रीमंत मंदिरांवर सरकारचे नियंत्रण आले आहे आणि अनेक मंदिरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. सरकारीकरण झालेल्या जवळपास प्रत्येक मंदिरामध्ये भ्रष्टाचार होत आहे. यासाठी सरकारवर हिंदु समाजाचा दबाव निर्माण करून मंदिरे भक्तांच्या हाती देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हिंदु समाज जर मंदिर रक्षणासाठी खंबीरपणे उभा राहिला, तर मंदिरांची निश्‍चितच सरकारीकरणातून मुक्तता होऊ शकते. त्यामुळे मंदिरांच्या रक्षणासाठी राष्ट्रव्यापी आंदोलन उभारण्याची आवश्यकता आहे. मंदिरांतून भाविकांना धर्मशिक्षण मिळाल्यास त्यांच्या श्रद्धा बळकट होतील आणि मंदिर संस्कृतीचे संवर्धन होण्यास साहाय्य होईल. त्यामुळे मंदिरांकडे केवळ धर्मस्थळ म्हणून न पहाता ती एक संस्कृती आणि धर्मकार्याचे अभियान आहे, या दृष्टीने पहाण्याची आवश्यकता आहे. मंदिरांतील अर्पणनिधीचा उपयोग विकासकामे किंवा आपत्ती निवारण यांसाठी केला जातो, हे चुकीचे असून देवनिधीचा उपयोग हा धर्मकार्यासाठीच झाला पाहिजे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment