‘सनातन डॉट ऑर्ग’ संकेतस्थळाच्या मल्याळम् भाषेचे तेलंगाणा चिलकूर बालाजी मंदिराचे मुख्य पुजारी सी. एस्. रंगराजन् यांच्या शुभहस्ते लोकार्पण

मल्याळम् भाषिक जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांना पर्वणी !

‘सनातन डॉट ऑर्ग’ संकेतस्थळाच्या मल्याळम् विभागाचे ‘होमपेज’

भाग्यनगर (तेलंगाणा) – सनातन संस्थेच्या ‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळावरील मल्याळम् भाषेचे लोकार्पण तेलंगाणा चिलकूर बालाजी मंदिराचे मुख्य पुजारी श्री. सी.एस्. रंगराजन् यांच्या शुभहस्ते २८ जून या दिवशी ‘मंदिरांचे नियंत्रण निधर्मी सरकारच्या हातात का ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ परिसंवादामध्ये संपन्न झाले. या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाच्या वेळी तमिळनाडू येथील ‘टेंपल वर्शिपर्स सोसायटी’ आणि ‘इंडिक कलेक्टिव्ह’चे अध्यक्ष श्री. टी.आर्. रमेश, मूळच्या केरळच्या; मात्र सध्या दुबई येथे रहाणार्‍या ‘पीपल फॉर धर्मा’च्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा नायर, सर्वोच्च अन् कर्नाटक उच्च न्यायालयांचे अधिवक्ता किरण बेट्टदापूर आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे या हिंदुत्वनिष्ठांचा यामध्ये सहभाग होता.

१. जिज्ञासूंना ‘साधना आणि अध्यात्म’, या विषयांवरील अमूल्य अन् सुलभ मार्गदर्शन मिळण्यासाठी सनातन संस्थेचे संकेतस्थळ मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती आणि तमिळ या ६ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. आता मल्याळम् भाषेतील जिज्ञासूंनाही हे अमूल्य ज्ञान उपलब्ध होणार आहे.

२. जिज्ञासूंना अध्यात्माची शास्त्रीय भाषेत ओळख करून देणे आणि धर्मशिक्षण देणे, हा सनातन संस्थेचा मुख्य उद्देश आहे. या समवेतच सनातन संस्था साधकांना वैयक्तिक साधनेविषयी मार्गदर्शन करून त्यांना ईश्‍वरप्राप्तीची वाटही दाखवते. यासाठी प्रवचने, साप्ताहिक सत्संग, मुलांसाठी बालसंस्कारवर्ग, तसेच समाज, राष्ट्र अन् धर्म यांच्या उत्थानासाठी अन्य उपक्रमही राबवते. अध्यात्म, आचारधर्म, आयुर्वेद तसेच मुलांसाठी आणि पालकांसाठी मार्गदर्शक असे ग्रंथही सनातन संस्थेने प्रकाशित केले आहेत.

जिज्ञासू पुढील लिंक द्वारे मल्याळम भाषेतील संकेतस्थळ पाहू शकतात. तसेच ही लिंक मल्याळम भाषिक मित्रमंडळी, नातेवाईक यांना पाठवून धर्मकार्यात सहभागी होऊ शकता. https://www.sanatan.org/malayalam/

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment