स्थिर, मितभाषी स्वभावाचे आणि सर्वांवर पितृवत् निरपेक्ष प्रेम करणारे सद्गुरु नंदकुमार जाधव !

‘सनातन संस्थेचे आणि सनातन संस्थेच्या शिकवणीप्रमाणे साधना करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक संत झाले आहेत. यांतील काहीजण ठिकठिकाणी जाऊन साधकांना साधनेसंदर्भात अगदी देहत्याग होईपर्यंत मार्गदर्शन करतात. आपण त्यांना ‘समष्टी संत’ म्हणतो. त्यांचे कार्य गुरूंप्रमाणेच साधनेत मार्गदर्शन करण्याचे आहे; म्हणून त्यांची माहिती सर्व साधकांना व्हावी आणि साधकांना संतांकडून काहीतरी शिकायला मिळावे, यासाठी त्यांच्याविषयीचे लिखाण ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित करत आहोत. त्या माहितीत काही संत आणि साधक यांनी लिहिलेली संतांची गुणवैशिष्ट्ये; शिकवण; त्यांच्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती; त्यांनी स्वतःविषयी, कुटुंबियांविषयी, इतर साधकांविषयी आणि संतांविषयी लिहिलेले लिखाण; त्यांनी केलेल्या कविता किंवा त्यांच्यावर इतर साधकांनी केलेल्या कविता इत्यादी विषयांवर लिखाण आहे. हे लिखाण वाचून त्यांच्याविषयी सर्वांनाच जवळीक वाटण्यास साहाय्य होईल आणि जगभरातील सर्वच साधकांना त्यांची तोंडओळख होईल. संतांची वैशिष्ट्ये केवळ वाचू नका, तर ती स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे या लेखमालेचे खर्‍या अर्थाने सार्थक होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सद्गुरु नंदकुमार जाधव

१. जन्मदिनांक : ज्येष्ठ शुक्ल पक्ष अष्टमी (१.६.१९५२)

२. संत आणि सद्गुरुपदी विराजमान : २६.६.२०१२ या दिवशी संत झाले आणि २४.६.२०१७ या दिवशी सद्गुरु झाले.

 

१. सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा परिचय

सद्गुरु नंदकुमार जाधव, B.Sc. B.Ed.

धर्मप्रचारक,  सनातन संस्था.

पूर्वाश्रमी त्यांनी माध्यमिक विद्यालयात गणित आणि विज्ञान या विषयांचे अध्यापक म्हणून कार्य केले. त्यांनी वर्ष १९९९ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधनेला आरंभ केला. मार्च २००२ मध्ये त्यांनी पूर्णवेळ हिंदु धर्मप्रसाराचे कार्य करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर परभणी, नांदेड, जळगाव आणि विदर्भ आदी ठिकाणी त्यांनी धर्मप्रचाराचे कार्य केले. सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनांतर्गत साधना करत ते २६.६.२०१२ या दिवशी सनातनचे २४ वे संत झाले आणि २४.६.२०१७ या दिवशी सद्गुरुपदी झाले. सध्या ते धर्मप्रचारक म्हणून सेवा करत आहेत.

‘गोदावरी महात्म्य’ या आध्यात्मिक ग्रंथाचे संकलक प.पू. डॉ. आठवले यांच्या समवेत त्यांनीही संकलन केले आहे. ते जाहीर ‘हिंदु राष्ट्रजागृती सभां’मधून मार्गदर्शन करतात. तसेच साधक, धर्मप्रेमी यांना व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी मार्गदर्शन करतात.

 

२. कलियुगात परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपे साधकांना
झालेले ईश्‍वर दर्शन आणि त्यांचे चैतन्य अन् कृपा यांमुळे
अखिल मानवजातीचे होत असलेले कल्याण ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

२ अ. सुखसागर येथील भेट !

२ अ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत केवळ एक पलंग आणि एक पटल (टेबल) एवढेच साहित्य बघून आश्‍चर्य वाटणे

‘मी गोवा येथे भावजागृती शिबिरासाठी गेलो आणि शिबिर संपल्यानंतर प.पू. गुरुदेवांना भेटण्यासाठी गोवा येथील सुखसागरमध्ये  गेलो होतो. तेव्हा प.पू. गुरुदेवांची खोली पाहून मला आश्‍चर्य वाटले; कारण खोलीत केवळ एक पलंग आणि एक पटल (टेबल) एवढेच साहित्य होते.

२ अ २. ‘मनात आलेला प्रत्येक विचार प.पू. गुरुदेवांपर्यंत पोचतो’, याची अनुभूती घेणे

आम्ही साधनेला आरंभ करून एक वर्ष झाले असेल ! तेव्हा एकदा नास्तिकतावाद्यांचा सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या विरोधात लिहिलेला लेख वाचला. तो वाचल्यानंतर मी डॉ. जाधव (घोंगाणे) यांना म्हणालो, ‘‘आपण या लेखाविषयी खंडण केले पाहिजे.’’ नंतर काही कालावधी गेला. माझे प.पू. गुरुदेवांशी थोडा वेळच बोलणे झाले. तेवढ्यात महाप्रसादाची वेळ झाली. मी महाप्रसाद घेऊन निघायच्या सिद्धतेत होतो आणि माझ्या जाण्याच्या मार्गावर प.पू. गुरुदेव हातात काही कागद घेऊन उभे होते. मी ते आत जाण्याची वाट पहात त्यांना दिसणार नाही, असा थांबलो. ‘ते आत गेल्यावर पाण्याची बाटली भरून निघायचे’, असे मी ठरवले. तेवढ्यात ते स्वत:च माझ्याजवळ आले आणि त्यांनी त्यांच्या हातातील कागद (नास्तिकतेविषयी हस्तपत्रके) मला दाखवले. ‘ती पत्रके ते मला का दाखवत आहेत’, ते मला कळेना. ती पत्रके दाखवून ते मला म्हणाले, ‘‘आता तुम्ही जाऊ शकता.’’

मी निघाल्यावरही माझ्या मनात सारखा विचार येत होता, ‘त्यांनी मला पत्रके का दाखवली ?’ तेव्हा मला वाटले की, कदाचित् काही दिवसांपूर्वी नास्तिकतावाद्यांनी लिहिलेल्या लेखाविषयी मी डॉ. जाधव (घोंगाणे) यांच्याशी चर्चा केली होती; म्हणून ती पत्रके प.पू. गुरुदेव मला दाखवत होते. अशाच प्रमाणे मनात आलेला विचार त्यांच्यापर्यंत पोचतो, याची अनुभूती यानंतरही अनेकदा आली.

२ आ. नांदेड येथील गुरुद्वारामध्ये प.पू. गुरुदेवांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

२ आ १. ‘गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यासाठी डोक्यावर टोपी किंवा रुमाल हवा’, हे लक्षात ठेवून वाहनातून उतरत असतांनाच प.पू. गुरुदेवांनी सनातन संस्थेची टोपी घालणे

प.पू. गुरुदेव साधकांना सत्संग देण्यासाठी नांदेडला येणार होते. नांदेड शहरात येताच प्रथम गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेण्याचे नियोजन होते. ‘गुरुद्वारामध्ये प्रवेश करायचा, तर पुरुषांनी डोक्यावर टोपी घातली पाहिजे किंवा रुमाल बांधला पाहिजे आणि महिलांनी रुमाल किंवा ओढणी घेतली पाहिजे’, असा नियम आहे. प.पू. गुरुदेवांसाठी आम्ही नवीन पांढरा रुमाल घेऊन जिथे त्यांचे वाहन थांबणार होते, त्या ठिकाणी एका साधकाला थांबवले आणि ‘ते येताच त्यांना रुमाल द्यायचा’, असे ठरवले. प.पू. गुरुदेव गुरुद्वारापाशी आल्यावर वाहनातून उतरले. तेव्हा आम्ही दोघे साधक एकमेकांकडे आश्‍चर्याने पहात राहिलो; कारण त्यांनी वाहनातून खाली उतरत असतांनाच सनातन संस्थेची टोपी घातली होती.

२ आ २. प.पू. गुरुदेवांनी गुडघेदुखीचा त्रास असूनही अनेक ठिकाणी गुडघे अन् डोके टेकून नमस्कार करणे

आम्ही गुरुद्वारामध्ये गेलो. तेव्हा तेथील माहिती सांगण्यासाठी शीख समाजाच्या व्यक्तीचे नियोजन केले होते. माहिती सांगत असतांना ती व्यक्ती बर्‍याच ठिकाणी भूमीवर गुडघे आणि डोके टेकवून नमस्कार करत होती. त्याप्रमाणे प.पू. गुरुदेव गुडघेदुखीचा त्रास असूनही गुडघे अन् डोके टेकून नमस्कार करत होते. अखेरीस गुरुद्वाराच्या मुख्य पुजार्‍यांची भेट होती. ते संतच असतात. तेथे बरीच चर्चा झाल्यानंतर त्यांनी प.पू. गुरुदेवांना ‘ग्रंथसाहेब’ (धर्मग्रंथ) ची प्रत भेट दिली आणि प.पू. गुरुदेवांनी त्यांना हिंदी भाषेतील काही ग्रंथ भेट दिले. निघतांना प.पू. गुरुदेवांनी त्या पुजार्‍यांच्या चरणांवर डोके टेकून नमस्कार केला. त्यानंतर नांदेडला कुणी साधक आले की, त्यांना गुरुद्वारामध्ये दर्शनाला घेऊन गेल्यावर मीही गुडघे अन् डोके टेकवून नमस्कार करायचो.

२ इ. प.पू. गुरुदेवांनी मिरज आश्रमात शिकवलेले सूक्ष्म परीक्षण

२ इ १. प.पू. गुरुदेवांनी त्रास असणार्‍या साधकासाठी नामजप करायला सांगणे आणि त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे  आत्मविश्‍वास वाढून सूक्ष्मातले कळल्याचा आनंद होणे

‘मी आणि प.पू. कालीदास देशपांडेकाका त्रास असलेल्या साधकांसाठी नामजपादी उपाय कसे करायचे ?’ हे शिकण्यासाठी मिरज आश्रमात राहिलो होतो. तेव्हा प.पू. गुरुदेव त्रास असणार्‍या साधकांसमवेत नामजपादी उपाय करायचे आणि आम्हाला त्याचे परीक्षण करायला सांगायचे. तो सूक्ष्मातील भाग असल्याने ‘आपल्याला जमेल का ?’ असे वाटून मी मागे मागेच थांबायचो; पण एक दिवस त्यांनी आम्हालाच प्रयत्न करायला सांगितले. आम्ही दोघांनी प्रार्थना केली आणि परीक्षण केले. परीक्षणामध्ये काय जाणवले, ते प.पू. गुरुदेवांना सांगितल्यावर त्यांनी ‘‘परीक्षण योग्य आहे’’, असे सांगितले. त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळेच आम्हाला परीक्षण करता आले, आमचा आत्मविश्‍वास वाढला आणि ‘सूक्ष्मातले कळले’, याचा आनंदही झाला. त्यामुळे प.पू. गुरुदेव आणि श्री दुर्गादेवी सूक्ष्मातून आलेले पहाता आले.

२ इ २. एका भाषणाच्या वेळी प्रार्थना केल्यावर श्री दुर्गादेवीचे दर्शन होणे

एकदा मिरजेत मंदिर सरकारीकरण कायद्याच्या विरोधात मोर्चा होता. मोर्च्याच्या समारोपप्रसंगी सौ. सुजाता कुलकर्णी भाषण करू लागल्या. सूक्ष्मातील भाग कळण्यासाठी मी प्रार्थना केल्यावर मला तेथे श्री दुर्गादेवी आलेली दिसली. त्या वेळी सौ. सुजाता कुलकर्णी एकदम क्षात्रतेजाने बोलू लागल्या. त्यांचा आवाज चढला होता आणि त्यांचे भाषण खूपच प्रभावी झाले.

प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे सूक्ष्मातून प.पू. गुरुदेव आणि श्री दुर्गादेवी यांचे दर्शन झाले. त्यासाठी त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता.

 

३. सद्गुरु जाधव यांची गायनकला, त्याविषयी त्यांचे मनोगत

३ अ. लहानपणापासून विविध प्रकारची गाणी गाणे,
त्यांपैकी भावगीते गाण्यास अधिक आवडणे आणि गाणी ऐकल्यावर लोकांनी कौतुक करणे

‘लहानपणापासून मी गाणी गायचो. आमच्या घरातील सर्वच जण गाणी गात. शिक्षण घेत असतांना मी शास्त्रीय संगीत शिकण्याचा विचार केला; पण काही कारणाने ते जमले नाही. पूर्वी मी देशभक्तीपर गीते, भावगीते आणि भक्तीगीते गायचो; परंतु मला भावगीते अधिक आवडत. लोकांना माझे गाणे आवडे. ते माझे कौतुक करत.

३ आ. पू. जाधवकाका यांच्या गाणे गाण्याच्या प्रकारात होत गेलेले पालट

१. शिकत असतांना सिनेमातील गाणी; म्हणजे जे कानावर पडे, ते गायला आवडे.

२. चाकरीत असतांना देशभक्तीपर गीते गायला आवडे.

३. साधनेत आल्यावर भजने, तसेच ज्यांतून भाव जागृत होतो, अशी गाणी गाण्यास आवडत.

३ इ. साधनेत येण्यापूर्वी आणि साधनेत आल्यानंतर गाणे गाण्यात झालेले पालट

३ इ १. गाणे गाण्याचा उद्देश

३ इ १ अ. साधनेत येण्यापूर्वी : ‘गाण्यातील अर्थ व्यक्त झाला पाहिजे’, असे वाटून मी गात असे. त्यामुळे गाण्याच्या शब्दातील अर्थ समजून घेऊन गात असे. ‘माझा भाव जागृत व्हावा’, यासाठी गाणे म्हटले जाई.

३ इ १ आ. साधनेत आल्यानंतर : माझ्या बरोबर इतरांनाही लाभ व्हावा, यासाठी प्रयत्न असतो.

३ इ २. गाणे गाण्यासाठीचे प्रयत्न

३ इ २ अ. साधनेत येण्यापूर्वी : जसे गाणे ऐकले आहे, तसे म्हणण्याचा मी प्रयत्न करत असे.

३ इ २ आ. साधनेत आल्यानंतर : गातांना मी स्वरांकडे लक्ष देतो. गाण्याच्या शब्दांतील भाव प्रकट होण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होतो.

३ इ ३. गाण्याची उंची गाठल्यावर भावाची अवस्था पेलण्याविषयी

३ इ ३ अ. साधनेत येण्यापूर्वी : गाण्याची उंची गाठल्यावर भावाची अवस्था पेलता येत नसे. मी तेथे थांबत असे.

३ इ ३ आ. साधनेत आल्यानंतर : मी त्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो.

३ इ ४. गाणे गायल्यानंतर कौतुकाची अपेक्षा

३ इ ४ अ. साधनेत येण्यापूर्वी : पूर्वी गाणे गायल्यानंतर ‘इतरांनी कौतुक करावे’, अशी अपेक्षा असे.

३ इ ४ आ. साधनेत आल्यानंतर : कौतुकाची अपेक्षा नसते.

३ ई. संत होण्यापूर्वी आणि संत झाल्यानंतर गाणे गाण्यात झालेले पालट

३ ई १. गाणे गाण्याची प्रेरणा

३ ई १ अ. संत होण्यापूर्वी : कोणी ‘गाणे म्हणा’ असे म्हटल्यावर मी गात असे.

३ ई १ आ. संत झाल्यानंतर : अंतःप्रेरणेने गाणे गायले जाते. मी प.पू. भक्तराज महाराज यांची भजने अधिक वेळा गुणगुणतो. संतांच्या शब्दांतील चैतन्यामुळे ती भजने म्हणावीशी वाटतात.

३ ई २. गाण्याची निवड

३ ई २ अ. संत होण्यापूर्वी : ज्या स्वरांत गोडवा आहे, गेयता आहे, अशी गाणी मी निवडत असे.

३ ई २ आ. संत झाल्यानंतर : कोणते गाणे गायला हवे, ते गायले जाते. तारक गीते म्हणजे ज्यातून भगवंताची कृपा होईल, अशी गीते अधिक वेळा गुणगुणली जातात.

३ ई ३. गाणे मनासारखे झाले नाही, तर मनाची स्थिती

३ ई ३ अ. साधनेत येण्यापूर्वी : मनाप्रमाणे गाणे झाले नाही, तर खेद वाटे.

३ ई ३ आ. साधनेत आल्यानंतर : आता खेद वाटत नाही. ‘देवाला अपेक्षित असे होणार आहे’, असे वाटते.

३ ई ४. संतपद प्राप्त झाल्यानंतर
३ ई ४ अ. गाणे गातांना असलेला भाव

१. ‘देवानेच आवाजाची देणगी दिली आहे. त्यामुळे तिचा देवासाठीच उपयोग करावा’, असे वाटते. कोणत्याही प्रकारच्या गाण्यात ‘देवासाठी गाणी गाणे’, असे होते.

२. ‘देवाला स्मरून गाणे गायचे आहे. त्याची कृपा होण्यासाठी गायचे आहे’, या उद्देशाने गायले जाते.

३. गाणे गातांना प.पू. डॉक्टरांचे स्मरण होते. त्यांच्यासाठी मी गाणे गातो. ‘प.पू. डॉक्टरांना गाणे ऐकवत आहे’, असा भाव असतो.

३ ई ४ आ. गाणे गात असतांना होत असलेली प्रक्रिया

१. गाणे गातांना शब्दांनुसार संबंधित दृश्य दिसते.

२. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ अशासारखी गीते गातांना देशासाठी काही केलेल्यांचे स्मरण होऊन ’आपणही देश आणि धर्म यांसाठी काही करायला हवे’, असे वाटते.

३. ‘कन्हैया खोड्या करू नको रे ।’, अशा प्रकारच्या गाण्यातून गोपीभाव निर्माण होतो.

३ उ. गाणे गाऊन झाल्यावर मनाची अवस्था गाण्याच्या प्रकारानुसार पालटत जाणे

गाणे आनंद देणारे असेल, तर गाणे गाऊन पूर्ण झाल्यावर आनंदावस्था असते. भाव जागृत करणारे गाणे असेल, तर भाव जागृत झालेला रहातो. कधीकधी गाणे गाऊन झाल्यावर तेच शब्द गुणगुणत रहावेसे वाटतात.

३ ऊ.  गाणे ऐकण्यापेक्षा ते गायला अधिक आवडणे

गाणे ऐकण्यापेक्षा ते गायला अधिक आवडते. दुसरे कुणी गाणे गात असतांना आपण गाणे गात असल्याची एकरूपता येते.

३ ए. गाणे गातांना आलेल्या अनुभूती

३ ए १. गाणे गातांना बाह्य जगाची जाणीव काही प्रमाणात असणे

गाणे गातांना मन निर्विचार असते. मन आनंदी असते. बाह्य जगाची जाणीव थोडी असते; पण मुख्य लक्ष गाणे परिणामकारक होण्याकडे असते.

३ ए २. गाण्याशी एकरूपता आल्यावर ‘गाणे आत उतरते’, असे वाटते.
३ ए ३. गाणे गातांना वाईट शक्तींचे अडथळे कधीच आले नाहीत.
३ ए ४. गाणे गातांनाची आणि अन्य सेवा करतांनाची अवस्था वेगळी असणे

गाणे गातांनाची अवस्था आणि अन्य सेवा करतांनाच्या अवस्था वेगळ्या असतात. ‘गाण्यातून माझ्यावर देवाची कृपा झाली पाहिजे’, असा भाव असतो. इतर सेवा करतांना समष्टी भाव असतो.

३ ऐ. पूर्वीचे आणि आताचे संगीत

पूर्वी सिनेमातील गाणी ‘रागां’वर आधारित होती. गाण्यांचे संगीत योग्य असे. ते भारतीय पद्धतीचे असे. ती गाणी गायलाही चांगली वाटत. आज पाश्‍चात्त्यांच्या अनुकरणामुळे भारतीय संगीत लुप्त झाले आहे. आताच्या संगीतात संगीत राहिलेले नाही. कला राहिलेलीच नाही. संगीत कलेची हानी झाली आहे.

३ ओ. गाणे गायला मिळण्याविषयीची पूर्वसूचना

१०.४.२०१३ या दिवशी सनातनचे संत पू. उमेश शेणै आणि पू. विनायक कर्वेमामा यांची ध्वनीचित्र-चकती पहात होतो. त्यात त्यांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांवर नृत्य करतांना पाहिले. त्या वेळी माझ्या मनात विचार आला की, मलाही गाणे म्हणायला सांगितले, तर ते मी म्हणीन. ‘कोणते गाणे म्हणायचे’, हेही मी ठरवले होते.

३ औ. ६० टक्के आध्यात्मिक प्रगती गाठल्यानंतर पुढील प्रगतीसाठी
उशीर होत असतांना ‘नको देवराया अंत आता पाहू ।’ हा अभंग आर्ततेने म्हटला जाणे

६० टक्के पातळी गाठल्यानंतर ७० टक्क्यांपर्यंत जायला मला उशीर झाला. त्या वेळी मी ‘नको देवराया अंत आता पाहू ।’ हा अभंग आर्ततेने म्हणत असे. त्या वेळी कंठ दाटून येत असे. ‘तू मला हृदयात घे. तू किती दिवस मला चरणांपासून दूर ठेवणार’, अशी आर्तता त्या भजनातून निर्माण होत असे.

३ अं. संगीत कलेच्या माध्यमातून साधना करणार्‍यांसाठी पू. जाधवकाका यांनी दिलेला संदेश

संगीत कलेच्या माध्यमातून साधना करायची असेल, तर साधक-कलाकारांनी संगीतातील ‘राग’ शिकून घ्यायला हवेत. ‘रागा’वर आधारित गीते म्हणायला हवीत. तानसेन इत्यादींनी संगीतातून ईश्‍वरप्राप्ती केली. त्यांच्या गाण्यात इतके सामर्थ्य होते की, त्याचा जो परिणाम साध्य व्हायला हवा, तो होत असे; उदा. ‘दीप राग’ गायला लागल्यावर दिवे लागत. पूर्वी हे सर्व कला म्हणून केले जात होते. आजकाल गाण्यात मधुरता राहिलेली नाही. कर्कशता आहे. त्यामुळे अशी गाणी लक्षातही रहात नाहीत. हल्ली गाणे म्हणजे धांगडधिंगा असतो. त्यात देव कुठेच दिसत नाही. गाणे नावालाच राहिलेले आहे.’

 

४. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी संतपद आणि सद्गुरुपद
गाठले त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काढलेले कौतुकोद्गार !

सद्गुरुपद घोषित केल्यानंतर सद्गुरु नंदकुमार जाधव यांची भावावस्था (२०१७)

 अतिशय कठीण प्रसंगांकडेही साक्षीभावाने पाहून
आपले संतत्व सिद्ध करणारे सनातन संस्थेचे २४ वे संत पू. जाधवकाका !

‘मी वर्ष २००४ मध्ये मिरज आश्रमात असतांना जाधवकाका आणि देशपांडेकाका तेथे वाईट शक्तींच्या त्रासांवरील नामाजपादी उपाय शिकण्यासाठी आले होते. नंतर देशपांडेकाकांनी जलद प्रगती केली आणि ते वर्ष २००६ मध्ये संत झाले. ३१.८.२००७ मध्ये देवद आश्रमात प्रयोग केला. तेव्हा साधकांना जाणवले की, राजेंद्र शिंदे आणि जाधवकाका यांची पातळी ६० टक्के झाली आहे. राजेंद्र शिंदे वर्ष २०१० मध्ये संत झाले; पण जाधवकाका झाले नाहीत. अशी उदाहरणे असल्यामुळे काही साधकांना आणि जाधवकाकांच्या पत्नीला अन् मुलींना वाटायचे की, ६० टक्के पातळीचे काही साधक संत झाले, तरी जाधवकाका अजून का झाले नाहीत ? कुटुंबीय तर जाधवकाकांना चिडवायचेही ! इतके खेळीमिळीचे वातावरण असलेले एक तरी कुटुंब कुणी पाहिले आहे का ? यावरूनच जाधवकाकांचा स्वभाव लक्षात येतो; मात्र या चिडवण्याचा परिणाम जाधवकाकांनी स्वतःवर होऊ दिला नाही. त्यांनी त्यांची साधना चालू ठेवली आणि त्याचे फळ त्यांना मिळाले आहे. ते संत झाले !  आता पू. जाधवकाका त्यांना चिडवतील, ‘झालो कि नाही संत ! आता तुम्ही तुमची प्रगती करून दाखवा !’

‘पू. जाधवकाका २ – ३ वर्षे आधीच संत का झाले नाहीत ?’, याचा विचार केल्यावर हे लक्षात आले की, इतर संतांच्या तुलनेत त्यांची बरीच साधना समष्टी कार्यासाठी वापरली गेली. त्यामुळे त्यांची व्यष्टी पातळी वाढून ते संत व्हायला इतर संतांच्या तुलनेत अधिक वर्षे लागली. पू. जाधवकाकांच्या उदाहरणावरून अध्यात्मात प्रत्येक गोष्टीचा कार्यकारणभाव कळल्याशिवाय कुणावर टीका करू नये, हे लक्षात येते. ते संत झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीने एक गोष्ट वाईट झाली आणि ती म्हणजे आता त्यांना काकांना चिडवता येणार नाही !

पू. काकांची स्थितप्रज्ञता सिद्ध करणारा प्रसंग म्हणजे सौ. काकूंचा अंथरुणाला खिळून ठेवणारा आजार. ते या प्रसंगाकडे साक्षीभावाने पहात होते.

पू. काकांची पुढील प्रगती जलद गतीने होऊन ते इतर संतांच्या तोडीचे होतील, याची मला खात्री आहे.’

 सर्वांवर पितृवत् निरपेक्ष प्रेम करणारे पू. नंदकुमार जाधव सद्गुरुपदी विराजमान !

‘सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्याशी बोलतांना ‘घरातल्यांशीच बोलत आहोत’, असे वाटते; कारण ते सर्वांशी खेळीमेळीने बोलतात आणि वागतात. त्याचबरोबर धर्मसभांत क्षात्रतेजयुक्त बोलणारे सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्यामुळेच जळगाव जिल्हा आणि परिसर येथील कार्य महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यांपेक्षा खूप अधिक पटींनी वाढत आहे. स्थिर, मितभाषी स्वभावाचे सद्गुरु नंदकुमार जाधव सर्वांवर पितृवत् निरपेक्ष प्रेम करत असल्याने आज अनेक साधक त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलून साधनेत मार्गदर्शन घेतात. साधकांना त्यांच्याशी बोलल्यावर अनेक प्रकारच्या अनुभूती येतात. त्यांच्या व्यक्तीगत जीवनात कठीण प्रसंग आले, तरी ते त्याकडे साक्षीभावाने पहातात. त्यांनी गायलेली काही गाणी भावजागृती करणारी, काही क्षात्रतेज जागृत करणारी, तर काही वाईट शक्तींच्या त्रासांवर चैतन्य मिळवून देणारी आहेत. अशा सद्गुरु नंदकुमार जाधव यांची पुढील वाटचाल अशीच जलद गतीने होवो’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

५. प.पू. गुरुदेवांचे सर्वत्र प्रक्षेपित होणारे चैतन्य आणि त्यांचा संकल्प यांमुळे भारतातच
नव्हे, तर संपूर्ण विश्‍वात हिंदु राष्ट्र स्थापनेच्या प्रक्रियेला प्रचंड गती आल्याचे जाणवणे

प.पू. गुरुदेवांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण भारतभरात वेगवेगळे उपक्रम चालू आहेत. हिंदु धर्मजागृती सभा, साधनेविषयीची प्रवचने, देवतांना प्रार्थना अन् साकडे घालणे, नामदिंडी, प.पू. डॉक्टरांच्या तेजस्वी विचारांचे फलक, ग्रंथ वितरण, शौर्यजागरण या सर्व माध्यमांतून त्यांचे चैतन्य सर्वत्र प्रक्षेपित होत आहे. त्यांची महती समाजापर्यंत पोचून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी त्यांनीच साधकांना दिली आहे. या उपक्रमांमुळे हिंदू संघटित होत आहेत, हिंदूंमधील ब्राह्मतेज अन् क्षात्रतेज जागृत होत आहे, याची जाणीव होऊ लागली आहे. सर्वत्र प्रक्षेपित होणारे त्यांचे चैतन्य आणि त्यांचा संकल्प, यांमुळे भारतातच नव्हे, तर संपूर्ण विश्‍वात हिंदु राष्ट्र स्थापनेच्या प्रक्रियेला प्रचंड गती आल्याचे जाणवू लागले आहे. हीपण त्यांची कृपा आहे.

त्यांच्या कृपेमुळेच मला हे लिखाण सुचले आणि त्यांनीच ते लिहून घेतले, त्यासाठी त्यांच्या चरणी मी सदैव कृतज्ञ आहे.’

 

६. सद्गुरु जाधवकाकांविषयी साधकांना आलेल्या अनुभूती

६ अ. पू. जाधवकाकांनी सांगितल्यानुसार नामजप करण्यासाठी
ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे प्रयत्न करूनही पहाटे जाग न येणे आणि त्याविषयी
प.पू. गुरुदेवांना प्रार्थना केल्यानंतर एका पक्ष्याने काही दिवस पहाटे ३ वाजता उठवणे

‘काही दिवसांपूर्वी अकोला येथे घरी असतांना पू. जाधवकाका यांनी ‘ब्राह्ममुहूर्तावर (पहाटे) उठून नामजप केल्यास पुष्कळ लाभ होतो’, असे मार्गदर्शन केले होते. त्यामुळे मला पहाटे उठून नामजप करण्याची पुष्कळ तळमळ लागली होती; पण मला काही केल्या पहाटे जागच येत नसे आणि मला घड्याळाचा गजरही ऐकू येत नव्हता. त्यामुळे मी झोपतांना प.पू. गुरुदेवांना पुष्कळ आर्ततेने प्रार्थना केली, ‘तुम्हीच मला पहाटे नामजपाला उठवत जा.’ त्याच्या दुसर्‍या दिवसापासून प्रतिदिन पहाटे ३ वाजता एक पक्षी ओरडत जातो आणि त्या वेळी मला लगेच जाग येते. नंतर मी प.पू. गुरुदेवांना पुन्हा प्रार्थना केली, ‘आता मला पहाटे उठायची सवय झाली. या दृष्टीने आता मी काळजी घेईन; कारण पक्षाला त्रास द्यायला नको.’ ही प्रार्थना केल्यानंतर आता मला ब्राह्ममुहूर्तावर उठवायला पक्षी येत नाही आणि मला पहाटेच जाग येते.’ – सौ. विमल राजंदेकर, अकोला (४.७.२०१६)

६ आ. सद्गुरु जाधवकाकांनी वास्तव्य केलेल्या घरातील खोलीत राहिल्यावर पाहुण्यांना आलेल्या अनुभूती

अ. ‘त्या खोलीत एक वेगळाच दैवी सुगंध येत आहे’, असे सौ. आशा कुलकर्णी (आत्या) यांनी सांगितले.

आ. श्रीमती उषा अंबडकर (आत्या, वय ७५ वर्षे) यांना रात्री झोपेत पुष्कळ वेळा उठावे लागते; पण त्या रात्री त्यांना एकदाही उठावे लागले नाही आणि शांत झोप लागली.’

– सौ. अक्षरा बाबते, संभाजीनगर (१८.५.२०१९)

 

७. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी गायलेल्या
गीतांच्या संदर्भात त्यांना स्वत:ला आलेल्या अनुभूती

शब्दांशी एकरूप होऊन गाणे गातांना सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नंदकुमार जाधव

प.पू. गुरुदेवांनी गीत सुचवणे आणि शिबिराच्या समारोपात म्हणण्याची इच्छा पूर्ण होणे

‘२ – ३ वर्षांपासून मनात होते की, प.पू. गुरुदेवांविषयी कविता लिहावी’, असे वाटत होते. मी यापूर्वी कुठल्याही विषयावर कधीही कोणतीही कविता केली नव्हती; परंतु प.पू. गुरुदेवांवर कविता रचण्याची तीव्र तळमळ वाटत होती. अमृत महोत्सवानंतर प.पू. गुरुदेवांना तळमळीने प्रार्थना केली आणि पटपट शब्द सुचत गेले, तेही ठाऊक असलेल्या चालीवर. त्यांनीच हे ‘प्रार्थनागीत’ सुचवले. मी पू. पिंगळेकाकांना दाखवल्यावर त्यांना ती प.पू. गुरुदेवांची ‘आरती’ वाटली.

गीत पूर्ण झाले आणि कृतज्ञता व्यक्त करतांना विचार आला, ‘हे गीत आपण सिद्ध करूया’, असे म्हणत होतो; परंतु ते तर देवानेच सुचवले. देवच आपल्याला सर्व देत असतो. आपण देवाला काही देऊ शकत नाही. आपण केवळ प्रार्थना आणि कृतज्ञता देवाला देऊ शकतो.’ प.पू. गुरुदेवांनीच हे गीत सुचवले आणि शिबिराच्या समारोपात म्हणण्याची इच्छा त्यांच्या कृपेने पूर्ण झाली. त्यासाठी त्यांच्या चरणी शरणागतभावाने कोटीकोटी कृतज्ञता.’

 

८. सद्गुरु जाधव यांनी गायलेल्या गीतांच्या
संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आलेल्या अनुभूती

८ अ. पू. जाधवकाका यांनी म्हटलेली गीते ऐकतांना
गीतांनुसार साधकांमध्ये भाव जागृत झाला किंवा क्षात्रतेज जागृत होणे

‘पू. जाधवकाका यांनी गायलेली क्षात्रगीते आणि प.पू. भक्तराज महाराज यांची भजने असलेली ध्वनीचित्रफीत रामनाथी आश्रमातील साधकांना दाखवली. तेव्हा गीतांनुसार साधकांमध्ये भाव जागृत झाला किंवा क्षात्रतेज जागृत झाले आणि साधकांना संतांच्या वाणीचे महत्त्व अनुभवता आले.’

८ आ. सद्गुरु जाधवकाका यांच्या आवाजात गायलेली  भावगीते, क्षात्रगीते
आणि प.पू. भक्तराज महाराजांची भजने ध्वनीचित्रफितीवर ऐकल्यावर आलेल्या अनुभूती

‘सद्गुरु जाधवकाका यांनी गायलेल्या गीतांना पार्श्‍वसंगीत नाही, तरी ती गीते ऐकतांना पुढील अनुभूती आल्या.

१. क्षात्रगीत ऐकतांना अंगावर शहारे आले आणि भाव जागृत झाला.

२. ‘दर्शन दे रे, ये रे भगवंता..’ हे भावगीत म्हणतांना आर्तता जाणवत होती.

३. काका हावभाव, हातवारे न करता ध्यान लागल्याप्रमाणे गातात.

४. ते गातांना त्यांच्या चेहर्‍यावर भाव दिसत नाही. ते निर्विचार स्थितीत असल्यासारखे वाटते.

५. ते तल्लीन होऊन गातात.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

८ इ. सद्गुरु जाधव यांच्या गायनकलेविषयी त्यांच्या
कुटुंबियांनी आणि श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली सूत्रे

८ इ १. सद्गुरु जाधवकाका यांचे गाणे ऐकून आलेल्या अनुभूती
८ इ १ अ. गाण्यात सहजता असणे

‘एरव्ही गाण्याचा सराव नसतांना विस्मरण होते. चाल आठवत नाही; पण काकांच्या बाबतीत तसे झाले नाही.

८ इ १ आ. आवाजाची नैसर्गिक देणगी असलेले पू. जाधवकाका !

पू. जाधवकाका यांच्या आवाजात पहाडीपण आणि आर्तता आहे. गाण्याचा सराव जितका असेल, तितका आवाज कसला जातो; पण काकांच्या बाबतीत तसे नाही. त्यांना आवाजाची नैसर्गिक देणगीच आहे. त्यांच्या आवाजाला फिरती आहे. हवा तशा प्रकारे वळू शकणार्‍या आवाजाला ‘फिरती’ म्हणतात.’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

८ इ १ इ. पुष्कळ दिवसांनंतर गाणे गाऊनही आवाजात सहजता असणे

‘संत होण्यापूर्वी गाणे गातांना बाबांचा आवाज बसे किंवा त्यांना खोकला येई. आज त्यांनी पुष्कळ दिवसांनंतर गाणे गायले. गाणीही विविध प्रकारची गायली; पण आज त्यांचा आवाज गाण्यानुसार पालटत होता. आवाजात सहजता होती.’

– कु. गायत्री जाधव (आताच्या सौ. गायत्री शास्त्री (पू. जाधवकाका यांची ज्येष्ठ कन्या))

८ इ २. भाव जागृत होणे
८ इ २ अ. गाणे ऐकणार्‍यांमध्ये भाव जागृत करण्याची क्षमता असणे

‘काकांच्या आवाजात दुसर्‍यामध्ये भाव जागृत करण्याची क्षमता आहे. राष्ट्रभक्तीपर गीत गातांना ‘आता आपण कृती करण्यास उद्युक्त व्हायलाच हवे’, ही तळमळ होती.’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

८ इ २ आ. गाणे ऐकतांना राष्ट्रभक्ती निर्माण होत असल्याचे जाणवणे आणि सात्त्विक भाव जागृत होणे

‘बाबांचे गाणे ऐकतांना ‘राष्ट्रभक्ती निर्माण होत आहे’, असे वाटत होते. मन एकाग्र होत होते. ‘मी कुठे आहे’, याचे भान रहात नव्हते. माझ्या अंगावर रोमांच येत होते.’ – कु. गायत्री जाधव

८ इ २ इ. ‘बाबांचे गाणे ऐकल्यावर माझा भाव जागृत होत होता. गाणे ऐकतच रहावेसे वाटत होते.’ – कु. गायत्री जाधव
८ इ २ ई. गाण्यातून आर्तता आणि देवाप्रतीचा उत्कट भाव जाणवणे

‘काका ज्या आर्ततेने गाणे गातात, ते विशेष आहे. काही वेळा परिस्थिती समोर आली की, आर्तता येते. आता तशी परिस्थितीही नाही, तरी काकांच्या शब्दाशब्दातून देवाप्रतीचा उत्कट भाव जाणवत होता. ‘गाणे गातांना आपण देवाच्या दारात ‘याचक’ किंवा ‘भिकारी’ म्हणून उभे आहोत’, हा काकांचा भाव आतून जाणवतो. त्यांचे गाणे ऐकल्यावर माणूस रडल्याशिवाय रहाणारच नाही, इतका त्यांच्या वाणीला अधिकार प्राप्त झाला आहे.’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

८ इ ३. ‘पू. जाधवकाका यांचा आवाज ऐकल्यावर त्यांच्या शब्दांशी पटकन एकरूप होता येते.’ – (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

८ इ ४. ‘काका गाणे गात असतांना तसे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर उभे रहात होते.’ – सौ. सुनंदा जाधव (पू. जाधवकाका यांची पत्नी)

८ इ ५. ‘काका गाणे म्हणत असतांना त्यांचे शब्द, तोंडवळा आणि भाव एकरूप झाले होते. त्यामुळे वातावरण स्तब्ध झाले होते.’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

८ इ ६. काका संत असल्यामुळे स्त्रीभावातील गवळण म्हणणे त्यांना जमणे

‘काकांनी ‘कन्हैया खोड्या करू नको रे ।’ ही गवळण म्हटली. तेव्हा वाटले, ‘पुरुषांनी स्त्रीभावात म्हणणं अवघड आहे. केवळ संतांनाच ते जमू शकते.’ – (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

८ इ ७. ‘बाबांच्या गाण्यातील शब्द आकाशाला भिडतात’, असे वाटले.’ – कु. गायत्री जाधव

८ इ ८. गाणे सुरू असतांना सर्वत्र नाद भरून राहिल्याचे जाणवणे आणि ‘गाणे संपले, तरी ते चालूच राहील’, असे वाटणे

‘काका गाणे गात असतांना नाद सर्वत्र भरून राहिला होता. नंतरही मी एका वेगळ्या जगात होते. ‘त्यातून बाहेर येऊ नये’, असे वाटत होते. ‘गाणे संपले असे नाही, ते चालूच राहील’, असे वाटते.’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

८ इ ९. ‘नाद’ ही मोठी शक्ती असल्याचे अनुभवणे

‘संगीत’ या कलेत साधकत्व आणि वाणीत चैतन्य नसेल, तर त्याची परिणामकारकता शून्य ठरते. संतांनी म्हटलेली गाणी ऐकतांना पुष्कळ वेगळ्या जगात जाता आले. वेगळ्या अनुभूती आल्या. ‘नाद’ ही मोठी शक्ती आहे’, हे अनुभवले.’ – (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

८ इ १०. ‘गाणे ऐकतांना मला चैतन्य मिळत होते.’ – कु. गायत्री जाधव

८ ई . पू. जाधव यांच्या पत्नी सौ. सुनंदा जाधव आणि ज्येष्ठ कन्या कु. गायत्री यांनी सांगितलेली पू. काकांची गुणवैशिष्ट्ये

८ ई १. धीर देणे : ‘घरातील सर्वच जण गाणे म्हणत असत. पूर्वी मला गाणेच काय; पण कविताही म्हणायला येत नव्हती. तेव्हा त्यांनी मला धीर दिला की, कविता पाठ नसेल, तर पाहून म्हण.’ – सौ. सुनंदा जाधव

८ ई २. परेच्छेने वागणे : ‘बाबा पहिल्यापासूनच परेच्छेने वागतात. इतर जे सांगतात, ते बाबा ऐकतात. ते स्वतःचे मत इतरांवर कधीच लादत नाहीत. घरच्यांसाठी कोणतीही वस्तू घ्यायला गेल्यावरही ‘इतरांना काय वाटते’, त्यानुसार ते करतात.’ – कु. गायत्री जाधव

८ ई ३. मुलींना गाणे आणि अन्य कला शिकण्यासाठी प्रोत्साहन देणे

‘लहानपणी स्पर्धेत भाग घेतल्यावर बाबा गाणी निवडून देत. आमच्याकडून सराव करून घेत. आम्ही इतर कला शिकाव्यात, यासाठी त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले.’ – कु. गायत्री जाधव

८ ई ४. पूर्वीपासून आवाज प्रेमळ असणे, साधनेत उन्नती होतांना आवाजात पालट जाणवणे आणि त्यांचे प्रवचन अन् मानसपूजा ऐकतांना प.पू. डॉक्टरांचा आवाज ऐकू येणे

‘साधनेत येण्यापूर्वीपासून बाबांचा आवाज प्रेमळ आहे. साधनेत उन्नती होत गेल्यावर त्यांच्या आवाजात पालट झाला. साधनेत आल्यावर एकदा त्यांनी केलेले प्रवचन ऐकतांना ‘प.पू. डॉक्टर बोलत आहेत’, असे मला वाटले. संत झाल्यावर एकदा भ्रमणभाषवर ते सांगत असलेली मानसपूजा ऐकतांना मला प.पू. डॉक्टरांचाच आवाज ऐकू येत होता.’ – कु. गायत्री जाधव

८ ई ५. शाळेत शिकवत असतांना बाबा ‘गाणारे सर’ म्हणून प्रसिद्ध असणे आणि चाकरीचे त्यागपत्र दिल्यानंतर ८ – ९ वर्षांनीही लोकांना ते म्हणत असलेल्या गाण्याची आठवण येणे

‘शाळेत शिकवत असतांना बाबा ‘गाणारे सर’ म्हणूनच प्रसिद्ध होते. बाबांना चाकरीचे त्यागपत्र देऊन ८ – ९ वर्षे झाली. पूर्वी पू. बाबा एका कार्यक्रमात नेहमी एक गाणे म्हणायचे. त्यांनी नोकरीचा त्याग केल्यावर तेथे दुसरे शिक्षक गाणी म्हणू लागले, तेव्हा इतर शिक्षक आजही भेटल्यावर म्हणतात, ‘सर, तुम्ही जसे गाणे म्हणत होता, तसा जिवंतपणा आताच्या गाणी म्हणणार्‍यांत नाही. यावरून ८, ९ वर्षांनीही शिक्षकांना पू. बाबांच्या गाण्यांची आठवण येत असल्याचे लक्षात येते.’’ इतक्या वर्षांनंतरही लोकांना त्यांची आठवण येेते.’ – कु. गायत्री जाधव

८ ई ६. ‘काका समाजातील कार्यक्रमात पूर्ण समरस होऊन गीत गात. त्यांचे गाणे ऐकून ऐकणार्‍यांच्या डोळ्यांत पाणी येत असे.’

– सौ. सुनंदा जाधव

८ ई ७. बाबांनी सांगितल्यानुसार आरती आणि नामजप म्हटल्यास देवाशी एकरूप झाल्याची अनुभूती येणे

‘आरती म्हणतांना प्रभु श्रीरामापेक्षा हनुमंताची आरती गतीने म्हणायला सांगायचे. नंतर श्रीकृष्णाच्या आरतीला थोडी गती अल्प व्हायची. टाळ वाजवतांना चारही आरत्या पूर्ण होईपर्यंत त्यांची गती सारखीच असायची. आम्ही टाळ वाजवतांना ताल कधी रेंगाळायला लागला, तर ते लगेच थांबून सांगायचे; कारण त्या गतीत म्हटल्यावर त्या देवतेप्रती भाव जागृत होत असे. हनुमंताची आरती करतांना त्यांचा क्षात्रभाव निर्माण होत असे किंवा सद्गुरूंची आरती म्हणतांना त्यांच्यात शरणागतभाव निर्माण होऊन त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत असत. त्यामुळे त्यांच्यासह आरती केल्यावर भाव जागृत होऊन अतिशय हलके वाटून चैतन्य मिळाल्यासारखे वाटायचे. नामजप करतांना कोणत्या लयीत करायचा, ते शिकवायचे. त्यानुसार केल्यास नामजप चांगला होई. देवाशी एकरूप झाल्यासारखे वाटे.’ – कु. गायत्री जाधव

सौ. सुनंदा जाधव
८ ई ८. साधनेसाठी गाण्याचा उपयोग व्हावा, ही इच्छा देवाने पूर्ण करणे

‘काका पूर्वीपासून गाणे म्हणतात. ‘त्यांच्या गाण्याचा साधनेसाठी उपयोग होईल का ?’, असे मला वाटे. देवाने आज ते पूर्ण केले.’ – सौ. सुनंदा जाधव

८ ई ९. ‘७.४.२०१३ या दिवशी सावंतवाडी येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेतील भाषणाच्या वेळी त्यांच्याकडे पहातच रहावेसे वाटत होते.’ – सौ. सुनंदा जाधव

८ ई १०. ‘काकांकडे वक्तृत्त्व आहे, नेतृत्व आहे, गाण्याचे अंग आहे. महत्त्वाचे म्हणजे ते संत आहेत.’ – (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

 

९. सद्गुरु जाधव यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन

२७.४.२०१३ या दिवशी पुणे जिल्ह्यातील ६० टक्के आणि त्यापेक्षा अधिक पातळी असलेल्या साधकांना पू. नंदकुमार जाधवकाका यांनी मार्गदर्शन केले. त्यातील काही सूत्रे पुढे देत आहोत.

९ अ. व्यष्टी साधनेच्या संदर्भात

१. ‘मनात अधिक विचार येत असल्यास वेगाने नामजप करावा. तरीही विचार आल्यास श्रीकृष्णाला प्रार्थना करावी.

२. ताण आल्यास लगेच प्रार्थना करावी.

९ आ. समष्टी साधनेच्या संदर्भात

१. साधकांनी ‘साधक स्वतःहून आढावा देत नाहीत, तेव्हा प्रतिक्रिया येतात’, असे सांगितल्यावर पू. काका म्हणाले, ‘‘आढावा घेणे ही आपली साधना आहे. कुणी देत नसेल, तर प्रतिक्रिया यायला नको.’’

२. इतरांना चूक सांगणे म्हणजे प्रेमभाव !

९ इ. संतपद प्राप्त करण्यासाठी कोणते प्रयत्न करावेत ?

१. भावाच्या स्तरावरील प्रयत्न वाढवावेत. सातत्याने श्रीकृष्णाला आळवायला हवे. श्रीकृष्णाला इतक्या आर्ततेने प्रार्थना करावी की, आपल्याला त्याची अनुभूती यायला हवी. अनुभूती येईपर्यंत तळमळीने आणि आर्ततेने प्रार्थना करायला हवी. श्रीकृष्णाला साष्टांग दंडवत घालून शरणागती वाढवावी. क्षमायाचना करावी.

२. साधकांनी कृतज्ञताभाव वाढवायला हवा. एकदा प.पू. डॉक्टर म्हणाले होते, ‘‘कृतज्ञताभाव नसेल, तर शरणागतभाव वाढवायला अनेक जन्म घ्यावे लागतील.’’

३. समष्टीमध्ये प्रयत्न करतांना स्वतःच्या चुका इतरांना विचारतो का आणि इतरांना त्यांच्या चुका सांगतो का, याचा विचार करायला हवा.’

९ ई. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांची आवश्यकता !

धर्मनिष्ठा असलेली व्यक्ती हिंदु धर्माची हानी स्वतः करत नाही आणि दुसर्‍यांनी केलेली धर्महानी तिला सहन होत नाही; म्हणून धर्मरक्षणाचे खरे कार्य साधना करणारी व्यक्तीच करू शकते. साधनेने आत्मबल जागृत होते. आत्मबल जागृत झालेल्या व्यक्तीकडून धर्माचे कार्य परिणामकारकरित्या होते. तसेच या कार्याला ईश्‍वराचा आशीर्वादही लाभतो; म्हणूनच हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, त्यांनी स्वतः साधना करावी. क्षात्रतेज आणि साधना करून मिळालेले ब्राह्मतेज एकत्र झाले की, हिंदु राष्ट्राची स्थापना करणे सुलभ होईल.’

९ उ. शरणागतभाव आणि कृतज्ञताभाव ठेवून व्यष्टी साधना करणे
अन् हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात झोकून देऊन सेवा करणे, हीच श्रीगुरुचरणी खरी कृतज्ञता होय !

‘प.पू. डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. त्यांच्यामुळेच दैवी नाद ऐकू येणे, दैैवी कणांचा वर्षाव होणे, ॐ उमटणे इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण घटना अनुभवण्यास मिळत आहेत. येणार्‍या भीषण आपत्काळाची जाणीव त्यांनीच करून दिली. मोक्षप्राप्ती हेच आमच्या जीवनाचे ध्येय आहे, हे त्यांच्यामुळे समजले आणि ते साध्य करण्यासाठी तेच आमच्याकडून साधना करवून घेत आहेत. त्याविषयी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करूया.

प.पू. डॉक्टरांना अपेक्षित आहे, त्याप्रमाणे स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निमूर्र्लन, गुणसंवर्धन आणि भावजागृती यांसाठी तळमळीने अन् सातत्याने प्रयत्न करून जलद आध्यात्मिक प्रगती साध्य करायला हवी. समाजातील व्यक्तींना ‘हिंदु राष्ट्र का हवे ? ते कसे असेल ?’, याची माहिती द्यायला हवी. हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी; म्हणून साधना आणि धर्माचरण करण्याचे महत्त्व समाजाला पटवून देऊन त्यांना धर्माचरण करण्यास प्रवृत्त करायला हवे. प.पू. डॉक्टरांनी संकलित केलेल्या ग्रंथांचा अभ्यास करून त्यांतील ज्ञान समाजापर्यंत पोचवणे, ही समष्टी साधनेची संधी घेऊन गुरुकृपेस पात्र व्हायला हवे. आमची जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका व्हावी, यासाठी प.पू. गुरुदेव जे प्रयत्न आमच्याकडून करून घेत आहेत, त्याबद्दल त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्प आहे. तरीही त्यांच्या चरणी सदैव शरणागतभाव आणि कृतज्ञताभाव ठेवून व्यष्टी साधना करणे अन् हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात झोकून देऊन सेवा करणे, हीच श्रीगुरुचरणी खरी कृतज्ञता होय !’

९ ऊ. ‘सेवा मिळाल्यावर योग्य विचारप्रक्रिया कशी असायला हवी ?’, याविषयी केलेले मार्गदर्शन

१. ‘माझ्यात काहीतरी चांगले आहे; म्हणून सेवा दिली आहे’, याऐवजी ‘माझ्यात काहीतरी उणीव आहे; म्हणून मला शिकण्यासाठी सेवा दिली आहे. या सेवेच्या माध्यमातून शिकून मला साधना करायची आहे’, हे सतत मनाला सांगावे.

२. श्रीकृष्णाला पुढील प्रार्थना करावी, ‘हे श्रीकृष्णा, गुरुदेवांना अपेक्षित आहे, तसेच तू मला बनव.’

३. ‘देवाने मला माध्यम बनवले आहे’, याविषयी आपल्याला कृतज्ञता वाटायला पाहिजे. सतत कृतज्ञताभावात रहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

४. ‘मला जमत नाही’, असे वाटते, तेव्हा कर्तेपणा असतो. त्या वेळी ‘मला येत नाही. देवा, तूच माझ्याकडून करवून घे’, अशी प्रार्थना करायला हवी.

५. ‘माझ्या समवेत सेवा करणार्‍या सहसाधकांची त्या सेवेच्या माध्यमातून साधना होते का ? सेवेअंतर्गत सहसाधकांना पुढच्या टप्प्याला घेऊन जाण्यासाठी अभ्यास होतो का ?’, याचा विचार सातत्याने व्हायला हवा.

६. ‘स्वतःच्या चुका लक्षात येऊन त्यातून शिकण्याचा भाग होतो का ? सहसाधकांच्या चुका लक्षात येतात का ? त्यांना त्या योग्य प्रकारे सांगता येतात का ?’, याचा अभ्यास करायला हवा.’

– श्री. सुमित सागवेकर, सनातन आश्रम, गोवा. (एप्रिल २०१८)

Leave a Comment