ज्ञान, भक्ती आणि कर्म या तिन्ही योगमार्गांनी वाटचाल करण्याची क्षमता असलेले एकमेवाद्वितीय सनातनचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे !

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त प्रभाकर पिंगळे

१. जन्मदिनांक : श्रावण शुक्ल पक्ष प्रतिपदा (६.८.१९६७)

२. संत आणि सद्गुरुपदी विराजमान : १४.५.२०१२ या दिवशी संत झाले आणि २४.६.२०१७ या दिवशी सद्गुरु झाले.

या लेखातील लिखाण पूर्वीचे असल्याने संतांच्या नावाचा उल्लेख पूर्वीप्रमाणेच ठेवला आहे. – संपादक

 

१. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त प्रभाकर पिंगळे यांचा परिचय

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त प्रभाकर पिंगळे, M.S. (E.N.T.) – राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘पू. (डॉ.) पिंगळे हे व्यवसायाने डॉक्टर असून ते नाक, कान आणि घसा यांचे तज्ञ आहेत. पूर्वाश्रमी ते वैद्यकीय व्यवसाय करत होते. त्यांनी वर्ष १९९९ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार पूर्णवेळ साधनेला आरंभ केला. सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनांतर्गत साधना करत ते संतपदी पोचले. ते सनातन संस्थेचे २२ वे संत आहेत. सध्या ते हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदूसंघटन अन् धर्मजागृती यांचे कार्य करत आहेत.

‘गंगामाहात्म्य (आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि उपासना यांसह)’, ‘इतिहास-संस्कृती रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना’, ‘देवनदी गंगेचे रक्षण करा’,  ‘कुंभमेळ्याचे महत्त्व आणि पावित्र्यरक्षण’ आणि ‘गुरुकृपायोग भाग – ३’ या आध्यात्मिक ग्रंथांचे संकलक प.पू. डॉक्टर आठवले यांच्या समवेत त्यांनीही संकलन केले आहे.

जून २०१२ आणि जून २०१३ या वर्षांमध्ये गोवा येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी झालेली अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशने’ त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. ते साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी मार्गदर्शनही करतात.’

 

२. डॉ. (श्री.) चारुदत्त पिंगळे संतपदी विराजमान !

२ अ. नाविन्यपूर्ण प्रयोगातून घोषित केले आधुनिक वैद्य पिंगळेकाका यांना संत म्हणून !

‘रामनाथी (गोवा), १४ मे २०१२ – ‘भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन संस्थेचे कार्य उत्तरोत्तर वाढतच आहे. यात ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जीवनमुक्त होणार्‍या साधकांबरोबरच सनातन संस्थेच्या संतांचीही संख्या वाढतच आहे. रामनाथी आश्रमातील सदैव अंतर्मुख असणारे, शांत, मितभाषी आणि अजातशत्रू अशा विविध गुणांनी युक्त असलेले साधक आधुनिक वैद्य श्री. चारुदत्त पिंगळेकाका हेही २२ वे संत, म्हणजे पू. पिंगळेकाका झाल्याचे घोषित करण्यात आले. या सोहळ्याला सनातन संस्थेचे संत पू. होनपकाका आणि पू. (डॉ.) मुकुल गाडगीळकाका यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

गेल्या वर्षी गुरुपौर्णिमेच्या वेळी पू. पिंगळेकाका यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के घोषित करण्यात आली होती. त्यानंतर केवळ १२ मासांच्या कालावधीत त्यांची ८ टक्के आध्यात्मिक पातळी वाढून ७० टक्के झाली. एवढ्या अल्प कालावधीत ८ टक्के पातळी वाढण्याचे हे पहिलेच उदाहरण होय.’

 

३. सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांच्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काढलेले गौरवोद्गार

साधेपणा, नम्रता, प्रीती इत्यादी गुणांमुळे सर्वांना आपले वाटणारे डॉ. चारुदत्त पिंगळे झाले पू. पिंगळेकाका !

‘धोतर नेसलेले डॉ. पिंगळे कान, नाक आणि घसा तज्ञ आहेत, हे त्यांच्या सहज वागण्यामुळे कोणाच्याही लक्षात येत नाही. आचारधर्मानुसार धोतराचे महत्त्व कळल्यावर त्वरित त्यांनी धोतर नेसण्यास प्रारंभ केला. यावरून साधनेसंदर्भात ‘कळेल ते कृतीत आणायचे’, ही त्यांची वृत्ती लक्षात येते आणि त्यामुळेच त्यांची प्रगती झाली आहे. आश्रमातील इतर डॉक्टरांशी बोलतांना साधकांना ‘आपण डॉक्टरांशी बोलतो आहोत’, याची जाणीव असते; मात्र पिंगळे यांच्याशी बोलतांना ‘एका मित्र असलेल्या सहसाधकाशी आपण बोलत आहोत’, असे जाणवते. ‘प्रीती’ या गुणामुळेच पिंगळे यांनी एवढी जलद प्रगती केली. वाईट शक्तींचा तीव्र त्रास असूनही संतपदापर्यंत वाटचाल करून त्यांनी पू. अनुराधा वाडेकर यांनी सिद्ध केलेल्या ‘वाईट शक्तींचा तीव्र त्रास असूनही संतपदापर्यंत वाटचाल करता येते’, या सिद्धांतावर शिक्कामोर्तब केले. पू. पिंगळे यांचे अनुकरण करून जलद प्रगती करण्याची साधकांना बुद्धी होवो, ही भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’

 

४. डॉ. पिंगळे यांनी प.पू. डॉक्टरांना भावपूर्ण मालीश करणे !

‘पूर्वी माझ्या हाता-पायांच्या स्नायूंत खूप गाठी झाल्या होत्या. तेव्हा डॉ. पिंगळे प्रतिदिन सकाळी पाऊण घंटा मला मालीश करत. ते खूप भावपूर्ण मालीश करत असत. मालीशमुळे ४ मासांत गाठींचा आकार खूप कमी झाला.’

 

५. देवाचे बोलणे ऐकायला शिकवणारे कान, नाक आणि घसा तज्ञ पू. (डॉ.) पिंगळे !

‘पू. (डॉ.) पिंगळे कान, नाक आणि घसा तज्ञ आहेत. बरीच वर्षे त्यांनी ऐकू न येणार्‍यांवर उपाय केले. काहींना श्रवणयंत्र वापरायला सांगितले. साधना करून संत झाल्यावर आता ते रुग्णांवर स्थुलातील कानांनी ऐकू येण्यासाठी उपाय करण्यापेक्षा ‘देवाचे बोलणे ऐकू यावे’, यासाठी साधकांना मार्गदर्शन करतात.’

 

६. ‘कमी बोललो, तरी आपल्या वागण्याने इतरांची
मने जिंकता येतात, याचे पू. पिंगळेकाका हे एक उत्तम उदाहरण आहे.’

 

७. आदर्श वक्ते पू. (डॉ.) पिंगळे !

‘६ व्या ‘अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’त पू. (डॉ.) पिंगळे यांनी जे भाषण केले, ते अतिशय उत्कृष्ट झाले. आतापर्यंतची त्यांची ब्राह्मतेजयुक्त आणि भाव जागृत करणारी भाषणे मी ऐकली होती. विषयाला अनुसरून त्यांनी क्षात्रतेजयुक्त जोरदार भाषण केले. आवश्यकतेनुसार ब्राह्मतेज किंवा क्षात्रतेज असणारे भाषण कसे करायचे, याचा त्यांनी सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.’

 

८. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग या
तिन्ही योगमार्गांनी वाटचाल करणारे सद्गुरु (डॉ.) पिंगळे !

‘बहुतेक संत एकाच योगमार्गाने वाटचाल करतात. याउलट सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे हे ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग या तिन्ही योगमार्गांनी वाटचाल करणारे आहेत ! त्यांची जलद प्रगती होण्याचे एक कारण म्हणजे अध्यात्मातले जे समजले, ते त्यांनी तात्काळ कृतीत आणले, उदा. त्यांना धोतराचे महत्त्व कळल्यावर त्यांनी १५ वर्षांपूर्वीच (वर्ष २००२ मध्ये) पँट घालणे बंद करून धोतर नेसण्यास आरंभ केला. या गुणामुळे वाईट शक्तींचा तीव्र त्रास असूनही त्यांनी सद्गुरुपद प्राप्त केले. त्यांच्यात साधकांविषयी प्रेमही आहे. त्यामुळे साधकांना त्यांचा आधार वाटतो. साधकांविषयी प्रेम असले, तरी ते पत्नी आणि मुलगी यांच्यात अडकले नाहीत. ते आवश्यकतेनुसार ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज अशा कोणत्याही स्तरावर भाषण करतात. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि उत्स्फूर्त भाषणांमुळे अनेक हिंदुत्वनिष्ठ आपल्या कार्याला जोडले जात आहेत. साधकांप्रमाणेच धर्मप्रेमी व्यक्तींनाही त्यांच्याविषयी आदर, तसेच त्यांचा आधार वाटतो. त्यांनी साधनेत केलेल्या मार्गदर्शनामुळे अनेक हिंदुत्वनिष्ठांची साधना आणि कार्य वेगाने चालू आहे.

अशा ‘सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांची पुढील वाटचाल अशीच जलद गतीने होवो’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’

 

९. सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांच्याविषयी संतांनी काढलेले गौरवोद्गार

९ अ. पू. (डॉ.) पिंगळेकाकांमध्ये असलेल्या ‘नम्रता’ या
गुणामुळे त्यांच्यातील अहंभाव अल्प होऊन त्यांची प्रगती झाली असणे

‘पू. पिंगळेकाकांमध्ये पूर्वीपासूनच नम्रता होती. मी काकांना भेटायला जायचो, तेव्हा ते लगेच उठून उभे रहायचे. बसण्यासाठी आसंदी द्यायचे. एकदा मी त्यांना म्हटलेही की, तुम्ही माझ्यासाठी हे सर्व करण्याची आवश्यकता नाही. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘नम्रता’ हा गुण वाढवण्यासाठी मी हे करत आहे.’’ त्यांच्याकडून अशी कृती सर्वांसाठीच घडे. या गुणामुळेच त्यांचा अहंभाव अल्प झाला.

९ आ. कोपरा सभेतील आवेशाने बोललेले पाहून ‘ते पिंगळेकाकाच आहेत’, यावर एक क्षण विश्‍वास न बसणे

आज दुपारी भोजनकक्षात मी महाप्रसाद ग्रहण करतांना समवेत कु. कल्याणी गांगण होती. तिने पू. पिंगळेकाकांविषयी सांगितले. ३ – ४ वर्षांपूर्वी ती मिरज आश्रमात असतांना धर्मजागृती सभेच्या निमित्ताने कोपरा सभा होत असत. एका सभेत पिंगळेकाका पुष्कळ आवेशाने बोलले. एक क्षण माझा विश्‍वासच बसला नाही की, हे पिंगळेकाकाच आहेत का ? हे ऐकून आमच्या जवळ उपस्थित असलेल्या सौ. अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘म्हणजे ईश्‍वराची तारक आणि मारक अशी रूपे असतात, तशी संतांचीही दोन रूपे असतात, हे पहायला मिळाले.’’

– पू. संदीप आळशी

९ इ. पू. (डॉ.) पिंगळे यांच्यामधील नम्रता त्यांच्या देहबोलीतून दिसून येणे
आणि अशा नखशिखांत नम्रतेमुळेच त्यांची प्रगती झाल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगणे

‘प.पू. डॉक्टरांनी पू. पिंगळेकाकांविषयी सांगितले आहे की, काकांमध्ये ‘नखशिखांत नम्रता’ आहे. याच गुणामुळे त्यांची प्रगती झाली. त्यांच्या देहबोलीतून नम्रता दिसते. त्यांची दृष्टी नेहमी खाली झुकलेली असते. बर्‍याच साधकांतील नम्रता वाणीतून, म्हणजे बोलण्यातून लक्षात येते; पण पूर्ण देहबोलीतून नम्रता म्हणजे ‘अंतर्बाह्य नम्रता’ कशी असायला हवी, हे काकांकडून शिकायला मिळाले.’

– सौ. अंजली गाडगीळ

‘सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांना भेटून त्यांच्यातील विनम्रता आणि साधेपणा यांचा अनुभव येतो. समाजाप्रती त्यांच्या मनात असलेली राष्ट्रभक्ती आणि भारताच्या पुरातन सनातन संस्कृतीला जागृत करण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.’

– १००८ श्री स्वामी शांती स्वरूपानंद गिरी महाराज, पीठाधिश्‍वर, पंचायती आखाडा श्री निरंजनी तथा महामंडलेश्‍वर, श्री चारधाम मंदिर (१.२.२०१९)

 

१०. सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांची गुणवैशिष्ट्ये

१० अ. मुलीच्या बालपणापासूनच तिच्यावर साधनेचे संस्कार करणे

‘पू. (डॉ.) पिंगळे आणि डॉ. (सौ.) मधुवंती पिंगळे यांनी वैदेहीवर बालपणापासून साधनेचे पुढील संस्कार केले आहेत.

१. खाऊ आणल्यावर सर्वांना वाटून मग खाण्यास सांगणे

२. कुणी आल्यास समोर जाऊन आदरातिथ्य करण्यास सांगणे

३. हट्ट करत असल्यास किंवा नकारात्मक विचार आल्यास आत्मनिवेदन करण्यास सांगणे किंवा कुणाशी तरी बोलण्यास सांगणे

४. तोकडे कपडे न आणणे (वैदेहीलाही न आवडणे)

५. केस कापू न देणे (वैदेहीलाही न आवडणे)

६. मराठी शाळेत शिकवणे’

– एक साधक (३.१०.२०१२)

१० आ. प्रेमभाव वाढवण्यासाठी पू. (डॉ.) पिंगळे यांनी प्रयत्न करणे
आणि प्रत्येक साधकाला साधनेत येत असलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी साहाय्य करणे

एक साधक : ‘पू. पिंगळेकाका, तुम्ही अल्प काळात ६० टक्क्यांपासून ७० टक्क्यांपर्यंत प्रगती केली. त्यामुळे ‘इतक्या लवकर प्रगती करणे कसे जमले ?’, असे साधक विचारतात.

पू. पिंगळेकाका : गेले संपूर्ण वर्ष कसे आले आणि गेले, याचे मला भान नाही. मी प्रेमभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करत होतो. रामनाथी आश्रमात गुरुकुल चालू झाले. पुरोहित पाठशाळेतील विद्यार्थी होतेच. मी ‘माझी मुलगी वैदेही हिच्याशी बोलतो, तसे या साधकांशी प्रेमाने बोलतो का ?’, असा विचार केला. कधी जेवतांना कुणी रुग्णाईत दिसले, निराश दिसले, तर त्या वेळी ‘त्यांना कसे साहाय्य करता येईल’, या विचारात रहायचो. गुरुकुलातील मुलींशी बोलतांना ‘त्यांच्यात वैदेही आहे’, असे समजून बोलायचो. माझी प्रगती व्हावी, अशी माझी तळमळ असते; पण इथे आलेल्या प्रत्येक साधकालाही तसेच वाटते की, आपली प्रगती व्हायला हवी. मी साधकांच्या जवळ जाऊन बसायचो.

त्या वेळी त्यांच्यासाठी आपोआप प्रार्थना होत असे. त्यांना ‘अडचणींवर मात कशी करायची’, हे सांगायचो. रात्री झोपतांना हे सर्व देवाला सांगायचो की, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची माझी पात्रता नाही.’(१६.५.२०१२)

१० इ. गाडीत बसलो असतांना गायीने स्वतःहून तोंड पुढे करून
पू. (डॉ.) पिंगळे यांच्या हस्ते अन्न ग्रहण करणे, हा श्रीकृष्णाचा मंगल संकेत असल्याचे जाणवणे

‘आम्ही जिथे थांबलो होतो, त्या ठिकाणी एक गाय आमच्या चारचाकी गाडीजवळ आली. ती गाडीच्या दारातून आत तोंड घालत होती. पू. (डॉ.) पिंगळेकाकांनी तिच्या तोंडात खाऊ भरवला. तेव्हा श्रीकृष्णानेच हा मंगल संकेत दिल्याचे जाणवले.

सप्तर्षीच हे सगळे घडवून आणत आहेत. आपण निमित्तमात्र आहोत, हे यातून लक्षात आले.’

– श्री. प्रणव मणेरीकर, हरिद्वार, उत्तरप्रदेश (१५.५.२०१५)

 

११. सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांचे आध्यात्मिक विश्‍लेषणात्मक लिखाण

११ अ. ‘माझ्या ठायी विविध मार्गांद्वारे परात्पर गुरु डॉ. आठवले कार्यरत आहेत’, या संदर्भात आलेले काही विचार

११ अ १. देहाद्वारे : ‘हे गुरुदेवा, हा देह म्हणजे आपणच आहात. आपणच या जिवाला हा देह दिला आहे. या देहातून आपणच या जिवाचा उद्धार करत आहात.

११ अ २. मनाद्वारे : हे गुरुदेवा, हे मन आपणच आहात. या मनातील विचार आणि संस्कार आपणच आहात. साधना आणि भावभक्ती यांद्वारे आपणच या जिवाचा उद्धार करत आहात.

११ अ ३. बुद्धीद्वारे : हे गुरुदेवा, ही बुद्धी (सत्बुद्धी, म्हणजे ईशबुद्धी) आपणच आहात. यातील ज्ञान आपणच आहात. या जिवाला स्व-स्वरूपाची आणि विराट रूपाची अनुभूती देत आपणच त्याचा उद्धार करत आहात.

११ अ ४. अहंद्वारे : हे गुरुदेवा, हा अहं म्हणजेही आपणच आहात. हा अहं म्हणजे ईश्‍वर. तो या देहाच्या आकारातून प्रकट झाला आहे. जिवाचा शिव करून ‘मी-तू’ म्हणजे सर्वत्र व्यापलेले एकच तत्त्व. भौतिकदृष्ट्या ‘मी-तू’ एक नाही, तर आध्यात्मिकदृष्ट्या सर्वत्र ‘मी-तू’ !

११ अ ४ अ. गुरूंनी अहंतत्त्वाची जाणीव करून देणे

अहं, म्हणजे अद्वैतरहित कर्तेपणा आध्यात्मिक उन्नतीस हानीकारक असतो. हा अहं सर्वसामान्य व्यक्तींमध्ये आढळतो. ज्या वेळी अहंतत्त्वाची अनुभूती येते, तेव्हा सर्वव्यापकता, सर्वज्ञता आणि सर्वशक्तीमानता यांची प्रचीती येते. त्या वेळी जे स्फुरण येते, ते आकाररहित असते; कारण सर्वव्यापी स्वरूपाला कोणताही आकार नसतो. या स्थितीला ‘ब्रह्मस्थिती’ म्हणतात. या स्थितीतील गुरु शिष्याला जेव्हा आपली जाणीव करून देतात, तेव्हा ‘अहं ब्रह्मास्मि (मी ब्रह्म आहे)’ हे स्फुरण होते. या स्फुरणात स्थिर झाल्यावर ‘अयमात्मा ब्रह्म (हा आत्मा ब्रह्म आहे)’ अनुभवायला येते. या स्फुरणाची व्यापकता लक्षात येते. तेव्हा ‘त्वमेव सर्वङ् खल्विदम् ब्रह्मासि’ची (‘सर्वव्यापी असे ब्रह्म खरोखर तूच आहेस’, याची) प्रचीती येते. हीच ‘परब्रह्म अवस्था’ होय.’

– (सद्गुरु) डॉ. पिंगळे (९.७.२०१७)

११ आ. प.पू. डॉक्टरांचे अवयव म्हणजे एकेका योगाचे प्रतीक !

या सर्वांचा संगम म्हणजे अखंड गुरुकृपा आणि गुरुकृपायोग होय.

– (पू.) डॉ. पिंगळे

११ इ. संतांच्या मनात त्यांच्या पातळीनुसार येणारे विचार

११ इ १. ७० टक्के पातळीचे संत

‘यांना स्वतःचे मन नसल्याने स्वतःविषयी विचार येत नाहीत. येथे स्वतःचे मन, म्हणजे जिवावर असलेले जन्मोजन्मींचे संस्कार. ते नष्ट झाल्याने त्यांच्या मनात स्वतःविषयी विचार नसतात; मात्र त्यांच्या अंतर्मनाचा पूर्ण लय न झाल्याने त्यांच्या मनात विचार येतात; मात्र त्यांना त्यांचा बाह्य स्रोत लक्षात येतो, उदा. एखाद्या व्यक्तीने त्यांची आठवण काढली असल्यास, एखाद्या व्यक्तीने त्यांना काही प्रश्‍न विचारले असल्यास त्याविषयी किंवा विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांच्याकडून त्यांना ग्रहण झालेले विचार इत्यादी त्यांच्या मनात येतात.

११ इ २. ८० टक्के पातळीचे संत

यांच्या अंतर्मनातील बुद्धीचा लय होण्यास प्रारंभ होतो. विश्‍वमनाद्वारे जसे ७० टक्के पातळीला मनात विचार येत होते, तसे आता ८० टक्के पातळीला त्यांना विश्‍वबुद्धीद्वारे घडणार्‍या घटनांचा कार्यकारणभाव, कळण्यास प्रारंभ होतो. त्यांच्या हातून कोणते कार्य व्हावे, हे त्यांना श्रीगुरूंकडून किंवा विश्‍वबुद्धीतून (ईश्‍वरेच्छा) कळल्याने त्यांना संकल्पाने ईश्‍वरी कार्य करणे शक्य होते.

११ इ ३. ९० टक्के पातळीचे संत (परात्पर गुरु)

यांचे अंतर्मन नष्ट झालेले असते. बिंब-प्रतिबिंब या न्यायाने शिष्य, साधक किंवा संपर्कात येणार्‍या व्यक्ती यांच्या मनातील विचार त्यांच्या मनात येतात. त्यामुळे कोणाच्या मनात काय आहे, ते त्यांना कळते. ईश्‍वराच्या कार्याविषयीचा विचार त्यांच्या मनात येतो आणि ते कार्य आपोआप घडते.’

– (सद्गुरु) डॉ. पिंगळे (१.७.२०१७)

११ ई. मुलीचा विवाह अचानक ठरल्यावर शिष्याच्या जीवनातील श्रीगुरूंच्या स्थानाची आलेली प्रचीती !

११ ई १. इतर आई-वडिलांप्रमाणे मुलीच्या विवाहापेक्षा तिची साधना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांचे विचार मनात असणे अन् अचानक मुलीचा विवाह ठरणे

‘सामान्यत: साधना करणारे किंवा न करणारे आई-वडील आपल्या मुलीचा विवाह व्हावा, यासाठी धडपडत असतात. त्यांच्या मनात ‘मुलीचा विवाह होऊन तिचे आयुष्य स्थिरस्थावर व्हावे आणि तिचे जीवन मार्गी लागावे’, असा विचार असतो. वैदेहीच्या संदर्भात माझा किंवा सौ. मधुवंतीचा (पत्नीचा) असा कोणताही विचार झालेला नव्हता. तिची साधना होऊ दे. हिंदु राष्ट्र स्थापन होऊ दे इत्यादी विचार मनात असायचे. अचानक वैदेहीच्या विवाहाचा विषय आला आणि तिचा विवाह ठरला.

११ ई २. महर्षि आणि श्रीगुरु यांनी आमच्या कर्तव्याची काळजी वहाणे आणि ते शिष्याचे दायित्व कुठपर्यंत घेतात, याची आंतरिक जाणीव होणे

दिल्ली येथील नाडीपट्टीच्या वाचनात महर्षींनी प्रथम मला विचारले, ‘तुमच्या मनात काही विचार किंवा चिंता आहे का ?’ आणि लगेच पुढेे म्हणाले, ‘तुमच्या मनात काही चिंता नाही, हे आम्हाला ठाऊक आहे; परंतु तुम्ही एका पुत्रीला जन्म दिला आहे. त्यामुळे पिता होण्याच्या नात्याने ‘पुत्रीचे पुढे सर्व चांगले व्हावे’ ही चिंता असणे स्वाभाविक आहे; पण श्रीगुरु तुमच्या पुत्रीच्या विवाहाची काळजी घेणार आहेत.’ नाडीपट्टी वाचनात महर्षींनी हे सांगितल्यावर ‘महर्षि आणि श्रीगुरु परात्पर गुरु डॉक्टर आठवले शिष्याचे दायित्व कुठपर्यंत घेतात’, याची आंतरिक जाणीव झाली. त्यानंतर मनात विचार आला की, आई-वडील म्हणून आम्ही आमच्या कर्तव्यात अल्प पडलो. महर्षि आणि श्रीगुरु यांनी आमच्या कर्तव्याची काळजी वाहिली.

११ ई ३. प्रारब्ध किंवा कर्तव्य यांनुसार शिष्याच्या जीवनातील घटनांचा भार गुरूंनी उचलणे, ‘श्रीगुरुच पुत्रीच्या विवाहाची काळजी घेणार आहेत’, या महर्षींच्या वाक्याची प्रचीती येणे आणि साधक करत असलेल्या साहाय्यातून त्यांचे प्रेम अनुभवता येणे

याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांशी बोलतांना ते म्हणाले, ‘‘नाही. तुम्ही कुठेही कर्तव्यात न्यून पडला नाहीत किंबहुना तुम्ही मुलीच्या आणि इतर साधकांच्या साधनेचा विचार केलात, ते योग्य आहे. प्रारब्धानुसार कन्येचा विवाह ज्या वेळी व्हायचा, त्या वेळी तो होणारच असतो.’’ यावरून हे शिकायला मिळाले, आपण श्रीगुरूंनी सांगितलेली साधना आणि गुरुसेवा करणे हेच योग्य असते. प्रारब्ध किंवा कर्तव्य यांनुसार साधकांच्या किंवा शिष्याच्या जीवनात काही घडायचे असल्यास श्रीगुरुच सर्व भार उचलतात आणि याविषयी महर्षींनी नाडीपट्टीच्या वाचनात जाणीव करून देऊन श्रीगुरु शिष्यांसाठी काय काय करत असतात, हे सोदाहरण दाखवले. महर्षींनी जे सांगितले होते की, श्रीगुरुच तुमच्या पुत्रीच्या विवाहाची काळजी घेणार आहेत, याची प्रत्यक्ष प्रचीती आली. मोठा भाऊ-वहिनी आणि आई-वडील, यांसह अनेक नातेवाईक विवाहाचे दायित्व घेत आहेत आणि साहाय्यही करत आहेत. यातून ‘श्रीगुरुच साधक वा नातेवाईक यांच्या माध्यमातून हा भावसोहळा (विवाह सोहळा) पार पाडत आहेत’, याची अनुभूती येत आहे.’

– (पू.) डॉ. पिंगळे, देहली

 

१२. सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा भाव

प.पू. डॉक्टरांच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्यासाठी, त्यांची शिकवण समाजाला
देण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागल्यास ‘तो त्यांच्या सेवेकर्‍याच्या रूपात मिळावा’, असे वाटते !

‘साधनेत प्रथम मला काही ठाऊक नसतांना अज्ञानाने ग्रंथ वाचून मी ‘मोक्ष’ हे ध्येय ठरवले होते. त्या वेळी प.पू. डॉक्टर माझी पत्नी सौ. मधुवंतीला म्हणाले होते, ‘‘मी आता यांना घेऊन जातो.’’ ते मलाही म्हणाले, ‘‘तुम्हाला या जन्मात मोक्ष नाही मिळाला, तर तुम्हीच कुठेतरी न्यून असणार आहात.’’ आरंभीच्या काळात मी एका फुग्यात होतो की, ‘मोक्ष’ हेच ध्येय. आजच्या घटकेला जाणीव झाली की, एका समर्थ अशा गुरूंच्या कृपेची प्रचीती आपल्याला येत आहे. त्यांनी जे कार्य दिले आहे, त्यांनी जी शिकवण समाजाला दिली आहे, ती देण्यासाठी पुन्हा जन्म घ्यायला लागला, तरी त्या वेळी त्यांच्या सेवेकर्‍याच्या रूपात व्हावा.’ – पू. (डॉ.) पिंगळे (१६.५.२०१२)

 

१३. कु. वैदेहीने (आताच्या सौ. वैदेही गौडा यांनी) वडिलांना (पू. (डॉ.)
पिंगळे यांना) दिलेला व्यष्टी साधनेचा आढावा आणि त्यांनी तिला दिलेले दृष्टीकोन

वैदेही,

आवश्यक तेथे टीपा घातल्या आहेत. नवीन सूत्रे स्वतःच्या आवश्यकतेनुसार निवडावीत. ‘श्रीकृष्ण सर्व साधकांच्या हृदयातच आहे आणि तो मनापासून प्रयत्न करणार्‍या सर्वांना साहाय्य करत आहे. आपण अंतरातील श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करण्यासाठी धडपडत आहोत’, हे लक्षात ठेवून प्रयत्न चालू ठेव; कारण प.पू. डॉक्टरांच्या दृष्टीने परिणाम नव्हे, तर प्रयत्न म्हणजे साधना ! कुणाचे प्रारब्ध लवकर नष्ट होते, तर कोणाचे विलंबाने एवढाच भेद ! शेवटी सर्व एकच असल्याने तेथे काहीच उरत नाही.

– प.पू. डॉक्टरांचा सेवक – तुझे बाबा (पू. पिंगळेकाका)

अ. ‘मी एप्रिलमध्ये ६ मेपर्यंत कठोर प्रयत्न करून ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याचे ध्येय ठेवले होते; परंतु प्रयत्नांमध्ये कठोरता आणि सातत्य अल्प पडले. (जे स्वतःच्या प्रयत्नांविषयी असा दृष्टीकोन ठेवतात, त्यांचे प्रयत्न वाढतात आणि साध्याकडे प्रवास होतो. – बाबा)

आ. ध्येय साध्य झाले नाही, तरी मागीलप्रमाणे वाईट न वाटता पुढील साधनेची दिशा ठरवून प्रयत्न करण्यास आरंभ केला. (ही साधनेत प्रगती होत असल्याचे लक्षण आहे. – बाबा)

इ. मे मासात (महिन्यात) बोलण्याचा भाग वाढवण्याचे ध्येय ठरवले होते. त्यामध्ये देवाने पुढीलप्रमाणे प्रयत्न करून घेतले.

१. आश्रमातील साधकांशी अनौपचारिक बोलणे

२.  साधकांशी साधनेच्या संदर्भात बोलणे

या दोन गोष्टींवर देवाने प्रयत्न करवून घेतले. त्यामध्ये आश्रमातील साधकांशी बोलण्याचा भाग वाढला. तसेच गुरुकुलातील साधकांशी साधनेच्या संदर्भात बोलल्यामुळे ‘मी त्यांना आणखी कसे साहाय्य करू शकते’, असा विचार वाढून ‘त्यांची प्रगती लवकर व्हावी’, असे वाटू लागले. अजूनही यासाठी भरपूर प्रयत्न करायला हवेत.

(व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या दृष्टीने योग्य गुण वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहे. – बाबा)

३. भावजागृतीच्या दृष्टीने देवाशी सतत अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले होते. यामध्ये प्रत्येक दिवशी एकेक प्रयत्न ठरवून त्यानुसार कृती केली, उदा. एके दिवशी ‘सर्वकाही देवासाठीच करत आहे.’ दुसर्‍या दिवशी यासह ‘सर्वकाही देवच आपल्याकडून करवून घेत आहे.’  (असे प्रयत्न अखंड होतील, याकडे लक्ष देणे – बाबा)

४. ‘मनातील प्रत्येक विचार देवाच्या चरणी अर्पण करायचा’, असे ठरवले. त्याप्रमाणे केल्यावर ‘मन रिकामे रिकामे वाटून तिथे देवाचे अस्तित्व निर्माण झाले’, असे जाणवत होते. (असे प्रयत्न अखंड होतील, याकडे लक्ष देणे – बाबा)

५. प्रत्येक दिवशी एक गोपीभाव ठेवून प्रयत्न केले.

६. ‘सर्वकाही देवच करत आहे’, असा भाव ठेवल्यावर सेवेच्या ठिकाणी वातावरण अंतर्मुख होण्यासाठी ‘देवच बोलत होता’, असे वाटणे आणि सहसाधिकांनीही तसेच सांगणे : ‘मी काही करत नसून सर्वकाही देवच करत आहे’, असा भाव ठेवल्यावर ‘दिवसभरातील प्रत्येक कृती देवच करत आहे’, याची जाणीव व्हायची. एकदा रात्री सेवेच्या ठिकाणी वातावरण फारच बहिर्मुख झाले होते. त्या वेळी आपोआपच त्यांच्यासाठी आवश्यक आणि अंतर्मुख करणारे काहीतरी बोलले गेले. शेवटी ‘माझे काही चुकले असेल, तर मला सांगा’, या वाक्याच्या वेळी मला माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली. तोपर्यंत ‘देवच बोलत होता’, असे वाटले. त्यानंतर सहसाधिकांनीही असेच सांगितले. अशा प्रकारच्या देव अनुभूती देत आहे.

७. मुलाखत ऐकल्यापासून इतरांना स्वतःच्या चुका सांगणे, त्यांना विचारणे, असे प्रयत्न चालू केले.

(इतरांकडून शिकून प्रत्यक्ष आचरण करणे, हा चांगला प्रयत्न आहे. – बाबा)

८. अहंचा पैलू लक्षात येणे

मला कधी कधी वाटते, ‘माझ्याशी साधकांनी स्वतःहून बोलायला हवे. इतरांशी जसे बोलतात, तसे माझ्याशी कुणीच बोलत नाहीत.’ या ठिकाणी ‘मला महत्त्व मिळावे’, असे वाटते. हा अहंचा पैलू लक्षात आला. या विचारांमुळे काही वेळा सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचा संघर्ष होतो. तेव्हा लगेचच प्रार्थना करून त्या विचारांवर देव मात करवून घेतो. (आवश्यकतेनुसार इतर बोलतील किंवा नाही, यापेक्षा आपणच त्यांच्याशी बोलावे; मात्र श्रीकृष्णाशी बोलणे होते, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अंतर्मनाची साधना होते. संघर्षामुळेच देवाचे साहाय्य आणि कृपा लाभते. कृतज्ञतेचा भाव वाढतो. – बाबा)

या मासात देवाने असे प्रयत्न करवून घेतले. यामध्ये आणखी पुष्कळ प्रयत्न करायला हवेत; पण ते माझ्याकडून अल्प होतात. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ‘एकवेळ वाघाच्या तोंडातून सावज सुटू शकेल; पण ज्याला गुरूंनी धरले, त्याचा या जन्मात उद्धार निश्‍चितच आहे !’ या वाक्यावर श्रद्धा ठेवून प्रयत्न केले जातात आणि असे वाटते, ‘मी देवामुळेच आणि त्याने केलेल्या प्रीतीमुळेच जिवंत आहे. यामध्ये काही चुकले असेल, तर क्षमा करा.’

– देवाची,

कु. वैदेही पिंगळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.६.२०१२)

‘वैदेहीने तिचे वडील पू. पिंगळे यांना दिलेला आपल्या साधनेचा हा आढावा वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिचे वय त्या वेळी केवळ १६ वर्षे होते. तिचे हे वय लक्षात घेता आपले वडील संत असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाचा आपल्या साधनेसाठी लाभ करून घ्यायची तिच्यात असलेली समज आणि त्यांना आपल्या प्रयत्नांचे सविस्तर लिहिलेले हे पत्र कौतुकास्पद आहे. यातून तिची साधनेची तळमळ आणि ध्यास लक्षात येतो. असे गुण असल्यावरच अध्यात्मात प्रगती होते.’

– डॉ. आठवले

 

१४. सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांचे आध्यात्मिक विश्‍लेषणात्मक लिखाण

संतांच्या परिवारातील सदस्यांमध्ये आपल्या परिवारातील संतांपेक्षा त्यांचे मार्गदर्शक प्रसारसेवक किंवा अन्य संत यांच्याविषयी श्रद्धा निर्माण होणे आवश्यक असणे आणि ‘त्यांनी त्या संतांविषयी कृतज्ञताभावाने लिखाण करणे’, हे साधनेतील निरपेक्षतेचे लक्षण असणे
‘मी संत झाल्यापासून कन्या सौ. वैदेही किंवा पत्नी सौ. मधुवंती यांचे माझ्याविषयी निरीक्षण वाढले होते, तसेच त्यांना माझ्याविषयी आध्यात्मिक अनुभूतीही येत होत्या. त्या तुलनेत अन्य संतांविषयी अनुभूती आल्याचे त्या मला सांगत नसत. मी संत असल्याने त्यांना माझ्याविषयी अनुभूती येणे साहजिक असले, तरी मी त्यांच्या परिवारातील संत असल्याने त्यांना माझ्याविषयी भावना आणि भाव यांच्या संगमातून अनुभूती येत होत्या. ‘त्या माझ्यामध्ये अडकल्या असून त्यांच्यात पूर्णतः भाव आणि निरपेक्षता नसल्याने अन्य संतांविषयी अनुभूती घेणे किंवा त्यांच्याविषयी लिखाण करणे’, यांत त्या अल्प पडत आहेत’, हे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मी प्रयत्नपूर्वक त्यांना ‘तुमच्या सान्निध्यात येणारे संत, तसेच चांगले प्रयत्न करणारे साधक यांच्याकडून शिका, त्यांच्याविषयी कृतज्ञताभावाने लिखाण करा’, असे सांगण्यास प्रारंभ केला. वैदेही यातून लवकर बाहेर पडली. त्या तुलनेत सौ. मधुवंती उशिरा बाहेर पडली.

संतांना आपल्या परिवारातील साधना करणार्‍या सदस्यांना स्वतःत अडकू न देता पूर्णतः भावाच्या आणि निरपेक्षतेच्या स्तरावर घेऊन जावे लागते. ‘प्रारंभी सर्व संत, नंतर प्रत्येक साधक आणि अंतिमतः सर्वांमध्ये श्री गुरु किंवा भगवंत दिसत नाही, तोपर्यंत त्यांची साधना अपूर्णच रहाते’, हे त्यांना ठाऊक असते. जेव्हा संतांच्या परिवारातील सदस्यांना हे साध्य होते, तेव्हाच त्यांची खर्‍या अर्थाने आध्यात्मिक प्रगती होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना त्यांच्यामध्ये अडकू दिले नाही, तर तत्त्वाकडे नेले. अगदी तसेच त्यांच्या कृपाशीर्वादाने घडलेले संतही अगदी परिवारातील सदस्यांनाच नव्हे, तर साधकांनाही त्यांच्यामध्ये अडकू न देता, तत्त्वाकडेच नेत आहेत. ही त्यांचीच कृपा, त्यांच्या चरणी समर्पित !’

– (सद्गुरु) डॉ. पिंगळे (७.१०.२०१८)

 

१५. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे

१५ अ. मन म्हणजे अतिशय घाण साचलेला नाला पूर्ण श्रद्धेने आणि सातत्याने
स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवत ते पाणी घालत राहिल्यास एक दिवस देवाच्या कृपेचा
मोठा पाऊस पाडून तुंबलेला मनरूपी नाला स्वच्छ करील अन् जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होता येईल !

‘अनेक साधकांना ‘आम्ही गेली कित्येक वर्षे स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवतो आहोत; परंतु आमच्यात म्हणावा तसा पालट होत नाही’, अशी खंत वाटते अन् निराशा येते. येथे लक्षात घेतले पाहिजे की, आपले मन म्हणजे अतिशय घाण साचलेला नाला (गटार) आहे. माझी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया म्हणजे छोट्याशा पेल्याने इतक्या वर्षाचा तुंबलेला नाला (मन) स्वच्छ करण्यासारखे आहे. माझ्या अशा छोट्याशा प्रयत्नांनी इतकी मोठी तुंबलेली ही मनरूपी नाली कशी स्वच्छ होणार ? आपण त्या छोट्या पेल्याने (आपली नियमित प्रक्रिया) नियमितपणे, पूर्ण श्रद्धेने आणि सातत्याने पाणी घालत राहिल्यास एक दिवस देव मोठा पाऊस (गुरूंची कृपा होते) पाडतो आणि आपला इतक्या वर्षाचा तुंबलेला मनरूपी नाला पावसाच्या पाण्याच्या लोंढ्याने एकदम स्वच्छ होतो (आपण जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतो); म्हणून साधकांनी नियमितपणे, श्रद्धेने स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवली पाहिजे अन् आपला उद्धार करून घेतला पाहिजे.’ – (पू.) डॉ. पिंगळे (२५.४.२०१३)

१५ आ. गुरुभक्ती हीच व्यष्टी आणि समष्टी कार्याची गुरुकिल्ली होय !

‘केवळ साधकाचे नव्हे, तर प्रत्येक मनुष्याच्या जन्माचे ध्येय ईश्‍वरप्राप्ती, म्हणजे आनंदप्राप्ती आहे. काळानुसार हे ध्येय व्यष्टी आणि समष्टी साधना यांच्या माध्यमातून प्राप्त करायचे आहे. व्यष्टी साधनेच्या स्वरूपात सगुण गुरुकृपेच्या माध्यमातून व्यक्तीगत आनंदप्राप्तीकडे जाणे, तर समष्टी साधनेच्या स्वरूपात निर्गुुण गुरुतत्त्वाच्या धर्मस्वरूपाशी एकरूप होणे म्हणजे समष्टीला आनंदमय करणे. ‘हिंदु राष्ट्र’ स्थापना ही गुरूंच्या समष्टी म्हणजे धर्मस्वरूपाशी एकरूपता देणारी, म्हणजेच सर्व प्राणीमात्रांना आनंद देणारी साधना असल्याने ती मोक्षदायी आहे. व्यष्टी असो वा समष्टी, कोणत्याही मार्गाने जाण्यासाठी श्रीगुरूंचे मार्गदर्शन आणि कृपा मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. गुरुभक्ती हीच व्यष्टी आणि समष्टी कार्याची गुरुकिल्ली होय.

‘हे श्रीगुरूराया, आम्हा सर्व साधकांना, तसेच हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना योग्य साधना करण्याची सतत सद्बुद्धी लाभो. आमच्याकडून स्वभावदोष आणि अहंभाव निर्मूलन या प्रक्रिया मनापासून अन् आनंदाने करून घ्या. ‘हिंदु राष्ट्रा’चे युग निर्माण करणार्‍या आपल्या कार्यात आम्हा सर्वांना खारीचा वाटा म्हणून मिळालेली सेवा साधना म्हणून करून घेऊन आमचा उद्धार करा’, हीच आपल्या चरणी प्रार्थना.’

– (पू.) डॉ. पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (९.७.२०१३)

१५ इ. नामजपाचे टप्पे !

१. ‘प्रथम नामजप होतो, तसा करावा.

२. त्यानंतर एक लय ठेवून जप करण्याचा प्रयत्न करावा.

३. नंतर नामजपाला गती देण्याचा (संख्यात्मक वाढ करण्याचा) आणि भावपूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. शेवटी आपल्याला आकाशतत्त्वाशी एकरूप व्हायचे आहे. (हनुमान वायूपुत्र असून जन्मतः त्याचे तेजावर नियंत्रण होते. पुढे हनुमान रामाशी, म्हणजे आकाशतत्त्वाशी एकरूप झाला.)

जसे एखादे चारचाकी वाहन चालवायला आपण टप्याटप्याने शिकतो, तसेच हे नामजपासाठी आहे.’

– (पू.) डॉ. पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (२९.३.२०१७)

१५ ई. गुरुकृपायोगानुसार साधना करण्याचेे महत्त्व

१५ ई १. साधनेने देहातील षट्चक्रेे जागृत होणे

‘साधना केल्याने देहातील षट्चक्रेे जागृत होतात. नामजप, भावजागृती आणि गुणसंवर्धन यांमुळे तारक स्वरूपातील ईश्‍वरी अंश जागृत होतो अन् स्वभावदोष (राक्षस) त्याचप्रमाणे अहं (रावण) यांच्या निर्मूलनाद्वारे ईश्‍वराचे मारक रूप (तत्त्व) जागृत होते. दोन्ही तत्त्वे पूर्ण स्वरूपात जागृत झाल्यामुळे ईश्‍वरप्राप्ती शक्य होते.

१५ ई २. भाव ठेवून कृती करण्याने साधकांतील ईश्‍वराचे तारक रूप जागृत होणे

साधना करतांना गुरुप्राप्ती होण्यापूर्वी आणि नंतरही जीवनातील सर्व व्यवहार (प्रत्येक कृती) ‘साधना, तसेच श्री गुरूंची कृपा प्राप्त व्हावी, यासाठी करतो’, असा भाव ठेवावा. यामुळे शीघ्र आध्यात्मिक प्रगती होणे शक्य होते. यांद्वारे साधकांतील ईश्‍वराचे तारक रूप जागृत होते.

१५ ई ३. अष्टांग साधना करतांना प्रत्येक टप्प्याला स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाचा प्रयत्न करणे

या प्रयत्नांमुळे त्या त्या चक्रांशी निगडित दोषांचे शुद्धीकरण होत असतांना तेथे सात्त्विक आणि तिर्यक लहरींमध्ये सूक्ष्म युद्ध चालू होते. साधकातील स्वभावदोष किंवा अहंभाव (राक्षस किंवा रावण) स्वरूपातील तिर्यक लहरींशी साधकांचा भाव, श्री गुरूंप्रती श्रद्धा, साधना आणि ईश्‍वरप्राप्ती यांची तळमळ, तसेच श्री गुरूंची अंतर्बाह्य कृपा यांतील सात्त्विक लहरी लढत असतात. हे सूक्ष्म युद्ध चालू असते, तेव्हा साधकाच्या देहात उष्णता निर्माण होते. त्या संघर्षाचा परिणाम त्याचे मन आणि शरीर यांवर होत असतो. या वेळी त्याने मार्गदर्शन घेऊन योग्य साधनापथावर रहाणे आवश्यक असते. श्री गुरुकृपेने साधकाचा टप्प्याटप्प्याने विजय होत असतो.

१५ ई ४. परिपूर्ण सेवा आणि भावजागृतीचे प्रयत्न यांमुळे अनाहत आणि विशुद्ध या चक्रांचे भेदन होऊ लागणे

परिपूर्ण सेवांमुळे आरंभी स्वाधिष्ठान आणि मणिपूर ही चक्रे, तर भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवा यांमुळे अनाहत आणि विशुद्ध या चक्रांचे भेदन (जागृती) होण्यास आरंभ होतो. साधनेतील भावजागृतीच्या प्रयत्नांमुळे साधकाच्या अनाहतचक्राचे भेदन होते, म्हणजे त्याचा व्यक्त भाव जागृत होऊ लागतो. यामुळे साधकांत तारक रूपातील ईश्‍वरी ऊर्जेची जागृती होत असते.

१५ ई ५. आज्ञापालनाने आज्ञाचक्राचे भेदन, म्हणजे साधकाचा मनोलय होण्यास आरंभ होणे

‘आज्ञापालन’ हा गुणांचा राजा आहे. गुरुकृपायोगात आज्ञापालनास अतिशय महत्त्व आहे. आज्ञापालन हा गुण आचरणात आणल्यास आज्ञाचक्राचे भेदन, म्हणजे साधकाचा मनोलय होण्यास आरंभ होतो. आरंभी परेच्छा म्हणून सहसाधकांचे, तर ईश्‍वरेच्छा म्हणून श्री गुरूंचे आज्ञापालन होते. नंतर मन आणि बुद्धी यांच्या शुद्धीकरण प्रक्रियेला आरंभ होत असल्याने सहसाधक अथवा श्री गुरु यांचेे आज्ञापालन करतांना त्या आज्ञेचा कार्याविषयीचा आणि त्यातून होणार्‍या स्वतःच्या साधनेसंबंधी कार्यकारणभाव जाणून आज्ञापालन केले जाते. अंती श्री गुरूंवरील (धर्मावरील) श्रद्धेने साधकाला जे सांगितले जाते, त्याचे आज्ञापालन करणे शक्य होते. श्रद्धेने आज्ञापालन करणे, हे सर्वश्रेेेष्ठ असते आणि पूर्वजन्मांत साधना झालेल्यांना ते लगेच साध्य होते. श्रद्धेने आज्ञापालन करता येणे, म्हणजे विहंगम गतीने साधना होणे.

श्री गुरु म्हणजे सगुणातील ईश्‍वर ! साधकाच्या साधनाविश्‍वात श्री गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहेे. श्री गुरूंच्या कृपेने गुरुकृपायोग कार्यरत असेल, तर साधकाचा साधनेचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडतो.’

– (सद्गुरु) डॉ. पिंगळे  (१.७.२०१७)

 

१६. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी साधनेविषयी सांगितलेली सूत्रे

१४.१.२०१३ ते २५.२.२०१३ या कालावधीमध्ये प्रयाग येथे आयोजित कुंभमेळ्यामध्ये सेवा करण्याची संधी गुरुकृपेने मिळाली. त्या वेळी पू. (डॉ.) पिंगळेकाकांनी साधनेविषयी सांगितलेली सूत्रे येथे देत आहे.

१६ अ. ‘जे आपल्याजवळ आहे, तेच आपण इतरांना देतो. आपल्यामध्ये दोष आहेत, तर प्रतिक्रिया देतो आणि गुण आहेत, तर प्रेम देतो.आपण इतरांना जे देतो, तेच आपल्याला त्यांच्याकडून मिळत असते.

१६ आ. साधनेची गती चांगली आहे; परंतु ‘विचारून न करणे’ किंवा ‘मनाने करणे’ या दोषांमुळे आपण ध्येयापासून दूर जाऊ शकतो.

१६ इ. ‘आपण जी सेवा करतो, तिचे परिणाम काय होणार’, यात समाधान शोधण्यापेक्षा सेवेमध्ये केलेल्या प्रयत्नांमध्ये समाधान मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा.

या कुंभमेळ्याच्या निमित्ताने ईश्‍वराने पुष्कळ शिकवले, त्यासाठी मी भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. अभिजीत माणके, प्रयाग (१३.५.२०१३)

१६ ई . देवाच्या अनुसंधानात रहाण्याचे महत्त्व

‘आपण काहीच समवेत घेऊन येत नाही आणि काहीच समवेत नेत नाही. आपल्या समवेत केवळ देवच असतो. त्यामुळे आपण सतत नामात आणि अनुसंधानात रहावे.

१६ उ. गुरूंचे ऋण कधीच फेडता येणार नसल्याने त्यांना केवळ प्रार्थना करा !

आपण गुरूंचे ऋण कधीच फेडू शकत नाही. ऋण फेडायचे म्हटले, तरी ज्या माध्यमातून आपण फेडणार, ते सर्व गुरूंचेच आहे. त्यामुळे ऋण पुन्हा वाढतेच. अशा वेळी गुरूंना प्रार्थना करावी, ‘माझ्यावरील ऋण एवढे वाढवा की, ते फेडताच येऊ नये. मग तुम्ही माझ्यावर जप्ती आणा, म्हणजे माझे अस्तित्व संपून तेथे केवळ तुमचेच अस्तित्व राहील.

१६ ऊ. वर्तमानात रहा !

भूतकाळात अडकायचे नाही. देवानेे वर्तमानात जो विचार दिलेला आहे, तो पकडून त्याप्रमाणे कृती करायची.

१६ ए. ६० आणि ७० टक्के आध्यात्मिक पातळी म्हणजे काय ?

‘आपण काही करू शकत नाही’, हे जाणून देवाला शरण जाणे म्हणजे ६० टक्के पातळी आणि ‘आपण काही करत नसून देवच सर्व करत आहे’, हे अनुभवणे म्हणजे ७० टक्के पातळी !’’

– आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे

 

१७. भावसूत्रे आणि प्रार्थना !

१७ अ. भावसूत्रे

१७ अ १. श्रीगुरूंविषयी
अ. मम हृदयी वसतसे श्रीगुरु !

प.पू. डॉक्टर (श्रीकृष्ण) माझ्या हृदयातच असून माझ्या मनातील प्रत्येक विचार त्यांना कळतो.

आ. प.पू. डॉक्टरांचे वाक्य, म्हणजे ब्रह्म वाक्यच !

मी गुरुदेवांंचे चरण धरले कि नाही, ते मला ठाऊक नाही; मात्र त्यांनी मला धरले आहे, हे निश्‍चित ! ‘एक वेळ वाघाच्या तोंडातील सावज सुटू शकेल; पण गुरूंनी ज्यांना धरले आहे, त्यांचा या जन्मातच उद्धार निश्‍चित आहे’, हे प.पू. डॉक्टरांनीच ‘शिष्य’ या ग्रंथात लिहिले आहे आणि त्यांचे वाक्य हे ‘ब्रह्म वाक्यच’ आहे. ‘त्यांच्या कृपेनेच मी सुटलो आहे’, याची मला अंतरात सतत जाणीव असू दे.

इ. चरणांना मानस मर्दन करणे

रोज रात्री झोपण्यापूर्वी प.पू. डॉक्टरांच्या चरणांना मानस मर्दन करायचे आणि त्यांच्या पाठीला हळूवारपणे तेल चोळायचे.

१७ अ २. सेवेविषयी भाव
अ. कोणत्याही सेवेतून होणार ईश्‍वराचीच प्राप्ती !

प्रत्येक सेवा ही मला ईश्‍वराकडे घेऊन जाणारीच आहे. शारीरिक सेवेतून अहं उणावून शीघ्र ईश्‍वराजवळ जाता येते. नामजप केल्याने मन शुद्ध होऊन शीघ्र ईश्‍वराजवळ जाता येते, तर बुद्धीची सेवा केल्याने बुद्धी शुद्ध होत ईश्‍वराजवळ जाता येते.

१७ अ ३. इतर सूत्रे
अ. सतर्कतेने मनाचे परीक्षण करणे

एखादा चुकीचा किंवा नकारात्मक विचार आला (त्रासामुळे किंवा अनिष्ट शक्तीमुळे), तर पटकन क्षमा मागायची. चांगला आणि सकारात्मक विचार आला की, लगेच कृतज्ञता व्यक्त करायची.

आ. हृदयस्थ ईश्‍वराचा सतत शोध घेणे

मी बाहेरच्या ईश्‍वराला शोधत नसून मी माझ्या हृदयातील ईश्‍वराला शोधत आहे. सतत डोळे बंद करून मी ईश्‍वर माझ्या हृदयात दिसतो का, हे शोधत आहे. (कधी प्रकाश, कधी बिंदू, कधी वलये, कधी आकृती अशा अनेक प्रकारे तो मला हृदयात दिसत असतो.)

इ. ‘प.पू. डॉक्टरच मला प्रत्येक क्षणी सांभाळत आहेत’, याची जाणीव ठेवणे

प.पू. डॉक्टर पदोपदी माझ्या श्रद्धेची परीक्षा घेतात आणि मला उत्तीर्ण करतात. कठीण प्रसंगातही ‘प.पू. डॉक्टरच मला सांभाळत आहेत आणि माझ्यावर कृपाही करत आहेत’, अशी जाणीव ठेवायला हवी. ‘ते माझेच प्रारब्ध आणि संचित संपवत आहेत’, हे मला सतत लक्षात ठेवायचे आहे.

१७ अ ४. प्रार्थना
अ. गुरुदेवा, केवळ आपल्या कृपाप्राप्तीसाठीच या जिवाची धडपड असू दे !

हे गुरुदेवा, माझ्यात सेवाभाव नाही आणि तुम्हाला अपेक्षित अशी ईश्‍वरप्राप्तीची तळमळही नाही. आपणच ती वाढवून माझ्याकडून भावपूर्ण सेवा करून घ्यावी. गुरुदेवा, केवळ आपल्यासाठीच या जिवाची धडपड असू दे.

आ. हे गुरुदेवा, इतरांच्या प्रगतीने आंतरिक आनंद लाभू दे !

हे गुरुदेवा, माझ्यात समष्टीभाव अत्यल्प आहे, याची मला सतत जाणीव असू दे. सहसाधकांची आणि तळमळीने सेवा अन् साधना करणार्‍या साधकांची शीघ्र प्रगती होऊ दे आणि त्यांच्या प्रगतीमध्येच मला आंतरिक आनंद लाभू दे.

इ. हे श्रीकृष्णा, तुझ्या लीलेची जाणीव राहून तुझ्या स्मरणातच आनंद मिळू दे !

हे श्रीकृष्णा, चांगल्याचे सुख नको किंवा वाईटाचे दुःख नको. सुख-दुःख या तुझ्याच लीला आहेत. तुझी माया आहे, हे माझ्या लक्षात येऊ दे. अंतरातील तुझ्या स्मरणाचा (अनुसंधानाचा) आनंद (जेे तुझे सत्य रूप आहे, ते) सतत मिळू दे.

ई. हे ईश्‍वरा, या पृथ्वीवर शीघ्र ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होऊ दे !

हे ईश्‍वरा, या पृथ्वीवर हिंदु धर्म आणि साधक यांना पूरक वातावरण निर्माण होऊ दे. तू करंगळीवर उचललेल्या या ‘ईश्‍वरी राज्यरूपी गोवर्धन पर्वताला’ आमच्या काठ्या लावून घे आणि आमची सर्वांची समष्टी साधना करवून घे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना !

– संकलक, कु. वैदेही पिंगळे (आताच्या सौ. वैदेही गौडा) (पू. पिंगळे यांची मुलगी)

 

१८. अनुसंधानाविषयी केलेले मार्गदर्शन

अ. ‘अष्टावधाने ज्या गोष्टीवर केंद्रित होतात, तिची आपल्याला आठवण येते. ही अष्टावधाने गुरुदेव आणि भगवंत यांच्यावर केंद्रित झाली की, साधनेत ईश्‍वराशी अनुसंधान निर्माण होते. अखंड अनुसंधान, म्हणजे ईश्‍वराशी एकरूपता !

आ. ईश्‍वराचे स्मरण करण्यासाठी नामस्मरण असते. अनुसंधान हे ईश्‍वराचे प्रत्यक्ष स्मरण असल्याने त्या ठिकाणी नामस्मरण नसते. यालाच ‘पश्यंती वाणीतील नामस्मरण’ म्हणतात.

इ. ‘मी, ईश्‍वर आणि चराचर एकच आहे’, ही अनुभूती घेणे, म्हणजे परावाणीतील नामस्मरण !’

 

१९. सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांची शिकवण

अ. ‘सर्व साधकांच्या चरणांकडे पाहून आपल्याला गुरुदेवांची आठवण यायला हवी. प्रत्येक साधकातील परमप्रिय प.पू. गुरुमाऊलीचे दर्शन घ्यायचे आहे.

आ. आपल्या सभोवती होत असलेल्या लहान चुका लक्षात येण्यासाठी प्रार्थना करायची.

इ. महाप्रसाद घेण्याच्या पटलावर पाटी कशी असायला हवी ? फलकावर चुका कशा पद्धतीने लिहायला हव्यात ? कुणाला कसा निरोप द्यायचा ?’, यांसारख्या लहान कृतींतूनही आपली साधना व्हायला हवी.’

– कु. पूनम चौधरी, देहली (१८.७.२०१७)

Leave a Comment