‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’ हा भाव ठेवून सेवा करणार्‍या, सात्त्विक अक्षरांची निर्मिती करणार्‍या, स्थूल आणि सूक्ष्म अशा त्रासांशी लढणार्‍या, त्याग, प्रीती अन् प्रचंड तळमळ असणार्‍या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

१. जन्मदिनांक : फाल्गुन कृष्ण पक्ष द्वादशी (३१.३.१९७३)

२. संत आणि सद्गुरुपदी विराजमान : २८.१०.२०११ या दिवशी संत झाल्या आणि वर्ष २०१५ मध्ये सद्गुरु झाल्या.

 

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचा संक्षिप्त परिचय

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर ‘कमर्शिअल आर्टिस्ट’ (व्यावसायिक कलाकार) म्हणून कार्यरत होत्या. गेल्या २१ वर्षांपासून, म्हणजेच वर्ष १९९७ मध्ये वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी मुंबई येथील सेवाकेंद्रात सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना चालू केल्यानंतर ‘व्यवसायासाठी नव्हे, तर साधनेसाठी चित्रकला’, असा दृष्टीकोन ठेवून त्यांनी अनेक देवतांची, विशेषतः श्रीदुर्गादेवीने तिला प्रत्यक्ष दिलेल्या दर्शनानुसार तिचे चित्र रेखाटले. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांतील बोधचित्र ‘समर्थ’च्या त्या जननी आहेत. वर्ष २००५ पासून त्यांनी हिंदु धर्माच्या प्रसारासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले आहे. वर्ष २००६ ते २००७ या कालावधीत त्या उत्तर भारतात धर्मप्रचारासाठी जात असत. जुलै २००८ मध्ये ६४ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून त्या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या. वर्ष २०११ मध्ये त्या संतपदी (गुरुपदी) विराजमान झाल्या. वर्ष २०१५ मध्ये त्या ८० टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सद्गुरुपदावर आरूढ झाल्या (टीप). सध्या त्या सनातन संस्थेच्या प्रमुख धर्मप्रचारकांपैकी एक असून हिंदु धर्मप्रचाराचे कार्य करत आहेत.

 

१. साधनेविषयी केलेले मार्गदर्शन

१ अ. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवणे आवश्यक

१ अ १. अहं संदर्भातील दोन संघर्ष !

‘चूक न स्वीकारतांना जसा मनाला संघर्ष करावा लागतो, तसा तो चूक स्वीकारण्यातही करावा लागतो. यांतील पहिला संघर्ष आहे, तो अहंचा संघर्ष आणि दुसरा संघर्ष आहे, तो अहंविरुद्धचा संघर्ष !’

१ अ २. ‘स्वतःकडे लक्ष ठेवणे, नमते घेणे आणि ‘आपले प्रत्येक पाऊल देवाकडे जात आहे ना’, याकडे लक्ष ठेवणे, ही त्रिसूत्री लक्षात ठेवून अहं-निर्मूलनासाठी प्रयत्न करावेत.’
१ अ ३. मनात येणारे विचार मनमोकळेपणाने सांगण्याविषयी तारतम्य बाळगून केवळ मनामध्ये टिकून राहिल्याने आपल्याला त्रास होणार्‍या आणि साधनेवर परिणाम करणार्‍या विचारांचाच या संदर्भात विचार करा !

‘स्वभावदोषनिर्मूलन-अहंनिर्मूलन-गुणसंवर्धन प्रक्रियेच्या अंतर्गत मनातील अनावश्यक विचारांचे ओझे न्यून करण्यासाठी साधकांना मनमोकळेपणाने बोलण्यास सांगितले आहे. मनमोकळेपणाने बोलण्याने मनातील ताण न्यून होण्यासमवेतच पूर्वग्रह, विकल्प, नकारात्मक विचार यांसारखे दोषही न्यून होऊन प्रेमभाव वाढण्यासाठी साहाय्य होते; परंतु साधकांनी ‘मनमोकळेपणाने काय बोलावे आणि काय बोलू नये’, याविषयी तारतम्य न बाळगल्याने काही जणांमध्ये गैरसमज होत आहेत. मनातील सर्वच गोष्टी सांगता येत नाहीत. काही गोष्टी मर्यादित ठेवाव्या लागतात, याचे साधकांनी भान ठेवावे.

अनिष्ट शक्तीही साधकांच्या मनात असंख्य निरर्थक, नकारात्मक आणि वासनेचे विचार घालतात. असे विचार सारणीत लिहिणे किंवा इतरांना सांगणे यापेक्षा प्रार्थना आणि आध्यात्मिक उपाय करणे यांकडे लक्ष देऊन ते घालविणे आवश्यक आहे.

मनाचे कार्य ‘विचार करणे’, हे असल्यामुळे आपल्या मनात असंख्य विचार येत असतात आणि जात असतात. जे विचार आपल्याला त्रासदायक ठरत नाहीत आणि मनात साठून रहात नाहीत, असे विचार सांगण्यात स्वतःचा आणि इतरांचा वेळ घालवू नये. याउलट जे विचार मनामध्ये टिकतात, ज्या विचारांमुळे आपल्याला त्रास होतो, ज्यांच्यामुळे साधनेवर परिणाम होतो, अशा विचारांसाठी ते सारणीत लिहिणे, त्यांच्यासाठी स्वयंसूचना देणे आणि ते फलकावर लिहिणे या प्रक्रियेतील पद्धतीनुसार उपाययोजना कराव्यात.’

१ आ. व्यष्टी साधना

१ आ १. ‘विवाहामुळे आपण संसारात अडकतो आणि विवाह नाही केला, तर त्याच्या विचारांमध्ये अडकतो. केवळ साधनाच आपल्याला त्यातून बाहेर काढते.’

१ आ २. ‘साधनेने मला काय मिळेल, हे मला ठाऊक नाही; पण जे काही मिळेल, ते फार अनमोल असेल’, असा साधनेविषयी दृष्टीकोन असावा !’

१ आ ३. ईश्‍वराची भक्ती वाढवणे आवश्यक

१ आ ३ अ. ‘आपण अनेक जन्म कितीही प्रयत्न केले, तरी जे होऊ शकणार नाही, ते ईश्‍वराची, गुरूंची कृपा संपादन करण्यासाठी प्रयत्न केल्यास ईश्‍वर करतो !’

१ आ ३ आ. ‘आपली भक्ती एवढी वाढायला हवी की, देवच आपल्यासमोर येऊन उभा रहायला हवा !’, असे एकदा प.पू. डॉक्टर म्हणाले होते.

१ इ. समष्टी साधना

१ इ १. साधकांनो केवळ कार्य नव्हे, तर कार्यातून साधना करायची आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येक कृती ईश्‍वराशी जोडा !

‘सर्वसाधारण साधकांमध्ये अहंचे प्रमाण चांगल्या साधकांपेक्षा अधिक असते. साधक करत असलेले कार्य साधना म्हणून न केल्याने त्यांच्या प्रगतीची गतीही मंदावते. त्यामुळे पुष्कळ कार्य करूनही अपेक्षित प्रगती होत नाही, याविषयी काही जणांना निराशाही येते. कितीही कार्य केले तरी तळमळ, भाव आणि श्रद्धा नसेल, तर आपण परिपूर्ण कार्य करू शकत नाही. कार्य ईश्‍वर करून घेणारच आहे. त्यामुळे कार्य करत असतांना आपण आपली साधना होते कि नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कार्य करत असतांना साधना होण्यासाठी करत असलेल्या प्रत्येक कृतीला ईश्‍वराशी जोडता आले पाहिजे. असे झाले तरच ती कृती सेवा होते; अन्यथा ते कार्यच होते. हे साध्य होण्यासाठी साधकांनी भावजागृतीचे प्रयत्न वाढवावेत.

याची जाणीव सातत्याने रहावी यासाठी कृतीच्या स्तरावर आपल्या वहीवर, घरात पटकन लक्ष जाईल अशा ठिकाणी अथवा आपला वावर अधिक असतो अशा ठिकाणी ठळक अक्षरात ‘सेवेच्या माध्यमातून मला ईश्‍वराला जोडायचे आहे’ हे वाक्य लिहून ठेवावे.’

साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतांना सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

 

२. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्याकडून साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे

२ अ. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी साधिकेला खाऊ देऊन ‘हा प्रगतीचा खाऊ असून
प्रगती होण्यासाठी कष्ट करावे लागतात’, असे सांगणे, त्या वेळी साधिकेची प्रयत्न करण्याची तळमळ वाढणे

‘५.६.२०१८ या दिवशी पू. (सौ.) संगीता जाधवकाकू संत झाल्या. त्या दिवशी मला सद्गुरु (कु.) अनुताईंनी प्रसाद दिला आणि म्हणाल्या, ‘‘हा प्रगतीचा खाऊ आहे.’’ त्या वेळी मला वाटले, ‘ताईंनी माझी प्रगती होण्यासाठी खाऊ दिला आहे.’

त्या वेळी मी काही बोलले नाही, तरी अनुताई म्हणाल्या, ‘‘प्रयत्न ही जादूची कांडी नाही. प्रयत्न हे करावेच लागतात. वैकुंठात आहात; म्हणून ‘प्रयत्न आपोआप होतील’, असे नाही. ते कष्ट घेऊन करावे लागतात.’’ सद्गुरु अनुताईंच्या या वाक्याने माझी प्रयत्न करण्याची तळमळ वाढली आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली, तसेच त्या वेळी सद्गुरु अनुताईंनी सत्संगात सांगितलेले वाक्य आठवले, ‘कणभर प्रयत्न केले की, मणभर अहं वाढतो आणि मणभर प्रयत्न केले की, कणभर अहं न्यून होतो.’’

– कु. माधुरी दुसे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.७.२०१८)

२ आ. प्रसारसेवेनिमित्त बाहेरगावी जातांना खोलीची मासिक स्वच्छता करण्यास सांगणे

‘वर्ष २००७ मध्ये मी देवद आश्रमात रहात होते. तेव्हा कु. अनुराधा वाडेकर यांचा मला जवळून सहवास लाभला. कु. अनुताई प्रसारसेवेच्या निमित्ताने आश्रमाच्या बाहेर जायच्या. त्यांचे ३ – ४ दिवसांचे बाहेर रहाण्याचे नियोजन असेल, तर अनुताई मला त्या परत येईपर्यंत खोलीची मासिक स्वच्छता करण्यास सांगायची. तेव्हा ताई मला कागदावर सामूहिक स्वच्छतेचे नियोजन बारकाव्यांसहित लिहून द्यायच्या, उदा. जळमटे काढणे, पंखे आणि दिवे पुसणे, पडदे यंत्रात धुणे, पटल पुसणे, देवघरातील वस्त्र पालटणे इत्यादी.

२ आ १. साधिकेकडून खोली स्वच्छता नीट न झाल्याचे लक्षात आल्यावर तिला त्याविषयी विचारणे आणि साधिकेला आध्यात्मिक त्रास होत असल्याने ‘स्वच्छता करू नये’, असे वाटत असल्याचे ओळखणे

‘कु. अनुराधा वाडेकर रहात असलेल्या खोलीची स्वच्छता मनापासून न करता मी वरवर करत होते. एकदा माझे अनुताईंशी पुढील संभाषण झाले.

कु. अनुताई : स्वच्छता मनापासून करत नाहीस का ? खोलीत आल्यावर तुझ्या मनात काय विचार येतात ?

मी : मला ‘स्वच्छता करू नये’, असे वाटते.

कु. अनुताई : कालच मला वाटले, ‘खोलीत आल्यावर तू अस्वस्थ होतेस. खोलीत आल्यावर तुला आध्यात्मिक त्रास होतो. त्यामुळे तुला स्वच्छता करावीशी वाटत नाही.’

त्या कालावधीत अनुताई सेवेत व्यस्त असल्याने माझी आणि त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती, तरीही त्यांनी मला त्रास होत असल्याचे ओळखले. मला आध्यात्मिक त्रास होत असल्याचे माझ्या लक्षातही आले नव्हते. त्यांनी सांगितल्यावर ते कळले.

२ आ २. स्नानगृह स्वच्छता चांगली केल्याचे अनुताईंनी सांगितल्यावर साधिकेला आनंद होणे आणि त्या वेळी ‘कौतुक केल्याने आनंद मिळाला कि सेवेमुळे ?’, असे विचारून पू. ताईंनी साधिकेला अंतर्मुख करणे

‘एकदा खोलीमधील स्नानगृहातील लाद्यांवर डाग पडले होते. ते नियमित स्वच्छतेच्या वेळी घासूनही जात नसल्याने एक दिवस मी अ‍ॅसिड घालून ते स्वच्छ केले. स्वच्छता झाल्यावर अनुताईंशी माझे पुढील संभाषण झाले.

कु. अनुताई : तू स्नानगृह किती स्वच्छ धुतलेस ! छान वाटते.

मी : खरंच का ? अ‍ॅसिडने धुतल्याने तुला चांगले वाटले. (त्या वेळी अनुताईंनी माझे कौतुक केल्याने मला आनंद झाला.)

कु. अनुताई : तुला आनंद झाला का ?

मी : हो.

कु. अनुताई : कशामुळे झाला ? स्नानगृह स्वच्छ झाल्यामुळे कि कौतुक केल्यामुळे ?

मी : तुम्ही कौतुक केल्यामुळे.

कु. अनुताई : असे प्रसंगातून शोधायचे की, कौतुक केल्यामुळे मन सुखावत आहे कि सेवेतून आनंद मिळाल्यामुळे ?

त्या वेळी हे विवेचन माझ्यासाठी नवीन होते आणि त्यांनी मला ‘प्रसंगात स्वतःतील अहंभाव कसा शोधायचा ?’, हे शिकवल्याने मला पुष्कळ आनंद झाला. प्रत्यक्षात त्यांनी मला माझ्यातील अहंची जाणीव करून दिली होती.

‘परात्पर गुरुदेव, त्या वेळी सद्गुरु (कु.) अनुताईंचा सत्संग लाभूनही मी प्रयत्न केले नाहीत. तुम्हीच माझ्याकडून प्रयत्न करवून घ्या. मला सतत शिकण्याच्या स्थितीत ठेवा’, अशी आपल्या चरणी प्रार्थना करते.’

– कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.३.२०२०)

२ इ. पू. अनुताई यांच्या मुलाखतीतून साधनेच्या प्रवासातील विविध पैलू आणि टप्पे श्रीकृष्णाने उलगडून दाखवणे

‘पू. अनुताई यांच्या मुलाखतीतून आम्हाला साधनेची एक नवी दिशा मिळून आतापर्यंत गुरूंनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची उजळणीच झाली. ही तबकडी पहातांना साक्षात् श्रीकृष्णाने जसे पू. अनुताईंना शिकवले, तसेच तो आम्हा साधकांना शिकवत असल्याची जाणीव सातत्याने होत होती. त्यातून पू. अनुताईंचे पुढील दृष्टीकोन मनावर ठसले.

१. देवाला भेटण्याचे ध्येय निश्‍चित झालेल्या साधकाचा मनोलय झाल्याविना पर्याय नाही.

२. देवामध्ये अडकायचे असेल, तर कोणतीही वस्तू अथवा गोष्ट यांमध्ये अडकता कामा नये. त्यासाठी आपल्याकडे जेवढ्या गोष्टी अल्प, तेवढा आनंद अधिक.

३. समोरचा कसा शिकतो, हे शिकत गेल्याने जलद प्रगती होऊन त्यातील आनंद घेता येतो.

४. प्रत्येक प्रसंगात मनात येणार्‍या दोन विचारांपैकी देवाचा मार्ग दाखवणारा विचार निवडायचा.

५. अहं जोपासण्यासाठी आपण जो संघर्ष करतो, तो अहं न्यून करण्यासाठी केला, तर आपण निश्‍चित देवाकडे जाऊ.

६. देवाच्या इच्छेप्रमाणे वागता यायला हवे.

७. आपण आश्रमात असू किंवा घरी, गुरु जे सांगतात ते भल्यासाठी आणि साधनेसाठी असून तेच शरणागत राहून करत रहाण्यात प्रत्येकाचे भले आहे.

८. इतरांशी तुलना न करता आपण स्वतः स्वतःशी तुलना करायची. पूर्वीपेक्षा आता काय पालट जाणवतो, हे पहावे. तरच आपल्याला योग्य दृष्टीकोन मिळतो.

९. परेच्छेने वागल्यास आणि छोट्या छोट्या गोष्टीत इतरांचा विचार केल्यास देव भरभरून देतो.

१०. ‘चूक आपली मैत्रीण आहे’, असा भाव ठेवूनच तिला स्वीकारायचे.

११. दुःख नसेल, तर आनंद अनुभवता येत नाही.

१२. मनोलय झाल्याविना आनंद मिळूच शकत नाही.

साधनेतील विविध पैलू पू. अनुताईंनी कमळाच्या फुलाच्या पाकळ्यांप्रमाणे उलगडून सांगितले. एकंदरीत साधकांनी शिकून पुढच्या पुढच्या टप्प्याला पुढे जावे, अशीच श्रीकृष्णाची तीव्र तळमळ असल्यानेच हे सर्व एकाच वेळी त्याने साधकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्णाने या ध्वनीचित्र चकतीच्या माध्यमातून आम्हाला अमूल्य सत्संगच दिला.’

– श्री. अविनाश जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.८.२०१४)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment