‘हिंदु शब्दाच्या संदर्भातील अपसमज आणि भारतातील विकृत सेक्युलरिझम्’ या विषयावरील वेब कॉन्फरन्स

नवी देहली – आज कोरोना आपत्तीमध्ये संपूर्ण विश्व आचरणाने हिंदु बनत आहे. ते स्वतःला हिंदु म्हणवून घेण्यास आतुर झाले आहेत. संपूर्ण विश्वात आज हिंदु शब्दाचीच चर्चा आहे. हिंदु शब्द हा वैदिक आहे, तो ऐतिहासिक आहे आणि घटनेच्या अनुच्छेद २५ मध्ये त्याचा उल्लेख असल्याने तो संवैधानिकही आहे. अरब, तुर्क आणि मोगल आक्रमकांच्या समवेत झालेल्या दीर्घकालीन संघर्षात ‘हिंदु’ हे नाव सनातन धर्मीय राष्ट्रवासियांचे सुख-दुःख, जय-पराजय, त्याग आणि बलीदान यांच्या स्मृतींनी पवित्र झाले आहे. त्यामुळे आपणही हिंदु शब्दाविषयी कुठलाही विकल्प न बाळगता ‘आम्ही सनातनधर्मी हिंदु आहोत’, हे अभिमानाने सांगायला हवे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ते ‘आय वुमन्स’, ‘ओम क्रियायोग’, ‘अमेरिकन्स फॉर हिंदूज’, ‘वर्ल्ड हिंदू डे’ आणि ‘वर्ल्ड एन्.आर्.आय असोसिएशन’ या अमेरिकेतील ५ संघटनांनी ६ जूनला आयोजित केलेल्या ‘हिंदु शब्दाच्या संदर्भातील अपसमज आणि भारतातील विकृत सेक्युलरिझम्’ या विषयावरील ‘वेब कॉन्फरन्स’मध्ये बोलत होते.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ५ यू ट्यूब चॅनेल्सने केले. २ सहस्रांहून अधिक लोकांनी हा कार्यक्रम पाहिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादा बर्फानी यांची अमेरिकेतील शिष्या तथा महामंडलेश्वर मां राजलक्ष्मीजी यांनी केले.
श्री. चेतन राजहंस यांनी शाळांमधून हिंदु धर्म शिकवण्यास प्रतिबंध असणे, भगवा आतंकवादाचा प्रचार, इतिहासाचे विकृतीकरण आणि शहरी नक्षलवाद यांविषयीची भारतातील विकृत सेक्युलरिझमची उदाहरणे देतांना त्या संदर्भात सनातन संस्थेने केलेले जनजागृतीचे कार्यही सांगितले.
क्षणचित्रे
१. श्री. चेतन राजहंस यांचा विषय झाल्यानंतर अनिवासी भारतीय जिज्ञासूंनी सनातन संस्थेच्या कार्याला अर्पण देण्याची इच्छा प्रकट केली.
२. अनेकांनी आम्ही अमेरिकेतून तुमच्या कार्याला कसे सहकार्य करू शकतो, याविषयी प्रश्नोत्तराच्या सत्रात विचारणा केली.
३. साधारणतः १ तास विषय झाल्यानंतर अनुमाने पुढील १ तास शंकासमाधान सत्र चालू होते. यात भारतातील गुरुकुलपद्धतीचा र्हास, हिंदूंमधील जातीव्यवस्था, धर्मांतरण, देहलीतील दंगली, मंदिरांचे सरकारीकरण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या विषयांवरही अनेकांनी प्रश्न विचारले. त्याची श्री. चेतन राजहंस यांनी अत्यंत समर्पक भाषेत उत्तरे दिली.
श्री. चेतन राजहंस यांनी मांडलेली अन्य सूत्रे
१. वेदांमध्ये ‘हिंदु’ शब्द नाही’, असे म्हणणे अयोग्य आहे. ऋग्वेदाच्या १० व्या मंडलात, तसेच तिसर्या मंडलातील नदीसूक्तात आणि अथर्ववेदात ‘सिंधु’ शब्द आहे. ‘हिंदु’ शब्दाची उत्पत्ती वेदांतील ‘सिंधु’ या शब्दापासून झाली आहे. संस्कृतमध्ये ‘स’चे ‘ह’मधील रूपांतर पाणिनीय व्याकरणानुसार योग्य आहे. जसे ‘सप्ताह’ शब्दाला ‘हफ्ताह’ म्हटले जाते, तसे ‘सिंधु’ शब्दाला ‘हिंदु’ म्हटले गेले आहे.
२. सनातन धर्मामध्ये एकच वस्तू, प्राणी, वनस्पती आणि व्यक्ती यांना अनेक नावे असण्याची परंपरा आहे. संस्कृतमध्ये ‘पाणी’ हे नीर, जल, उदक, आप, तोय, पय, कलम, अमृत आदी १० पेक्षा अधिक नावांनी ओळखले जाते. तसे ‘सनातन’ म्हणा, ‘आर्य’ म्हणा, ‘वैदिक’ म्हणा, ‘हिंदु’ म्हणा किंवा ‘सनातन आर्य वैदिक हिंदु’ म्हणा. सर्व समानार्थी शब्द आहेत.
३. महंमद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांच्याही अगोदरपासून ‘हिंदु’ शब्द आणि त्याचा प्रयोग अस्तित्वात होता. सिकंदराने तत्कालीन भारतात येऊन ‘हिंदुकुट’ पर्वतमाला (आजची अफगाणिस्तानमधील ‘हिंदुकुश’ ही पर्वतमाला) पहाण्याची इच्छा प्रकट केली होती. हा प्राचीनतम पर्वतच ‘हिंदु’ हा शब्द प्राचीन असल्याची साक्ष आहे.
४. मुसलमानांनी ‘हिंदु’ हा शब्द ‘काळा, काफीर, चोर’ इत्यादी अर्थांनी वापरला आहे, असा भ्रम पसरवण्यात येतो. प्रत्यक्षात फारसी आणि अरबी शब्दकोशात ‘हिंदु’ शब्दाचा अर्थ निंदाव्यंजक नाही ! फारसी शब्दकोशात ‘हिन्दू’ या शब्दाचा अर्थ ‘हिन्ददेश निवासी’, ‘हिंदुस्थानचा धर्म’, ‘प्राचीन हिंदचे रितीरिवाज मानणारा’, ‘तरुणींच्या गालावरील सौंदर्याची खूण असलेला काळा तीळ’, असे दिले आहेत.
५. हिंदु शब्दाची व्याख्या करणे कठीण आहे, असा अनेकांचा आक्षेप असतो. प्रत्यक्षात ‘मेरुतंत्र’ या ८ व्या शतकातील शैव तंत्रग्रंथात त्याची व्याख्या आध्यात्मिक परिभाषेत केली आहे. त्या आधारे ‘शब्दकल्पद्रुम’ या पाणिनीय व्याकरणानुसार शब्दांची व्युत्पत्ती सांगणार्या या ग्रंथामध्ये ‘हिंदु’ शब्दाची व्युत्पत्ती सांगतांना म्हटले आहे की, ‘हीनं दुषयति इति हिन्दु जातिविशेषः ।’ अर्थात हीन कर्म आणि गुण यांचा त्याग करणार्यांना ‘हिंदु’ म्हणतात. अध्यात्मात सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण सांगितलेले आहेत. यातील रज-तम गुण हे हीन असल्याने त्यांचा त्याग करणारा अर्थात सत्त्वगुणी आचरण करणारा हिंदु असतो.
६. ‘आदिवासी हिंदु नाहीत’, अशा प्रकारे आजकाल ‘ट्विटर ट्रेंड’ चालवले जात आहेत. प्रत्यक्षात आदिवासींचे विवाह ‘हिंदु विवाह कायदा १९५५’ नुसार होतात; मग ‘ते हिंदु नाहीत’, असे म्हणणे असंवैधानिक ठरते. हिंदु विवाह कायद्यात स्पष्ट म्हटलेले आहे की, भारतीय राज्यातील जी व्यक्ती मुसलमान, ख्रिस्ती, पारशी आणि ज्यू नाही, ती हिंदु आहे. त्यामुळे आदिवासी हे हिंदूच आहेत !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...