श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ, श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्यातील सहज संवादातून उलगडलेली सद्गुरु (डॉ.) गाडगीळ यांची गुणवैशिष्ट्ये !

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ हे सनातन संस्थेच्या समष्टी सद्गुरुपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता ३१ मे २०२० या दिवशी आश्रमातील फलकाद्वारे घोषित करण्यात आली. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ (सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांची पत्नी) यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ यांनी सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांच्याशी साधलेल्या संवादातून उलगडलेला सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांचा प्रेरणादायी साधनाप्रवास आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये !

संकलक : कु. सायली डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा

 

१. ईश्‍वरप्राप्तीसाठी समर्पित झालेला सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांचा दैवी परिवार !

बसलेले सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ, श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ आणि मागे उभे असलेले जावई श्री. सिद्धेश करंदीकर अन् मुलगी सौ. सायली करंदीकर (वर्ष २०१६)

गाडगीळ कुटुंबियांची वैशिष्ट्ये सांगतांना श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘समाजातील कुटुंबियांचा कल मायेकडे असतो. हे कुटुंबीय एकत्र येतात, तेव्हा मायेच्याच विचारांचे आदान-प्रदान होते. मायेतीलच विषयांवर संवाद साधला जातो. ते एकत्र दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहातात, सहलीला जातात. सनातन परिवारात अनेक कुटुंबे मायेच्या प्रवाहापासून दूर रहातात. गाडगीळ परिवार हा असाच ईश्‍वरप्राप्तीसाठी वाहून घेतलेला, राष्ट्र आणि धर्म यांसाठी समर्पित झालेला परिवार आहे. गाडगीळ कुटुंबियांच्या सहवासात मी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. एवढ्या वर्षांत एकही क्षण अनुभवला नाही की, त्यांच्यात मायेच्या विषयांवर संवाद चालू आहे. कोणत्याही वेळी गेले, तरी त्यांच्यात ईश्‍वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे, साधनेविषयीचे संवादच अनुभवले आहेत.’’

 

२. आरंभीपासूनच अत्यंत गांभीर्याने आणि
तळमळीने साधना करणारे सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ !

साधनाप्रवासातील आरंभीच्या काळातील आठवणींना उजाळा देतांना सद्गुरु गाडगीळकाका म्हणाले, ‘‘आमच्या कुटुंबात प्रथम माझ्या आई-वडिलांनी साधनेला आरंभ केला. मी नोकरीच्या निमित्ताने बोईसर (आताचा जिल्हा पालघर) येथे रहात होतो. माझे आई-वडील मुलुंड (मुंबई) येथे रहात होते. त्यांच्या घरी सनातन संस्थेचा सत्संग होत असे. त्यांनी आम्हाला कुलदेवीचा नामजप अधिकाधिक करण्यास सांगितले होते. प्रथम जाणीवपूर्वक नामजप करत असू. त्या वेळी मी आणि श्रीचित्शक्ति सौ. अंजली यांच्यात स्पर्धा होत असे की, ‘कुणाचा नामजप अधिक होतो.’ आगगाडीने कार्यालयात जातांना आणि मुलुंडच्या घरी परत येतांना, मी नामजप करण्याचा प्रयत्न करत असे. मुलुंडला साधकांच्या संपर्कात आलो आणि सत्संगाची, नामजपाची गोडी लागली.

त्या संदर्भात सनातन संस्थेचे दोनच ग्रंथ प्रकाशित झाले होते. ‘गुरुकृपायोग’ आणि ‘शिष्य’ हे ते ग्रंथ होते. मी कार्यालयात जातांना त्या ग्रंथांचे वाचन करत असे. मला नोकरीनिमित्त काही वेळा पुण्याला जावे लागत असे. त्या वेळीही मी हे ग्रंथ समवेत घेऊनच जात असे.’’

या वेळी श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ म्हणाल्या की, ‘आम्हा दोघांमध्ये त्यांचा नामजप अधिक होत असे. ते पहिल्यापासूनच अत्यंत गांभीर्याने साधना करत होते.’

 

३. साधनेविषयी माहिती नसतांनाही श्री गणपतीची आर्ततेने केलेली उपासना !

सद्गुरु गाडगीळकाका म्हणाले, ‘‘सनातन संस्थेची ओळख नव्हती, तेव्हा मी श्री गणपतीची उपासना करत असे.  मी नियमित ‘प्रणम्य शिरसा देवम्’, हे गणपतिस्तोत्र म्हणत असे. त्या वेळीही मला असे वाटायचे की, गणपतिस्तोत्र असे म्हणावे की, साक्षात् गणपतीने समोर उभे राहिले पाहिजे. मी नोकरी करत असलेल्या आस्थापनाचे एखादे काम अडले की, मी गणपतीला प्रार्थना करायचो.

आता कळते, आस्थापनांतील कामांसाठी प्रार्थना करणे, हे मायेतील होते.’’

 

४. उच्चशिक्षित असूनही अत्यल्प अहं असलेले सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ !

४ अ. कार्यालयात शिपाई आला नसल्यास स्वतः तेथील केर काढणे

सद्गुरु गाडगीळकाकांची वैशिष्ट्ये उलगडतांना श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘आमचा विवाह झाल्यानंतर कधीच भांडण झाल्याचे मला आठवत नाही. ‘ते सगळेच सेवा म्हणून करायचे, त्यामुळे भांडणांचा कधी प्रसंगच आला नाही’, असे आता वाटते. त्यांच्या कार्यालयातही एखादा दिवस केर काढायला शिपाई आला नसेल, तर ते स्वतः तो परिसर झाडून स्वच्छ करायचे. जेव्हा पूर्णवेळ साधनेसाठी त्यांनी नोकरी सोडली, तेव्हा ‘असा देवासारखा मनुष्य सोडून चालला आहे’, या विचाराने कार्यालयातील कर्मचारी रडले होते.’’ (सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी पीएच्.डी. केली आहे. ते त्या वेळी त्या आस्थापनात मोठ्या पदावर कार्यरत होते.)

४ आ. सद्गुरु (डॉ.) गाडगीळ यांच्यातील अल्प अहंविषयी परात्पर गुरु डॉक्टरांनी काढलेले गौरवोद्गार !

सद्गुरु गाडगीळकाकू म्हणाल्या, ‘‘वर्ष २००० मध्ये संगीत साधना नुकतीच चालू झाली होती. त्या वेळी एक दिवस परात्पर गुरुदेवांनी मला त्यांच्या खोलीतील आरशासमोर उभे रहाण्यास सांगितले. त्या वेळी ‘आरशात उभे राहून काय बघायचे आहे’, ते मला कळले नाही. तेव्हा परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘स्वतःचे परीक्षण करा.’’ मी आरशात पाहिल्यानंतर ते मला म्हणाले, ‘‘किती अहं आहे ना तुमच्यात ! तुमचे यजमान गाडगीळकाकांना आठवा. त्यांचा चेहरा डोळ्यांसमोर आल्यावर काय वाटले, ते सांगा.’’

यावर काकांचा चेहरा आठवल्यावर मला छान वाटले. मी तसे सांगितल्यानंतर ‘त्यांचा अहं कमी आहे ना, म्हणून छान वाटले. तुमचा चेहरा त्यांच्यासारखा झाला पाहिजे. गाडगीळकाकांमध्ये जन्मतःच अहं कमी आहे. नंतरच्या काळातही त्यांनी तो वाढू दिला नाही.’’

त्या कालावधीत एका साधिकेला अनुभूती आली. तिला सद्गुरु काकांच्या तोंडवळ्याच्या जागी माझा तोंडवळा दिसला. ती अनुभूती वाचनात आल्यावर परात्पर गुरुदेवांनी मला बोलवून घेतले. ती अनुभूती दाखवून म्हणाले, ‘‘केवळ पती-पत्नी एकमेकांशी एकरूप झाले असे नको, तर आता पुढे जाऊन आपल्याला देवाशी एकरूप व्हायचे आहे.’’ अशा तर्‍हेने गुरुदेव प्रत्येक वेळी त्या त्या टप्प्यावरून आपल्याला पुढे घेऊन जातात.’’

– श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ

श्रीगुरूंचे त्वरित आज्ञापालन करून मायेची ओढ अल्प करण्यासाठी
प्रयत्न करणारे सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ !

‘आमची मायेची ओढ अल्प करण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनीच प्रसंगांतून शिकवले. आम्ही साधनेत आलो, तेव्हा दिवाळीच्या निमित्ताने काही दिवस माझ्या सासरी आणि माहेरी जायचो. तेव्हा माझी ज्ञान ग्रहण करण्याची सेवा असल्याने मी भ्रमणसंगणक घेऊन घरी जायचे. एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना सांगितले, ‘‘त्यांना भ्रमणसंगणक देऊ नका. घरी मायेतच असणार, तर किती वेळ मिळणार सेवेला ?’’ अशा प्रसंगांतून त्यांनी आम्हाला विचारप्रवण केले.

त्यानंतर एक दिवस परात्पर गुरु डॉक्टरांनी एक सारणी बनवली. त्या सारणीतून त्यांनी ‘अन्य एका संतांच्या तुलनेत आमची अध्यात्माची ओढ आणि तळमळ अल्प आहे’, हे दाखवले. त्या वेळी आम्ही लगेच घरी जाण्यासाठी केलेले रेल्वेचे आरक्षण रहित केले. आम्ही दोघांनी त्याक्षणीच ठरवले की, ‘सुट्टी इत्यादी काही नको. आता हेच आपले घर आहे.’’ नंतर मी त्यांच्याकडे गेले असता, ते मला म्हणाले, ‘‘अरे वा, उद्या तुम्ही घरी जाणार ना ?’’ यावर मी त्यांना म्हणाले, ‘‘गुरुदेव, आम्हाला आमची चूक कळली. आता आमचे सर्वस्व आम्ही साधनेसाठीच देणार !’’

अशा प्रकारे मनाची सिद्धता झाली की, त्यांनी ‘जाऊन येऊ शकता’, असे सांगितले. त्यांनीच आमचे मायेचे आकर्षण न्यून केले. ‘गुरु जीवनात का असावे लागतात’, हे यातून लक्षात येते.’’

– श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ

 

५. प्रत्येक कृती सत्यम्-शिवम्-सुंदरम् अशा पद्धतीने करणारे सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ !

श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘सद्गुरु गाडगीळकाकांची प्रत्येक कृती सत्यम्-शिवम्-सुंदरम् असते. त्यांच्या खोलीत कधीही गेले, तरी पलंगावरील चादरीला (बेडशीटला) एकही चुणी पडलेली दिसत नाही. पटलावरील साहित्यही सुंदर आणि व्यवस्थित पद्धतीने ठेवलेले असते. त्यांच्या खोलीतील पोटमाळ्यावरील साहित्यही अत्यंत सुंदर ठेवलेले आहे. काकांची प्रत्येक कृती सुंदर आणि परिपूर्ण असते. एवढ्या वर्षांत एखादाही प्रसंग आठवत नाही की, त्यांच्या खोलीतील एखादी वस्तू अव्यवस्थित आहे. आश्रमातील साधकांमध्ये ‘व्यवस्थितपणा’ हा गुण रुजावा, यासाठी आपण आश्रमातील निवासी खोल्यांमध्ये फेरी घेऊन ‘कुणाचे साहित्य अव्यवस्थित आहे / कुणाचे साहित्य / खोली व्यवस्थित आहे’, अशांची सूची करतो. अशा सूचीमध्ये ‘ज्यांची खोली अतिशय व्यवस्थित आहे’, अशांमध्ये सद्गुरु काकांच्या खोलीचा नेहमीच पहिला क्रमांक असे. आपण आश्रमातील साधकांना ‘आदर्श खोली कशी असावी’, यासाठी सद्गुरु काकांच्या खोलीचे उदाहरण देतो. परात्पर गुरु डॉक्टर म्हणतात, ‘‘ज्या साधकांची साधना चांगली चालू आहे, त्यांची खोली / वैयक्तिक साहित्याचा खण व्यवस्थित असतो.’’ सद्गुरु काकांच्या साधनेचे प्रतिबिंब अशा रितीने त्यांच्या खोलीत पहायला मिळते.’’

 

६. कौतुकाचे श्रेय सहजतेने इतरांना, गुरूंना किंवा ईश्‍वराला देणारे सद्गुरु गाडगीळकाका !

व्यवस्थितपणाविषयी झालेल्या संवादाच्या वेळी सद्गुरु गाडगीळकाकांनी अत्यंत सहजतेने सांगितले, ‘‘ते माझ्या आई-बाबांचे संस्कार आहेत. त्यांनी मला शिस्तीची सवय लावली.’ काकांनी त्याचे श्रेय सहजतेने इतरांना दिल्याचे पाहून श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘त्यांनी आई-वडिलांनी केलेले संस्कार घेतले आणि टिकवलेही. त्यांच्यात ‘व्यवस्थितपणा’ हा ईश्‍वराचा गुण आहे. मी दौर्‍यावरून काही कालावधीकरता आश्रमात आले की, माझे बरेच साहित्य खोलीत असते. अशा वेळी अजूनही ते मला म्हणतात, ‘‘तू परत गेलीस की, मी सगळे व्यवस्थित लावून ठेवतो.’’

या संवादाचे विश्‍लेषण करतांना श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ यांनी सद्गुरु गाडगीळकाकांच्या स्वभावाचा एक सुंदर पैलू उलगडला, तो म्हणजे त्यांचे कौतुक केले की, त्याचे श्रेय इतरांना देणे. काका नेहमीच त्यांचे कौतुक केले की, त्याचे श्रेय इतरांना, गुरूंना किंवा ईश्‍वराला देतात.

 

७. साधकांना नामजप सांगण्याच्या सेवेतून
स्वतःतील व्यापकत्व आणि प्रेमभाव वाढवणारे सद्गुरु गाडगीळकाका !

श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘देश-विदेशातील साधकही हक्काने काकांना नामजपादी उपाय विचारतात. पू. काकांचे वैशिष्ट्य म्हणजे साधकांना स्वतःच्या सर्व समस्या त्यांना सांगता येतात. साधक कोणत्याही प्रकारचा त्रास त्यांना मोकळेपणाने सांगू शकतात. पू. काका कोणत्याही सेवेत असले, तरी साधकाकडे  प्रथम लक्ष देतात. ते प्रसाद-महाप्रसाद ग्रहण करत असले, तरी साधक अडचणी सांगण्यास आल्यानंतर त्या प्रथम साधकांचीच अडचण सोडवतात. ते साधकाला पूर्ण महत्त्व देऊन, त्याची समस्या जाणून घेऊन उपाय सांगत असतात. यज्ञ अथवा कोणती पूजा चालू असतांना साधक लघुसंदेशाद्वारे नामजप विचारतात. अशा वेळी काका त्याही स्थितीत वेळ काढून सगळे उपाय तत्परतेने कळवतात.’’

श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ याविषयी म्हणाल्या, ‘‘सध्या दळणवळण बंदीमुळे मी बराच काळ आश्रमात आहे. तेव्हा मी जवळून पाहिले. त्यांची रात्रीची झोपही पूर्ण होत नाही. जेवण वाढलेले असेल आणि तेवढ्यात साधक आले, तरी ते तिथेच नामजप शोधून सांगतात. एक दिवस त्यांनी सकाळी न्याहारी केली नव्हती. दुपारी महाप्रसादाची वेळ उलटून गेली, तरी ते उपाय सांगण्याचीच सेवा करत होते. असे असूनही त्यांची कोणत्याही कारणाने चिडचिड होत नाही. कधी नामजपादी उपाय करतांना ग्लानी येऊन संबंधित साधकाला त्रास होऊ नये; म्हणून ते मला सांगतात की, ‘नामजपादी उपाय करतांना मला झोप लागली, तर उठव.’ ‘आपल्या साधकांचे त्रास दूर व्हायला हवेत’, ‘त्यांची साधना व्हायला हवी’, ‘साधक सतत छानच रहावे’, असा त्यांना ध्यास लागला आहे. हा समष्टी ध्यास आहे.’’

महर्षींच्या आज्ञेने साधकांच्या रक्षणासाठी समुद्रकिनारी श्री कालिमातेचा जप करतांना १. सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ, त्यांच्या मागे सनातन संस्थेचे अन्य संत आणि साधक (२९.११.२०१८)

 

८. सद्गुरु काकांची सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता !

८ अ. साधकाने त्रास कळवण्यापूर्वीच ईश्‍वरी प्रेरणेने उपाय करणे

‘‘सद्गुरु काकांच्या उपायांच्या तळमळीमुळे ईश्‍वर त्यांना झोपेतही सुचवतो की, ‘अमूक साधकाला त्रास होत आहे.’ अशा वेळी ते झोपेतूनही उठून साधकांसाठी नामजप करतात. ‘केवळ साधकाने विचारल्यानंतरच नामजप सांगितला, असे नाही’, तर त्या साधकाचा नामजप विचारण्यासाठीही वेळ जाऊ नये, यासाठी ते प्रयत्न करतात. हे सर्व ते न थकता, न कंटाळता अविश्रांत करत असतात.’’

८ आ. बाळंतपणासाठी रुग्णालयात गेलेल्या स्त्रीला उपाय सांगतांना सद्गुरु गाडगीळ काकांच्याही पोटात वेदना होणे

श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांनी सांगितले, ‘‘साधकांसाठी उपाय शोधतांना ‘तो साधक मीच आहे’, अशी एकरूपता ते साधतात. मी दौर्‍यावर असतांना एकदा मला काकांनी भ्रमणभाषवर कळवले. ते म्हणाले, ‘‘आज एक मी विलक्षण प्रसंग अनुभवला. एक साधिका गरोदर होती. तिच्या प्रसुतीतील आध्यात्मिक अडचणी दूर होण्यासाठी नामजप करत असतांना मी स्वतः गरोदर असल्याचे अनुभवले. त्या साधिकेला जशा वेदना होत होत्या, तशाच वेदना मलाही जाणवत होत्या.’’ खरेच आहे, ‘पुरुष असूनही महिलांच्या समस्या जाणवून त्यांवर उपाय सांगणे’, हे अत्यंत विलक्षण आहे. ईश्‍वराला स्त्री-पुरुष काही भेद नसतोच ना !

त्या वेळी काकांना जाणवले होती की, ‘ते गर्भातील बाळ त्यांना सांगत होते, ‘‘लवकर उपाय सांग म्हणजे मी लगेच बाहेर येईन. मला आईला वाचवायचे आहे. ‘मी नाही वाचलो’, तरी चालेल.’’ खरेच, त्या प्रसंगांत काकांनी नामजप सांगितल्यानंतर ५ मिनिटांत बाळ बाहेर आले आणि आईचा जीव वाचला. आधुनिक वैद्यांनी सांगितले होते, ‘‘बाळ लवकर बाहेर आले नसते, तर त्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असता.’’ (आजच्या काळात हे अद्भुत वाटेल; मात्र आद्य शंकराचार्य यांच्या अनेक अनुभूतींपैकी एका अनुभूतीत ते स्वत:च्या शरिराबाहेर येण्याची एक अनुभूती होती. त्यामुळे अध्यात्माच्या अभ्यासाच्या दृष्टीने ही अनुभूती प्रसिद्ध करत आहोत. – संपादक)

८ इ. समष्टी स्तरावर होणार्‍या त्रासांविषयी आंतरिक जाणीव होऊन स्वतःहून उपाय करणे

श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ यांनीही याविषयीचे काही अनुभव सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘सद्गुरु काका साधकाने त्रास सांगण्यापूर्वीच साधकासाठी आध्यात्मिक स्तरावर उपाय करतात, हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. समष्टी स्तरावरही एखादे आक्रमण असल्यास ईश्‍वर काकांना आधीच पूर्वसूचना देतो. त्याप्रमाणे ते नामजपादी उपायही करतात आणि नंतर विचारतात की, ‘अमूक वेळी काही जाणवले का ?’ खरेच, त्या वेळी तसा त्रास झालेला असतो आणि नंतर सद्गुरु काकांनी उपाययोजना केल्यावर तो दूर झालेला असतो. ईश्‍वराने सुचवलेले विचार ग्रहण करणे, त्यानुसार आध्यात्मिक स्तरावर उपाय करणे आणि नंतर त्याविषयी विचारपूस करून त्रासांचे निवारण झाल्याची निश्‍चिती करणे, हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे.

सध्या संस्थास्तरावर होणारे अनेक सत्संग सद्गुरु काकांनी उपाय केल्यामुळे चालू आहेत. अनेक वेळा सद्गुरु काकांनी उपाय केल्यानंतरच सत्संग आरंभ होऊ शकतो.’’

८ ई. त्रास नेमकेपणाने न सांगताही अडचण अचूक शोधून उपाय करणे

श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘प्रसारातील एका साधकांनी ‘फ्रोझन शोल्डर’मुळे त्यांचा हात दुखत असल्याचे सांगितले. उजवा हात दुखतो कि डावा हात, हे विचारण्यासाठी संपर्क केला असता, त्यांना संपर्क होऊ शकला नाही. सद्गुरु काकांना हे कळवले असता त्यांनी लगेच सांगितले की, तो उजवा हात आहे. नंतर संपर्क झाल्यावर त्या साधकानेही सांगितले की, माझा उजवाच हात दुखत होता.’’

८ उ. गाडगीळ दांपत्यातील खेळीमेळीचे संवाद !

श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘पूर्वी मी सूक्ष्म संदर्भात सेवा करायचे. तेव्हा ते मला म्हणायचे, ‘‘मला थोडेतरी सूक्ष्मातील शिकव.’’ त्यांना त्या वेळी जिज्ञासा असायची की, ‘सूक्ष्मातील कसे दिसते ?’, ‘ती प्रक्रिया कशी असते ?’ आता त्यांच्यात सूक्ष्मातील जाणण्याची अशी अफाट क्षमता निर्माण झाली आहे. मध्यंतरी एकदा ते मला गमतीने म्हणाले, ‘‘बघ, आता मीपण सूक्ष्म संदर्भात सेवा करतो कि नाही !’’ परात्पर गुरु डॉक्टर असा प्रवास करून घेतात.

८ ऊ. साधकांना नामजपादी उपाय सांगण्याच्या सेवेविषयी सद्गुरु गाडगीळकाकांचा भाव !

‘साधकांना नामजपादी उपाय सांगण्याच्या सेवेच्या माध्यमातून समष्टी सेवा करण्याची संधी मिळाली; म्हणून माझ्याकडून सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त होते. आधी साधकांप्रती कृतज्ञता वाटायची, आता साधकांप्रती प्रेमभाव वाटतो. ‘सगळे आपलेच आहेत’, या प्रेमभावातून नामजप सांगतो. प्रेमभावाने केलेल्या उपायांचा साधकांनाही लवकर लाभ होतो. या सेवेत प्रत्येक प्रसंगात नवीन शिकायला मिळते. हे अनंताचे ज्ञान आहे. सूक्ष्मातील ज्ञानाला सीमाच नाही !’, असे सद्गुरु काका या वेळी म्हणाले.

 

९. साधकांच्या रक्षणासाठी परात्पर गुरु
डॉक्टरांप्रमाणेच प्राणांतिक संकटे झेलणारे सद्गुरु गाडगीळकाका !

श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांवर सूक्ष्मातील अनेक आक्रमणे होतात. साधकांचे सर्व त्रास ते स्वतःवर घेत असतात. सद्गुरु काकाही साधकांना नामजपादी उपाय सांगून त्यांचे त्रासांपासून रक्षण होण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्यावरही प्राणांतिक आक्रमणे होतात. ईश्‍वरी कृपेने देव त्यांचे रक्षण करतो. गुरुदेवांचा संकल्प आणि काकांची साधकांचे त्रास दूर करण्याची तळमळ यांमुळे हे घडते.’’

याविषयी सद्गुरु काकांनी त्यांना आलेला एक अनुभव सांगितला. ते म्हणाले, ‘‘एकदा एक साधक भ्रमणभाषवर त्रास सांगत होते. त्यांना नामजप सांगितल्यानंतर मला गळून गेल्यासारखे झाले आणि पुढचा अर्धा घंटा काहीच करता आले नाही. त्या वेळी मी चिंतन केले, ‘असे आक्रमण का झाले. त्या वेळी लक्षात आले की, ‘देवाने सुचवलेले उपाय सहज सांगितले. त्या वेळी माझ्यात शरणागतभाव किंवा ‘ईश्‍वराने सुचवले; म्हणून सांगू शकलो’, असा कृतज्ञताभाव नव्हता.’ आपल्यात शरणागतभाव असेल, तर मृत्यूही टळू शकतो.’’

श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘गुरूंचा आधार पाठीशी असल्यामुळे त्यांना मृत्यूचेही भय वाटत नाही.’’

 

१०. कोणत्याही प्रसंगात निराश न होता श्रीगुरूंचे
आज्ञापालन करून अखंड प्रयत्न करणारे सद्गुरु गाडगीळकाका !

श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ यांनी विचारले, ‘‘सद्गुरु काका साधनाप्रवासात गुरुदेवांनी तुम्हाला अनेक वेळा तुमच्या चुका सांगितल्या आहेत; पण तुम्ही कधीच निराश झाला नाहीत. वर्ष २०१४ मध्ये तुमची आध्यात्मिक पातळी वाढली नाही. त्या वेळीही तुम्ही अंतर्मुख होण्याच्या दिशेनेच प्रयत्न केले. तुम्ही सतत सकारात्मक रहाण्यासाठी कसे प्रयत्न केले ?’’

सद्गुरु काका म्हणाले, ‘‘पहिले स्वीकारायला हवे. वर्ष २०१४ मध्ये वाटले की, आपल्या चुकीमुळेच आपली पातळी वाढली नाही. प्रामुख्याने असे लक्षात आले की, समष्टीसाठी काही करण्याचा विचार, व्यापक विचार होत नव्हता. केवळ मी आणि माझी सेवा इतकाच विचार त्या वेळी होत असे. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी दिशा दिल्याप्रमाणे स्वतः चिंतन करून आणि साधकांना विचारून विचारून प्रयत्न केले. पू. संदीप आळशी यांनीही साहाय्य केले. पहिले २-३ मास झगडावे लागले. नंतर या प्रयत्नांतून आनंद मिळू लागला. पूर्वीही परात्पर गुरु डॉक्टर सेवेतील चुका सांगत असत, तेव्हा ‘साधना हेच आता आपले विश्‍व आहे. ईश्‍वराच्या चरणी जायचे आहे, तर प्रयत्न करायला हवे’, असे विचार येत असत.’’

श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांनी वेळोवेळी सांगून काकांची स्वेच्छा संपवली. समष्टीमध्ये व्यापकत्व वाढल्यानंतर आपोआपच पातळी वाढली. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले की, काकांनीही त्वरित १०० टक्के आज्ञापालन केले. साधनेमध्ये आज्ञापालन हा सर्वोच्च गुण आहे. त्यांनी जे गुण स्वतःमध्ये नव्हते, ते आत्मसात केले. कधी त्यांनी एवढा साधक परिवार जोडला, माझे मलाच कळले नाही. त्यांना निराशा कधीच अजिबात आली नाही. त्यांनी अखंड प्रयत्न केले. आतापर्यंत एकही दिवस विश्रांती घेतली नाही. ‘सारखे सारखे तेच तेच काय करायचे’, ‘कंटाळा आला, आता थोडा विरंगुळा हवा’, असे विचार त्यांच्या मनात कधीच येत नाहीत, ही मोठी गुरुकृपा आहे !’’

कलियुगाचे वैशिष्ट्य पत्नीने पतीचा सन्मान करणे !

‘पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी सद्गुरुपद गाठल्यावर त्यांच्या पत्नी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांचा सन्मान केला !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

 

११. साधनेत पुढे असलेल्या पत्नीविषयी आदरभाव असलेले अहंशून्य सद्गुरु गाडगीळकाका !

श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘सद्गुरु काका श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांच्याविषयी आदराने बोलतात. काका त्यांच्याकडून शिकण्याच्या स्थितीत असतात.’’

११ अ. अध्यात्मात उन्नत असलेल्या पत्नीकडून शिकण्याच्या स्थितीत रहाणे

‘तुमचा काकूंविषयी कसा भाव असतो ?’, या प्रश्‍नाला सद्गुरु काकांनी दिलेल्या उत्तरातून त्यांच्या उदात्त विचारांचे दर्शन घडते. ते म्हणाले, ‘‘साधनेत येण्यापूर्वीही आम्ही पती-पत्नी म्हणून एकमेकांचा आदर करत होतो. आता त्यांची आध्यात्मिक पातळीही अधिक असल्याने त्या आदरणीयच आहेत. मला कुठेही अडचण आली किंवा काही अडले की, त्यांना सहजतेने विचारणे होते. ‘कसे विचारायचे’, असे वाटत नाही.’’

श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांनी सांगितले, ‘‘त्यांचा अहं मूळातच अल्प आहे. ते एकदा म्हणाले, ‘‘पुष्कळ वेळा पतीच्या मागून पत्नीची वाटचाल होते. आता तुझ्यामागे मी येणार आहे.’’ त्यांच्यात पुरुषी अहं नाही. ते सर्वप्रकारे नम्र आहेत.’’

११ आ. सन्मानानंतर परात्पर गुरु डॉक्टरांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी
या नात्याने श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार !

श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांनी सद्गुरुपदी विराजमान झाल्याप्रीत्यर्थ त्यांचा सन्मान केल्यानंतरही सद्गुरु गाडगीळकाकांनी ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी’ या नात्याने श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला ! सद्गुरु काकांचा तो भाव आणि त्याच वेळी हात जोडलेल्या मुद्रेत असलेल्या श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांच्या डोळ्यांतून अखंड वाहणारे भावाश्रू हे कलियुगातील अलौकिक दृश्य होते. दोघांच्याही उच्च आध्यात्मिक स्थितीचे दर्शन त्या प्रसंगातून घडले. ‘सर्व साधकांच्या आशीर्वादाने आम्हाला मोठे केले’, असा भाव श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांनी या वेळी व्यक्त केला.

सद्गुरु काकांनी श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ यांच्याही चरणांवर डोके ठेवून त्यांना नमस्कार केला. श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांनीही सद्गुरु काकांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला.

११ इ. श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांना उमगलेली विवाहाची आध्यात्मिक व्याख्या !

श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘विवाहाच्या वेळी आम्ही एकमेकांच्या गळ्यात हार घातले. मी जेव्हा संत झाले, तेव्हा माझा सन्मान करतांना त्यांनी माझ्या गळ्यात हार घातला. त्या वेळी मी खर्‍या अर्थाने मायेतून मुक्त झाले. आता त्यांना हार घालण्याची देवाने मला संधी दिली आहे. ‘विवाहातील हार कशासाठी आहेत, तर विवाहाच्या वेळी गळ्यात पडणारे एकमेकांचे हार एकमेकांना मुक्त करण्यासाठीच आहेत’, ही विवाहाची खरी व्याख्या प.पू. डॉक्टरांमुळे आता कळली.’’

 

१२. सद्गुरु गाडगीळकाका यांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्यासंदर्भात व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘आपण आधी कोण होतो आणि आता कसे झालो आहोत ? परात्पर गुरु डॉक्टरांनी आपल्यासाठी काय नाही केले ? त्यांनीच सगळे संस्कार केले. प्रत्येक अंगाने मोठे केले. स्वतःच्या मुलावर आपण असे करू शकत नाही, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी आपल्याला घडवले आहे. हे सगळे परात्पर गुरु डॉक्टरांचे दिव्यत्व आहे’, असा कृतज्ञताभाव सद्गुरु गाडगीळकाकांनी या वेळी व्यक्त केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment