दारूड्यांना ‘तळीराम’ म्हणणे भगवान श्रीरामाचा अवमानच होय !

राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ या नाटकात ‘तळीराम’ नावाचे पात्र असून तो मद्यपी दाखवला आहे. हे नाटक मराठी नाट्यक्षेत्रात प्रसिद्ध असल्याने आणि त्यातही हे पात्र तितेकच प्रसिद्ध असल्याने जेव्हा कुठे मद्यपी, दारूड्या व्यक्तीचा उल्लेख करायचा असतो, तेव्हा त्याला ‘तळीराम’ अशी उपमा दिली जाते; मात्र ते देतांना प्रभु श्रीराम यांचा अवमान होत आहे, हे हिंदूंच्याच लक्षात येत नाही. अनेक दैनिके, चित्रपट आदींमध्ये, तसेच अनेकदा नेत्यांच्या भाषणांतून तसा उल्लेख आर्वजून केला जातो. सध्या कोरोनामुळे असलेल्या दळणवळण बंदीत मद्यविक्रीला अनुमती दिल्यानंतर अनेक दैनिकांकडून मद्यपींचा उल्लेख ‘तळीराम’ असाच करण्यात आला, जो चुकीचा आहे. जरी एखाद्या पात्राचे नाव ‘तळीराम’ असे आहे आणि तो दारूड्या दाखवला असला, तरी त्या नावाने दुसर्‍याचा उल्लेख करणे चुकीचे आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे. दारूड्याला दारूडाच म्हणणे अधिक सयुक्तिक ठरते. त्यामुळे दारूड्यांचा उल्लेख कुणी ‘तळीराम’ करत असेल, तर हिंदूंनी त्याला वैध मार्गाने विरोध करणे अपेक्षित आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment