वाटचाल विश्‍वगुरुपदाकडे… !

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी २२ मे या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचा अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला. त्या संबंधित प्रस्तावावर १९ मे या दिवशी १९४ देशांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षर्‍या केल्या. भारतियांसाठी ही निश्‍चितच अभिमानास्पद गोष्ट आहे. आज कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. ‘कोरोनाचा शेवट केव्हा, कुठे होणार ?’, याची चिंता प्रत्येक देशाला लागलेली आहे. सद्य:स्थितीत कोरोनाला थोपवण्यासाठी भारताने तात्काळ कार्यवाहीत आणलेली दळणवळण बंदी, जगातील देशांना केलेला औषधांचा पुरवठा, तसेच अन्य स्तरांवर घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय यामुळे भारताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या सगळ्यांतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे भारतातील हिंदु संस्कृतीच्या मार्गाकडे आज संपूर्ण जग ‘अंध:काराला दूर करणारा दीप’ म्हणून आशेने पहात आहे; त्या मार्गाने मार्गक्रमण करू पहात आहे. ही प्रत्येक हिंदु धर्माभिमान्याला आनंद देणारी गोष्ट आहे.

भारताला ‘हिंदु संस्कृती’चा वारसा लाभलेला असल्याने उपासना करणार्‍या हिंदूंना धर्मचैतन्याचे बळ मिळत आहे. धर्माचरणाच्या कृतींमुळे आपोआपच सुरक्षितता राखली जाते. नमस्कार करणे, घरात प्रवेश करण्यापूर्वी हातपाय धुणे आदी कृती या सामाजिक स्वास्थ्य उत्तम राखण्यास पूरक आहेत. गेल्या काही वर्षांत विदेशातून आलेले विविध प्राणघातक आजार, त्यामुळे होणारी जीवितहानी यांविषयी ऋषिमुनींनी सहस्रो वर्षांपूर्वी, तसेच काही संतांनीही लिहून ठेवलेले साहित्य या निमित्ताने सामाजिक माध्यमांतून पुढे आले. मोठ्या यज्ञयागापासून सोप्या अग्निहोत्रापर्यंत वातावरणशुद्धी करून संरक्षककवच निर्माण करणार्‍या कर्मकांडादी उपासना भारतातील धार्मिक जनता करत आहे. आज त्याचे महत्त्व जगात वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाले आहे. आयुर्वेदिक प्रतिबंधात्मक औषधांचे आणि त्यात सांगितलेल्या सात्त्विक, संयमित, चौरस, तसेच ऋतुकालानुसार असलेल्या आहारविहाराचे महत्त्व अशा दुर्धर आजारांपुढे आता आपोआप समोर येत आहे. रोगप्रतिबंधक असणारी हळद भारतियांच्या जेवणात असल्याने त्यांची प्रतिकारक्षमता चांगली असल्याचे लक्षात आले. योगाभ्यासातील कपालभांती ही शुद्धीक्रिया फुफ्फुसांची क्षमता वाढवणारी आहे. ही समृद्ध भारतीय परंपरा आहे. भारतातील विविध आध्यात्मिक संस्था कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी नामजपादी प्रतिबंधात्मक आध्यात्मिक उपाय सांगत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेत भारताला मिळालेले प्रमुख स्थान या संकटकाळात भारतीय संस्कृतीचे महत्त्व जगाला पटत चालल्याचे द्योतक आहे. पुढे अशीच वाटचाल होत राहिली, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘भारत लवकरच विश्‍वगुरुपदी विराजमान होईल’, यात शंका नाही !

– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात