रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर येऊन समाजकंटकाचा साधकांशी विनाकारण वाद

  • समाजकंटकाच्या विरोधात आश्रम व्यवस्थापनाकडून फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार 
  • आश्रमावर काचेच्या बाटल्या फेकून मारण्याचाही होता डाव

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – रविवार, १९ एप्रिलच्या रात्री एका समाजकंटकाने रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन तेथील साधकांना नाहक काही प्रश्‍न विचारले आणि भ्रमणभाषवरून काही व्यक्तींना अन् पोलिसांना आश्रमाविषयी खोटी माहिती दिली. त्याचप्रमाणे या व्यक्तीचा त्याच रात्री आश्रमावर काचेच्या रिकाम्या बाटल्या फेकून दहशत निर्माण करण्याचा हेतू होता. या दोन्ही घटनांविषयी आश्रमाचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. दोन्ही घटनांच्या सी.सी.टी.व्ही. कॅमेर्‍यातील छायाचित्रणाची कॉपी पोलिसांना देण्यात आली आहे. अधिक चौकशीअंती या व्यक्तीचे नाव श्रीकृष्ण विनायक दुर्भाटकर असून ते मडकई येथील आहेत, असे समजले.

तक्रारीत म्हटले आहे की, १९ एप्रिलच्या रात्री ८.५४ वाजता एक अज्ञात व्यक्ती रामनाथी येथील सनातन आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर GA-05-K 4760 या क्रमांकाच्या दुचाकी वाहनावरून येऊन आश्रमातील वाहनांची संशयास्पद पहाणी करत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर ही व्यक्ती आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबली आणि स्वत:च्या भ्रषणभाषवरून अन्य एका व्यक्तीला चुकीची माहिती देत होती. या व्यक्तीचे बोलणे ऐकून आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या एका साधकाने त्या व्यक्तीला ‘तुमचे नाव काय ? तुम्हाला काय हवे आहे ?’, असे विचारले. त्यावर या व्यक्तीने काही उत्तर दिले नाही. पुन्हा त्या व्यक्तीला तिचे नाव विचारले असता तिने तिचे नाव ‘दुर्भाटकर’ असल्याचेे सांगितले.

 

समाजकंटकाने पोलिसांनाही खोटी माहिती दिली !

काहीही ठाऊक नसतांना आश्रमाच्या विरोधात बोलत असणारी ही व्यक्ती उद्दामपणे आणि स्वत:ला काहीही अधिकार नसतांना आश्रमातील साधकालाच ‘इथे काय चालू आहे ?  इथले विश्‍वस्त आहेत का ?’, असे प्रश्‍न विचारत होती. इथे कोण आहेत, ते मला सांगा मी ढवळीकरांकडून (स्थानिक आमदार श्री. सुदिन ढवळीकर) आलो आहे’, असेही ती म्हणाली. या व्यक्तीने नंतर पोलिसांनाही खोटी माहिती दिली.

१५ मिनिटांनी गस्तीवरील पोलीस आले आणि त्यांनी आम्हाला ‘दुर्भाटकर यांनी १०० क्रमांकावर तक्रार केल्यामुळे आलो’, असे सांगितले. त्यांनी आमच्याकडून माहिती घेतली. दुर्भाटकर यांनी सांगितल्याप्रमाणे येथे काहीही नसल्याचे लक्षात आल्यावर ते निघून गेले.

 

आश्रमावर मद्याच्या बाटल्या फेकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

या घटनेनंतर पुन्हा त्याच रात्री ११ वाजता एका दुचाकी वाहनावरून २ समाजकंटक श्री शांतादुर्गा मंदिराकडून रामनाथी मंदिराच्या दिशेने जात असतांना त्यांच्याकडे असलेल्या रिकाम्या मद्याच्या बाटल्यांचा खोका आश्रमापासून साधारण ५० फुटांवर पडला. तो तसाच रस्त्याच्या मधोमध टाकून ते रामनाथी देवस्थानच्या दिशेने गेले. या खोक्यात मद्याच्या एकूण ५ रिकाम्या बाटल्या होत्या. या वेळी एक व्यक्ती श्री शांतादुर्गा कवळेच्या बाजूने होंडा युनिकॉर्नसारख्या दिसणार्‍या दुचाकी वाहनावर आश्रमाच्या दिशेने तोंड करून संशयास्पदरित्या उभी होती. साधारण रात्री ९.५४ च्या सुमारास जी व्यक्ती आश्रमाजवळ येऊन थांबली होती, ती हीच व्यक्ती होती, याची आम्हाला खात्री आहे.

८.४.२०२० आणि ११.४.२०२० या दिवशीही काही समाजकंटकांकडून मद्याच्या बाटल्या फेकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याची प्रत तक्रारीसमवेत जोडली आहे. एका मागून एक घडणार्‍या या घटनांमुळे आश्रमाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे. आश्रमाविषयी असलेल्या द्वेषापोटी आणि आकसापोटी हे समाजकंटक वारंवार दळणवळण बंदीच्या (लॉकडाऊनच्या) नियमांचे उल्लंघन करत आहेत. या सर्व गोष्टींची नोंद घेऊन दुर्भाटकर यांची चौकशी करावी आणि समाजकंटकांवर कायद्यानुसार कडक कारवाई करावी, अशी मागणी आश्रम व्यवस्थापनाने केली आहे.

या तक्रारीची प्रत दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठवण्यात आली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment