कोरोनाची दुसरी बाजू म्हणजे भारतियांच्या दृष्टीने एक इष्टापत्तीच !

सध्या जवळपास सर्व रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सरासरी बंदच आहेत, आपत्कालीन कक्षामध्ये कोणतीही गर्दी नाही. कोरोनाबाधित किंवा त्यासंबंधी संशयित रुग्ण सोडला, तर इतर आजाराचा नवीन रुग्ण रुग्णालयामध्ये येत नाही. खासगी दवाखानेही बंद आहेत. रस्त्यावर वाहने नसल्यामुळे अपघात होत नाहीत. ना घायाळ, ना मृत्यू. कोणाला हृदयविकाराचा झटका, मेंदू रक्तस्राव किंवा उच्च रक्तदाब यांसारख्या समस्याही झपाट्याने घटल्या आहेत. इतकी आजारामध्ये घट कशी काय झाली ?, हा चमत्कारच म्हणावा लागेल.

 

हे असे कसे घडले ?

स्मशानात येणार्‍या मृतदेहांच्या संख्येतही घट झाली आहे ? कोरोना विषाणूने इतर सर्व रोगांचा नाश केला आहे कि काय ? नाही… बिलकूल नाही ! जिथे कोणताही गंभीर आजार नसतो, तिथे गल्लाभरू डॉक्टर तो अवास्तव बनवून आजाराला गंभीर स्वरूप देत होते. त्यामुळे नवीन कॉर्पोरेट रुग्णालये, रक्त तपासणी करणार्‍या प्रयोगशाळा (टेस्टिंग लॅब्स) उभ्या राहिल्या. त्याला जोड मिळाली आरोग्य विम्याची (‘हेल्थ इन्श्युरन्स’ची). ही एक भयंकर कुव्यवस्थाच बनली. थोड्याशा थंडी आणि खोकल्यावर सहस्रो रुपयांच्या तपासण्या करायला लावून लोकांना खुलेआम लुटण्याचे वा खड्ड्यात घालण्याचे काम चालू होते.

आता कोरोनामुळे हे सगळे अचानक बंद झाले. लोकांना सत्य कळले. घरगुती उपचारांचे महत्त्व कळले. आता लोकांचे रस्त्यावरचे आणि उपाहारगृहांमधील बाहेरचे खाणे बंद झाले. ते तर आता घरातील जेवण खाणे पसंत करत आहेत. जंक फूड नाही, नाक्यावरचा वडापाव नाही, चायनीज नाही. अनेक लोकांना घरच्या जेवणाची किंमत कळू लागली. दुसरे म्हणजे लोकांचे अनेक अनावश्यक खर्च बंद झाले. उपाहारगृहात (हॉटेलिंग) जाणे नाही, चित्रपट (मुव्ही) – नाटक (ड्रामा) नाही. अनावश्यक मार्केटिंग -शॉपिंग नाही. रात्रीचे आइस्क्रीम खाणे किंवा ज्यूस पिणे नाही. उगाच भटकणे नाही.

हा भेद कोरोनामुळे झाला आहे. सगळ्यात म्हणजे तंबाखू, गुटखा, दारू यांची उपलब्धता प्रचंड घटल्यामुळे व्यसनाधीनताही घटली. व्यसनांमुळे घरात होणारा क्लेश बंद झाला. आई-वडील, पत्नी, मुले आणि कुटुंब काय असते ?, याची जाणीव ज्यांना नव्हती, त्यांना प्रत्यक्षानुभव आला. घरात स्वच्छता वाढली, सामूहिक टीव्ही दर्शन, वाचन, गायन, स्पर्धा, अभ्यास, विचारमंथन वाढले. वायू, ध्वनी, जल यांचे प्रदूषण नाही. सार्वजनिक ठिकाणी कचरा नाही, धकाधकीचे जीवन नाही. आणखीही काही बरेच आहे की, जे चांगले घडले आहे, घडत आहे ! दरोडे, घरफोड्या, बलात्कार, छेडछाड, खून, मारामारी, दंगल, नळावरची भांडणे आदी गुन्हेगारी घटली. भ्रष्टाचार घटला. काय काय घटले, ते किती किती म्हणून सांगावे ?

 

कोरोना विषाणू आत्मपरीक्षण आणि चिंतन यांच्यासाठी आवश्यक !

कोरोना विषाणूमुळे माणसाच्या मर्यादा, तसेच मानवी अहंकाराच्या, तथाकथित विज्ञानवादाच्या, चंगळवादी भौतिक विकासवादाच्या मर्यादा ठळकपणे अधोरेखित झाल्या. फोलपणा दिसून आला. स्वतःला स्मार्ट समजणारा भांडवलवादी आधुनिक माणूस हा वास्तवात किती दुर्बल, खुजा, डरपोक आणि संकुचित आहे, याची जाणीव झाली. आपल्या काही धारणा किती चुकीच्या आणि निरुपयोगी आहेत, हे प्रकर्षाने जाणवले. ही गोष्ट आत्मपरीक्षण आणि चिंतन यांसाठी अत्यंत आवश्यक ठरणारी !

 

एकंदर कोरोनाच्या परिणामाच्या दुसर्‍या बाजूचा
विचार करता भारतियांच्या दृष्टीने ही एक इष्टापत्तीच ठरावी !

या कोरोनामुळे जर प्रत्येक माणूस जागा झाला असेल, तर त्याला जगण्यासाठी गरज किती आहे, ती नक्कीच समजली असेल. आधुनिक चंगळवादाच्या मर्यादा कळल्या असतील. त्यातून बोध घेतला, तर त्याला आजार, आहार आणि प्रामुख्याने पैसा यांची चिंता अन् हव्यास रहाणार नाही. निदान सतावणार तरी नक्कीच नाही. आज ना उद्या कोरोना विषाणू आटोक्यात येईलच; पण नागरिकांनी याची दुसरी बाजू कायम लक्षात ठेवून गरजा मर्यादित ठेवल्या, डोके ठिकाणावर ठेवले, तर स्वतःसह स्वतःच्या परिवाराचे जीवन मंगलमय होईल आणि त्यातून समाजाचे अन् पर्यायाने देशाचेही नक्कीच कल्याण होईल !

– श्री. राजेंद्र चव्हाण, कार्यकारी संपादक, दैनिक ‘आपला वार्ताहर’, मुंबई.

Leave a Comment