मुसलमान समाज परिपक्वता कधी दाखवणार ?

श्री. चेतन राजहंस

कोरोनाच्या साथीचा प्रतिकार करण्यासाठी संपूर्ण विश्‍वामध्ये विलगीकरण चालू असतांना भारतात मात्र मशिदींमधून एकत्रीकरण होत आहे. दळणवळण बंदी (लॉकडाऊन) लागू होण्याच्या आधीपासूनच खरेतर गर्दी टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येत होती. २४ मार्चला २१ दिवसांसाठी संपूर्ण देशात दळणवळण बंदी लागू झाल्यानंतर तरी या संकटाचे गांभीर्य लक्षात यायला हवे होते; पण अल्पसंख्य समाजाच्या संदर्भात दुर्दैवाने तसे दिसून आले नाही. दळणवळण बंदी होऊनही बर्‍याच ठिकाणी मुसलमान समाज मशिदींमध्ये नमाजपठणासाठी एकत्र जमला. यामुळे संसर्गजन्य कोरोनाचा फैलाव होऊन सामाजिक आरोग्यच संकटात येऊ शकत होते; किंबहुना ते आलेही; पण याचे भान ना नमाजींना आहे ना, त्यांना उपदेश करणार्‍या धार्मिक प्रमुखांना ! मुसलमान समाज परिपक्वता दाखवणार तरी कधी ?, हाच खरं गहन आणि सामाजिक चर्चेचा विषय आहे.

 

१. अज्ञान, असंवेदनशीलता कि उद्दामपणा ?

दळणवळण बंदी अथवा संचारबंदी काही एकाएकी लागू करण्यात आलेली नाही. साधारण मार्चच्या दुसर्‍या आठवड्यापासूनच भारताला कोरोनाचा विळखा पडायला आरंभ झाला. मार्चच्या तिसर्‍या आठवड्यात अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून येऊ लागले. हा संसर्गजन्य रोग तिसर्‍या टप्प्यात पोचू नये, म्हणजेच समूह संसर्ग (कम्युनिटी ट्रान्समिशन) होऊ नये; म्हणून भारत सरकारने कठोर पावले उचलली. प्रचंड आर्थिक हानी होणार असूनही २१ दिवस दळणवळण बंदीचा निर्णय घेतला. याचे पालन करणे, हे प्रत्येक भारतियाचे कर्तव्य आहे; पण मोठ्या प्रमाणात जागृती करूनही जर अल्पसंख्य समुदायातील घटक सरकारी सूचनांचे पालन करणार नसतील, तर याला त्यांचे अज्ञान म्हणायचे, निष्काळजीपणा म्हणायचा, पराकोटीची असंवेदनशीलता म्हणायची कि उद्दामपणा ?

 

२. संशयास्पद हालचाली !

उत्तरप्रदेशातील हरदोई जिल्ह्यात दळणवळण बंदीच्या काळात मशिदींमध्ये मुसलमान नमाजपठण करण्यासाठी एकत्र आले. देहलीतील निजामुद्दीन परिसरात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी तबलीगी समाजाच्या मरकजमध्ये (बैठकीमध्ये) ४-५ सहस्र जणांनी सहभाग घेतला. ‘कोरोना वगैरे काही नाही. हे तर लोकांना धर्मापासून वेगळे करण्याचे षड्यंत्र आहे’, अशी या मरकजमध्ये सहभागी झालेल्यांची भावना होती, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. या मरकजमधून वेगवेगळ्या राज्यांमध्ये गेलेल्या कथित धर्मप्रसारकांमुळे भारतात कोरोनाचा अधिक मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्रातील इचलकरंजी, जामखेड, नेवासा या ठिकाणी, तसेच कर्नाटकातही काही ठिकाणी दळणवळण बंदीच्या काळात मुसलमानांचे नमाजपठण नेमाने चालू होते. जामखेड आणि नेवासा या ठिकाणी मशिदींमध्ये विदेशी नागरिकांचे वास्तव्य आढळून आले. धर्मप्रसारासाठी ते शहरभर फिरले असल्याचेही समोर आले आहे. भारतात धर्मप्रसार करण्यासाठी या विदेशींनी प्रशासनाची अनुमती घेतली होती का ?, हा एक वेगळाच प्रश्‍न आहे; पण एकंदरित या सगळ्या घटना काय दर्शवतात ? ‘आमच्याकडे देशभक्तीचे प्रमाणपत्र मागू नका’, असे म्हणत अल्पसंख्य समाजासह पुरोगामी लोक नेहमी दावे करत असतात; पण या दाव्याला पुष्टी देणार्‍या कृती मात्र करत नाहीत. सरकारी नियमांचे उल्लंघन ही देशभक्ती आहे का ? ‘एकत्र येऊ नका’, असे सांगितले असतांनाही प्रार्थना करण्याच्या नावाखाली गर्दी करणे, आजार लपवणे, पोलीस-प्रशासनाला साहाय्य न करणे, मशिदीमधून लोकांना बाहेर काढणार्‍या पोलिसांवर दगडफेक करणे, ही देशभक्तीची चिन्हे आहेत का ? मास्क वापरतांना त्यावर ‘No NRC’ (नो एन्आर्सी) आणि ‘No CAA’ (नो सीएए) असे लिहिल्याची चित्रेही मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली होती. अल्पसंख्यांकांप्रती समाजमनात असलेला संशय बळावण्यासाठी अशा घटनाच कारणीभूत ठरतात.

 

३. विवेकबुद्धी जागृत ठेवा !

मशिदींमधून पोलिसांनी हुसकावल्यावर पुणे जिल्ह्यातील चिखली येथे इमारतीच्या गच्चीवर एकत्र जमून नमाजपठण करण्यात आले. त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत; पण पुढे काय ? स्वातंत्र्यपूर्व काळात तुर्कस्तानच्या जुलमी खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतातील मुसलमानांनी आंदोलन उभे केले होते. वास्तविक तुर्कस्तानच्या खलिफाच्या विरोधात तेथील जनताही रस्त्यावर उतरली होती. त्यांना खलिफाची राजवट नको होती; पण भारतातील मुसलमानांना मात्र खलिफाचे राज्य वाचवण्यासाठी आंदोलन करत होते. कारण काय, तर तो खलिफा आहे ! मशिदीमध्ये प्रतिबंध केल्यावर गच्चीवर गर्दी करून नमाजपठण करणे काय किंवा तुर्कस्तानचा खलिफा अत्याचारी असूनही भारतातील मुसलमानांनी त्याची गादी वाचवण्यासाठी भारतात आंदोलन चालू करणे काय, या दोन्ही घटना विवेकशून्यतेचीच उदाहरणे नव्हेत काय ? पुरोगाम्यांना ‘विवेकाचा आवाज’ वगैरे जागृत करायचा असेल, तर या ठिकाणी करायला हवा.

सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याचा निकाल देतांना ‘मशिदीमध्ये नमाजपठण करणे, हा इस्लामचा अनिवार्य भाग नाही’, असे नमूद केले होते. असे असतांना प्रार्थनास्थळांमध्ये जाऊनच आणि भोंगे लावूनच नमाजपठण करण्याचा अट्टहास का ? ईश्‍वर हा सर्वव्यापी आणि सर्वशक्तीमान आहे. त्याला मुंगीच्या पायामधील घुंगराचा आवाजही ऐकू येऊ शकतो. त्यामुळे आततायीपणा बाजूला ठेवून मुसलमान बांधवांनी सरकारी सूचनांचे पालन करायला हवे. ‘अल्लाचे बंदे’ या गोष्टींचा विचार करतील का ?

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment