नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सनातन संस्थेचे ६१ वे संत पू. अनंत (तात्या) पाटील यांचा देहत्याग !

पनवेल – नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सनातन संस्थेचे ६१ वे संत पू. अनंत (तात्या) रामचंद्र पाटील (वय ८७ वर्षे) यांनी २५ मार्च २०२० या दिवशी दुपारी ३.३० वाजता देहत्याग केला. गेले काही मास ते वाकण (जिल्हा रायगड) येथे त्यांच्या मुलाकडे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्‍चात २ पुत्र, २ स्नुषा, १ मुलगी, जावई, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे.

पू. अनंत (तात्या) पाटील हे वर्ष १९९४ पासून ते सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत होते. त्यांना वर्ष २०१६ मध्ये पेण येथील सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात संत घोषित करण्यात आले होते.

पू. तात्या यांनी ‘दैनिक सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अनेक वर्षे केली. वृद्धापकाळातही लांबपर्यंत चालत जाऊन ते ‘दैनिक सनातन प्रभात’चे वितरण करत. ते सनातन संस्थेचा अंगफलक आणि टोपी प्रतिदिन घरात अन् बाहेर जातांनाही दिवसभर परिधान करत, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अत्यंत कठीण परिस्थितीत पू. तात्यांनी अखंड नामजप करून अनेक अडचणींवर मात केली. ‘निरपेक्षपणे प्रत्येक कृती करणे’, हा तात्यांचा स्थायीभाव होता. वृद्धापकाळीही भगवंतावरील दृढ श्रद्धेमुळे कठीण प्रसंगांतही ते आनंदावस्थेत होते. ‘आपल्या समवेत परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. भक्तराज महाराज हे सतत आहेत’, असा त्यांचा भाव सदैव असे. त्यामुळे वृद्धापकाळात त्यांच्या पत्नी सविताबाई यांचे निधन झाल्यावरही त्यांना घरात एकटे वाटत नसे.

काही वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले रुग्णाईत असतांना पू. तात्यांनी त्यांच्यासाठी नामजप केला होता.

नागोठणे (रायगड) येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मस्थानी ते अनेक वर्षे प्रतिदिन जप करण्यासाठी येत. ‘पू. तात्यांनी जन्मस्थानाच्या सात्त्विकतेचा लाभ करून घेतला’, असे गौरवोद्गार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. तात्यांविषयी काढले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात