सुखी आणि निरोगी आयुष्यासाठी सामाजिक प्रसारमाध्यमांपासून लांब रहा ! – संशोधन

सध्या भारतीय जनतेकडूनही सामाजिक प्रसारमाध्यमांचा अधिक वापर होतांना दिसत आहे. हे संशोधन त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे !

बर्लिन – जर आपल्याला सुखी आणि निरोगी रहायचे असेल, तर फेसबूकसारख्या सामाजिक प्रसारमाध्यमांपासून आपल्याला अंतर राखावे लागेल. सध्या लोक फेसबूक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या विविध माध्यमांवर घंटोन्घंटे वेळ घालवतात. यामुळे त्यांचा वेळ वाया जातोच; पण ते आजारी पडण्याची किंवा तणावग्रस्त होण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे सुखी आयुष्यासाठी दिवसभरातून केवळ २५ मिनिटेच ‘सोशल मीडिया’चा वापर करायला हवा, असे संशोधन ‘कॉम्प्युटर इन ह्यूमन बिहेवियर’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे. संशोधनकर्त्यांनी २८६ जणांचे निरीक्षण करून हे संशोधन केले आहे. हे सर्व जण दिवसभरात सरासरी १ घंट्यांपेक्षा अधिक वेळ सामाजिक प्रसार माध्यमांचा वापर करत होते. त्यांच्यावर ३ मासांपर्यंत केलेल्या संशोधनात वरील गोष्ट उघड झाली आहे.

या संशोधनात निदर्शनास आले आहे की,

१. २५ मिनिटांपेक्षा न्यून वेळ सामाजिक प्रसार माध्यमांचा वापर करणारे अधिक सुखी होते. तसेच त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा झाली आणि त्यांनी कुटुंबाला पुरेसा वेळही दिला.

२. जर्मन युनिव्हर्सिटीचे प्रमुख संशोधक ज्युलिया ब्रिलोवास्किया यांनी सांगितले की, फेसबूकचा वापर न्यून केल्यानंतर लोक आधीपेक्षा अधिक सक्रीय दिसले. तसेच पूर्वीच्या तुलनेत त्यांचे सिगारेटचे व्यसनही न्यून झाल्याचे दिसून आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment