‘मास्क’च्या वापराविषयी काही महत्त्वाची सूत्रे

‘सध्या कोरोना १९ विषाणूंच्या (Covid 19 च्या) भीतीमुळे समाजात ‘मास्क’च्या वापराविषयी अनेक संभ्रम आहेत. प्रत्येकाला वाटते, ‘या विषाणूंपासून आपले रक्षण होण्यासाठी आपण मास्क वापरावा.’ ‘प्रत्यक्षात खरोखरच मास्कमुळे कोरोना १९ विषाणूचा संसर्ग होण्यापासून आपला बचाव होऊ शकेल का ? तसे होणार असेल, तर यासाठी खरोखरच कोणत्या प्रकारचा मास्क आवश्यक आहे ? तो वापरण्याची काही विशिष्ट पद्धत आहे का ? त्याच्या मर्यादा कोणत्या आहेत ?’, याविषयीची महत्त्वाची माहिती आज आपण समजून घेणार आहोत.

‘कोरोना १९ विषाणूबाधित रुग्णाकडून अथवा अन्य प्रकारे त्या विषाणूंचा आपल्याला संसर्ग होऊ नये’, यासाठी खास प्रकारचा ‘एन् ९५’ हा मास्क उपयोगी आहे. तो बाजारात सहज उपलब्ध नाही. तो आता कोरोना १९ विषाणूंच्या बाधेने ग्रस्त रुग्णाची देखभाल करणार्‍यांसाठी वापरण्यात येतो.

 

१. निरोगी व्यक्तींनी मास्क वापरण्याची आवश्यकता नाही !

‘कोरोना १९ विषाणूंचा संसर्ग होऊ नये’, यासाठी सर्वसाधारण व्यक्तींनी, म्हणजे ज्यांना श्‍वसनविषयक (खोकला, सर्दी, श्‍वासोच्छ्वासास त्रास होणे यांसारखी) लक्षणे नाहीत, त्यांनी मास्कचा वापर करणे आवश्यक नाही.

आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे

अ. ज्या व्यक्तींना काही लक्षणे नाहीत, अशा निरोगी व्यक्तींनी मेडिकल (सर्जिकल) मास्क (म्हणजे बाजारात साधारणपणे विकत मिळणारा मास्क) वापरण्याची आवश्यकता नाही. ‘स्वतः वापरत असलेल्या मास्कमुळे विषाणूंपासून त्यांना संरक्षण मिळत आहे’, असा भ्रम निर्माण होऊन ते अत्यावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकतात, उदा. साबणाने पुनःपुन्हा ४० सेकंद हात धुणे

आ. समाजातील निरोगी व्यक्तींना मास्क वापरल्याने लाभ झाल्याचे वैज्ञानिक पुरावे नाहीत.

इ. एखाद्याने मास्क वापरल्यास त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर होऊ शकतो. त्यामुळे लाभांऐवजी हानी होण्याची जास्त शक्यता आहे, उदा. एकाच मास्कचा वापर पुनःपुन्हा करणे, मास्कमुळे तोंडवळ्याला पुनःपुन्हा हाताने स्पर्श करणे, अशा चुकीच्या कृतींमुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे.

 

२. ‘कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये’, यासाठी घ्यावयाची काळजी

‘कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये’, यासाठी इतर काळजी घेणे मास्क वापरण्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे.

अ. गर्दीच्या ठिकाणी न जाणे

आ. हस्तांदोलन न करणेे

इ. सर्दी-खोकला असलेल्या व्यक्तींपासून एक मीटरहून अधिक दूर रहाणे

ई. स्वतःच्या आणि इतरांच्या तोंडवळ्याला हाताने स्पर्श न करणे

उ. वारंवार साबणाने ४० सेकंद योग्य प्रकारे हात स्वच्छ धुणे

ऊ. शिंकतांना किंवा खोकतांना तोंडावर हात न ठेवता हाताचा दंड (कोपराचा वरचा भाग) ठेवून शिंकणे किंवा टिश्यू पेपर धरणे, टिश्यू पेपर धरल्यास तो वापर झाल्यानंतर झाकण असलेल्या कचरापेटीत टाकणे, काही उपलब्ध नसेल, तर तोंडावर रूमाल धरणे आणि वापरलेला रूमाल नंतर धुवून वाळवणे

ए. घसा दुखू लागल्यास अथवा खोकला असल्यास एक पेला (२०० मिली) कोमट पाण्यात मीठ आणि हळद घालून त्या पाण्याने प्रत्येक ३ – ४ घंट्यांनी गुळण्या करणे, तसेच पिण्यासाठी गरम पाणी वापरणे

 

३. मास्क कुणी आणि कधी वापरावा ?

अ. एखाद्याला ताप, खोकला अशी लक्षणे निर्माण झाल्यास त्याने मास्कचा वापर करावा. त्यामुळे त्या व्यक्तीकडून इतरांना जंतूंचा संसर्ग होण्यापासून रोखले जाते.

आ. अशा रुग्णांवर उपचार करणारे वैद्य, परिचारिका आणि त्या रुग्णाची प्रत्यक्ष सेवा करणारे सर्व यांनी रुग्णाच्या प्रत्यक्ष संपर्कात असतांना मास्क वापरणे आवश्यक असते.

 

४. वापरात असलेला मास्क किती काळपर्यंत उपयोगी ठरतो ?

मेडिकल मास्कचा लाभ साधारण ६ ते ८ घंट्यांपुरता मर्यादित असतो. त्यानंतर किंवा त्यापूर्वी तो ओला झाला, तर तो लगेच बंद कचरापेटीमध्ये टाकून द्यावा लागतो. नंतर त्या कचरापेटीतील सर्व टाकाऊ वस्तू वैद्यकीय निर्देशानुसार टाकाव्यात.

 

५. मास्क वापरण्याची योग्य पद्धत

अ. मास्क ‘नाक, तोंड आणि हनुवटी पूर्णपणे झाकेल’, अशा प्रकारेच असला पाहिजे.

आ. मास्क तोंडवळ्यावर लावतांना किंवा काढतांना त्याच्या पुढील भागाला स्पर्श करू नये. हाताच्या स्पर्शाने मास्कवर जंतूंचे संक्रमण होऊ शकते. ते अधिक धोकादायक ठरू शकते.

इ. मास्क पाठीमागून त्याच्या दोर्‍या धरून घालावा किंवा काढावा.

 

६. मास्कची योग्य विल्हेवाट

अ. मास्कचा वापर केल्यानंतर तो इतरत्र कुठेही टाकू नये. त्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.

आ. हे मास्क ५ टक्के ब्लीच किंवा १ टक्का सोडियम हायपोक्लोराईट या द्रावणात बुडवून निर्जंतुक करावेत आणि त्यानंतर जाळावेत किंवा मातीत खोलवर पुरावेत.

 

७. मास्कसाठी अन्य पर्याय

‘मेडिकल मास्क’ व्यतिरिक्त सुती कापडापासून बनवलेल्या अन्य मास्कना जागतिक आरोग्य संघटना मान्यता देत नाही.

 

८. ‘कोरोना विषाणू १९’च्या संसर्गाला प्रतिबंध होण्यासाठी व्यावहारिक सूचना

अ. सद्यःस्थितीत अनावश्यक प्रवास आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे अत्यंत आवश्यक आहे.

आ. गर्दीच्या ठिकाणी जाणे आवश्यक असल्यास आपण सर्जिकल मास्कचा वापर करू शकतो. गर्दीमध्ये अत्यावश्यक असेल, तेवढाच काळ थांबावे. यामुळे गर्दीतील अन्य व्यक्तीकडून आपल्याला अन्य जंतूसंसर्ग होण्यास प्रतिबंध होतो आणि मास्क वापरणार्‍यास सर्दी-खोकला ही लक्षणे असल्यास त्याच्यापासून इतरांना प्रादुर्भाव होत नाही. गर्दीतून घरी आल्यानंतर मास्कचा उपयोग करू नये.

इ. मेडिकल मास्क बाजारात उपलब्ध नसल्यास त्याच मास्कप्रमाणे सुती मास्क शिवून घेऊन तो वापरू शकतो. हा मास्क प्रतिदिन गरम पाण्यात साबणाने धुऊन वापरू शकतो.

ई. मास्क उपलब्ध नसल्यास मोठ्या सुती रूमालाची घडी करून तो ‘नाक, तोंड आणि हनुवटी झाकली जाईल’, अशा पद्धतीने बांधावा. वापर झाल्यानंतर तो रूमाल गरम पाण्यात साबणाने धुऊन वापरू शकतो.’

– आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.३.२०२०)