निरपेक्षता, त्यागी वृत्ती आणि संसारात राहून साधना करणार्‍या, तसेच इंग्लंड येथे वास्तव्य करणार्‍या सौ. कैलाशकुमारी महेशचंद्र सोलंकी (वय ६७ वर्षे) संतपदी विराजमान !

रज-तमाच्या वातावरणात (विदेशात) राहून केली आपण साधना ।
भाव अन् भक्तीच्या बळावर गुरुमंत्राची अखंडित आराधना ॥

निरपेक्षता आणि त्यागी वृत्ती ही आपली ओळख दैवी ।
जाणिली ती श्रीहरीने केले आपणास विराजमान संतपदी ॥

पू. (सौ.) कैलाशकुमारी सोलंकी यांना श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ (उभ्या असलेल्या) आणि बाजूला बसलेले श्री. महेशचंद्र सोलंकी

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – ‘जर आपल्यामध्ये ईश्‍वराप्रती भाव, साधना करण्याची तळमळ आणि वर्तमानात जगणे आदी दैवी गुण असतील, तर जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो, तरी आपण आध्यात्मिक उन्नती करू शकतो. याचे आदर्श उदाहरण म्हणजे मूळच्या दीव येथील आणि गेल्या १८ वर्षांपासून इंग्लंडमध्ये वास्तव्य करणार्‍या ६७ वर्षांच्या सौ. कैलाशकुमारी महेशचंद्र सोलंकी ! मडगाव (गोवा) येथील ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातन संस्थेचे साधक डॉ. मनोज सोलंकी यांच्या मावशी असलेल्या सौ. कैलाशकुमारी सोलंकी यांनी संतपद गाठल्याची घोषणा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १५ मार्च या दिवशी झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आली. त्यांचे भाचे डॉ. मनोज सोलंकी यांनीच ही घोषणा अत्यंत भावपूर्ण केली. ही आनंदवार्ता ऐकताच उपस्थित साधकांची भावजागृती झाली. सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांचा सन्मान केला. या मंगलप्रसंगी पू. (सौ.) सोलंकी यांचे पती श्री. महेशचंद्र रायचंदी सोलंकी, पू. (सौ.) सोलंकी यांची चुलत बहीण म्हणजेच डॉ. मनोज सोलंकी यांच्या आई सौ. इंदिरा सोलंकी आणि त्यांचे पती श्री. वसंतलाल सोलंकी हेही उपस्थित होते.

या मंगलप्रसंगी अत्यल्प अहं असलेल्या पू. (सौ.) सोलंकी म्हणाल्या, ‘‘मी स्वत:ला भाग्यशाली समजते. मी काहीच सेवा करत नाही. मी सर्वसामान्य गृहिणी आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपात मला पुन्हा माझे गुरु मिळाले. ‘मी त्यांना पहिल्यांदाच पहात आहे’, असे मला वाटलेच नाही. ‘त्यांच्याशी मी आधीपासूनच जोडलेली आहे’, असेच मला वाटले. त्यांना भेटून, इथे येऊन माझे जीवन धन्य झाले.’’

पू. (सौ.) सोलंकी या त्यांचे पती श्री. महेशचंद्र सोलंकी यांच्या समवेत त्यांचे भाचे आणि सनातन संस्थेचे ६९ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले साधक डॉ. मनोज सोलंकी यांच्या घरी आल्या होत्या. डॉ. सोलंकी यांनी त्यांना रामनाथी येथील सनातनचा आश्रम पहाण्यासाठी आश्रमात आणले. तेव्हा त्यांना आश्रमात चालणार्‍या कार्याविषयी माहिती देण्यात आली.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment