सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उत्तरप्रदेशच्या जौनपूर आणि चंदौली जिल्ह्यांमध्ये हिंंदु राष्ट्र संपर्क अभियान

सैन्य सेवा समितीच्या युवा कार्यकर्त्यांसह डावीकडून बसलेले श्री. चेतन राजहंस, अधिवक्ता मदन मोहन यादव आणि श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी

चंदौली (उत्तरप्रदेश) – भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी जागृती करण्याच्या दृष्टीने, तसेच समविचारी व्यक्ती आणि संस्था यांचे संघटन होण्याच्या दृष्टीने उत्तरप्रदेशच्या जौनपूर आणि चंदौली या २ जिल्ह्यांमध्ये हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याद्वारे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान आयोजित करण्यात आले. या अभियानामध्ये सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी सहभागी झाले होते. या अभियानाच्या अंतर्गत उभय जिल्ह्यांतील बुद्धीजीवी, प्रतिष्ठित, हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती यांच्या भेटी घेण्यात आल्या. तसेच काही ठिकाणी बैठकांच्या माध्यमातून हिंदूंमध्ये जागृती करण्यात आली.

 

थानागद्दी येथील संघ शाखेमध्ये साधनेविषयी मार्गदर्शन

श्री. चेतन राजहंस यांनी थानागद्दी येथील प्रभात संघशाखेला मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये आपण खेळ खेळतांना राष्ट्रवाद शिकतो. शाखेतून आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचे वर्धन होते; मात्र शारीरिक बल आणि मनोबल यांच्यापेक्षाही आत्मिक बल महत्त्वाचे असते. आत्मबल वाढवण्यासाठी साधना करणे आवश्यक ठरते. संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय गोळवलकर गुरुजी हे उच्च प्रतीचे साधक होते. त्यांनी युवा अवस्थेतच संघ देशभर वाढवला, तसेच संकट काळातही त्यांनी न डगमगता संघ बंद पडू दिला नाही. त्यांच्यामध्ये असलेले आत्मबल हेच यामागील कारण होते. आपणही आत्मिक बल वृद्धीसाठी साधना करावी. साधना म्हणजे ईश्‍वराची भक्ती आणि स्मरण. नामसाधनेतून ईश्‍वराची भक्ती आणि स्मरण करणे सहज सुलभ होते.’’

 

बाराई गावातील प्रबुद्ध ग्रामस्थांशी संवाद

बाराई गावातील ग्रामस्थांशी संवाद साधतांना श्री. राजहंस म्हणाले, ‘‘शुभकर्म आणि पापकर्म काय आहे, हे केवळ धर्म शिकवतो. आज कुणी धर्म शिकलेला नसल्याने किंबहुना शाळा आणि महाविद्यालये यांमधून तो शिकवला गेलेला नसल्याने कुणालाच पाप कर्माविषयी भीती वाटत नाही. पापकर्म केल्याने मृत्यूच्या नंतर दुर्गती होते, हे केवळ धर्म शिकवतो; म्हणून प्राचीन काळी धर्म जाणणारे लोक पापभिरू होते. आपण सर्व जणही धर्माचरणी बनलो, तर गावात भांडण तंटे होणार नाहीत आणि सुख समृद्धी येईल. धर्माचे वचनच आहे की, सुखाचे मूळ धर्म आहेे.’’

 

जौनपूर येथे पूर्वांचल विश्‍वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद

‘‘अभ्यास चांगला होण्यासाठी मन एकाग्र असणे आवश्यक असते; परंतु मनात निरर्थक विचारांची शृंखला आणि सामाजिक माध्यमे यांमुळे मनात चंचलता उत्पन्न होते. नामसाधनेद्वारे मनाची एकाग्रता वाढवणे हाच या समस्यांवर उपाय आहे. कुलदेवतेचा नामजप करणे ही सर्वांत सहज आणि उपयुक्त साधना आहे. नामसाधनेमुळे निरर्थक विचार न्यून होतात आणि हळूहळू एकाग्र होऊ लागते’’, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. पूर्वांचल विश्‍वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी आयोजित संवादामध्ये ते बोलत होते.

 

सकल्डीहा (चंदोली) येथील हिंदु राष्ट्र जागृती परिसंवादात सनातन संस्थेचा सहभाग

धर्मनिरपेक्षतेमुळे भारतातील हिंदूंची सर्वाधिक हानी झाली आहे. वस्तुतः भारताच्या राज्यघटनेतील ‘सेक्युलर’ हा शब्द हा राज्य व्यवस्थेसाठी लागू आहे. तो हिंदूंसाठी लागू नाही; पण हिंदू स्वतःला धर्मनिरपेक्षतावादी म्हणून घेऊ लागल्याने ते स्वतःचे हिंदुत्व विसरू लागले आहेत. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ते नास्तिक बनू लागले आहेत. त्यामुळे देशाच्या राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द वगळण्याची आवश्यकता आहे. तसेच भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन श्री. चेतन राजहंस यांनी येथे युवा संघर्ष मोर्चाद्वारे आयोजित हिंदु राष्ट्र जागृती परिसंवादात केले. सकल्डीहा बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. शैलेंद्र पांडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment