सनातनचे ४० वे संत पू. गुरुनाथ दाभोलकर (वय ७९ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

‘बाह्यतः संत असल्याचे एकही लक्षण नसलेले पू. गुरुनाथ दाभोलकर हे गुरुपदावर आरुढ आहेत’, हे कळणेही बहुतेकांना अशक्य आहे. हा एक फार मोठा आदर्श त्यांनी साधकांसमोर ठेवला आहे. ‘त्यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

१. जन्म आणि बालपण

जन्मदिनांक : १५.०२.१९४०

वाढदिवस : माघ शुक्ल पक्ष सप्तमी (१९.२.२०२१) या दिवशी वाढदिवस झाला.

संतपदी विराजमान : ५ मे २०१४

‘माझा जन्म १५.२.१९४० (माघ शुक्ल पक्ष सप्तमी (रथसप्तमी) या दिवशी मळेवाड (तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग) येथे झाला. बालपणापासून घरातील वातावरण आध्यात्मिक होते.

१ अ. आई आणि आजी यांना ‘मुंबईहून काका येणार आहे’, असे सांगणे,
त्या रात्री खरोखरच काका घरी येणे अन् हा प्रसंग परात्पर गुरु डॉ. आठवले
यांना सांगितल्यावर त्यांनी ‘तुमच्या पूर्वपुण्याईमुळे तुम्हाला तसे वाटले’, असे सांगणे

मी ५ वर्षांचा असतांना एकदा रात्री ९.३० वाजता आई आणि आजी पोळ्या भाजत होत्या. तेव्हा मी म्हणालो, ‘‘मुंबईहून नाना (काका) येणार आहे.’’ आई आणि आजी यांनी माझे बोलणे गमतीवारी नेले; परंतु तेव्हा खरेच काका त्या मध्यरात्री आमच्या घरी आले.

हा प्रसंग मी जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुमच्या पूर्वपुण्याईमुळे तुम्हाला तसे वाटले.’’

१ आ. वयाच्या १४ व्या वर्षापासून ‘आपल्याला संसारात
राहायचे नसून कुठेतरी तीर्थक्षेत्री जायचे आहे’, असे सतत वाटणे

साधारणतः वयाच्या १४ व्या वर्षापासून मला सतत वाटत असे, ‘आपल्याला घरात (संसारात) राहायचे नाही, तर कुठेतरी तीर्थक्षेत्री, धर्मस्थळी किंवा अज्ञातस्थळी जायचे आहे.’ याविषयी मी आमच्याशेजारी राहणार्‍या एका मुलाला सतत सांगत असे. आम्हा दोघांची मते जुळत असत. तो माझ्यापेक्षा १० – १२ वर्षांनी लहान होता.

१ इ. देवीचा संचार होणार्‍या एका व्यक्तीने ‘याचा नंतर फार मोठा उदय होणार आहे’, असे सांगणे

माझ्या लहानपणी माझ्या वडिलांच्या अंगात देवीचा संचार होत असे. रात्री ९ नंतर संचार झालेले अन्य ३ – ४ एकत्र येत असत. त्यांतील एक जण माझ्याविषयी म्हणाला, ‘‘याचा नंतर फार मोठा उदय होणार आहे.’’

 

२. समष्टी साधना

अ. जेव्हापासून साधना समजली, तेव्हापासून मी येणार्‍या-जाणार्‍यांना नामजप करण्यास सांगू लागलो. साधनेच्या आरंभी बर्‍याच वेळा मी बसमध्ये व्यक्ती पाहून तिच्या शेजारी बसत असे आणि हळूहळू साधनेविषयी बोलायला आरंभ करून साधना सांगत असे.

आ. अध्यात्मप्रसाराच्या अंतर्गत मी ग्रंथप्रदर्शन लावणे, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जाहीर सभेसंदर्भातील सेवा इत्यादी सेवा केल्या.

इ. कुडाळ येथे पूर्णवेळ साधना करायला प्रारंभ करून तेथील सेवाकेंद्रात मी स्वागतकक्षात सेवा केली.

ई. ऑक्टोबर २०११ ते मे २०१२ या कालावधीत मी जळगाव येथील साधकांसाठी नामजप केला. अजूनही समष्टीसाठी आणि त्रास असलेल्या साधकांसाठी जप करत आहे.

उ. मिरज आश्रमात साधारण दीड वर्षे स्वागतकक्षात सेवा केली. त्यानंतर मी देवद (पनवेल) येथील आश्रमात आलो. आतापर्यंत मी तेथेच सेवारत आहे. तेथे मी स्वागतकक्ष, मागणी-पुरवठा इत्यादी सेवा केल्या. आता मी बांधणीच्या अंतर्गत सेवा करत आहे.

 

३. सेवा करतांनाची विचारप्रक्रिया

साधनेत आल्यावर मला मनापासून वाटायचे की, मला सांगितलेली सेवा मनापासून करायची आहे. त्यासाठी मी कधीही रात्र आणि दिवस पाहिला नाही.

 

४. गुरुमाऊलीप्रतीचा भाव

‘काहीही घडो, गुरुमाऊली ते पाहून घेईल’ आणि ‘सर्वकाही तीच करवून घेईल’, असा भाव आजपर्यंत आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी जे साधनेविषयी सांगितले, ते ते मी करत गेलो.

 

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले मार्गदर्शन

एकदा मी परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणालो, ‘‘मी भाववृद्धी सत्संगाला बसल्यावर सत्संग घेणार्‍या साधिकांनी बोललेले काहीही माझ्या लक्षात येत नाही.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘तुम्हाला भाववृद्धी सत्संगांना बसायला नको. आपल्याला परत मागे जायचे नाही.’’

 

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काढलेले गौरवोद्गार !

मी देवद आश्रमात सेवेला असतांना एकदा मुंबई येथील कु. वत्सला रेवणकर यांच्याशी दूरभाषवरून माझे संभाषण चालू होते. तेव्हा त्या मधेच म्हणाल्या, ‘‘काका, तुम्ही एक दिवस आम्हा सर्वांना भेटायला या ना !’’ तेव्हा मी म्हणालो, ‘‘अहो, मला तिकडे कोण ओळखतो ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘काका, तुम्ही असे कसे म्हणता ? परम पूज्यांनी मुंबईत जेथे जेथे स्वतः सत्संग घेतले, तेथे तेथे एक वाक्य नेहमी सांगितले की, मी केवळ श्री. गुरुनाथ दाभोलकर यांच्यासाठीच सिंधुदुर्गला गेलो होतो.’’ हे ऐकून माझ्या डोळ्यांत अश्रू आले. आजही जेव्हा जेव्हा त्या प्रसंगाची आठवण येते, तेव्हा तेव्हा मला गहिवरून येते.

 

७. देवद आश्रमात आल्यावर परात्पर गुरु पांडे महाराज यांची सेवा करण्याची संधी मिळणे

वर्ष २००३ मध्ये मी देवद आश्रमात आलो. येथे आल्यावर काही वर्षांनी मला परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या सेवेची संधी मिळाली. तेव्हा मी सतत त्यांच्या समवेत होतो.

 

८. संतपद

५.५.२०१४ या दिवशी देवद आश्रमात मला संत म्हणून घोषित करण्यात आले.

 

९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे कुटुंबियांचीही सर्वतोपरी काळजी घेतली जाणे

एकदा मी आणि माझा भाऊ परात्पर गुरु डॉक्टरांना भेटायला गेलो होतो. माझ्या भावावर आमच्या कुटुंबाचे दायित्व आहे. तो सतत सर्व सोडून कुठेतरी जाण्याविषयी बोलत असे. हे जेव्हा मी परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितले, तेव्हा ते भावाला म्हणाले, ‘‘कुठेतरी कशाला जायला पाहिजे ? रामनाथी आश्रमात राहू शकता किंवा पनवेलला जा ! तेथे तुमचे भाऊ आहेत. तेथे राहू शकता.’’

 

१०. उत्स्फूर्तपणे विचार सुचणे

पूर्वायुष्यात कोणतेही लिखाण केलेले नसतांनाही साधना, राष्ट्र, धर्म आदी विषयांच्या संदर्भातील विचार काही वेळा मला उत्स्फूर्तपणे सुचले आहेत.

 

११. स्वतःच्या अस्तित्वामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रात झालेले चांगले पालट

अ. वर्ष २०१७ मध्ये माझ्या खोलीतील पूजेत असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र गुलाबी झाले होते.

आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी मला दिलेले त्यांचे एक छायाचित्र मी बॅगेत ठेवले होते. तेही गुलाबी झाले होते.

इ. ‘आता खोलीतील पूजेत असलेले परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पालटलेले दिसते’, असे खोलीत येणारे साधक सांगतात.

 

१२. कृतज्ञता

आतापर्यंतच्या साधनेतील वाटचालीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यास मी अपात्र आहे. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.’

– (पू.) श्री. गुरुनाथ दाभोलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३१.१२.२०१८)

 

पू. दाभोलकरकाकांची साधकांवरील प्रीती !

‘पू. दाभोलकरकाकांचे प्रीतीमय स्मित हास्यच आम्हा साधकांना पुष्कळ काही देऊन जाते. त्यांची आम्हा साधकांवरील प्रीती अमूल्य आहे. त्यांनी येता-जाता व्यक्त केलेली आमच्या साधनेविषयीची काळजी आम्हाला प्रेरणा देऊन जाते.’

– सौ. आनंदी पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३१.१२.२०१८)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment