प्राचीन काळातील लाकडापासून मूर्ती सिद्ध करण्याची अध्यात्मशास्त्रीय पद्धत

कु. प्रियांका लोटलीकर

‘भारताला ऋषिमुनींची थोर परंपरा आहे. ऋषिमुनींनी लिहिलेले वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी ग्रंथ मानवाला सर्वंकष ज्ञान देतात. त्यांमध्ये मनुष्यासाठी आचारधर्म, उपासना, साधना, संरक्षण इत्यादी सर्वच विषय आहेत. ऋषिमुनींना हे ज्ञान त्यांच्या तपोबलामुळे, म्हणजे आध्यात्मिक सामर्थ्यामुळे मिळाले होते. साधनेत पूर्णत्व आल्यावर त्यांना ईश्‍वराकडून ज्ञान प्राप्त झाले. भारतावर सातत्याने झालेल्या मोगल, इंग्रज, डच आणि पोर्तुगीज यांच्या आक्रमणांनंतर भारतातील संपत्ती, समृद्धी अन् वैभव लुटले गेले; परंतु भारत ही देवभूमी आणि धर्मभूमी असल्यामुळे आजही भारतात काही प्रमाणात ज्ञानरूपी वैभव टिकून राहिले आहे. लाखो वर्षांपूर्वी लिहिलेले हे ग्रंथ अजूनही काही प्रमाणात टिकून आहेत, ते त्यांतील शाश्‍वत स्वरूपातील ज्ञानसामर्थ्य आणि चैतन्य यांमुळेच ! भारतातील पुरातन काळापासून चालत आलेल्या नृत्यकला, नाट्यकला, चित्रकला, आयुर्वेद, संरक्षणकला, वनस्पतीशास्त्र, तंत्रविद्या इत्यादी अनेक विद्यांचा यामध्ये अंतर्भाव आहे.

वृक्षाचे पूजन करतांना त्यामध्ये देवतातत्त्व प्रकाश रूपात आकृष्ट झाल्याचे आणि वृक्षातून पूजकाकडे आकृष्ट होतांना छायाचित्रात दिसत आहे.

 

१. देवतेची मूर्ती अथवा पादुका सिद्ध करण्यासाठी
झाडाचे पूजन आणि प्रार्थना करून खोडामध्ये मूर्ती कोरण्यात
येणे, ते झाड त्यानंतर जिवंत राहिल्यास मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणे

केरळ राज्यात त्रिशूर येथे आम्ही एल्.के. गिरीश यांच्याकडून प्राचीन भारतीय संस्कृतीच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी गेलो होतो. एल्.के. गिरीश हे स्वत: तंत्रविद्या उपासक आणि अभ्यासक आहेत. त्यांनी पूर्वीच्या काळची लाकडापासून देवतांच्या मूर्ती किंवा पादुका सिद्ध करण्याची प्रक्रिया सांगितली. पूर्वीच्या काळी ज्या झाडापासून मूर्ती सिद्ध करायची असेल, त्या झाडाचे आधी पूजन करण्यात येत असे आणि त्या वनस्पतीला प्रार्थना करून त्या वनस्पतीच्या खोडामध्ये मूर्ती कोरण्यात येत असे. मूर्ती कोरलेला वृक्षाचा तेवढाच भाग त्या झाडातून काढण्यात येई आणि त्या कापलेल्या भागामध्ये औषध लावून त्या भागाला कापडाने बांधून ठेवण्यात येत असे. त्यानंतर ते झाड जिवंत राहिल्यास त्यापासून तयार केलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करता येत असे. याचे एक प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे केरळ येथील एर्नाकुलम जिल्ह्यातील कोरंकोट्ट येथील सोळाव्या शतकातील भगवती मंदिरात ध्वज प्रतिष्ठापनेसाठी वृक्ष शोधल्यानंतर एक श्‍वेत प्रकाश वृक्षाला बांधलेल्या आणि मंत्राने भारित केलेल्या लाल कापडात आकृष्ट होतांना छायाचित्रात आला आहे.

 

२. प्रत्येक जिवामध्ये अन् चराचरामध्ये ईश्‍वरी तत्त्व
असल्याचा अध्यात्मशास्त्रीय सिद्धांत ऋषिमुनींनी पूर्वीच शिकवलेला असणे

सध्या आधुनिक जगामध्ये विविध स्वार्थांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते; परंतु भारतीय परंपरा किती प्रगत होती, हे या उदाहरणावरून लक्षात येते. अशाप्रकारे ‘प्रत्येक जिवामध्ये अन् चराचरामध्ये ईश्‍वरी तत्त्व असते आणि त्यामध्ये अध्यात्म कसे आहे ?’, हे ऋषिमुनींनी पूर्वीच शिकवले आहे. ऋषिमुनींनी दिलेल्या अपूर्व ज्ञानामुळे त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करू तेवढी अल्पच आहे.

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२७.४.२०१९)

Leave a Comment