गुरुकृपायोगानुसार साधना ही कलियुगातील सर्वश्रेष्ठ साधना ! – आधुनिक वैद्या ज्योती काळे, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने पुणे येथे वाचक मेळावा आणि साधनेविषयी मार्गदर्शन

मार्गदर्शन करतांना आधुनिक वैद्या ज्योती काळे

पुणे – १९ जानेवारी या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने आंबेगाव पठार, पुणे येथील श्रीकंठ व्ह्यू सोसायटीच्या प्रांगणात ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर जाहीर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या वेळी बोलतांना आधुनिक वैद्या ज्योती काळे यांनी ‘गुरुकृपायोगानुसार साधना ही कलियुगातील सर्वश्रेष्ठ साधना आहे’, असे सांगितले. गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधना केल्यास जलद आध्यात्मिक प्रगती कशी होते, हे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांनी कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप आवश्यक असून उपस्थितांकडून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप २ मिनिटे करवून घेतला. त्या वेळी वातावरण प्रसन्न झाले होते. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

अनेक महिलांनी ‘आमच्या घराजवळ, तसेच मंदिरात धर्मसत्संग चालू करावा’, अशी उत्स्फूर्त मागणी केली. प्रवचनानंतर २० जिज्ञासूंनी १ घंटा चर्चा करून शंकानिरसन करवून घेतले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला आरंभ झाला. या कार्यक्रमाला पुष्कळ जिज्ञासू उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment