सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. जीजी आणि सुपुत्र पू. नंदूदादा यांची देवद येथील सनातनच्या आश्रमाला मंगलभेट !

प.पू. भक्तराज महाराज यांचे सूक्ष्मातून अस्तित्व असणार्‍या
भजनांच्या भावपूर्ण सोहळ्यात साधकांनीही अनुभवला भावानंद !

देवद (पनवेल) – सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या पत्नी प.पू. (श्रीमती) सुशिला कसरेकर म्हणजे प.पू. जीजी, म्हणजेच वात्सल्यभावाचे मूर्तीमंत उदाहरण ! प.पू. बाबांच्या सर्व भक्तांना त्यांनी वात्सल्याने जोडून ठेवले आहे. अशा वात्सल्यमूर्ती गुरुमाऊली प.पू. जीजी आणि त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र पू. नंदूदादा कसरेकर यांनी येथील सनातनच्या आश्रमाला १२ जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजता भेट दिली. त्यांच्या चरणस्पर्शाने आश्रम पावन झाला. या वेळी त्यांच्या समवेत प.पू. बाबांच्या स्नुषा सौ. नयना सुनील कसरेकर आणि अन्य भक्तही उपस्थित होते.

पू. नंदूदादा यांनी त्यांच्या भक्तांसह प.पू. बाबांची भजने म्हटली. हा सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. या सोहळ्यात सहभागी झालेल्या सनातन संस्थेच्या साधकांना प.पू. जीजी आणि पू. नंदूदादा यांच्या माध्यमातून प.पू. बाबांनी सगुण रूपात दर्शन दिल्याची अनुभूती आली. त्यामुळे सर्व साधकांना पुष्कळ आनंद होऊन त्यांची भावजागृती झाली. या सोहळ्याचे सूत्रसंचालन आश्रमातील साधिका सौ. मानसी सहस्रबुद्धे यांनी भावपूर्णरित्या केले.

 

सन्मान सोहळा

१. सनातन संस्थेच्या पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी पुष्पहार, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू प.पू. जीजी यांना अर्पण करून त्यांचा सन्मान केला. या वेळी प.पू. जीजी यांनी सन्मानातील पुष्पहार गळ्यात घालून न घेता तो पटलावरील प.पू. बाबांच्या छायाचित्राला अर्पण करण्यास सांगितला.

प.पू. जीजी (उजवीकडे) यांचा सन्मान करतांना पू. (सौ.) अश्‍विनी पवार

२. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी पुष्पहार, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू पू. नंदूदादा यांना अर्पण करून त्यांचा सन्मान केला. या वेळी पू. नंदूदादा यांनीही पुष्पहार स्वतःच्या गळ्यात घालून न घेता तो प.पू. रामानंद महाराज यांच्या छायाचित्राला अर्पण केला.

पू. नंदूदादा (उजवीकडे) यांचा सन्मान करतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे

३. सनातन संस्थेच्या साधिका सौ. स्मिता नाणोसकर यांनी प.पू. जीजी यांच्या स्नुषा सौ. नयना सुनील कसरेकर यांची ओटी भरली.

सौ. नयना सुनील कसरेकर (डावीकडे) यांची ओटी भरतांना सौ. स्मिता नाणोसकर

४. प.पू. बाबांची आणि नारायणगाव येथील प.पू. काणे महाराज यांची अनेक वर्षे मनोभावे सेवा करणारे श्री. शशिकांत ठुसे यांचा सत्कार पू. शिवाजी वटकर यांच्या हस्ते करण्यात आला.

श्री. शशिकांत ठुसे (डावीकडे) यांचा सत्कार करतांना पू. शिवाजी वटकर

 

सनातन संस्थेच्या आश्रमातील प.पू. बाबांची गाडी अजूनही नवीनच वाटते ! – प.पू. जीजी

प.पू. बाबांच्या गाडीला भावपूर्ण नमस्कार करतांना प.पू. जीजी

प.पू. बाबांनी अनेक वर्षे ज्या गाडीतून भ्रमण करून अध्यात्मप्रसार केला, ती गाडी प.पू. जीजी यांनी या वेळी पाहिली. ‘बाबांची ही गाडी पाहायलाच हवी’, असे म्हणून त्या गाडीजवळ आल्या. त्यांनी प.पू. बाबांची गाडी आणि त्यांचे छायाचित्र यांना भावपूर्ण नमस्कार केला. त्या म्हणाल्या, ‘‘आमच्याकडे २ गाड्या होत्या. त्यातील एक गाडी मी सनातनच्या आश्रमात पाठवली. ही गाडी किती चांगली ठेवली आहे ! अजूनही ही गाडी नवीन वाटते.’’

 

भजनांच्या सोहळ्याला संतांची वंदनीय उपस्थिती

सद्गुरु राजेंद्र शिंदे, पू. सुदामराव शेंडेआजोबा, पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा, पू. गुरुनाथ दाभोलकर, पू. शिवाजी वटकर, पू. रमेश गडकरी आणि पू. (सौ.) अश्‍विनी पवार

 

प.पू. जीजी आणि पू. नंदूदादा यांच्या सान्निध्यात आश्रमातील
साधकांनी भजनांच्या माध्यमातून अनुभवला अद्वितीय असा चैतन्यदायी सोहळा !

भजने सादर करतांना पू. नंदूदादा, त्यांच्या डावीकडे सौ. गायत्री शेवडे आणि सौ. नयना सुनील कसरेकर

१. अवघ्या २० ते २५ मिनिटांत भजनाच्या कार्यक्रमाची झालेली सिद्धता पाहून पू. नंदूदादांनी साधकांचे कौतुक केले !

आश्रमात प.पू. जीजी आणि पू. नंदूदादा यांचा सन्मान करण्यात येणार होता; मात्र ऐनवेळी प.पू. बाबांच्या भजनांचा कार्यक्रम घेण्याचे ठरले. नियोजनात अचानक पालट होऊनही आश्रमातील सर्व साधकांनी २० ते २५ मिनिटांत व्यासपीठ, ध्वनीक्षेपक यंत्रणा, तसेच बैठकव्यवस्था यांची तत्परतेने सिद्धता केली. अवघ्या २५ मिनिटांत झालेली ही सिद्धता पाहून पू. नंदूदादा यांनी साधकांचे कौतुक केले.

२. प.पू. जीजी यांनी प.पू. बाबा आणि प.पू. रामानंद
महाराज यांच्या छायाचित्रांना नमस्कार केल्यानंतर भजनास प्रारंभ !

व्यासपिठावरील पटलावर प.पू. बाबा आणि त्यांचे शिष्य प.पू. रामानंद महाराज यांची मोठी छायाचित्रे ठेवण्यात आली होती. व्यासपिठावर पू. नंदूदादा आणि भजन म्हणणारे यांना बसण्यासाठी गादी अंथरली होती; मात्र पू. नंदूदादांनी गादीवर न बसता ‘तेथे प.पू. बाबा आहेत’, या भावाने त्यावर फुले अंथरली. ते म्हणाले, ‘‘येथे प.पू. बाबा आहेत. ते आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे कार्यक्रम चांगला होईल.’’ त्यानंतर ते गादीच्या पुढे बसले.

प.पू. जीजी यांनी प्रथम दोन्ही छायाचित्रांना भावपूर्ण नमस्कार केला. त्यानंतर पू. नंदूदादा, प.पू. जीजी यांच्या स्नुषा सौ. नयना सुनील कसरेकर आणि भक्त सौ. गायत्री शेवडे यांनी ‘श्री गुरुदेव दत्त । श्री साईनाथ महाराजकी जय । प.पू. भक्तराज महाराज की जय ।’, असा जयघोष करून भजनांना प्रारंभ केला. या वेळी भजने म्हणण्यासाठी प.पू. बाबांचे भक्त श्री. राजेंद्र जोशी यांनी तबल्याची साथ दिली, तर ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातन संस्थेचे साधक श्री. संजय नाणोसकर यांनी पेटी वादन केले.

पू. नंदूदादा यांनी मधाळ वाणीतून ‘एक तुझे नाम शास्त्रांचा आधार…’, ‘त्रैलोक्याचे योगीराज हे अवतरले भूवरी…’ ‘सोनियाच्या शिंपल्यात घावला हा चिंतामणी…’ ‘आनंद कंद दाता नांदे या हृदयी माझ्या…’ ‘दयेच्या सागर नाथा, बुद्धीच्या दाता…’ यांसह अन्य भजने म्हटली. या वेळी पू. नंदूदादा भजनांमध्ये तल्लीन झाले होते. तेव्हाचे त्यांचे रूप वेगळेच जाणवत होते.

सनातन संस्थेचे सद्गुरु, संत आणि साधक सर्वच जण भजनांच्या तालात सहभागी झाले. कोणालाही वेळेचे भान उरले नाही ! ‘भजनांचा कार्यक्रम संपूच नये’, असे साधकांना वाटत होते. कार्यक्रम झाल्यावर सर्व साधकांना ‘आपण चैतन्यात न्हाऊन निघालो आहोत’, अशी जाणीव होत होती. सर्वांनी भजनानंदात डुंबून पुष्कळ आनंद अनुभवला. याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साधकांना शब्दच अपुरे पडले ! भजनांची अवीट गोडी अनुभवायला देऊन वेगळ्याच भावविश्‍वात नेल्याविषयी सर्वांनी प.पू. बाबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या नंतर पू. नंदूदादा म्हणाले, ‘‘प.पू. बाबा कार्यक्रमाला (सूक्ष्मातून) उपस्थित होते. त्यामुळे भजनांचा कार्यक्रम चांगला झाला.’’

गादीवरील वस्त्राला चंदनाचा सुगंध येणे आणि त्या माध्यमातून प.पू. बाबांच्या उपस्थितीची प्रचीती येणे

सोहळ्यानंतर व्यासपिठावरील गादीवर घातलेल्या वस्त्राला चंदनाचा पुष्कळ सुगंध येत होता. तो सुगंध सर्वत्र दरवळत होता. ‘ही प.पू. बाबांच्या अस्तित्वाची आलेली प्रचीतीच होती’, असे साधकांना जाणवले.

 

प.पू. जीजी आणि पू. नंदूदादा यांच्या आगमनापूर्वी साधकांनी अनुभवलेली भावविभोर अवस्था !

प.पू. जीजी आणि पू. नंदूदादा आश्रमभेटीसाठी येणार असल्याचे कळल्यावर सर्वच साधकांना पुष्कळ आनंद झाला होता. ‘जणू त्यांच्या माध्यमातून प.पू. बाबाच येणार आहेत’, असे सर्वांना वाटत होते. त्यांच्या स्वागतासाठी भावपूर्ण शब्दरचना करून फलकही सिद्ध करण्यात आला होता. प्रवेशद्वाराजवळ पायघड्या अंथरण्यात आल्या. ‘प.पू. जिजींना कधी एकदा पाहतो’, असे प्रत्येकच साधकाला वाटत होते. त्यांच्या दर्शनाची प्रत्येकालाच ओढ लागलेली होती. सर्वच साधकांनी या वेळी भावविभोर अवस्था अनुभवली. त्यांच्या आगमनाची वाटणारी आतुरता, तसेच आश्रमात लावण्यात आलेली प.पू. बाबांची प्रासादिक भजने यांमुळे वातावरण मंगलमय झाले होते.

प.पू. जीजी आणि पू. नंदूदादा यांचे आगमन झाल्यावर सर्वांनी प.पू. बाबांचा सलग जयघोष केला. या वेळी वातावरणही भावमय आणि चैतन्यमय झाल्याचे जाणवत होते.

 

प.पू. बाबांच्या जयघोषात प.पू. जीजी आणि पू. नंदूदादा यांसह भक्तांचे स्वागत

७ जुलै २०१९ या दिवसापासून प.पू. बाबांच्या जन्मशताब्दी महोत्सवास प्रारंभ झाला. त्या अनुषंगाने पनवेल येथे १२ जानेवारी २०२० या दिवशी कार्यक्रम आयोजित केला होता. तो पार पडल्यावर सायंकाळी ५.३० वाजता प.पू. जीजी आणि पू. नंदूदादा यांचे भक्तांसह देवद आश्रमात शुभागमन झाले. या वेळी सनातन संस्थेचे सद्गुरु, संत आणि साधक यांनी त्यांचे ‘प.पू. भक्तराज महाराज यांचा विजय असो’, अशा जयघोषात स्वागत केले. प.पू. जीजी यांनी आश्रमात प्रवेश केल्यानंतर तेथे प्रवेशद्वारासमोरील प.पू. बाबांच्या मोठ्या छायाचित्रासमोर फुले वाहून भावपूर्ण दर्शन घेतले.

 

वयस्कर साधक सेवा करत असल्याचे पाहून प.पू. जीजी भारावून गेल्या !

सनातन संस्थेचे पू. शिवाजी वटकर, तसेच आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक आगवेकर यांनी प.पू. जीजी यांना आश्रमातील स्वयंपाकघर, सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादने सिद्ध करण्याचा कक्ष आणि धान्य निवडण्याचा कक्ष येथे चालणार्‍या सेवांची माहिती दिली.

‘माझ्यासारख्या वयस्कर महिला आश्रमात पुष्कळ उत्साहाने सेवा करत आहेत’, असे म्हणून प.पू. जीजी भारावून गेल्या. आश्रमातील सेवांविषयी माहिती घेतल्यानंतर आणि वयस्करांसह तरुण साधकही आश्रमात सेवा करत असल्याचे पाहून त्यांना पुष्कळ आनंद झाला. त्यांच्या तोंडवळ्यावर तसा आनंद जाणवत होता.

 

जन्मशताब्दी वर्षानिमित्त झालेल्या
सोहळ्याचा पू. नंदूदादांनी विशद केलेला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध !

संपूर्ण सोहळा झाल्यावर पू. नंदूदादा म्हणाले, ‘‘सकाळी पनवेल येथे प.पू. बाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त झालेला सोहळा हा पूर्वार्ध होता आणि सायंकाळी देवद आश्रमात झालेल्या भजनांचा सोहळा हा उत्तरार्ध झाला.’’

देवद आश्रमात भजनांचा भावपूर्ण सोहळा झाल्यानंतर साधकांना जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त ‘या सोहळ्याच्या माध्यमातून प.पू. बाबांनी आपल्यावर जणू चैतन्याची उधळणच केली आहे’, अशी अनुभूती आली.

या वेळी सर्वांनी मिळून श्री अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांचा जयघोष केला.

सन्मान सोहळा झाल्यानंतर प.पू. जीजी आणि पू. नंदूदादा यांनी आश्रमातील साधकांचा भावपूर्ण निरोप घेऊन आपल्या भक्तांसह प्रस्थान केले. या वेळी देवद आश्रम, तसेच आश्रमाच्या शेजारील सनातन संकुलातील साधक त्यांना निरोप देण्यासाठी आले होते.

 

प.पू. जीजी आणि पू. नंदूदादा यांनी आश्रमाला दिलेल्या भेटीतून त्यांचा
सनातन संस्थेच्या कार्याला अन् साधकांच्या साधनेसाठी कृपाशीर्वाद लाभला !

‘सकाळी पनवेल येथे कार्यक्रम झाला. त्यानंतर प.पू. जिजींना थकवा आला असतांनाही त्यांनी पू. नंदूदादांसह सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या माध्यमातून त्यांचा कृपाशीर्वादच सनातन संस्थेच्या कार्याला आणि साधकांना लाभला. त्यांनी भजनांच्या माध्यमातून साधकांना चैतन्य दिले. हे केवळ प.पू. बाबा आणि प.पू. रामानंद महाराज यांचा कृपाशीर्वाद, परात्पर गुरुदेवांची कृपा आणि साधकांचा भाव यांमुळेच झाले’, असे वाटले.

 

प.पू. बाबांच्या काही भक्तांनीही सनातनच्या आश्रमाचे दर्शन घेतले !

१२ जानेवारीला पनवेल येथे होणार्‍या कार्यक्रमानिमित्त बडोदा, नाशिक, पुणे आणि इंदूर येथून आलेल्या प.पू. बाबांच्या काही भक्तांनी ११ जानेवारीला रात्री देवद येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या वेळी त्यांनीही आश्रमातील सेवांविषयी जाणून घेतले. आश्रमात प्रवेश केल्यावर त्यांनी प्रवेशद्वाराजवळील प.पू. बाबांचे छायाचित्र पाहून मोठ्या स्वरात जयघोष केला. आश्रमाचे दर्शन घेतल्यावर त्यांनीही प.पू. बाबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

 

‘सेवकांनी सेवकाचे काम करावे’, असे म्हणून व्यासपिठावरील
आसंदीवर बसण्यास नकार देणारे पू. नंदूदादा यांच्यातील विनम्रतेचे झालेले दर्शन !

सन्मानाच्या प्रसंगी व्यासपिठावर दोन आसंद्या ठेवण्यात आल्या होत्या. पू. नंदूदादा यांना एका आसंदीवर बसण्याची विनंती केली; मात्र ‘सेवकांनी सेवकाचे काम करावे’, असे सांगून त्यांनी आसंदीवर बसण्यास नम्रपणे नकार दिला. पू. नंदूदादा यांनी उभे राहूनच सन्मान स्वीकारला. या वेळी पू. नंदूदादा यांनी ‘प्रत्येकाच्या हृदयात प.पू. बाबा आहेत’, असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment