‘ऑनलाइन’ खरेदी करण्याची सवय हा एकप्रकारचा मानसिक आजार ! – संशोधन

आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीचा असाही एक दुष्परिणाम !

नवी देहली – सध्या मोठ्या संख्येने लोक ‘ऑनलाइन’ खरेदीला महत्त्व देत आहेत. आतातर अशा लोकांची संख्या पुष्कळ वाढली आहे की, ज्यांच्यासाठी ऑनलाइन खरेदी करणे, ही एक सवय झाली आहे; पण जर्मनीच्या हॅनोवर मेडिकल स्कूलच्या वैज्ञानिकांनी केलेल्या एका संशोधनानुसार ऑनलाइन खरेदीची सवय हा एकप्रकारचा मानसिक आजार आहे.

या सवयीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण मानसोपचार घेत आहेत. वैज्ञानिकांनी अशा १२२ लोकांची चाचणी केली. त्यातील ३४ लोकांचे ऑनलाइन खरेदीचे प्रमाण व्यसनाच्या प्रमाणापेक्षा जास्त होते. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता आणि निराशेची (डिप्रेशनची) लक्षणेही दिसत होती. ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह सायकायट्री’ नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार विकसित देशांमध्ये साधारण ५ टक्के लोक असे आहेत, ज्यांना ‘बाईंग शॉपिंग डिसऑर्डर’ची (‘बीएस्डी’ची) सवय लागली आहे. जगभरात प्रत्येक २० पैकी एक व्यक्ती याने प्रभावित आहे. यातील प्रत्येकी ३ पैकी एका व्यक्तीला ऑनलाइन खरेदीची सवय लागली आहे. बीएस्डीने पीडित व्यक्तीला ऑनलाइन खरेदीची तीव्र इच्छा होऊ लागते. ती व्यक्ती स्वत:ला जेवढे परवडते, त्यापेक्षा अधिक खरेदी करते. या कारणाने व्यक्तीला पैशांची चणचण भासते. त्यातून कुटुंबात समस्या होऊ लागतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment