चालू शेतीत आंतरपीक म्हणून लावता येण्याजोग्या तसेच पडीक भूमीमध्ये, केवळ पावसाच्या पाण्यावर लागवड करता येण्याजोग्या औषधी वनस्पती

अनुक्रमणिका

१. लागवड करताना एकच पीक न घेता सोबत आंतरपीके घ्यावी

‘नैसर्गिक शेतीमध्ये एका वेळी एकच पीक न घेता मुख्य पिकासह साहाय्यक पिकेही घेतली जातात. या पिकांना ‘आंतरपीक’ म्हणतात. मुख्य पीक एकदल असेल, तर आंतरपीक द्विदल आणि मुख्य पीक द्विदल असेल, तर आंतरपीक एकदल असावे. द्विदल धान्याच्या रोपांच्या मुळांवर गाठी असतात. या गाठींमध्ये वातावरणातील नत्र (नायट्रोजन) मातीत खेचणारे ‘नत्राणू (Nitrogen Fixing Bacteria)’ असतात. यांच्यामुळे सोबत असलेल्या एकदल पिकांना नत्र (नायट्रोजन) उपलब्ध होते. एकदल पिकांच्या मुळांवर जे जीवाणू (बॅक्टेरिया) असतात, ते नत्राणूंना त्यांच्या वाढीसाठी आवश्यक ती साखर पुरवतात. अशा नैसर्गिक सहजीवनामुळे दोन्ही पिकांचे उत्पन्न वाढते आणि मातीमध्ये ‘यूरिया’सारखी रासायनिक खते देण्याची आवश्यकताच रहात नाही.’ – सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२०.८.२०२२)

 

२. चालू शेतीत आंतरपीक म्हणून लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती

औषधी वनस्पतींची चालू शेतीतही आंतरपीक म्हणून लागवड करता येते. कोणत्या पिकामध्ये कोणत्या वनस्पती लावता येतात याची सूची पुढे दिली आहे.

 

 

३. पडीक भूमीमध्ये, अत्यल्प श्रमांमध्ये, तसेच केवळ
पावसाच्या पाण्यावर लागवड करता येण्याजोग्या औषधी वनस्पती

३ अ. रानावनांत औषधी वनस्पतींची लागवड करावी न लागणे

रानावनांत अनेक औषधी वनस्पती असतात. तेथे कोणी या वनस्पतींची लागवड केलेली नसते. एखाद्या झाडाचे बी मातीत पडते. पावसाळ्याच्या दिवसांत परिस्थिती अनुकूल झाल्यावर ते बी अंकुरते. वनामध्ये झाडांचा पालापाचोळा पडून माती सुपीक झालेली असते. या सुपीक भूमीत अशा वनस्पती वाढतात. या वनस्पतींना पावसाचे पाणी पुरेसे होते. पाऊस संपल्यावर दव आणि हवेतील आर्द्रता, तसेच भूमीतील ओलावा यांच्यावर या वनस्पती जगतात.

३ आ. स्वतःकडील भूमी विनावापर पडीक ठेवण्यापेक्षा त्यावर औषधी वनस्पती लावणे लाभदायक असणे

आजकाल सर्वत्रच ‘शेतीकामासाठी कुणी कामगार मिळत नाही आणि मिळाला, तरी त्याची मजूरी परवडत नाही’, अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत अत्यल्प श्रमांमध्ये, तसेच न्यूनातिन्यून व्ययामध्ये औषधी वनस्पतींची लागवड करता येऊ शकते. काही जणांकडे मोठी भूमी विनावापर पडून असते. या भूमीवर पावसाळ्याच्या दिवसांत औषधी वनस्पतींचे बी टाकल्यास त्यातील काही वनस्पती तरी उगवून येतील. भूमी विनावापर पडीक ठेवण्यापेक्षा अशा भूमीमध्ये थोडेसे प्रयत्न करून बीजारोपण करणे कधीही चांगलेच नाही का ?

३ इ. पावसाळ्यात प्रत्येकालाच स्वतःच्या क्षमतेनुसार औषधी वनस्पतींचे बीजारोपण करणे शक्य असणे

पुढे केवळ पावसाच्या पाण्यावर वाढू शकतील अशा औषधी वनस्पतींची माहिती दिली आहे. ही माहिती पाहिल्यावर लक्षात येईल की, यांतील काही वनस्पती केवळ औषधांसाठीच नव्हे, तर कुंपण म्हणून, तसेच फुले आणि फळे मिळवण्यासाठीही लावता येतील. स्वतःकडील भूमीच्या उपलब्धतेनुसार यांतील शक्य तेवढ्या वनस्पती लावाव्यात. स्वतःजवळ भूमी नसल्यास आपल्या शेजार्‍यांच्या किंवा मित्रांच्या भूमीमध्येही त्यांच्या अनुमतीने पावसाळ्यात बीजारोपण करावे. बीजारोपण करतांना पुढे झाड मोठे झाल्यावर त्याचा अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. औषधी वनस्पती शास्त्रीय पद्धतीने, म्हणजेच योग्य खड्डा खोदून रोप लावणे, अशा प्रकारे लावल्यास त्यांच्या जगण्याचे, तसेच वाढीचे प्रमाण चांगले असते. पावसाच्या आरंभी वृक्षवर्गीय वनस्पतींची ४ ते ६ फूट उंचीची परिपक्व रोपे लावल्यास त्यांचे जगण्याचे प्रमाण चांगले असते. पाऊस संपतांना वनस्पतींच्या रोपांभोवती आळी करून त्यांत पालापाचोळा पसरून ठेवल्यास पावसानंतर झाडाला १५ ते ३० दिवसांनी एकदा पाणी दिले, तरी पुरते. लहान झाडे, वेली, झुडुपे, वृक्ष आदींची लागवड योग्य प्रकारे कशी करावी, याचे विवेचन सनातनचा ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?’ यात केले आहे.

३ ई. अत्यल्प श्रमांमध्ये लागवड करता येण्याजोग्या औषधी वनस्पती

३ इ १. कुंपण म्हणून किंवा कुंपणाच्या कडेला लावता येण्याजोग्या वनस्पती
वनस्पती लॅटिन नाव कोणत्या विकारांत उपयोगी ? औषधासाठी उपयुक्त अंग लागवडीसाठी
उपयुक्त अंग
१. एरंड Ricinus communis वातविकार, पोटाचे विकार आणि दमा पाने, मूळ आणि बी बी किंवा खोडाचे छाट
२. खैर Acacia catechu पित्त आणि रक्त यांचे विकार, त्वचेचे विकार आणि खोकला साल आणि कात बी
३. चोपचिनी Smilax glabra ताप, संधीवात आणि गुप्तरोग मूळ बी किंवा खोडाचे छाट

 

एरंड
एरंड

 

चोपचिनी
चोपचिनी

 

 

३ इ २. फुलझाडे
वनस्पती लॅटिन नाव कोणत्या विकारांत उपयोगी ? औषधासाठी उपयुक्त अंग लागवडीसाठी उपयुक्त अंग
१. आपटा Bauhinia racemosa मूत्रवहनसंस्थेचे विकार साल, पाने आणि शेंग बी
२. उंडी Calophyllum inophyllum पित्त आणि रक्त यांचे विकार फूल आणि बी बी
३. कांचनार Bauhinia variegata शरिरावरील गाठी आणि भगंदर साल बी

 

३ इ ३. फळझाडे
वनस्पती लॅटिन नाव कोणत्या विकारांत उपयोगी ? औषधासाठी उपयुक्त अंग लागवडीसाठी उपयुक्त अंग
१. चारोळी Buchanania lanzan लघवीला जास्त प्रमाणात होणे आणि जुनाट ताप बी बी

 

३ इ ४. औषधी वनस्पती
वनस्पती लॅटिन नाव कोणत्या
विकारांत उपयोगी ?
औषधासाठी उपयुक्त अंग लागवडीसाठी उपयुक्त अंग
१. काकमाची (मकोय) Solanum nigrum घशाचे विकार आणि बद्धकोष्ठता पंचांग बी
२. कोंबडनखी Tectaria cicutaria शरिरावरील गाठी मूळ मुनवे (सकर्स)
३. गोखरू (सराटे) Tribulus terrestris मूत्रवहनसंस्थेचे विकार पंचांग बी

 

कोंबडनखी
कोंबडनखी

 

 

४. लागवडीची आवश्यकता नसलेल्या; परंतु
भोवतालच्या परिसरातून हेरून ठेवण्याजोग्या औषधी वनस्पती

४ अ. आपोआप उगवणार्‍या औषधी वनस्पतींची ओळख होणे आवश्यक असणे

काही वनस्पती निसर्गतःच पुष्कळ मोठ्या प्रमाणात उगवत असतात. पावसाळ्यात तणस्वरूपात उगवणार्‍या अनेक वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म असतात. टाकळा, मोठी नायटी (दुधाणी), एकदंडी, बला, पुनर्नवा यांसारख्या वनस्पती तर आपण प्रतिदिन पहात असतो; पण ‘त्या औषधी वनस्पती आहेत आणि त्यांचा विकार बरे करण्यासाठी उपयोग होऊ शकतो’, हेच आपल्याला ठाऊक नसते. निसर्गामध्ये तण स्वरूपात मोठ्या प्रमाणात उगवणार्‍या वनस्पतींची वेगळी लागवड करण्याची आवश्यकता नसते; परंतु आपल्याला अशा वनस्पतींची ओळख होणे आणि त्या आपल्या भोवताली कुठे मिळतात, हे ठाऊक असणे आवश्यक असते. यासाठी अशा वनस्पती आपल्या भोवतालच्या जागेत कुठे आहेत, हे हेरून ठेवावे. जाणकारांना विचारून आपण ओळखलेल्या वनस्पती योग्य आहेत ना ? याची निश्‍चिती करून घ्यावी. यामुळे त्या औषधी वनस्पतींची जेव्हा आवश्यकता भासेल, तेव्हा आयत्या वेळी त्या शोधण्यातील वेळ वाचवता येईल. अशा वनस्पतींचे औषधी उपयोग, गुणधर्म, तसेच त्यांच्यापासून विविध औषधे कशी बनवावीत, याची सविस्तर माहिती सनातनची ग्रंथमालिका ‘आयुर्वेदीय औषधी (४ खंड)’ यात दिली आहे.

४ आ. औषधासाठी कोणतीही वनस्पती घेण्यापूर्वी लक्षात घेण्याची महत्त्वाची सूत्रे

१. घाण, दलदल, स्मशानभूमी आदी ठिकाणची वनस्पती औषधाकरता घेऊ नये.

२. औषधी वनस्पती घेणार असू तेथील भूमीच्या अवतीभोवती प्रदूषण निर्माण करणारे, विशेषतः हानीकारक रसायने सोडणारे कारखाने नसावेत.

३. बुरशी किंवा कीड लागलेली, तसेच रोगट वनस्पती औषधासाठी घेऊ नये.

४. विषारी वृक्षावरील औषधी वनस्पती घेऊ नयेत, उदा. कुचल्याच्या (काजर्‍याच्या) झाडावरील गुळवेल घेऊ नये.

५. पावसाळ्यात उगवणार्‍या बर्‍याच वनस्पती पावसाळा संपल्यावर वाळून जातात. अशा वनस्पती पाऊस संपल्यावर पुरेशा प्रमाणात जमा करून सावलीत वाळवून ठेवल्यास त्या आपल्याला वर्षभर वापरता येतात.

६. औषधी वनस्पती तोडून आणल्यावर ती स्वच्छ पाण्यामध्ये २ – ३ वेळा धुवून घ्यावी.

 

वनस्पती लॅटिन नाव कोणत्या विकारांत उपयोगी ? औषधासाठी उपयुक्त अंग लागवडीसाठी उपयुक्त अंग
१. आघाडा Achyranthes aspera प्लीहेचे विकार, मूत्रवहनसंस्थेचे विकार आणि मूळव्याध पंचांग बी किंवा खोडाचे छाट
२. एकदंडी Tridax procumbens व्रण (जखम), संधीवात, अर्धशिशी, जुलाब आणि कर्करोग पंचांग बी किंवा खोडाचे छाट
३. कासविंदा Cassia occidentalis ताप, खोकला, दमा, यकृताचे विकार आणि त्वचाविकार पंचांग बी किंवा खोडाचे छाट
४.कुरडू (हरळू) Celosia argentea मूत्रवहनसंस्थेचे विकार बी बी किंवा खोडाचे छाट
५. कोळसुंदा (तालीमखाना) Hygrophila schulli मूत्रवहनसंस्थेचे विकार बी बी किंवा खोडाचे छाट

 

आघाडा
आघाडा

 

एकदंडी
एकदंडी

 

कुरडू (हरळू)
कुरडू (हरळू)

 

कोळसुंदा (तालीमखाना)
कोळसुंदा (तालीमखाना)

 

४ इ. वनस्पती सात्त्विकतेला प्रतिसाद देतात, याची उदाहरणे

अ. कोल्हापूर येथील सनातनच्या आश्रमाच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाला आश्रमाच्या बाजूने पुष्कळ आंबे लागले होते.
– श्री. संजय माने, कोल्हापूर सेवाकेंद्र (ऑक्टोबर २०१४)

आ. सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील प.पू. डॉ. आठवले यांच्या खोलीपासून जवळ असलेल्या पारिजातकाच्या झाडाच्या फांद्या खोलीच्या दिशेनेे झुकल्या आहेत. वर्षभर हे झाड फुलांनी पुष्कळ बहरलेले असते. आश्रमाच्या शेजारी असलेल्या आम्रवृक्षाच्या अन्य फांद्यांच्या तुलनेत प.पू. डॉक्टरांच्या खोलीच्या दिशेने असलेल्या फांद्यांना पुष्कळ आंबे लागतात. (संदर्भ : दैनिक सनातन प्रभात, १.३.२०१५)

इ. रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाच्या जागेत पुढील बाजूला असलेल्या नारळाच्या झाडांना आश्रमाच्या बाजूला नारळ जास्त येतात. वनस्पती सात्त्विकतेला प्रतिसाद देत असल्याने औषधी वनस्पतींची लागवड करतांना ती जास्तीत जास्त सात्त्विक होईल, यादृष्टीनेही प्रयत्न करायला हवेत.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड करा !’

Leave a Comment