नैसर्गिक साधनांनी साकारलेली आणि शेकडो वर्षे टिकणारी केरळ शैलीतील ‘म्युरल’(भित्ती) चित्रे !

‘केरळमधील अनेक मंदिरांच्या भिंतींवर एका विशिष्ट शैलीतील चित्रे आढळतात. ती मंदिरांची केवळ शोभाच वाढवत नाहीत, तर भाविकांसमोर पुराणांतील प्रसंग उभे करतात. सध्याच्या काळात घरांतील भिंतींचे रंगही काही वर्षांत फिके पडतात. त्या तुलनेत काही शतके जुनी असलेली ही चित्रे अजूनही टिकून आहेत, हे आश्‍चर्यच नव्हे काय ? या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्राचीन कलेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या साधकांनी २१ मार्च २०१९ या दिवशी केरळमधील सुप्रसिद्ध ‘म्युरल आर्ट गॅलरी’ला भेट दिली. तेथून केरळ शैलीतील ‘म्युरल’ (भिंतींवरच्या) चित्रकलेविषयी विस्तृत माहिती घेतली. ‘यु.ए.एस्.(युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या प्रभावळमापक वैज्ञानिक उपकरणाद्वारे म्युरल चित्रे, त्यासाठी वापरले जाणारे रंग आणि चित्रकार यांची चाचणी घेऊन त्यांच्यातील ऊर्जांचा अभ्यास केला. त्याचे निष्कर्ष, ‘म्युरल’ चित्रांविषयीची संक्षिप्त माहिती, आध्यात्मिक दृष्टीकोनातून ‘म्युरल’चित्रांचा केलेला अभ्यास आदी माहिती या लेखात दिली आहे.

राधा-कृष्णाचे भित्तीचित्र (नैसर्गिक रंगांनी रंगवलेल्या या चित्रात मुखावरील भाव, डोळ्यांतील जिवंतपणा आदी सुबकरित्या दाखवले आहे.)

 

१. ‘म्युरल’ चित्रे म्हणजे काय ?

‘म्युरल’चित्रे म्हणजे भित्तीचित्रे, म्हणजेच भिंतीवर काढली जाणारी चित्रे. ही रंगीत दगड आणि वनस्पतींची पाने यांपासून बनवलेले नैसर्गिक रंग यांनी रंगवलेली असतात. पूर्वी राजवाडे, श्रीमंतांचे प्रासाद, मंदिरे यांच्या भिंतींवर ही चित्रे काढली जायची. ही एक पारंपरिक कला आहे. आजही ही चित्रे काढतांना ‘ती रेखाटण्याची प्रक्रिया, तिच्यातील विविध टप्पे, त्यांचा क्रम’ आदींविषयी उपलब्ध पुरातन ग्रंथांमध्ये सांगितलेल्या माहितीनुसार काढली जातात.

 

२. भित्तीचित्रांचा इतिहास

भारतामध्ये सर्वांत पुरातन भित्तीचित्रे मध्यप्रदेशातील ‘भीमबेठका’ आणि महाराष्ट्रातील ‘अजंठा’ आणि ‘एलोरा’ येथील गुहांमध्ये आढळतात. केरळमध्ये या कलेला राजाश्रय मिळाला आणि ‘गुरुकुल’ पद्धतीच्या शिक्षणात या कलेचा विकास झाला. केरळमधील भित्तीचित्रांचा इतिहास पाहता, सर्वाधिक भित्तीचित्रे ही १५ व्या आणि १९ व्या शतकांत बनवलेली आहेत. भित्तीचित्रांच्या संख्येचा विचार करता भारतात राजस्थाननंतर केरळचा दुसरा क्रमांक लागतो. केरळ शैलीतील सर्वांत प्राचीन भित्तीचित्रे ही सध्याच्या तमिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यातील श्री थिरुनंदीकरा गुहेतील मंदिरांत आढळतात. केरळमधील ‘अलपुळ्ळा’ जिल्ह्यातील ‘कायमकुलम्’ येथील कृष्णपुरम् राजवाड्यातील ‘गजेंद्र मोक्ष’ हे एक मोठे भित्तीचित्र आहे. एर्नाकुलम् जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ‘मट्टेनचरी पॅलेस’ येथे रामायण आणि भागवत यांतील प्रसंग दर्शवणारी वैशिष्ट्यपूर्ण भित्तीचित्रे आहेत.

भिंतीवर रेखाटलेले कालियामर्दन देखाव्याचे चित्र

 

३. भित्तीचित्रे बनवण्याची प्रक्रिया

भित्तीचित्रकलेत रेखाटनापासून अंतिम चित्र बनवण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ही प्रदीर्घ आणि कष्टप्रद असते. तिच्यामध्ये साधारण पुढील टप्पे येतात.

३ अ. चित्र काढण्यासाठी सुयोग्य भिंत निवडणे

या प्रक्रियेचा आरंभ ज्यावर चित्र काढायचे ती भिंत निवडण्यापासून होतो. थेट सूर्यप्रकाश पडणार नाही, अशी मजबूत, सलग असलेली आणि खडबडीत नसलेली, हवेशीर ठिकाणची, न्यूनतम दमटपणा असणारी भिंत निवडतात. दमटपणा अधिक असल्यास भित्तीचित्रांच्या नैसर्गिक रंगांना बुरशी येऊ शकते.

३ आ. भिंतीवर विशिष्ट घटकांच्या मिश्रणाचा लेप देऊन त्यावर रेखांकन करणे

निवडलेल्या भिंतीवर चुना, नारळाचे पाणी आदींच्या मिश्रणाचे लिंपन केले जाते. त्यानंतर भिंतीवर चित्राचे रेखांकन करण्यात येते.

३ इ. केवळ नैसर्गिक रंगांचा उपयोग करून चित्र रंगवणे

रेखांकनानंतर चित्र रंगवण्यात येते. रंगकाम करण्यासाठी वापरण्यात येणारे कुंचले (ब्रश) आणि रंग हे नैसर्गिक असतात. अनुभवी तज्ञ व्यक्ती वनस्पतींचे अर्क, पाने, दुर्मिळ माती आणि दगड यांपासून विशिष्ट पद्धतीने हे रंग बनवतात. लाल, हिरवा, पिवळा, निळा, काळा आणि पांढरा हे रंग प्रामुख्याने वापरले जातात. कुंचले आणि रंग कशापासून बनवतात, ते पुढे दिले आहे.

घटक कशापासून बनवतात ?
१. लेखणी (टीप) किट्टालेखणी (काळा दगड आणि गोमय यांचे मिश्रण)
२. रंग
२ अ. पिवळा पिवळा दगड
२ आ. लाल लाल दगड
२ इ. निळा निळीच्या झाडाची पाने (नीलामरी) किंवा कट्टेनीलम् (चायनीज ब्लू)
२ ई. हिरवा निळा रंग आणि ‘एरविक्करा’ (एक प्रकारची वनस्पती) यांचे मिश्रण
२ उ. काळा दिव्याची काजळी
२ ऊ. पांढरा चुना
३. कुंचला ‘इयमपुल्लु’ किंवा ‘कुंटलीपुल्लु’ (‘एरो ग्रास’ किंवा ‘एलिफंट ग्रास’)
हे नदीकिनारी उगवणारे एक प्रकारचे गवत

 

४. भित्तीचित्रे बनवण्याच्या प्रक्रियेतील काही वैशिष्ट्ये

४ अ. देवतेच्या ध्यानमंत्रावर मन एकाग्र करणे

ज्या देवतेचे चित्र बनवायचे, त्या देवतेच्या मुखमंडलावरील भाव व्यवस्थित यावेत, तसेच चित्रातील रंगछटा, देवतांनी परिधान केलेल्या अलंकारांची नक्षी, विविध भावमुद्रा आदी प्रसंगानुरूप योग्य असावी, यासाठी कलाकार त्या देवतेच्या ध्यानमंत्रावर मन एकाग्र करून रंगकाम करतो.

४ आ. कलाकाराने धार्मिक आचारांचे पालन करणे आवश्यक असणे

चित्र काढत असतांना ठरलेल्या धार्मिक आचारांचे काटेकोरपणे पालन करणे आणि व्रतस्थपणे राहणे, हे कलाकारासाठी आवश्यक असते.

४ इ. भित्तीचित्रातील व्यक्तीरेखांचे रंग त्यांच्या त्रिगुणात्मक प्रकृतीनुसार असणे

भित्तीचित्रातील व्यक्तीरेखांचे रंग हे त्या व्यक्तीरेखांच्या त्रिगुणात्मक प्रकृतीनुसार असतात. सात्त्विक किंवा आध्यात्मिक व्यक्तीरेखा (उदा. श्रीराम) हिरव्या रंगाच्या छटांनी रंगवतात. राजसिक व्यक्तीरेखा लाल किंवा सोनेरी रंगाच्या छटांनी रंगवतात. तामसिक किंवा वाईट व्यक्तीरेखा (उदा. रावण) काळ्या किंवा पांढर्‍या रंगाच्या छटांनी रंगवतात.

 

५. काळानुसार या कलेत झालेला पालट

पूर्वी या शैलीतील चित्रे भिंतीवर बनवली जायची; पण आता ती कागद, ‘कॅनव्हास’, फुलदाणी यांवरही काढली जाऊ लागली आहेत.

 

६. लुप्त होत चाललेल्या; पण पर्यटकांचे आकर्षण
असलेल्या भित्तीचित्रकलेचे भविष्य उज्ज्वल असणे

भित्तीचित्रे ही केरळमध्ये येणार्‍या देशविदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचा एक मुख्य विषय आहे. या कलेच्या संवर्धनासाठी ‘वास्तुविद्या गुरुकुलम्’ आणि अन्य समविचारी संघटना अन् व्यक्ती प्रयत्नरत आहेत. देशातून आणि विदेशातून अनेक चाहते देत असलेल्या प्रोत्साहनामुळे लुप्त होत असलेली ही प्राचीन कला तग धरून आहे आणि भविष्यात तिचा विकास होणार, हे निश्‍चित आहे.’

 

७. भित्तीचित्रांचे ‘यु.ए.एस्.(युनिव्हर्सल ऑरा
स्कॅनर)’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे परीक्षण करणे

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

७ अ. ‘यु.ए.एस्’ उपकरणाची ओळख

‘या उपकरणाला ‘ऑरा स्कॅनर’ असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि तिची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगण येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम् मूर्ती यांनी वर्ष २००५ मध्ये विकसित केले. ‘वास्तूशास्त्र, वैद्यक शास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्‍या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे’, असे ते सांगतात. (‘यु.ए.एस्’ उपकरणाविषयीच्या अधिक माहितीसाठी पहा : http://www.vedicauraenergy.com/universal_scanner.html)

७ आ. भित्तीचित्रे आणि भित्तीचित्रकलेतील रंग, कुंचला आदी नैसर्गिक घटक यांमध्ये
सकारात्मक ऊर्जा असणे आणि त्यांची प्रभावळ तत्सम सर्वसाधारण वस्तूंच्या तुलनेत अधिक असणे

२१.३.२०१९ या दिवशी ‘वास्तुविद्या गुरुकुलम्’ येथे काही भित्तीचित्रांची आणि भित्तीचित्रकलेत वापरल्या जाणारे नैसर्गिक रंग अन् कुुंचला (ब्रश) यांची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपरणाद्वारे चाचणी केली असता मिळालेल्या मोजण्यांच्या नोंदी पुढीलप्रमाणे आहेत.

भित्तीचित्रांमध्ये सात्त्विकता
असण्यामागील अध्यात्मशास्त्र
भित्तीचित्रे
काढणारे
चित्रकार
कृत्रीम रंगांनी
रंगवलेले श्री
गणपतीचे चित्र
नैसर्गिक रंगांनी
रंगवलेले
श्रीविष्णूचे चित्र
नैसर्गिक रंगांनी
रंगवलेले
श्रीविष्णूचे चित्र
नैसर्गिक
हिरवा रंग
नैसर्गिक
लाल रंग
नैसर्गिक
पिवळा रंग
नैसर्गिक
पांढरा रंग
कुंचला
बनवण्याचे
गवत
‘यु.ए.एस्.’ उपकरणाद्वारे नोंद घेतल्याची वेळ दुपारी ४.५० दुपारी ४.४५ दुपारी ४.४० दुपारी ४.३० दुपारी ४.१० दुपारी ४.१८ दुपारी ४.१५ दुपारी ४.२१ दुपारी ४.०३
१. नकारात्मक ऊर्जा
१ अ. इन्फ्रारेड ऊर्जा
१ आ. अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा
२. सकारात्मक ऊर्जा
अ. स्कॅनरने केलेला कोन (अंश) ९० १८० १८० १८० ९० १८० १८० १८० ४५
आ. प्रभावळ (मीटर) १.६१ २.६४ ०.४० ०.५४ १.०० १.६०
३. एकूण प्रभावळ
अ. स्कॅनरने केलेला कोन (अंश) १८० १८० १८० १८० १८० १८० १८० १८० १८०
आ. प्रभावळ (मीटर) २.६२ २.५५ ४.७० २.०५ २.८१ २.८१ ३.२७ ३.३१ २.४८

वरील नोंदी पाहिल्यास हे स्पष्ट होते की, भित्तीचित्रे, रंग आणि कुंचला आदींपैकी कशातही नकारात्मक ऊर्जा मुळीच नाही. या सर्वच घटकांमध्ये सकारात्मक ऊर्जा आहे आणि सर्वच घटकांची एकूण प्रभावळ सर्वसाधारण वस्तूच्या एकूण प्रभावळीपेक्षा एक मीटरहून अधिक आहे. नैसर्गिक रंगांत पारंपरिक पद्धतीने बनवण्यात आलेल्या श्रीविष्णूच्या भित्तीचित्राची प्रभावळ ही कृत्रिम रंगांत बनवलेल्या श्री गणपतीच्या चित्राच्या प्रभावळीपेक्षा अधिक आहे. याचे मुख्य कारण ‘कृत्रिम घटकांपेक्षा नैसर्गिक घटक सात्त्विक असतात’, हे आहे. ही सात्त्विक कला जोपासणार्‍या चित्रकारातही सकारात्मक स्पंदने आहेत, तसेच या कलेचे शिक्षण जेथे दिले जाते, तेथील मातीतही सकारात्मक स्पंदने पुष्कळ प्रमाणात आहेत, हेही वैशिष्ट्यपूर्ण आहे.

 

८. भित्तीचित्रांमध्ये सात्त्विकता असण्यामागील अध्यात्मशास्त्र

‘भित्तीचित्रे काढणे’ हा केवळ छंद नव्हता, तर त्याही पलीकडे जाऊन त्यातून त्या कलाकाराची साधना होत होती. साधना म्हणून केलेल्या कृतींमध्ये ईश्‍वराचे अधिष्ठान असते. त्यामुळे अशा कलाकृतींमध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण होते. त्याचा लाभ त्या कलाकृती बनवणार्‍या कलाकारालाच नव्हे, तर त्या कलाकृती पहाणार्‍यांनाही होतो. चैतन्ययुक्त कलाकृतीकडे पाहून आनंद जाणवणे, भाव जागृत होणे, ध्यान लागणे, कलाकृतीचा विषय असलेल्या देवतेचे अस्तित्व जाणवणे आदी अनुभूती येतात. ‘भित्तीचित्रे काढणे’ यातून कलाकाराची साधना कशी होत होती, हे पुढील सूत्रांवरून लक्षात येईल.

८ अ. कलाकृतीच्या निर्मितीतील घटक सात्त्विक असणे

कलाकृतीच्या निर्मितीसाठी आवश्यक घटक, उदा. रंग नैसर्गिक आहेत. त्यामुळे भित्तीचित्रे सात्त्विक आहेत.

– कु. प्रियांका विजय लोटलीकर आणि श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.

 

लुप्त होत असलेल्या भित्तीचित्रकलेच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणारी ‘म्युरल आर्ट गॅलरी’ !

ब्रिटिशांच्या काळात लुप्तप्राय झालेल्या या प्राचीन कलेच्या संरक्षणासाठी काही व्यक्ती आणि संघटना कार्यरत आहेत. त्यांपैकी एक म्हणजे ‘म्युरल आर्ट गॅलरी’. केरळ येथील ‘पथनमथित्ता’ जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आरनुमळा पार्थसारथी मंदिराच्या जवळ ‘वास्तुविद्या गुरुकुलम्’ अंतर्गत ‘म्युरल आर्ट गॅलरी’ आहे. ती केरळ शैलीच्या भित्तीचित्रांचे संरक्षण आणि संवर्धन करून त्यांची लोकप्रियता वाढावी, यासाठी प्रयत्नरत आहे. या संस्थेच्या माहितीपत्रकात ‘म्युरल आर्ट गॅलरी’च्या स्थापनेचा उद्देश दिला आहे, तो असा – ‘केरळमध्ये भित्तीचित्रे अधिक प्रमाणात मंदिरांच्या भिंतींवर आहेत; पण अनेक मंदिरांमध्ये हिंदूंव्यतिरिक्त इतरांना प्रवेश नाही. त्यामुळे समाजातील काही जणांना मंदिरांतील या अद्वितीय भित्तीचित्रांचा आनंद घेता येत नाही. यासाठी वास्तुविद्या गुरुकुलम्ने ‘म्युरल आर्ट गॅलरी’ची निर्मिती केली आहे. हे कलादालन सर्वांसाठी खुले आहे आणि तेथे भित्तीचित्रकलेची संपूर्ण प्रक्रिया विस्तृतपणे जाणून घेता येते. या ठिकाणी विविध विषयांवरील साधारणपणे ५० भित्तीचित्रे ठेवलेली आहेत.’

‘म्युरल आर्ट गॅलरी’ आणि ‘वास्तुविद्या गुरुकुलम्’, आरनुमळा, केरळ येथील चित्रकार श्री. सुरेशकुमार यांची ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या प्रतिनिधींनी २१ मार्च २०१९ या दिवशी भेट घेतली अन् भित्तीचित्रकलेविषयी त्यांच्याकडून जाणून घेतले. त्या वेळी त्यांनी भित्तीचित्रकलेचा इतिहास, प्रक्रिया, वैशिष्ट्ये आदींविषयी विस्तृतपणे माहिती दिली. त्यांनी भित्तीचित्रकलेत वापरले जाणारे काही नैसर्गिक रंग आणि कुंचला बनवण्यासाठी वापरले जाणारे गवत संग्रहासाठी दिले, तसेच त्या सर्वांची वैज्ञानिक चाचणी आणि चित्रीकरण करण्याची अनुमतीही दिली, यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय त्यांचे अत्यंत आभारी आहे !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment