ज्येष्ठ समर्थभक्त पू. मारुतिबुवा रामदासी (भोसले) यांचा देहत्याग

सातारा – श्रीक्षेत्र सज्जनगड येथील ज्येष्ठ समर्थभक्त पू. मारुतिबुवा रामदासी (भोसले) (वय ८४ वर्षे) यांनी १९ ऑक्टोबरच्या सायंकाळी ६ वाजता समर्थसदन येथे देहत्याग केला. श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने त्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारत आणि भारताबाहेरही समर्थ संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला. ते श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह होते. अखेरच्या श्‍वासापर्यंत त्यांनी श्री समर्थसेवा प्रमाण मानून राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे व्रत अंगीकारले होते. श्री समर्थ विचार केवळ समाजाला न सांगता, ते त्यांच्याकडून आचरणात कसे येईल, यासाठी ते तळमळीने प्रयत्न करत असत. श्रीक्षेत्र सज्जनगड येथील अनेक वास्तू उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. प.प. श्रीधरस्वामींचे ते अनुग्रहित शिष्य होते. त्यांच्या करुणामय आवाजातील मनाचे श्‍लोक अखिल भारताला सर्वश्रृत आहेत. पुणे आकाशवाणी केंद्रवारून ‘साक्षेप समर्थांचा’ या कार्यक्रमाद्वारे त्यांनी श्रीसमर्थ विचार सातासमुद्रापलीकडे नेले. श्री समर्थ संप्रदायातील अनेक ग्रंथांचे त्यांनी लेखन केले असून अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.

 

पू. मारुतिबुवा रामदासी यांचे सनातन संस्थेवरील प्रेम

पू. मारुतिबुवा रामदासी यांचे सनातन संस्थेवर पुत्रवत् प्रेम होते. राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी अत्यंत तळमळीने कार्य करणारी एकमेव संघटना म्हणून ते सनातन संस्थेचा उल्लेख करत असत. सनातन संस्थेच्या कार्याला नेहमीच त्यांचे भरभरून आशीर्वाद लाभले. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना ते आदराने ‘गुरुजी’ असे संबोधत असत. कार्यासाठी त्यांच्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी गेल्यावर ते नेहमी गुरुजी (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) यांच्या प्रकृतीची चौकशी करत असत. सनातन संस्थेवर चुकीचे आरोप होत असतानाही ते खंबीरपणे सनातन संस्थेच्या पाठीशी उभे राहिले होते. कित्येक वेळा अंथरुणाला खिळून असतांनाही त्यांनी सनातन संस्थेच्या कार्यासाठी आशीर्वादरूपी लिखाण करून दिले आहे. सनातन परिवार पू. मारुतिबुवा रामदासी यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment